Sunday, May 19, 2019

               
सोऽहं-हंसोपनिषद
                   अर्थात

                 ( क्रमश :-१७ )             
            श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
                यांच्या साहित्यातील
                ( चाकोरीबाहेरचे )
            मराठीतील पहिले उपनिषद            
           “ एक तत्व नाम दृढ धरी मना

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठा बद्दल माहिती नाही असा मराठी वाचक विरळा असेल. त्याच हरिपाठात, वरील अभंग २६ मधे, दोनदा नामाचा तत्व असा उल्लेख येतो. तत्व अविनाशी असतं.

ॐ’ काररूपी स्फुरणाने परमात्म्याला शक्ति-तत्वाचं स्वरूपदर्शन झालं.ते नामाच्या रूपे संत-मुखांतून सबीज होत विश्वबांधवानां प्राप्त होतं

नामही अविनाशी आहे. जीव आणि शिव यांनां जोडणारं नाम हा जीवब्रह्मैक्या साठीचा दुवा, द्वैतातून अद्वैताकडे नेणारा पूल, सांधा आहे.

नाथपंथातील, नामाची पार्श्वभूमी थोडी अशी अाहे . श्रीगहिनीनाथांनीं संप्रदायातील रुक्षपणा भक्तीनामाच्या गोडीनं कमी केला. ते कृष्ण नामी रंगलेले महाराष्ट्रीयन होते. त्यांनीं निवृत्तीनां  तीच उपासना दिली. श्रीनिवृत्तीनाथांनी अनुग्रहाचे वेळीं माऊलींनां हरिनाम दिलं. अखंड नामस्मरण केल्यामुळे श्राज्ञानदेवांनां भगवंताचे दर्शन झालं
माऊलींच्या  स्वानुभवाचं, स्वानंदाचं, काव्यात्मक शब्दलेणं म्हणजे हरिपाठ

उत्तर वैदिककालीन विचारात स्वरुप साक्षात्कार अपरोक्ष अनुभव हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आणि स्वरुपानुसंधान,अद्वैत वेदांताचं अधिष्ठान झालं. त्यासाठी श्रवण-मनन, निदिध्यासन मार्ग श्रुतींनी दाखविला. यातून ईश्वरी-कल्पना भक्ती आणि श्रद्धेचे अनुसार वेगवेगळ्या देव-देवतांचे भजन-पूजन, नाम-संकीर्तन यांचा उदय झाला.

इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की भारतीय धर्मदृष्टी ही सर्वसमावेशक व सहिष्णु आहे. अंतर्यामी, अद्वितीय, सर्वात्मक ईश्वराची देवतात्मक अनंत नामरूपे भलेही असोत पण या सर्वांचे अधिष्ठान आत्मसत्ता, आत्म-रुप आहे ही वास्तव भूमिका आहे. त्यात सांप्रदायिक कलह/अभिनिवेशाला स्थान नाही. याबाबतीत ऋषींचे प्रज्ञान व साक्षात्कारी संतांचे खालील वैचारिक बैठकीमुळे, एकमत आहे.

“ आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागर । सर्वदेव नमस्कार केशवं प्रतिगच्छती ”॥ अर्थात्

आकाशातून पडलेले पाणी जसे सागरात जाऊन मिळते, तद्वतच कोणात्याही देवाला केलेला नमस्कार केशवालाच पोचतो.

असाच प्रकार नामाच्या बाबतीतही आहे. आणि हे मत आहे माऊलींच्या हरिपाठाचे सखोल सार्थ विवरण-कर्ता तत्वज्ञानाचे प्रा.के.वि.बेलसरे यांचं
त्यांनी लिहिलं आहे-“ भगवंताच्या नामांत ज्याचे अंतरंग रमू लागते त्याचे अंत:करण शुद्ध म्हणजे सूक्ष्म होत जाते. शुद्ध अंत:करण व्यापक बनते. व्यापकपणाने साध्य व साधन ( म्हणजे भगवंत व त्याचे नाम ) यामधील अंतर कमी होत जाते. अखेर नामाला इतकी सूक्ष्मता येते, की नाम आणि भगवंत या दोघांमधे फरक दाखवणे अशक्य होते. तसेच नाम घेणारा जो मी तो एक नामरूप तरी होतो किंवा भगवद्रूप होऊन सोऽहं म्हणू लागतो.”
ही गोष्ट सर्वविदीत आहे, की शीख, ख्रिश्चन, इस्लाम बांधवही नामस्मरण करतात.             
श्रीस्वामी स्वरूपानंद (पांवस) यांचे साहित्यात   सोऽहं-हंसोपनिषदचाकोरीबाहेरचे मराठी तील पहिले उपनिषद प्रतीत होण्याचं कारण कीं त्यांनी कालानुरुप बदल करुन नाम व भक्तीच्या पायावर ‘सोऽहंचा सोपा मार्ग विश्वाला दिला.
स्वामींची वर-प्रार्थना, केवळ आठ चरणांत अष्टांग योगासारखी द्वैतातून अद्वैताकडे जाणारा एक परिपूर्ण असा साधना मार्ग शिकवते. म्हणून त्यातील एक कडवे (६) सोऽहं-हंसोपनिषदाचा शांतिपाठ म्हणून निवडले.

स्व.प.मं. तील ६/१२ मधे श्रीस्वामीनी लिहिलंय
“ असो; संसार व्हावया मोक्षमय। सांगतो अति सुगम उपाय । भावार्थ गीतेचा द्वादशाध्याय । होऊनि तन्मय वाचावा ॥ ४२/७ या पत्रांतही अ.१२ पठण करा लिहिलंय.
भगवंत भक्तांबद्दल असं सांगतात-

निज-नामाची नौका साची । त्यांत बसवुनी त्यांतें । जन्म-मृत्यु-भव-सागरांतुनी नेईं पैलतिरातें ”॥भा.गीता १२/२५॥

आधींच्या लेखांत उल्लेख केला तसा स्वामींनी“ ॐ रामकृष्ण हरि ” हा मंत्र समाधीपूर्वी स्वत: सांगून सबीज केला व करवून घेतला. त्यांनी हा नामाचा वसा आमचे मामा वै.भाऊराव देसाईंना दिला. त्यांनीं १००१ कोटी जपाचा संकल्प केला (स्वामी कृपांकित कर्मयोगी भाऊ पृष्ठ १९-१०७)
नामजपात आमच्या आईचे मोठे योगदान आहे.

कोटीच्या कोटी आवर्तने झालेल्या या जपाने व आजतागायत ३६५ दिवस श्रीक्षेत्र पांवसला होत असलेल्या या नाम-मंत्राला आता क्षेपणास्त्राची गती आली आहे. आपण ज्या वाहानात बसतो तीच गती आपल्याला मिळते हा साधा विज्ञानाचा नियम.

मध्यंतरी एकदा माझे आवडते कलाकार श्री प्रशांत दामले यांना दूरदर्शन वर गातांना ऐकलं-
मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !

तेंव्हा सहज मनांत आलं, याचं सोपं उत्तर आहे-

बैसोनि घरात । करा एकचित्त । आळवा हा फक्त । नाम-मंत्र ॥

श्रीस्वामींनी आपल्याला दिलेल्या नामाच्या या  क्षेपणास्त्रात बसून घर बसल्या काय सुख मिळतं, पहा तर खरं. नाहीतर, असं करा कीं-
“ The Art of Happy Living सुखी जीवनाची कला ” हा YouTube video पहा आणि श्रीक्षेत्र सहलीबरोबरच श्रीस्वामींच्या समाधी मंदिरात चाललेल्या नाम-मंत्राचा आनंद घ्या.
आज नारदजयंतीच्या शुभमुहूर्तावर या लेख-मालेतील हे पुष्प प्रेरणास्रोत सद्गुरूचरणीं समर्पण.

सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरु श्रीस्वामी स्वरुपानंदाय नम:
                                              माधव रानडे
ranadesuresh@gmail.com        

No comments: