Tuesday, August 15, 2017

                            “सोऽहं-हंसोपनिषद ”
                                अर्थात
     श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
        ( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
                           ( क्रमश:- २)

हा लेख लिहायला घेताच मला आठवली कवी केशवसुत ह्यांची प्रसिध्द “ तुतारी ” ही कविता ज्यामध्ये ते म्हणतात-
“ एक तुतारी द्या मज आणुनि । फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें । दीर्ध जिच्या त्या किंकाळीने”
कारण श्रीस्वामींच्या साहित्याच्या, तत्वज्ञानाच्या रूपानं मला खुणावत असणाऱ्या या तुतारीत प्रचंड ताकद आहे.
“ सोsहं-हंसोपनिषद ” चं संकलन, संशोधन, संस्करण व अखेर जेव्हां संपादन होईल तेंव्हा ते विश्व-विख्यात होईल. आजच्या संगणक युगांत गति हा परवलीचा शब्द आहे. एखादी संकल्पना नवीन पिढीला भावली तर माहितीचे महाजाल अल्पावधीत ती वाऱ्यासारखी पसरविण्यास सक्षम आहे. श्रीस्वामींच्या साहित्यांतील निवडक संदर्भ जाणीवेच्या नव-विज्ञानाची दालने उघडतील व आधुनिक पदार्थविज्ञानातील पूंजसिद्धांताशी त्यांच्या नात्याचा शोध घेतील.
माझा तुटपुंजा वैयक्तिक अनुभव व तोकडी अभिव्यक्ती याची पूर्ण जाणीव असतांनाही मी असं धाडसी विधान करतोय याचं कारण माझ्या दुबळ्या पंखांना स्वामी योगेश्वरानंद या उच्चशिक्षित नाथसिद्ध योगी, यांच्या आश्वासनाचं बळ मिळालंय. त्यांना योगेश्वर श्रीकृष्णाचा साक्षात्कार झालेला आहे. त्यांनी इंग्रजी व मराठीमध्ये अनेक ग्रंथ लिहिले आहेत. “योगदा ज्ञानेश्वरी” “ एका नाथसिद्ध योग्याचे आत्मवृत्त ” हे त्यातील प्रमुख. त्यांनी “ज्ञानेश्वरी नित्यपाठ ” चं ईंग्रजीत Versification / transliteration केलं आहे.  ते Academia.edu च्या https:/www.academia.edu/2481731/Nityapatha_Dnyaneshwari या link वर आहे
मी त्यांना “ सोsहं-हंसोपनिषद ” च्या, संस्करण, संशोधनासाठी विनंती केल्यावर त्यांनी कळवलं. Quote-
“ I will do what my limited abilities permit.
Between us, and for a few others, I am revealing to you the secret of 'Soham' अनुभूती, as I understand in the context of my exposure to the Swami, and his mystic compositions:
"अन्तरातुनी सहज ध्वनि तो निघतो सोsहं सोsहम । विनाश्रवण ऐकता तोषतो माझा आत्माराम ।। विनावैखरी होत अंतरीं सोsहं शब्दोच्चार । सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैती व्यापार ||अमृतधारा/१४८-१४९।।अद्वय भक्ति येतां हातीं सरली यातायाती । बुडतां अमृतीं मरण तरी का संभवेल कल्पान्ती ।।अ.धारा/१५७।।"-
This "Soham" is what is known to the Yogis and mystics as अनाहत नाद. नाभिपासून ब्रह्मरंध्रात उमटणारा हा नाद आहे. लक्षणा आहे- नाभिवर: 'नाभि' म्हणजे 'कंदस्थान'- कुंडलिनी पिंड-निर्मिति केल्यावर विश्राम करते, सुप्तावस्थेत असते, अंशात्मक जागृत राहून देहकार्य चालवते, ते स्थान. हे मूलाधाराखाली असते. नाभि व मूलाधार यांच्याशी संबंधित असते. सुषुम्नेचे खालील द्वार तेथे असते. जागृत कुंडलिनी सुषुम्नेच्या या द्वारातून प्रवेशून पुढे मार्गस्थ होते. तिची अंतिम गति (पिंडसंबंधित) ब्रह्मरंध्रस्थित 'शिव' ही आहे. त्यापुढे ती 'पिंड' ओलांडून विश्वकुंडलिनीत सामावून जाते.
जेव्हा तिचे ब्रह्मरंध्र ते 'नाभिदेश' (कंद) असे आवागमन होत असते, तेव्हा तिला तांत्रिक संज्ञा 'कुलकुंडलिनी' अशी आहे. ती कोणत्याही चक्रावर केव्हाही जाऊ शकते. पण सिद्ध सहसा तिला आज्ञाचक्रावरील प्रांतात ठेवतात आणि जसे कार्य असेल तसे त्याखालील चक्रात उतरवून ते कार्य सिद्ध करून परत आज्ञाचक्रावर जातात. अर्थात यातही केवळ तिचा अंशमात्र खाली उतरतो, पूर्ण नाही. म्हणूनच म्हणतात की सिद्ध पुरूष एकाच वेळी परब्रह्म आणि व्यावहारिक दशा दोन्हीही उपभोगतात.
स्वामींचे वाङ्मय खरेच कळून घ्यायचे असेल तर ते सिद्धांकडूनच समजेल. कारण त्यातील गूढगर्भ अन् मिती नसलेल्या आशयाचे ज्ञान केवळ तेच धारण करतात.
'सोहम' मंत्र जेव्हा दीक्षितास मिळतो तेव्हा कुंडलिनी जागृतीसाठी आवश्यक ती पार्श्वभूमी निर्मिण्यासाठी लागणारी चालना सद्गुरू देतात. साधकाच्या पिंडवॆशिष्ट्यानुसार योग्य काल येताच, automatically कुंडलिनी अंशतः जागृत होते आणि पुढील क्रियांना सुरुवात होते.
अत्यंत प्रगत साधकास पूर्ण कुंडलिनीजागृतीच्या अवस्था अनुभवास येतात. कुंडलिनी जागृति ही 'धर्ममेघ समाधि' ची सुरूवात आहे.
यातच खरी 'सोहम् ध्यानावस्था' आहे. ती परिपक्व होत जाते आणि कुंडलिनी पुढील चक्राक्रमण करत ब्रह्मरंध्री जाऊन शिवात सामरस्य प्राप्त करते. असा हा स्वामींच्या 'सोहम्'साधनेचा खरा भाग आहे.
तो स्वामींनी सगळ्या दीक्षितांना सांगितला किंवा अध्याहृत ठेवला, ते ज्याचे तोच साधक जाणे.
'सोहम्' वाग्जप करत असतांना शास्त्रानुसार पिंडशुद्धी होऊन जेव्हा एक कोटी (लाक्षणिक अर्थाने; म्हणजे अतिशय मोठी संख्या) तेव्हा 'अजपाजप' सिद्ध होतो. तो जसा प्रगत होत जातो आणि पूर्णावस्थेत जाऊन त्याच्याही जेव्हा कोट्यवधी आवृत्ति होतात, तेव्हा 'अनाहत नाद' ऎकू येऊ लागतो. तो जेव्हा सर्व  प्रकारचा (शंख, भेरी, ढोल समुद्रगर्जना इ.इ. सहस्रावधी प्रकारांचा) साधक अनुभवतो, ती अनाहताची पुढील अवस्था आहे.
जेव्हा तो 'अखंड'  (जागृतीकाळात) अनुभवायला येऊ लागतो, तेव्हा त्याची परिणत अवस्था  असते. त्याच्याही सूक्ष्म नाद आणि घोर नाद अशा अवस्था आहेत. योगी (यात भक्तादी इतर सर्व 'मार्गी' पण आलेत) या नादांना 'सगुण' आणि 'निर्गुण' जशी अवस्था असते वेळोवेळी तसे 'सूक्ष्म' ते 'घोर' अशा नादांचा अनुभव घेतो. नाद आणि प्रकाश या परमात्म्याच्या (परब्रह्म, ब्रह्म, परमशिव इ.) अनुभूति आहेत; त्यांच्यातच परमसाक्षात्कार आहे.
तूर्त येवढेच पुरे. आवश्यक त्या स्वामिभक्तांना कळवण्यास, आपल्या swami.mhane वर टाकण्यास; आनंदाने परवानगी देत आहे. ”  Unquote-
श्रीस्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी होते. त्यांची  अनुभवसंपन्न वाणी, त्यांच्या संपूर्ण साहित्यांत नवीन पिढीला प्रिय आचार सुलभ, साधन-सुलभ व गेय रूपांत प्रकट झाली आहे. श्रीस्वामींचं हेच खास वैषिट्य आहे. जड जंजाळ शब्द नाहीत,साधनेचं अवडंबर नाहीं.
श्री स्वामींच्या अध्यात्मप्रवण पिंडाचं संगोपन संस्कारक्षम गोडबोल्यांच्या धार्मिक कुळांत झालं.त्यांच्यांतील उपजत अध्यात्मपर प्रवृत्तीनां खतपाणी, त्यांच्या मुंबईतील शालेय जीवनांत मिळालं. मात्र त्यांच्या अध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीला, मार्गदर्शन व योग्य दिशा, नाथसंप्रदायांतील सद्गुरू गणेशनाथ (बाबा महाराज वैद्य) यांच्या १९२३ मधें झालेल्या कृपानुग्रहानंतर मिळाली. स्वामी लिहितात-
“ पुण्य-पत्तनीं श्री सद्गुरूंनीं पथ-दर्शी होऊन । ‘ॐ तत्वं सोऽहं स:’ श्रुतिची दाखविली मज खूण ”।अ.धा.१३४।।
अनुग्रहानंतरच्या स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देतांना बाबा महाराज म्हणाले- “ आतां तुला जो थोडा वेळ अनुभव आला त्याचें दृढीकरण सोऽहं भावाचा सतत अभ्यास केल्यानें होईल व देहबुद्धीचें निराकरण होऊन तुला पूर्ण स्थितीचा अनुभव येईल. सोऽहं ध्यासानें देहबुद्धीचा निरास करून साक्षित्वानें राहा व यथोचित कर्में कर.” महाराजांच्या या उपदेशानें स्वामींचें समाधान झालें. सोऽहं चा ध्यास लागला व चित्त अखंड अनुसंधानांत रमूं लागलें.स्वामींच्या “असे सहज परि सोऽहंभावें करी सतत अभ्यास । हीच साधना जोंवरी न तो झाला मोह निरास ”।।अ.धा.२५।।
या साकीत सद्गुरूंचे वरील शब्द प्रतिबिंबित झालेले दिसतात. सं.गाथेच्या मंगलाचरणात गुरूपरंपरा सांगून स्वामी लिहितात “योग-सार ऐसें परंपराप्राप्त । सद्गुरू गणनाथ देई मज”।
ते सांगतात “अनुभविली सद्विद्या ही गुरू-परंपरा सांगितली ।शतकानुशतक प्रत्यक्ष जशी पुढती चालत आली ”।अ.धा.१३६।। विद्यारूप वस्तूच गुरूमूर्ती या माऊलींच्या अमृतानुभवातील व इतरत्र प्रकट सिद्धांताचाच पुरस्कार करीत मंगलाचरणाच्या दुसऱ्या कडव्यांत, मत्स्येंद्रनाथांना “ शिव-शक्ति-बीज ”
आदिनाथांनांकडून प्राप्त झाल्याचा सूचक उल्लेख करतात. नाथसंप्रदायांत “सद्गुरू” अथवा  “ गुरू ” या शब्दाला, या पदवीला अनन्यसाधारण महत्व आहे. “ शिव-शक्ति ” च्या सामरस्याकडे लक्ष वेधणारे हे शब्द, माऊलींच्या तत्वज्ञानाशी स्वामींच्या तादात्म्याचे निर्देशक आहेत.“ नसानसांतुनि तें संताचें नाचे अस्सल रक्त ” या ओळी हाच भाव प्रकट करतात.“ शिव-शक्ति ” यांच्या एकत्रीकरणांतून जे तत्व सक्रीय झालें तो आकार म्हणजे “गुरू” स्वामींच्या “गुरू तोचि देव” या अभंगाचा शेवटचा चरण हीच गोष्ट मनावर बिंबवतो. “स्वामी म्हणे वंदीं सद्गुरू -पाउले । भलें आकारलें पर-ब्रह्म ”।।
“सद्गुरू” व “ सोऽहं ”संबंधींच्या अनेक अर्थपूर्ण संदर्भांनी स्वामींचं साहित्य ओतप्रोत भरलेले आहे. ते आपण क्रमा -क्रमानें पाहाणार आहोत. उदा. “तों चि अवचित भेटला समर्थ । स्वामी गणनाथ कृपार्णव ।। सोऽहं मंत्र गुज सांगितलें कानीं । शब्दाविण ध्वनि ऐकविला।‘तत्वमसि’  महा-वाक्य विवरून । ॐ काराची खूण दाखविली ” ।।“ सद्गुरू गणेश । उपनामें वैद्य । तेणें स्वसंवेद्य ।आत्मरूप ।। दाखवोनि स्वामी । स्वरूपानंदास । कैवल्यपदास । पोंचविलें ।।"
या दृष्टीनें पाहिल्यावर मनांत येते, कीं “सोऽहं” साधना, “सोऽहं” भाव,“सोऽहं” बोध व शेवटी “सोऽहं” सिद्धी इ.सर्व छटा आणि आचार सुलभ माहिती, “अमृतधारा”,संजीवनी गाथा ” व “ भावार्थ गीता ” या स्वामींच्या ग्रंथांमधून आपल्याला मिळते. म्हणून हे तीनही ग्रंथ त्यांच्या “सोऽहं-हंसोपनिषद” दर्शनाची प्रस्थानत्रयी मानायला हरकत नाही माझ्यासारख्या आळशी शिष्याला समजावें या हेतूनें श्रीस्वामी काहीनां काही निमित्ताने शिकवत असतात.
आज श्री स्वामींच्या महासमाधीला ४३ वर्षे झाली. सगुणांत असतांना, सोऽहं संगीतात नित्य रममाण असणाऱ्या श्रीस्वामींच्या पवित्र स्मृतींनां त्रिवार वंदन.

ranadesuresh@mail.com             माधव रानडे
09823356958
Friday, July 21, 2017

 “सोऽहं-हंसोपनिषद ” 
अर्थात 
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील 
( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश:- १ )


१९३४ साली एका मामुली आजाराच्या निमित्ताने जेव्हा साक्षात मृत्यू समोर उभा ठाकला तेव्हा स्वामींसाठीं गुरुपदिष्ट “सोऽहं” हा तारक मंत्र ठरला, त्याच 'सोsहं' भजनाच्या, सोsहंस्मरणाच्या, आधारे, स्वामींच्या जीवाची शिवाशी भेट झाली,त्रिपुटीचा अंत झाला. त्यांनीं “आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां ” चा साक्षात् अनुभव घेतला. मरण भयावर मात करीत ते निर्भय झाले, व अद्वय भक्तिसुखांत आकंठ डुंबत, " बुडतां अमृती मरण तरी का संभवेल कल्पांती '' असा अमरत्वाचा साक्षात्कारी अनुभव त्यांनी घेतला.
समग्र अस्तित्वाच्या मुळाशी केवळ एक “ आत्मरूप ” आहे या मूलभूत सत्याचा, अपरोक्ष अनुभव, श्री स्वामीनीं, २१ जुलै १९३४, शुक्रवारच्या रात्री अनुभूतीच्या अंगाने घेतला. ते लिहितात --
 “ शुक्ल पक्ष भृगु-वासर रात्रौ आषाढींची नवमी ।  
अठराशें छप्पन्न शकाब्दीं मृत्यु पावलों आम्ही"अधा२७
वरील साकी, ईशावास्योपनिषदांतील खालील श्लोकाच्या-
  “ सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयं सह
   विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्याऽमृतमश्नुते " ईशा.१४
संदर्भांत वाचली असतां,लक्षांत येते- कीं “ आपुलें मरण पाहिले म्यां डोळां ” हा आपल्या देह-भावाच्या मरणाचा   "अनुपम्य सोहळा ” पाहाणारे श्री स्वामीं सारखे साक्षात्कारी संतच, खऱ्या अर्थानें अमरत्व अनुभवतात.
“ विनाशेन मृत्युं तीर्त्वा ”, “ संभूत्याऽमृतमश्नुते ” मृत्यूची भीती दूर झाल्यानेच, वस्तुत: नव्याने जन्म (संभूति) होतो, नवजीवन सुरूं होते.
म्हणूनच श्री स्वामींच्या तोंडून सहजोद्गार निघाले- 
जगीं जन्मुनी अभिनव - जीवन - सत्कविवर होईन
स्वानुभवान्त:स्फूर्त नवरसीं सत्य-काव्य निर्मीन"अधा१
आपल्या या अभिनव - जीवनाची दिशा कोणती असावी व आपल्याला काय कार्य करावयाचे याबद्दल श्री स्वामी नि:संदेह असल्याचे त्यांच्या “ अमृतधारा ” मधील अनेक साक्यांमधून स्पष्ट होते.
 “ पाठवी येथें ती आम्हातें मातेची नवलाई ।
चाकर आम्ही दिधल्या कामीं न करूं कधिं कुचराई ”।।
अ.धा. १५९ ।।
ते नेमून दिलेलं काम म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रमुख तीन ग्रंथांचें  प्रचलित मराठीत रूपांतर. भाषेच्या दुर्बोधतेमुळे, पुढील पिढ्यांसाठी लुप्तप्राय होत चाललेल्या, श्री ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकट केलेल्या ब्रह्मरसाला, ब्रह्मानंदलहरींना, श्री स्वामींनीं त्यांच्या साहित्यसेवेतून, अभंग-रूपांत पुन:प्रवाहित केलं.
पण जग्नमातेनं नेमून दिलेल्या कामाची पूर्व कल्पना दृष्ट्या स्वामींना असल्याचे वरील साकीवरून स्पष्ट होते. एव्हढंच नव्हे तर त्यांनीं ते अभंग-रूप किती अनुपम अभिनव पद्धतीनं प्रस्तुत केलंय याचाही आपल्याला प्रत्यय आला आहे.
मात्र “ सोऽहं-हंसोपनिषद ” हे, सोऽहं-हंसावतार, सच्चिदानंद सद्गुरू, स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या सर्व साहित्यांतून,मला भावलेलं,मी निवडून संकलन करण्याचे योजलेलं  विसाव्या शतकांतील चाकोरी बाहेरचं असं आगळं वेगळं मराठीतील पहिले-उपनिषद असावें.
मी, मला, किंवा योजलेलं असं लिहिण्याचं कारण हे कीं सद्गुरूंच्या प्रेरणेंतून माझ्या मनांत उद्भवलेले हे वैयक्तिक विचार आहेत व सध्या तरी कल्पनारूपच आहेत. न पटेल त्यांनीं सोडून द्यावे. यांत कोणाला बदल करावा,वा भर टाकावी वाटल्यास मला त्यांत आनंदच वाटेल.
झपाटयानं बदलणाऱ्या समाज-मनाच्या आकलनांतून, एका साक्षात्कारी द्रष्ट्या संताच्या, चिंतन-मननांतून निघालेलं हें बोधामृत आहे.
देश यंत्रयुगाच्या उंबरठयावर असतांनाचं द्रष्ट्या, श्री स्वरूपानंद स्वामींचे तत्वज्ञान, हे सांप्रत संजीवनी ठरणारं आहे. स्वामी म्हणतात-     
       “ बाह्य सुखालागीं धांवतो हा जीव । यंत्र-युगें हांव वाढविली ।अंतरींच्या सुखा होउनी पारखा । दुःखाचिया नरकामाजीं पडे ।।मायिक नश्वर विषयसुखास्तव माजविले बडिवारे  आत्म-देव अव्हेरुनि आम्ही देहाचे देव्हारे ।।
केवळ देहाचेच चोचले पुरविणाऱ्या, व त्यांतच इतिकर्तव्यता मानणाऱ्या भोगवादी संस्कृतीची कीड समाजाला पोखरून टाकीत असल्याचे भान श्री स्वामींनां होते.
खालावत चाललेली संतभूमिका, अभावाने दिसणारे संतकार्य, आणि त्याचबरोबर परमार्थ क्षेत्रांतील  वाढता दांभिकपणा आणि व्यापारीकरण याचे दुःख वाटून त्यांचें मन व्यथित झाल्यामुळे खंत वाटून ते म्हणतात-
       पुरे पुस्तकी विद्या ती कीं अवधी पोपटपंची ।----
       स्वानुभवाविण वेदान्ताची पोपटपंची वायां ।----
        परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती ।-----                  देतसे व्याख्यान सांगे ब्रम्हज्ञान ।
                    पोटीं अभिमान पांडित्याचा ।------
     “ गतानुगतिकत्वाची ऐसी पाहुनियां जन-रीति ।
        विटलें मन जाउनि बैसलें हृदयाच्या एकान्तीं ।
“ लोकां सांगे ब्रह्मज्ञान पण आपण कोरडे पाषाण ” अशा बळावत चाललेल्या वृत्तीचा त्यांनां खेद वाटे.
‘लोक कल्याण’ व ‘जगदुद्धार’ हा स्वामींच्या सर्व लेखनाचा,शिकवणीचा पाया आहे ‘श्री स्वामीजींची सर्वांत प्रमुख शिकवण म्हणजे .." सोऽहं ”
यत्र तत्र सर्वत्र, सोऽहं चं संगीत अनुभवून ते तितक्याच समर्थपणे तुम्हा-आम्हासमोर मांडणारे  सोऽहं-हंसारूढ स्वरूपानंद स्वामींसारखे अनुभवसंपन्न साक्षात्कारी संत दिसतानां देहधारी दिसले तरी प्रत्यक्षात परब्रह्मच!
खरं सुख हे अमाप पैसै खर्च करून एकत्र केलेल्या अनेक वस्तुं मध्यें / वस्तूंपासून नसून, सर्वांच्या हृदयदेशीं वास करणाऱ्या त्या एकमेवाद्वितीय सहज-स्फुरणरूप वस्तूच्या अनुसंधानांत आहे.
सोऽहं साधनेचा सहज सोपा मार्ग सांगताना, स्वामीजी नेमके हेच सांगतात. खरं तर त्यांच्या नावांतच ही शिकवण एकवटली आहे: ‘स्व’’रूप’’आनंद’!
स्वतःचे रूप, स्वरूप, आत्मरूप ओळखणे आणि निष्ठेने कर्म करत असतानाही फळाचा मोह न ठेवणे, ही खरी समाधानाची गुरुकिल्ली!
यंत्र-युगामुळें बळावलेल्या,व भविष्यांत फोफावत जाणाऱ्या सामाजिक विषमतेची चाहूल लागल्यानें ते कमालीचे अस्वस्थ होते. ते म्हणतात-
  “ समानता मानव-धर्माचा नसेल भक्कम पाया ।
    तरी इमारत यंत्र-युगाची उठेल मनुजा खाया ” ।।
यंत्रें ही दुधारी हत्यारे आहेत याची जाणीव असल्यामुळे, ते लिहितात-
  “ अंतरीं सद्भाव । असेल जागृत । 
तरी यंत्रें हित । स्वामी म्हणें ”।।
श्री स्वामींची पुढील साकी यावर प्रकाश टाकते--
   “ तो चि महात्मा, ती च हिंद-भू, तें चि स्वातंत्र्य-रण ।
      दृष्टिकोण तो मात्र बदलला येतां चि मला मरण ”।।
वरील साकीतींल बदलेला दृष्टिकोण हें श्री स्वामींच्या कालातीत तत्वज्ञानाचं इंगित आहे, मर्म आहे. त्यासाठीं आवश्यक आहे मरण,
देह-अहंकाराचं मरण. जें स्वामींनीं अनुभवलं. म्हणून ते म्हणतात--
“ पूर्वीं तुम्ही आम्ही एकत्र बैसोन । 
केलें सोऽहं ध्यान काहीं काल ।।
   आतां रात्रंदिन सोऽहं ध्यानाविण । 
नाहींच स्फुरण मज दुजें ”  ।।
“ सोऽहंभाव प्रकट होतां । अहंकार नुरे चि तत्वतां ” ।। होतां स्वरूपाची ओळखण । सहज संपते जन्म-मरण ”
अंतरीं सद्भाव जागृत करण्याचा, दुष्टांची दुष्ट खोडी संपवण्याचा, शस्त्राविण दुष्टांचा प्रतिकार करण्याचा श्री स्वामींचा कानमंत्र आहे सोऽहं मंत्र.           
श्रीस्वामी हे अभिजात कवित्वाचे, उपजत वरदान लाभलेल्या, ज्ञानी भक्तांच्या, दुर्मिळ श्रेणीतील संत असल्यामुळे त्यांचे बोल ---
           “ साच आणि मवाळ । मितुले आणि रसाळ
                     बोल जैसे कल्लोळ।अमृताचे ”।।
असे आहेत. त्यामुळेंच “ अमृतधारे ” तील सोऽहं बद्दलच्या साक्या, ह्या   “ सोऽहं ” हा समस्त मानव जातीसाठी प्राणमंत्र असल्याचे सांगणाऱ्या अनुभूतीच्या अमृतधारा झाल्या आहेत.
   “ यावत् सावध तावत् सोऽहं स्मरण अखंडित जाण ।
          अढळ भाव सर्वथा मग राहो जावो प्राण ” ।।
स्वामींचे स्वानुभवान्तस्फूर्त शब्द आज समाजासाठी तारक मंत्र ठरणार आहेत.
“ संजीवनी गाथेतील ” सोऽहं संबंधीचे अभंग, हे एका सोऽहं सिद्धाचे, अनुभवाचे बोल सहज, सरळ, सोप्या भाषेत सोऽहं ची महति उलगडतात.
                 “ बैसोनि एकांति करी “सोऽहं ” ध्यान ।
                        तेणे तुझे मन स्थिरावेल ” ।।-----
तर “ स्वरूप-पत्र मंजुषा ” तील सोऽहं बद्दलचे उल्लेख हे सद्गुरू व शिष्य भक्त / वा साधकांबरोबरील प्रसंगोपात् संवादरूपानं “सोऽहं ” साधनेची  प्रक्रिया समजावतात. जसं-
 “ नाभीपासुनि ब्रह्मरंध्रांत । सोऽहं ध्वनि असे खेळत ।
   तेथे साक्षेपे देउनि चित्त । रहावे निवांत धडिघडि ”।।
     घडिघडी करावा विवेक । देहदि प्रपंच मायिक ।    सत्य नित्य शाश्वत एक | असे निःशंक आत्मरूप ।|  
 आत्मरूपी दॄढ विश्वास । आत्माचि मी हा निदिध्यास । साक्षित्वे साहोनि सुखदुःखास करावा अभ्यास
नित्यनेमें  इथे हे लक्षांत ठेवलं पाहिजे कीं, या साऱ्या साहित्याचं स्वरूप हे श्रीस्वामींकडून त्यांचें ईश्वर नियोजित कार्य होत असतांना घडलेली अनैच्छिक सहज-निर्मिती आहे.
माझ्या कल्पनेने त्यांची निवड व संकलन करून भविष्यांत सोहं-हंसोपनिषदा च्या रूपानं प्रस्तुत करण्याचे मनोगत आहे.
आज २१ जुलैलाच याचा शुभारंभ करतांना विशेष आनंद होत आहे.  
नियोजित “ सोऽहं-हंसोपनिषदा ” चा शांतिपाठ म्हणून वरप्रार्थनेतील पुढील साकी निवडली आहे-
                “ नर-नारी हरीरूप दिसो बाहेर अंतरीं ।
                रामकृष्ण हरि मंत्र उच्चारो मम वैखरी ” ।।

माधव रानडे 
09823356958
ranadesuresh@gmail.com                                                                     

Friday, June 9, 2017

                गोष्ट “ सुखी जीवनाची कला लघुपटाची
              गोष्ट “ The Art of Happy Living ” ची
                              (क्रमश:-२)
        
यापूर्वींच्या लेखांत लिहिल्याप्रमाणें, श्री स्वामींच्या साहित्य / तत्वज्ञान यावर डाॅक्यूमेंटरी काढायचं स्वप्न मी हाॅस्पिटलमध्येपण पहात होतो.
माझ्या पत्नीने मनोभावे केलेल्या प्रार्थनेच्या फलस्वरूप, श्री स्वामींनीं मला समजावले कीं, दुसऱ्या कोणीही, मग बेशक ते सेवा मंडळ असो किंवा कोणी व्यक्ती असो, काय करावे, याबद्दल आग्रह न धरतां स्वत: काय करतां येईल तेवढं करावं.
श्री स्वामींनीं सुचवले कीं माझ्या मनांत त्यांच्यावर डाॅक्यूमेंटरी काढायची आहे तर ती मीच कां काढूं नये ? वर त्यांनीं आश्वासनही दिले कीं या प्रयत्नांत ते सतत माझ्या पाठीशी असतील.
या घटनेनंतर मात्र स्वप्नाची परिणीती संकल्पात झाली. श्री स्वामींच्या कडून मिळालेल्या प्रेरणेंतून, “ सारद ” च्या  कविता दातिर ” यांच्या ऐवजीं दोन दुसरींच नवीन नांवं डोक्यांत आली.
सौ. मृणाल मायदेव-धोंगडे, व शशांक म्हसवडे. खरं तर तेंव्हापर्यंत या नांवाच्या दोन व्यक्तींबरोबर माझी फक्त तोंड-ओळख होती.
आम्ही रहात असलेल्या प्राधिकरण भागातील, “ज्ञानप्रबोधिनी ” नवनगर विद्यालय स्नातक संघाच्या “प्रबोध रत्न ” या २०१५ साली सुरू झालेल्या पुरस्कार उपक्रमांत दोन्ही वर्षीं मी परीक्षक होतो, त्या निमित्तानें.
मृणाल चं दोन्ही वर्षी “ प्रबोध रत्न ” पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं. २०१६ साली तिची यासाठी निवड देखील झाली.त्यामुळं परीक्षक या नात्यानं मला तिच्या शैक्षणिक व बौद्धिक पातळीची आणि तिच्या व्यवसायाची बऱ्यापैकी कल्पना होती.
तर शशांकने या कार्यक्रमाची व पुरस्कारासाठी निवड झालेल्यांची पार्श्वभूमी सांगणारी चित्रफीत बनवली होती.
खरंतर एवढ्या जुजबी माहिती व ओळखीवर एका संपूर्ण माहितीपटाची जबाबदारी या दोघांवर टाकणे कितपत योग्य असंच कोणालाही वाटेल.
पण अशा बाबतींत मी स्वामींच्याच एका अभंगातील-

   “ खेळविसी तैसा । खेळेन साचार । 
तूंचि सूत्र-धार । बाहुलें मी ।।
      बोलविसी तैसे । बोलेन वचन । 
मज अभिमान । कासयाचा ।। ”

हे सूत्र कायम लक्षांत ठेवतो व त्याप्रमाणें कृती करतो. पावले उचलतो.
मी दवाखान्यांतूनच मृणालचा नंबर मिळवला. ती आणि शशांक मिळून ही जबाबदारी पार पाडूं शकतील असा मला विश्वास वाटतो ही ईश्वरी योजना आहे. असा मी तिला फोन केला.
आता जवळपास २७०० लोकांनी यूट्यूबवर हा श्री स्वामीं
वरील लघुपट पाहून झाला, अनेकांनी तोंडभरून कौतुक केलं.  आतां मागे वळून पहातांनां, तिला काय वाटतं, अस मी तिला विचारलं, ती काय म्हणाली, ते मृणालच्याच शब्दांत पाहूं-

“ १५ सप्टेंबर.... चिकन गुनियामुळे आलेला ताप नुकताच गेला होता आणि मी असह्य सांधेदुखी सोसत, अजूनही झोपूनच होते.... तशात मला रानडे काकांचा फोन आला. रानडेकाका आणि माझी ओळख तशी जुजबीच...म्हणजेच ज्ञान प्रबोधिनी च्या प्रबोधरत्न  पुरस्काराच्या निमित्ताने  १-२ वेळा भेटलो होतो इतकंच ! , ते परीक्षक...तेवढीच काय ती  ओळख. काकांचा फोन  उचलला तर ते म्हणाले माझ्या डोक्यात काही कल्पना आहे. त्यासाठी तू काही करू शकशील का? मी आजारपणामुळे  अजून काम सुरु केले नव्हते आणि आतून मला उभारी देखील वाटत नव्हती. तसे मी काकांना सांगितले तर ते म्हणाले.. मी तुझ्याशी हॉस्पिटलमधून बोलतोय. डेंग्यू  झाल्याने मी ऍडमिट आहे.... हे ऐकल्यावर माझी बोलतीच बंद... ७८  वर्षाच्या तरुणाला ऍडमिट  असताना ही काम सुचतंय तर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही.  मी त्यांना लगेच सांगितले की मला होईल ते सगळं मी नक्कीच कारेन पण मला या विषयाची काहीच माहिती  नाही. तेव्हा त्याच फोनवर  काकांनी मला सांगितले की गीता जशी ज्ञानेश्वरांनी सोपी केली तशी ज्ञानेश्वरी स्वामीजींनी अधिक सोपी केली पण तरीही आताच्या समाजाला कळेल अशा अधिक सुलभ स्वरूपात डॉक्युमेंट्री च्या रूपात आपल्याला त्यांची शिकवण पोचवायची आहे. त्यासाठी तू आणि शशांकने काम करावं  असं  मला  वाटतं ....मी शशांकशी  बोलले. त्यानेही  तयारी दाखवली पण तो हैद्राबादमध्ये, मी आजारपणामुळे  घर-ग्रस्त ...   भेटून चर्चा करणार तरी कशी  ... पण म्हणतात ना.... इच्छा तेथे मार्ग.... आम्ही कॉन्फरन्स  कॉल  वर बोलायचे ठरवले ...त्यानुसार २३  सप्टेंबर ला रात्री कॉन्फरन्स कॉल  झाला...अनेक नवीन लोकांची फोन -ओळख झाली. मी स्क्रिप्ट  लिहायची व शशांक ने त्यानुसार व्हिज्युअल  करायचे हे ठरले . तरीही माझ्या डोळ्यासमोर काहीच नीटसे चित्र येईना वेदनेमुळे डोके ही बहुधा थोडे मंद झाले होते. म्हणून कामाला नक्की सुरुवात कशी करायची ते कळेना. काका फोनवर काही काही माहिती द्यायचे पण मला स्वरूपानंद, त्यांचे काम....काहीच माहित नव्हते.
काका म्हणले तू इथे येतेस का एकदा? मी महिनाभर घराबाहेर पडले नव्हते इतकी सांधेदुखी तीव्र होती. म्हणून त्यांना म्हणलं की फोनवर नाही का सांगता येणार...ते म्हणले नाही...एकदा तरी ये...कॅब करून ये...स्वतःचे हाल करू नको ...आणि केबिन लगेजची बॅग घेऊन ये..मला वाटले काका गम्मत करत आहेत पण मी खरंच तेवढी मोठी बॅग घेऊन गेले. नवरात्रात म्हणजे साधारण ऑक्टोबर मध्ये त्यांना भेटायला गेले. ती मीटिंग सर्वात महत्वाची होती. काकांनी मला स्वामींचे चरित्र, त्यांचे कार्य याविषयी खूप काही सांगितले आणि १७-१८ पुस्तके बरोबर घेऊन मी परतले. त्या दिवशी दुसरे काही केले नाही. मनन मात्र चालू होते. दुसऱ्या दिवशी एक-एक पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केली ... ....केवढा हा आवाका....केव्हढे साहित्य...केवढे कार्य....आपल्या बुद्धीला झेपणारे का हे स्क्रिप्ट लिहणे...एक नाही अनेक प्रश्न मनात फेर धरत होते...एकदा वाटले...सरळ काकांना सांगावे की मला काही कळत नाहीये...मला नाही वाटत मी लिहू शकेन....काका मधून मधून फोन करत होते आणि माझ्याकडे असलेली पुस्तकामधील साक्या, अभंग, मला पान नंबर सांगून, तोंडपाठ म्हणून दाखवत होते....त्यांचे inputs देत होते....अगदी खरं सांगते....त्यांचा उत्साह, त्यांची यातील involvement आणि त्यांना माझ्यावर असलेला विश्वास पाहून मला वाटले....मी हे करू शकणार नाही असे मी म्हणूच शकत नाही...मला हे केलेच पाहिजे....खूप मंथन होऊन...एक दिवस अचानक मी....लिहायला सुरु केली.. 
क्षणात येते मनात माझ्या...” काकांनी ही साकी सांगितल्यापासून मनात घोळत होती...तिनेच स्क्रिप्टचा श्रीगणेशा झाला आणि जे काही थोडेफार लिहिले होते ते रेकॉर्ड करून मी काकांना पाठवले. काकांचे लगेचच फीडबॅक आला की तू तर सुरवातीलाच सिक्सर मारला आहेस. हे कौतुक ऐकून खरच खूप हुरूप आला आणि मग बघता बघता स्क्रिप्टला आकार आला...रफ स्क्रिप्ट झाल्यावर, मी, शशांक आणि काका-काकू भेटलो. त्या दिवशी स्क्रिप्टचे गुण, दोष, काय हवे काय नको याची सांगोपांग चर्चा झाली आणि त्यानुसार बदल करून साधारण डिसेंबरच्या मध्यात स्क्रिप्ट तयार झाले. त्यानंतर शशांक पावसला जाऊन शूटिंग करून आला. बऱ्यापैकी जुळवाजुळव झाली होती. शशांकने एक रफ ड्राफ्ट करून पाठवला आणि सगळ्यांनाच जाणवले की आपल्या हातून काहीतरी चांगले काम व्हावे ही ईश्वरी योजना आहे. काका तर पहिल्या फोनपासून मला तसे सांगत होते...माझ्यापेक्षा जास्त त्यांचा माझ्यावर विश्वास होता. त्यामुळेच की काय, डोक्युमेंट्री आकार घेत गेली आणि १५ एप्रिलला आमची जी मीटिंग झाली त्यात तिचा नीटस आकार दिसू लागला. काका-काकूंचे प्रेम, विश्वास, काकूंचे कमालीचे आदरातिथ्य, अनेकांशी केलेली चर्चा...या सगळ्या गोष्टी या प्रवासात लक्षात राहतील अशा होत्या! अक्षय तृतीयेला डाॅक्युमेंट्री रिलीज करायची हे ठरले आणि त्यानुसार काम होत राहिले....बदल केले गेले, सुधारणा केल्या गेल्या...यात अनेकांनी खूप मोलाचे सल्ले दिले...आणि ठरल्याप्रमाणे रिलीज झाली!

लोकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला....तो केवळ अवर्णनीय! खूप कौतुक होत होते...आपण नक्की याला पात्र आहोत का...हा प्रश्न सतत मनात येतो...कारण 
मी खरं तर, सागरातून केवळ २ थेंब उचलण्याचा प्रयत्न केला आहे...पण ते तरी माझ्या हातून झाले याचा मला खूप खूप आनंद आहे. या कामाने जे समाधान मिळाले त्याचे वर्णन करणे अशक्य आहे ”

मृणाल जसं म्हणते-- कीं
आपल्या हातून काहीतरी चांगले काम व्हावे ही ईश्वरी योजना आहे. काका तर पहिल्या फोनपासून मला तसे सांगत होते...माझ्यापेक्षा जास्त त्यांचा माझ्यावर विश्वास होता.”

या माझ्या अतूट, अढळ विश्वासाचं कारण, केवळ गुरु-कृपा

“ तैसी सद्गुरूकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ” म्हणूनच आम्ही या लघुपटाद्वारें- 
“ बोलीं अरूपाचे (स्व)रूप---” दाखवूं शकलो. शिवाय श्री स्वामी म्हणतात तसं-
       भक्ताचे मनोगत पुरवितां श्री सद्गुरू समर्थ ।      
देव भक्त असे द्वैत दावोनि खेळत स्वयें तोचि ।। ”

सद्गुरूमाऊलींच्या शब्दांत मामुली बदल करत मी फक्त एव्हढंच म्हणेन-
  “ सदैव मार्गी चालत असतां मजला देतो हात ।       
उठतां बसतां उभा पाठीशी (त्रैलोक्या) पांवसचा नाथ।। ”

“ॐ रामकृष्ण हरि-ॐ रामकृष्ण हरि-ॐ रामकृष्ण हरि    919823356958
ranadesuresh@gmail.com                  माधव रानडे.