Tuesday, June 4, 2019

              “ सोऽहं-हंसोपनिषद
                       अर्थात
                  
x

 
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
           यांच्या साहित्यातील
                 ( चाकोरीबाहेरचे )
             मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश :-१८ )
            “ तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे

वरकरणी विरोधात्मक वाटणाऱ्या या विधानाबद्दल, ओवीच्या पुढच्याच चरणात माऊली सांगतात-     
    “ हें अनुभवाचिजोगें नोहेबोलाऐसें ”॥
             ज्ञानेश्वरी १८/११५१॥  
या ओवीच्या सुरवातीला माऊली म्हणतात कीं अद्वैतात क्रिया संभवत नाही हे खरं असलं, तरी आत्मज्ञान, झालेला ज्ञानी-भक्त, अद्वैतांत भक्ति सुख अनुभवतो. खरंतर या अवस्थेमधे हा भक्त मनानं किंवा देहानं वेगळीकेनं उरलेला नसल्यानं, परमात्म्याशी एकरूप झाल्याने सुखरूप होतो. भोगितेपणही विसरल्यानं सुखचि उरे स्वरूपें तसं

गीता अ.१८/५५ वरील ११६ ओव्यांपैकी ही एक या सर्वच ओव्या मननीय आहेत.या श्लोकाचं व ओव्यांचं सार, स्वामींच्या पुढील साक्यांत पहा-

“ मद्भक्तीनें यथार्थ जाणे असे केवढा कोण । माझ्या ठायीं विलीन होई मग यथार्थ जाणून॥ ऐशा रीती जी अद्वैतीं भक्ति संभवे पूर्ण । आत्मानुभवी तो चि अनुभवी अनिर्वाच्य ती खूण ”॥
भावार्थ गीता १८/८९ व ९८

या साक्यांतील सर्वच शब्द चपखल आणि अर्थवाही आहेत व श्लोकाचे मर्म/भाव नेमका पोचवतात.

गी.अ. ११/५४ मधेही भगवंत स्पष्ट सांगतात कीं अनन्यभक्तीनेच, माझे ज्ञान होणे, मला पहाणेतत्वत: माझ्या ठायी प्रवेश करणें शक्य आहे यावरील निरुपणात माऊली शेवटी समजावतात

“ तैसे माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं अवधारी । द्वैत जाय ॥ मग मी तूं हे आघवें।एक मीचि आथी स्वभावें। किंबहुना सामावेसमरसें तो॥” ज्ञा.११/६९४/९५

द्वैताला कारणीभूत असणारा अहंकार. तो लोप पावल्यामुळे मी तूं हे सर्व संपून अनन्य भक्ताचा जीव, शिवरूप होतो. तो जीवब्रह्मैक्य अनुभवतो. स्वामींच्या साक्यात हाच भाव छान व्यक्त होतो.

“ मिळे सागरा अखंड-धारा जशी जान्हवी जगतीं । तसा भक्त तो मला भेटतो अनन्य भावें अंतीं ॥ मजसीं मिळतां नुरे तत्वतां ‘मी-तो’ ऐसें द्वैत । म्हणुनि राहे मी चि होउनी मज माजीं चि निवांत ! अनन्य-भक्ति करी भारता, तो चि तत्त्वतां मातें । असा जाणतो आणि पाहतो समरस होतो तेथें ”॥ भा. गीता अ११/१३४-१३६-१३७

स्वामींच्या वर-प्रार्थनेचा सातवा चरण पहा ते

“ मी-माझें मावळो सर्व तूं-तुझें उगवो अतांमीतूंपण जगन्नाथा, होवो एक चि तत्वतां

नामाप्रमाणें भक्ति हे देखील तत्व आहे, व्यापक अविनाशी आहे, व नाम आणि भक्ति ही तत्वत: सोऽहं-साधनेला, पूरक असून साधनेसाठी सुलभ आहेत ही जाणीव आणि भान दृष्ट्या स्वामींच्या सर्व साहित्यात दिसते. पुढील काही अभंग पहा.

देव भक्त आणि नाम।झाला त्रिवेणी संगमराम-कृष्ण-हरि मंत्र । उच्चारूं या अहोरात्र ॥भक्त नामीं आनंदला ।देव अंतरीं तोषला ॥ देव-भक्तांसी एकांतीं।स्वामी म्हणे पडे मिठी॥"
देवपिसा झालों नामीं आनंदलों।आतां नका बोलों दुज्या गोष्टी ॥ जेथें पाहें तेथें दिसे वासुदेव।वेडावला जीव जडे पायीं॥"
" उच्चारितां नाम आनंदलें मन । दाटले लोचन प्रेमाश्रुंनीं ॥"
" नाम तेथें राम भक्तांचा आरामअंतरीं चि नाम अंतरीं चि राम ।" " तुझ्या चि नामाचा घेउनी आधारपाववीन पार जड जीवां ॥"
" नसे तरी नसो वेदान्ताचें ज्ञाननामसंकीर्तन सोडूं नये॥”

खालील अभंग वरील विधानाची पुष्टी करील-

श्र्वासोच्छ्वासीं देख राम-नाम-जप । होतो आपेंआप अखंडिततेथें रात्रं-दिन ठेवीं अनुसंधान । सांडुनी मीपण सोऽहं-भावें राम-नामीं चित्त रंगतां स्वानंदें । सुखें हाता चढे तत्व-बोध ॥होतां तत्व-बोध लाभे परा शांति । जीवासी विश्रांति स्वामी म्हणे॥" सं.गा.२४८॥

असे एक ना अनेक संदर्भ देतां येतील. जी गोष्ट नामाची, तीच भक्त आणि भक्तीची. काही अभंग पहा

भक्ताचे अंतरीं सांवळा श्रीहरी । सुखें वास करी सर्वकाळ ॥ म्हणोनी तयासी विश्व हरि- रुप । झालें आपेंआप अखंडित ॥"
" आतां अहं सोऽहं मावळलें भान।अवघें नारायणरूप झालें ॥ स्वामी म्हणे ऐसें भक्तीचें महिमानओळखावी खूण स्वानुभवें ॥"
" रामकृष्ण हरि उच्चारी वैखरी ।भक्त तो संसारी भाग्यवंत॥ स्वामी म्हणे भक्तीपासीं चारी मुक्तिभाग्या नाही मिति भक्ताचिया॥" "लाभतां अभेद भक्तीचें  निधानएक चि आसन जिवा-शिवा ॥"
"न होती विभक्त देव आणि भक्त । अंतरीं एकान्त एकमेकां॥"
"स्व-रूपीं अभिन्न तन आणि मनजगीं दुजेपण उरे चि ना॥"

ज्ञानेश्वर माऊली, श्रीस्वामी हे साक्षात्कार-वादी तत्वज्ञ, संत आणि सत्कवी.त्यांनी ऋषींचे प्रज्ञान म्हणजे उपनिषदें, त्यांचं सार हे गीता. त्यांतील गुरु-परंपरेनं लाभलेलं अद्वयानंदवैभव, नित्यनूतन गीता तत्व, विश्वकल्याणासाठीं सुलभ सोपं केलं. माऊलींचा,गीतार्थेसी विश्व भरण्याचा, जगाला आनंदाचें आवार मांडण्याचा,विश्वाला परतत्व डोळां दाखविण्याचा मानस, वसा स्वामींनीं पुढें चालवला. ते लिहितात-

“ जगीं जन्मुनी अभिनव-जीवन-बागवान होईन। स्वानुभव-सुधा शिंपुनि वसुधा नंदनवन बनवीन॥” अमृत-धारा ६॥

अद्वैत भक्तीचा स्वानुभव वर्णन करतांनां स्वामी म्हणतात-
“ आला अनुभव देव तूं तसा भक्त हि तूं स्वयमेव । लीला-लाघव हें अपूर्व तव पाहे तो चि स-दैव ”॥अमृत-धारा १५६॥

ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला, श्रीस्वामींचे समाधीवर आमची समृद्ध पूजा असते. शरीराने कुठेही असलो तरी मनानं आम्ही गुरुचरणीं पूजा करतो. मी
स्वत:ला गुरुमाऊलींचं बोलकं बाहुलं मानतो. त्यांच्याच प्रेरणेनं स्फुरलेली ही शब्दसुमनं आजच्या पवित्र दिनी त्यांच्या चरणीं समर्पण.

सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरू श्रीस्वामी स्वरुपानंद महाराज की जय.
                                 माधव रानडे.
आधींचे लेख वाचवण्यासाठी खालील संकेत स्थळावर पहावे.

श्रीस्वामींच्या चरित्र, साहित्य तत्वज्ञानाचा यूट्यूबवरील व्हिडिओ पहाण्यास खालील संकेत स्थळावर पहावा.

https://www.youtube.com/watch?v=rXoNczKaaio&feature=youtu.be
                     


No comments: