Tuesday, April 24, 2018

              “ सोऽहं-हंसोपनिषद
                       अर्थात
        श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
              यांच्या साहित्यातील
               ( चाकोरीबाहेरचे )
           मराठीतील पहिले उपनिषद
                   ( क्रमश :- ९ )


या आधींच्या लेखांत शेवटी लिहिल्या प्रमाणें अति सुगम भाषेत ‘ज्ञानदेवां’ प्रमाणेंच आपणही प्रचलित मराठीत गीता-तत्वज्ञान रचावें ही स्वामींची इच्छा जगन्माउलीनंच सिद्धीस नेली. १९५१ च्या गुरुपौर्णिमेला “भावार्थ-गीता” प्रकाशित झाली. त्यांतील “सोऽहं” भाव पाहु-


निज-विस्मृतिची येतां निद्रा जीव-रुप होऊन।
   भव-स्वप्न हें पाहे आत्मा उपाधींत गुंतून ॥
 असे चि माझी सदैव सर्वां अंतर्यामीं वस्ती ।
         म्हणुनि स्फुरते प्राणि-गणांतें
            ‘मी अमुका’ ही स्फूर्ती ॥
संत-संगतीं सद्गुरू-भक्तिस्तव ती ज्ञान-प्राप्ति।
होतां घेई ‘अहं ’जयाचें पर-तत्वीं विश्रांति ॥      
‘सोऽहं’ तेंही जिथे मावळे द्रष्टा-दर्शन-दृश्य ।
  एकरूप तीं होती जाणे तो परमात्मा ईश ॥
   ज्ञानाज्ञाना-विरहित तैसे भावाभावातीत ।
 स्वत:सिद्ध तें तिथें संपतें द्वैत आणि अद्वैत ॥”   
    (भावार्थ-गीता- १५/५०,४१,४२,६१,५७)              


स्व-रुपाच्या विस्मृतिमुळे आत्मा जीव-रुप उपाधींत गुंतून त्या निद्रेत भव-स्वप्न पाहातो. ‘अहं ’ चे जे नित्य स्फुरण अंतरांत चालूं असते ते परमात्म्याचें स्फुरण आहे हा प्रत्यय येण्यास सत्संगति, योगज्ञानांत प्रगती, व विरक्तिपूर्वक सद्गुरूपास्ति,कारणीभूत होतात. अशा सत्कर्मांनी द्रष्टा-दृश्य-दर्शन त्रिपुटी एकरूप होते व जीव-अहंता मूळ अहंतेत विलीन होत तो ज्ञान अज्ञाना विरहित असा“सोऽहं”भाव अनुभवतो. स्वामींच्या याच विचारांचे प्रतिबिंब पुढील साक्यांत दिसते.


“ आत्मज्ञानें दूर सारुनी स्वर्ग-नरक-संसार।
  सोऽहं-भावें तन्मय होईं मद्रूपीं साचार ॥
  सोऽहं-भावें रत स्व-रुपीं जगद्भान विसरून। तुज उपासिती परमात्म्यातें दुजा भाव सांडून॥
सोऽहं-भाव-प्रचीत येतां सहज-संयमी झाला। आत्म-रुप जगिं एक संचलें हा दृढ निश्चय केला॥” (भावार्थ गीता-१८/११४ व १२/९,४७)      


“सोऽहं” भाव हे स्वामींच्या “सोऽहं-हंसोपनिषद
चे वर्म आहे, मर्म आहे.आणि जरी त्यात भाव हा शब्द असला तरी वस्तुत: ती अवस्था भावातीत द्वैताद्वैताच्या, ज्ञानाज्ञानाच्या, पलीकडची आहे.  


“भावार्थ-गीता” स्फुरण्याच्या, बरीच वर्षे आधीं पासून स्वामींना प्रभुदर्शनाचे डोहाळे लागले होते
कारण “भावार्थ-गीते” चं सृजन व्हायचं होतं.


        “ रुप चतुर्भुज तुवां चक्र-पाणि ।
            ध्रुवा मधु-वनीं दाविलें जें ॥
         तें चि देखावया भुकेले हे डोळे ।
          काय सांगों झाले उतावीळ ॥”
            (संजीवनी गाथा- ९२/१-२)


असा हट्ट ते लडिवाळपणे करीत होते.दिसांमासी त्यांची तळमळ वाढत गेली त्या भावात त्यांनीं खोलीत चतुर्भुज विष्णूची तसबीर लावून घेतली. स्वामींनां तशाच रुपात साक्षात्कारही झाला. जेंव्हा त्यांनां विचारलं कीं भगवंताचें दर्शन ही साधनेची इतिश्री ना ? तेंव्हा त्यांनीं सांगितलं कीं सर्व भूतमात्रांत परमात्मा पाहाणे आणि तसा तो दिसणें हे खरं भगवत् दर्शन.पुढील अभंग पहा


     तैसे त्याचे चित्त । काय सांगूं  फार ।
          देखे चराचर । मद्रूप चि  ॥
        मजपासोनियां  । कीटकापर्यंत ।
           एक भगवंत । दुजें नाहीं ॥
      तत्क्षणीं  मी विश्व-। रूप भगवंत ।  
        आकळें निभ्रांत । तयालागीं ॥
       ऐसें होता ज्ञान । मग आपोआप ।
          माझें विश्वरूप । दिसे तया ॥
       (अभंग ज्ञानेश्वरी ११/१३७२-७५)
मग त्यांना चतुर्भुज-रुप दर्शनाचा हव्यास का ? असा प्रश्न क्वचित् कोणाच्याही मनांत आलाच तर त्याचं उत्तर स्वामींच्याच साहित्यांत सापडते.


    “ स्वरूपाचा शोध घेतां अंतरांत ।
         देव प्रकटत एकाएकीं ॥
   मग आवडे त्या रूपीं देऊनि दर्शन ।
 करीतसे पूर्ण मनोरथ ”॥स्व.प.मं. ३३/७,९॥


आपल्या मनांतील प्रस्तावित गीता-तत्वज्ञानाला भगवान विष्णुंनीं ज्या कृष्णावतारांत प्रकट केलं त्याच परतत्वाचा परीस स्पर्श व्हावा. शिवाय,


      “ किंवा मधु-वनीं।ध्रुवाचिया गाला।
           शंखें स्पर्श केला। नारायणें॥
        तों चि वेदांची हि।खुंटे जेथें मति।
          ऐसी दिव्य स्तुति।करुं लागे॥”
          (अभंग ज्ञानेश्वरी ११/३८४-८५)


“ पाठवि येथें ती आम्हांतें मातेची नवलाई ।
चाकर आम्ही दिधल्या कामीं न करूं कधिं  
             कुचराई ॥” (अमृतधारा/१५९)


प्रारब्धवशात ज्या सारस्वत निर्मितीचा ईश्वरी संकल्प होता त्यांत कुचराई होऊ नये हा सद्हेतु


“ कर्म-विपाकें जाण मला गे लागे सावध-वेड।
जीवन्मुक्तास हि न चुकते प्रारब्धाची फेड॥”
                 (अमृतधारा-१२४)


       “ तयांच्याकडोन।कर्म-आविष्कार।  
           संस्कारानुसार।प्रारब्धाच्या॥
         तैसें चि प्रारब्ध-।संस्कारानुसार।
             मुक्ताचें शरीर।हालतसे ॥”
        (अभंग ज्ञानेश्वरी १८/७६२,७८७).   


स्वामींनीं तर प्रारब्धही हरीला अर्पण केलं होतं


     “ प्रारब्ध संचित आणि क्रियमाण ।
             हरीसी अर्पण करोनियां ॥१॥
         सुखें हरिपायीं राहिलों निवांत ।
           जाहलों निश्चिंत कर्माकर्मीं ॥२॥
        स्वयें आत्माराम वाहे योग-क्षेम ।
 ऐसें भक्त-प्रेम स्वामी म्हणे ”॥सं.गा.२७/३॥


स्वामींचे हेसोऽहं-हंसोपनिषदम्हणजे -
प्राप्त परिस्थितीत प्रयत्नपूर्वक परमेश्वरप्राप्तीचं पांवसच्या परब्रम्हरुप प्रेमदीपाचं, परमार्थाचे,   प्रयोगसिद्ध,पारदर्शक, प्रकट प्रवासवर्णन.


म्हणूनच ते आत्मविश्वासानं सांगतात कीं-


“प्रसन्न होतां माता हातां चढलें सोऽहं सार ।
हवा कशाला मला आतां हा वृथा शास्त्रसंभार”


9823356958                   माधव रानडे.
ranadesuresh@gmail.com
  
      


    


 
     
     



             




Sunday, April 8, 2018

                          “ सोऽहं-हंसोपनिषद ”
                                 अर्थात
         श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
           ( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
                              ( क्रमश:- ८)

क्र.७ च्या लेखाचा ओघ अजाणताच स्वरुप पत्र मंजुषांतील पत्र क्र.६३,६४,६५ कडे वळला. ही तीनही पत्रं व ‘अमृतधारा’ तील ‘सोऽहं’ संबंधीच्या साक्या म्हणजे श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यातून प्रकट होणाऱ्या ‘ सोऽहं-हंसोपनिषद ’ या मराठीतील पहिल्या वहिल्या उपनिषदाचा पाया आहेत, हे खरं.
पण, त्या ओघात “अभंग-अमृतानुभव” आणि “अभंग-चांगदेव-पासष्ठी” या स्वामींच्या अनुवादित साहित्यांतील ‘सोऽहं-भावाचे’ संदर्भ पुढील लेखांत पाहूं, असं १९ जाने. क्र. ६ च्या लेखाच्या अखेरीस लिहिलं ती गोष्ट राहून गेली होती. त्याचा विचार करु-

“अमृतानुभव” या आत्म-संवादरुपी ग्रंथांत, “वाचा-ऋण-परिहार” या प्रकरण ३ मधे माऊली चारही वाचांचे ऋण, त्यांच्या मर्यादा व आत्म्याची झोप ह्या संकल्पना स्पष्ट करतात. मी म्हणजे माझा देह हा विचार सर्वसाधारण व्यक्तींच्या मनामधे तीनही अवस्थेत, जागेपणी, स्वप्नात व झोपेतही प्रबळ असतो. ह्या तीन अवस्थात वैखरी, मध्यमा व पश्यन्ति ह्या तीन वाणी सक्रीय असतात. आणि त्यावेळी हाच विचार प्रामुख्याने घोळत असतो. पूर्वसुकृतामुळे सत्संग घडला, विवेक व विचाराने, मी देहापुरता मर्यादित नाही हा विचार पक्का होऊन आत्म्याची झोप जरी उडाली, आणि नाभींतून उठणाऱ्या परा वाणीतील “सोऽहं” चा परोक्ष अनुभव आला तरी ‘अहं ब्रह्म’ ही द्वैतरुपी जाणीव रहातेच.

“अमृतानुभव” प्रकरण ३ च्या पहिल्या ओवीत माऊली लिहितात

       ययाचेनि बोभाटे । आत्मयाची झोप लोटे ।
      पूर्ण तरी ऋण न फिटे । जे चेणेचि नीद की ”।। ३.१ ।।
या ओवीचा अनुवाद स्वामींनी ६ अभंगात केला ते लिहितात-

        ‘सोऽहं’ ‘सोऽहं’ ऐसा। आळवितां शब्द ।
           जरी गेली नीद ।जीवात्म्याची ॥१॥
          आणि जरी जीवा। आलें जागेपण।
             जाणीव होवोन। शिवत्वाची ॥२॥
            तरी जागेपण। ती ही निद्रा साच।
             राहिली तैसीच। अहंता ती ॥३॥
            ज्ञान अहंता जी। ती ही घालवोन।
              स्वभावें गिळोन। ज्ञानाज्ञान ॥४॥
             जया आत्मरुपीं ।नित्य जागेपण ।
               भावें व्हावें लीन । तेथें जेंव्हां ॥५॥
             तेंव्हा चि ते साच । फिटे वाचाऋण ।
                 मौनासी हि मौन ।आपेंआप ॥६॥

मोक्ष मिळवण्यासाठी वाणीचा निश्चितच उपय़ोग होतो.वाणीची निर्मिती ही अविद्येमुळे होते.अविद्या म्हणजे स्वतःविषयी भ्रामक कल्पना.मी म्हणजे माझे शरीर व ते ब्रह्मापेक्षा वेगळे आहे ही ती कल्पना.ही संकल्पना भ्रामक आहे.मी ब्रह्मापेक्षा वेगळा नाही  माझी ब्रह्माशी एकरूपता आहे हे मी वाणीच्या सहाय्यानेच जाणतो. जगद्गुरू तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात-

  “ -।ऊर्ध्वमुखें आळविला सोऽहं शब्दाचा नाद   
    अरुप जागविला दाता घेऊनि छंद ”॥तु. गाथा॥४२६॥

अविद्येने निर्माण केलेली वाणीच अविद्येच्या नाशास कारणीभूत होते, अविद्याच नाहिशी झाली म्हणजे तिने निर्माण केलेल्या वाणीही नाहिशा होतात. या चार, (वैखरी स्थूल, बाकी तीन सूक्ष्म) वाणींचे स्थान स्वामी त्यांच्या पुढील अभंगात देतात.

          “ मूळ नाभि-स्थानीं जन्म पावे ध्वनि
             ती चि परा वाणी ओळखावी ॥१॥
              हृदयीं च जाण पश्यन्तीचें स्थान ।
                 कंठीं ओळखण मध्यमेची ॥२॥
                मुखें जो उच्चार वैखरी साचार ।
               ऐशा वाणी चार जाणोनियां ॥३॥
                     परेहुनी पर राहे परात्पर ।
        पाहे निरंतर स्वामी म्हणे ॥संजीवनी गाथा ४६/४॥”

परमात्मा परे-च्याही, अर्थात चारही वाणींच्या (पर) पलीकडे अशा शब्दांत स्वामी वाणींची मर्यादा दर्शवितात.

माऊलींनी ययाचेनि शब्द प्रक.२, अंतिम ८० ओवीच्या संदर्भात वापरला आहे. त्यांत ते सांगतात कीं श्रीगुरुंनां वंदन केल्यामुळें चारही वाचांची ऋणें फेडून मी ऋणमुक्त झालो आहे. प्रकरण ३ च्या क्र. ३३ या अखेरच्या ओवीतही माऊली परत तेच सांगतात. स्वामी त्यांच्या अनुवादात हेच अधिक खुलासा करुन लिहितात.  
अभंगांतील चरण ५ व ६ मधे हाच अर्थ अभिप्रेत आहे. सद्गुरु हे आत्मरुपीं नित्य जागे असतात. कारण त्यांची अहंता व दृष्टि आत्मस्वरुपी खिळून असते. म्हणून वाचाऋणमुक्त होता येते.

“जयांची अहंता।आत्मस्वरुपांत।राहिली निवांत।स्थिरावोनि॥ते तों स्वरुपीं च।ठेवोनियां दृष्टि।देखोनि किरीटी।मज तेथें ॥
                              ॥ अभंग ज्ञानेश्वरी १५/७६०-६१॥

स्वामींचे हे शब्द ज्ञानेश्वरीतील पुढील ओवीचे अभंगरुप आहे.
         “ येणेचि सत्कर्में। अशेषही अज्ञान विरमे।
          जयांचे अहं विश्रामे। आत्मरुपीं ”॥ज्ञाने. १५ /४२३॥

माऊली सांगतात की ४ वाणींच्या नादमय, ध्वनि लहरींच्या सततच्या गजराने (बोभाट्याने) जरी आत्म्याची झोप गेली (लोटे) म्हणजे असं कीं आत्मा आपले खरं स्वरूप विसरुन मी म्हणजे माझा जड देह, ‘देहोऽहं’ असा जो विचार करूं लागला होता-

“तैसा स्वरुपाचा।पडोनि विसर।होय देहाकार।चैतन्य जें ॥
मग देह चि मी।ऐसे मानी साच।पावोनि देहीं च।तद्रुपता ॥
जीव ऐसी संज्ञा।तयालागीं देती।स्वरुप-विस्मृति।घडतां च”          
                           ॥अभंग-ज्ञानेश्वरी १८/५७८-५८०॥

तो ‘कोऽहं’ च्या जिज्ञासेपोटी,मी देहाएवढाच मर्यादित नाही हे जरी समजला व ‘सोऽहं’ बोधावर आला तरी ते (चेणेचि) जागे होणे ही देखील एक प्रकारची निद्राच (नीद) होय. इतकाच फरक, की ‘देहोऽहं’ ही अज्ञानावस्थेंतील गाढ निद्रा आहे तर सोऽहं ही ज्ञान-जनित भ्रम-निद्रा आहे. जसं माऊली सांगतात कीं

“-।म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें।ज्ञानासि करी॥ज्ञा.९/१७३॥”

स्वामींचे पुढील अभंग पारमार्थिक प्रवासातील वेगवेगळ्या या सर्व अवस्थांचं व स्वरुप-स्थितीचं सटीक वर्णन करतात-

“‘अहं देह’ वृत्ति ।पावते विनाश ।येतां उदयास । आत्म-ज्ञान॥ अज्ञानाचा नाश।करोनियां ज्ञान।होतसे विलीन।आत्म -रुपीं॥  ‘अहं आत्मा’ ह्याही।वृत्तीची निवृत्ति। आत्म-रुप-स्थिति।ती चि जाण ॥ स्वामी म्हणे कैंची ।प्रवृत्ति निवृत्ति । शब्दातीत स्थिति स्वरुपाची ॥” संजीवनी गाथा २५५ ॥
स्वरुप महिमा वर्णवेना वाचेपुरे ना शब्दाचें बळ तेथें ॥विचाराचा डोळा होतसे आंधळा ।तर्क तो पांगळा ठरे जेथेंमना इंद्रियांचा काय तेथें पाड।शास्त्रांसी निवाड होये चि ना‘नेति’ वेद बोले तें चि म्यां देखिलें।गुरु-कृपा-बळें स्वामी म्हणे॥ संजीवनी गाथा- १२४/४॥
                                    ॥संजीवनी गाथा- १२४/४॥
श्रीस्वामींचे वरील अभंग शब्दातीताचें व गुरु-कृपेचें बळ सोप्या शब्दांत समजावतात. स्वरुपाचा महिमा वर्णन करणारे स्वामींचे हे शब्द आद्य श्री शंकराचार्यांच्या निर्वाण षटकाची आठवण करुन देणारे आहेत.

             “मनोबुद्धय्हंकार चित्तानि नाहं
                श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे
             न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः
          चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम ॥१॥”

यांत प्रत्येक चरणाच्या शेवटीं “ चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम” मी सच्चिदानंदरुप आहे, असें म्हटलें आहे. पण हा मी अहंकाराचे रुप नाही हे पहिल्याच चरणांतील, “ मन, बुद्धि, अहंकार अथवा चित्त म्हणजे मी नव्हे या उल्लेखाने स्पष्ट होते. अहंकाराला जाणणारा हा मी अहंकाराहून साक्षीत्वानं वेगळा आहे.
“अभंग-अमृतानुभवा”मधे द्वंद्वातीतभूमिकेचा कठीण विषय स्वामी सोप्या आणि प्रासादिक भाषेत समजवितात. प्रकरण ३ व १० मधील काही ओव्या वानगीदाखल देऊन त्यावरील विचार देतो.
इथे हे नमूद करणं आवश्यक आहे कीं याचं प्रकाशन १९६२ ला नाथषष्ठीच्या मुहुर्तावर झालं पण यातील तत्व-विचारांचं बीज व १९३४-३५ सालच्या “अमृतधारे” त पहायला मिळतं कारण
स्वामीनीं १९३४ मध्ये अमृतधारेत लिहिल्याप्रमाणे “सोऽहं-भावें”  उडी घेतली अनन्तांत चौखूर” हा भाव त्यांचा स्थायीभाव झाला.

‘अहं ब्रह्म’ ज्ञान।स्वयें होय लीन।म्हणोनि तें गौण।वाटे आम्हां ॥जेथे ‘सोऽहं’ तें हि।जाय मावळोन।मोक्षाची ती खूण ब्रह्मभावीं॥अभंग-अमृतानुभव”३/५८-५९॥‘सोऽहं’ तें हि अस्तवलें तें नाही भोगिलें माते ।‘सोऽहं’-दर्शन अनुभविलें तें लिहूनि ठेविले येथें ॥अमृतधारा १५५॥
आठव-नाठव।गेले भावाभाव।तयाची अपूर्व।आत्मस्थिती॥अभंग-अमृतानुभव १०/५८ “आठव नाठव नुरे स्वभावे स्फुरे एकलें एक ।॥अमृतधारा ६९॥
देव चि तो भक्त।होवोनि राहिला।भक्त चि तो झाला।देव आतां॥ऐसें एकपण।देव-भक्तां जेथें।राज्य करी तेथें।अक्रिय हा॥” अभंग-अमृतानुभव १०/६४ ६५.
“ आला अनुभव देव तूं तसा भक्त हि तूं स्वयमेव।अ.धा.१५६॥

हे वाचून पटेल कीं स्वामींनीं त्यांचे पुढील विचार कृतीत आणले

       “क्षणांत येते मनांत माझ्या ‘ज्ञानदेव’ होऊन ।
       प्राकृतांत अति सुगम रचावें गीता-तत्वज्ञान ॥”

“सोऽहंभाव” संगीतात नित्य रंगून राहिलेल्या “सोऽहं-हंसो पनिषदा” च्या या उद्गात्याला कोटी कोटी वंदन.

ranadesuresh@gmail.com            माधव रानडे