Friday, December 22, 2023

आज गीता जयंती. श्रीमद्भगवद्गीता ही मानवानी कसं वागावं याची नियमावली आहे. केवळ या ग्रंथाची गंध अक्षतांनी पूजा करून उपयोग नाही. दररोज थोडे बहुत गीता पठन व त्यावर मनन, चिंतन आणि अनुसरण, सुखी जीवनाची ही गुरुकिल्ली आहे.


Thursday, December 14, 2023

 “गीता-भावार्थ अर्थात् भावार्थ-गीता”

 संस्करणा मागील भूमिका - -
   
“गीता ज्ञानेश्वरी । आता घरोघरी । 
भक्तांचा कैवारी । स्वरूपानंद  ॥”

 असा माझा दृढ विश्वास आहे.

‘ज्ञानेश्वरी’ तील दृष्टांत, सिद्धांतांवर आधारित, साकी वृत्ता तील, गेय 'गीता - भावार्थ' अर्थात‘भावार्थ-गीता’ या स्वामी स्वरुपानंद (पावस) यांच्या  गीते चे वेगळेपण व महात्म्य विशद करुन सर्व मराठी वाचकांनां ही स्वस्त आणि सुलभपणे उपलब्ध करुन देणे हा या संस्करणाचा मुख्य उद्देश आहे.

मला कोणी कधी विचारलं, तर मी सांगतो की, गीतेच्या अंतरंगात प्रवेश करायचा असला; गीता-तत्व सुखाचा बोध   करून आनंद घ्यायचा असला,  तर “ज्ञानेश्वरी” सारखा ग्रंथ नाही. भाषा दुर्बोध वाटली तर “अभंग-ज्ञानेश्वरी” चा आधार घ्या. त्यासारखा उत्तम मार्गदर्शक नाही. आणि गीता व ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांचा रसास्वाद प्रचलित सोप्या मराठीत घ्यायचा असेल तर “भावार्थ-गीता” सर्वोत्तम आहे.
"भावार्थ गीता" म्हणजे भगवद्गीता (७०० श्लोक) विस्तार  तसेच ज्ञानेश्वरी (९०३३ओव्या) सार आहे.   
संस्कृतशी तोंड ओळख असलेल्या मराठी वाचकांचा गीता-तत्वाशी परिचय, व  गीतेवरील, अद्वितीय टीका ग्रंथ ज्ञानेश्वरीतील प्रमेय आणि दृष्टांत आजच्या मराठीत सोप्या शब्दांत समजावणारी, ब्रह्मरसाची पर्वणी म्हणजे  "भावार्थ गीता".

नाथ संप्रदायात, तेराव्या शतकानंतर, ‘ज्ञानेश्वरी’ प्रमाण ग्रंथ मानतात. संप्रदायातील साक्षात्कारी संत म्हणजे ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी. ज्ञानेश्वरी बरहुकुम जगणारे. ज्ञानेश्वरीतील भक्त लक्षणे असोत वा स्थितप्रज्ञाची, त्यानुसार आचरण करणारे.

नाथ संप्रदायाचे विसाव्या शतकातील ध्वजवाहक, व ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानत्रयी चे समर्थ भाष्यकार अग्रगण्य साक्षात्कारी संत कवी चैतन्य स्वरूप स्वामी स्वरूपानंद (पावस) याचे चालते बोलते उदाहरण.

जीव-जगत्-ईश्वर यांच्या एकात्म दर्शनाचा, अद्वैत भक्तीचा, पुरस्कार करणाऱ्या नाथ संप्रदायात,  ‘ज्ञानेश्वरी’ त प्रतिपादन केलेल्या माऊलींच्या ज्ञान-भक्ति समन्वया नंतर, ज्ञान व भक्ति या मार्गांनी जीव ब्रह्मैक्य योग ईश्वराशी समरस झाल्यानंतरच, अनुभवता येतो अशी मान्यता आहे.

ज्ञानेश्वर माऊलींनी लोकजागरण केले. जनप्रबोधन करून महाराष्ट्राच्या तळागाळांतील सर्व भागवत भक्तांना जवळ केलं. वर्ण विशेष मक्तेदारी मोडीत काढली. नामदेव शिंपी,सावता माळी, चोखोबा महार, गोरा कुंभार, जनाबाई, बहिणाबाई, सेना-महाराज, निळोबा, विसोबा खेचर अशी एक संत परंपरा निर्माण केली. पुढील काळात संत एकनाथ, संत तुकाराम या तत्कालीन संतांनी ईश्वरनिष्ठांच्या या मांदियाळीत भर घातली. त्यामुळे रूढीवादाला आळा बसला. खंगत चाललेल्या भागवत धर्माचं पुनरुज्जीवन झाले.     
 बहिणाबाईं लिहितात - 
“सन्त  कृपा झाली इमारत फळा आली  | ज्ञानदेवे रचिला पाया  | उभारिले देवालया | नामा तयाचा किंकर | तेणे विस्तरिले आवार  |
जनी जनार्दन एकनाथ | स्तम्भ दिला भागवत | तुका झालासे कळस |भजन करा सावकाश || बहिणा फडकती ध्वजा | तेणे रूप केले ओजा  ||”
माऊलींच्या पाऊलांवर पाऊल ठेवत संप्रदायाची धुरा सांभाळणाऱ्या स्वामींचे ध्येय केवळ ‘आत्म-कल्याण ’ नव्हते, तर त्या बरोबर ‘जगत्कल्याण’ हे होते, म्हणून त्यांनी देखील, " जे जें भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत |- - -|| हा दृढ भाव असलेल्या ‘भक्तिमार्गा’ चाच पुरस्कार केला.

काळपरत्वे बदलती नीती आणि संगणक युगाची गती यावर मात करणारी शक्ती फक्त भक्तीत आहे. 
 
ईश्वराची - विश्वात्मकता हा धर्मविचार भारतीय भक्ति - साधनेचा पाया,    आहे हे लक्षात घेऊन चैतन्य स्वरूप श्री स्वामींनीं  ‘विष्णुमय जग’ ही संतांची भावदृष्टी दर्शविणारी ईशावास्योपनिषदातील, गुरूपदिष्ट व स्वानुभवसिद्ध त्रिकालाबाधित ‘सोsहं’ श्रुती उक्ती चाच तारक मंत्र म्हणून स्वीकार, प्रचार व प्रसार केला. 

“पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह
रश्मीन्समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं
तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ” ॥ईशावास्योपनिषद /१६॥

कुळ, धर्म, जात-पात वर्ण विरहित, सर्व मानव मात्रांच्या अंतरीं अखंड चालणारे सहज स्फुरण हे स्वत:च्या देहापुरतेंच मर्यादित नाही तर ते सर्व व्यापक चैतन्यमयतेचा अंश ‘सोsहं’ स्वरूप आहे ही जाणीव श्री स्वामींनीं त्यांच्या “भावार्थ गीता” व त्यांच्या सर्व साहित्यात सर्वांना समजेल अशा सोप्या शब्दांत विशद केली आहे.

ज्ञानी भक्त सगुण निर्गुण दोन्ही मधे भेद मानत नाही. जीवा शिवाची भेट झाली की त्रिपुटी चा अंत होतो उरते फक्त आत्मज्ञान.“भावार्थ-गीते”त स्वामी ज्ञान, विज्ञान, अज्ञान, अध्यात्म, अधिदैव, अधिभूत, कर्म, अकर्म, विकर्म इ. संज्ञा ज्ञानेश्र्वरीच्या आधारे सोप्या शब्दात व्यक्त केल्या आहेत.

श्री स्वामींच्या ‘संजीवनी गाथे’ तील पुढील पंक्ति, उल्लेखनीय व सैद्धान्तिक आहेत.
 
“भक्त तो चि ज्ञानी ज्ञानी तो चि भक्त ।
जाणावा सिद्धान्त स्वामी म्हणे ” ॥ ४०/४ ॥
“सगुण निर्गुण कासया हा भेद । 
एकला अभेद वासुदेव”      ॥१४८/१॥

साक्षात्कार साधनेत ज्ञान व भक्ती, यांच्यात समन्वय साधला जातो. श्री स्वामी निक्षून सांगतात “ सदा स्वरूपानुसंधान।हेंचि भक्ति हेंचि ज्ञान । तेणें तुटोनि कर्म-बंधन । परम समाधान प्राप्त होय ”स्वपमं६४/७॥

श्र्वेताश्र्वेतर महर्षींनी ऋषिसमुदायाला आत्मज्ञान प्राप्तीसाठी सांगितलेल्या उपदेशाचे भरतवाक्य  एकात्म दर्शनाची ही भूमिकाच अधोरेखित करते. यांत गुरु - कृपेला अनन्यसाधारण महत्व आहे.
 
“यस्य देवे पराभक्ति: यथा देवे तथा गुरौ।तस्यैते कथिता ह्यर्था: प्रकाशन्ते महात्मन:” ॥६/२३॥ श्र्वेत - श्र्वेतांबर.
“ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल । जे गुरुकृपा होईल । पार्था गा ।” ४/१७१॥ ज्ञानेश्वरी.
 
श्री स्वामींचे 
“गुरुकृपेविण नाही आत्म-ज्ञान । वाउगा तो शीण । साधनांचा ॥
सहज-साधन गुरु-कृपा जाण । जीवाचें कल्याण तेणें होय”॥संजी.गाथा६५/१-२॥ 

गुरु-कृपेचाच निर्देश करतात. 
 
“नीतीच्या बदलती कल्पना कितीक कालपरत्वें । त्रिकाल असती परी अबाधित तिचीं मूळचीं तत्वें” ॥
“पाठवी येथें ती आम्हांतें मातेची नवलाई । चाकर आम्ही दिधल्या कामीं न करूं कधिं कुचराई” ॥
“स्थैर्य प्रज्ञेप्रति त्वत्कृपें पूर्ण तपस्या झाली । त्वदाज्ञेस अनुसरून आतां ठेवूं लेखनी खाली”॥
जग्न्माऊली आज्ञा होतां ती पुनरपि उचलूंच । भक्त होऊनी त्वद् - यशोद्व्धजा जगीं उभारूं उंच ॥
अमृत-धारा - ७४,१५९, १६१,१६२.
 
स्वरूप पत्र मंजूषाच्या पत्र क्र.३१(   १४-१०-५४ ) मधे स्वामी लिहितात-

अखंडित घ्यावा कोण ‘मी ?’ हा शोध ।
व्हावया प्रबोध अंतर्यामीं ॥८॥
अंतर्यामीं एक वसे नारायण ।
राहे जो व्यापोन चराचर ॥९॥
चराचररूपें तो चि एक साच ।
प्रत्यय ऐसाच आला मज ॥१०॥
स्वरूप पत्र मंजूषाच्या पत्र क्र.२६ मधे स्वामी लिहितात   
 
आकळितां मी हे कोण ।
सहज तुटे संसार बंधन ।
नुरे दिक्कालाचे भान ।
लाभे समाधान नित्य नवें ॥९॥
नित्य नवें सत्य प्रकटत ।
मन होतां शांत निवांत ।
लागे ठाव अखंड अनंत ।
सहज शाश्वत स्व-रूपाचा ॥१०॥
स्वरूपाचा लागतां ठाव ।
मग सर्वत्र आत्मभाव ।
दर्शनी स्पर्शनीं नवोनव ।
सत्य स्व-भाव स्फुरे तेव्हां ॥११॥
तेंव्हा घडों जें जें कांहीं ।
तें तें सत्य स्वरूप पाहीं ।
लिहिणें वाचणें बोलणें तेंही ।
स्वभावें होई सत्स्वरूप ॥१२॥
सत्स्वरूपीं रंगो मन ।
लाभो परम समाधान ।
ऐसें देतसें आशीर्वचन ।
स्मरोनि चरण सद्गुरूचे ॥१३॥
१५/०७/६१

तर जें जें काहीं आपल्याला अनुभवाला येते तें तें नाही, ‘नेति, नेति’ असा निश्चय करीत व्यतिरेकाने सर्व दृश्य विलीन/निरास करून केवळ द्रष्टा उरवणं/बाकी ठेवणें हा झाला ज्ञानमार्ग.
बहुतेक ज्ञानीपुरूष व्यतिरेकानें येणाऱ्या आत्मानुभवांतच तृप्ति मानून राहातात. पण श्री स्वामी हे, व्यतिरेकानंतर, “ सर्वं खल्विदं ब्रह्म ”, असा अन्वयाचा, सर्व नामरूपासह एक सच्चिदानंद परमात्माच आहे, असा व्यापक अनुभव घेणाऱ्या, व त्यांतून मिळणाऱ्या अवीट आनंदाचे मुक्त हस्ते दान करणाऱ्या दुर्मिळ साक्षात्कारी संतांपैकी एक आहेत.  

स्वतःची अनुभूती तितक्याच समर्थ पणे अभिव्यक्त करण्याची, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सारखी किमया श्री स्वामींच्या साहित्यात दिसून येते. 
“लोकविलक्षण । करोनि वर्तन । 
न ह्वावें आपण ।अलौकिक ।।”
तर आत्मज्ञानानं कृतार्थ झालेल्यानीं,
“डोळस तो जैसा । पुढें चाले नीट । 
दाखवीत वाट । आंधळ्यासी ।।
तैसा निजधर्म । स्वयें आचरोन । 
नेणत्यांलागोन । दाखवावा ।। ”
ह्या माऊलीच्या सांगण्याप्रमाणें नुसतेंच ‘आत्मकल्याण’ नाही तर त्याबरोबरच ‘जगत्कल्याण’ हे श्री स्वामींचे ध्येय होते,ब्रीदवाक्य होतं. व यासाठींच त्यांनीं ‘भक्तिमार्गा’ चा अवलंब केला.
स्वामींच्या मनांत केवळ काव्यरचना नव्हती. तर त्यांचा मनोरथ होता, कीं आपल्या ईश्वर दत्त अभिनव जीवनामध्ये, सत्कविवर होऊन, स्वानुभवान्त:स्फूर्त, नवरसानीं परिपूर्ण,असें सत्यकाव्य निर्माण करण्याचा, स्वानुभव-सुधा शिंपडून, वसुधा (विश्व) नंदनवन बनविण्याचा.इथें ध्यानांत ठेवलं पाहिजे, कीं सत्कविवर होणे हा, श्री स्वामींचा मनोरथ आहे, मनोदय (Aim), (Resolve) आहे, महत्वाकांक्षा (Ambition) नव्हे. आणि जगदंबेचा सेवक बनून, दास बनून, विश्व- बांधवांसहित सहित सर्वदा भक्ति-सुधा- रस सेवन करणे ही त्यांची मनीषा आहे. 
म्हणूनच त्यांचे  " साच आणि मवाळ | मितुले आणि रसाळ | शब्द जैसे कल्लोळ  | अमृताचे "|| वाचून मन थक्क होते. 
श्री स्वामींचे एक खास वैषिट्य हे आहे की त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रयोगशाळेत काही बोलण्याआधी त्या प्रत्येक गोष्टीचा प्रयोग स्वतःवर केला व त्यानंतरच ते प्रयोगसिद्ध ज्ञान / तवत्ज्ञान लोकांपुढे ठेवले. त्यामुळें त्यांचे बोल हे केवळ अनुभवसमृद्ध न राहातां प्रयोगसिद्ध आहेत असें ठामपणें म्हणतां येतें. या दृष्टीने “ मृत्युपत्र ” या त्यांच्या अप्रकाशित साहित्यांतील, एका कडव्याच्या, ३-११-३४ रोजीं केलेल्या नोंदीचा आवर्जून उल्लेख करावा असा आहे-
“अन जन्मुनि आत्मज्ञ बनावें हा माझा हव्यास । प्रयोगांत आयुष्य आघवें वेचावें हा ध्यास । असा ध्यास लागतां जिवाला झाला साक्षात्कार । वृथा नव्हे कीं बोल; सांगतो अनुभव हा साचार” ।।
परतत्वस्पर्शानं, अरूपातून स्वरूप-मय होऊन,भक्ति-सुधा-रसाचं विश्वासाठीं मुक्त-हस्ते पारणं केलेल्या ऋषीची ही सत्यकथा आहे. आणि हे शक्य झालं, ते केवळ सद्गुरुनी सांगितल्याप्रमाणे “भक्ति तितकी प्राप्ति” हे ब्रीद मानून नाम-रूप कुळ यांच्या अतीत गेल्याने.
श्रीस्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरीतील आत्म-रुप, स्वरूप प्राप्तीची सूत्रे, सोप्या मराठीत साकी वृत्तात मांडली, ज्ञान व भक्तीचा समन्वय केला. ‘सोऽहं’ ची ध्वनि-शक्ति  स्पष्ट केली.
गीता अध्याय २/५४ मधील  स्थितप्रज्ञाच्या लक्षणांवर  चिंतन करत असतांना त्यांच्या मनांत “अंगावरती जरी कोसळती डोंगरही दुःखाचे, असे अढळ मन सदा जयाचे नांव न उद्वेगाचे ". अशा काव्यपंक्ति स्फुरल्या/ झंकारल्या,व एका महान साहित्यिक पर्वाची / कार्याची नांदी झाली. श्री स्वामींनी हे स्फुरण हाच जगन्मातेचा कौल मानला. ते लिहितात" पुसतां गीता भावार्थास्तव ज्ञानेशाते वाट । ठेवि मस्तकी वरद हस्त हा माझा सद्गुरुनाथ ।।" अन "अंतरंग अधिकारी" होऊन श्री ज्ञानेश्वरी  "भावे अवलोकिल्याची" साक्ष  "भावार्थ-गीते" च्या रूपानं  श्री स्वामींच्या लेखणीतून अवतरली / प्रकट झाली. 
या ग्रंथाचा-- ग्रंथकर्ता- ' हृदयस्थो जनार्दनः ' असा उल्लेख स्वामी करतात.
विस्तारभयास्तव “भावार्थ गीते” संबंधीचे उल्लेख पुस्तकाच्या परिशिष्ट (क, ख, ग) म्हणून जोडले आहेत ते पहावे. याबद्दल आवर्जून नमूद करावेसे वाटते ते हे की परि. “ख” मधील ओव्या ग्रंथाचे काम सफल व्हावे म्हणून सद्गुरूंना, आवाहनासाठीं च्या निवडक ओव्या आहेत. परि.“ग” मधील विचार पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू महामहोपाध्याय द.वा.पोतदार यांचे आहेत.
“जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं संपूर्ण | आत्म-रूप जाण प्रकटलें “॥ संजीवनी गाथा ७४/३ ॥ असा अप्रत्यक्ष अनुभव (टीप - इ.स. १९३० साली  स्वामींनी त्यांच्या मित्राला आपला रामभाऊ असा उल्लेख केलेले पत्र परिशिष्ट ‘ग’ म्हणून जोडले आहे.) घेतल्याने आत्म-रूप दृष्टी गवसलेल्या श्री स्वामींचा १९७४ ला महासमाधी घेईपर्यंतचा, शब्द न् शब्द व साहित्य ही स्वानुभव-सुधा आहे. म्हणूनच श्रीमद्भगवद्गीता, आणि माऊलींची “ज्ञानेश्वरी” यांच्यातील सेतू - "मन मी चि करीं तूं प्रीति धरीं मद्भजनीं अविकारी | अभेद-चित्तें मज एकातें सर्वत्र नमस्कारीं "|| ऐशा रीती जी अद्वैतीं भक्ति संभवे पूर्ण | आत्मानुभवी तो चि अनुभवी अनिर्वाच्य ती खूण " || १८/११४ व ९८ || असे निक्षून सांगणारी, श्रीस्वामींची “ “भावार्थ-गीता” आजही तितकीच प्रासंगीक आहे.

आत्म-रूप दृष्टी गवसलेल्या श्री स्वामींचा १९७४ ला महासमाधी घेईपर्यंतचा, शब्द न् शब्द व साहित्य ही स्वानुभव-सुधा आहे. म्हणूनच श्रीमद्भगवद्गीता, आणि माऊलींची “ज्ञानेश्वरी” यांच्यातील सेतू - "मन मी चि करीं तूं प्रीति धरीं मद्भजनीं अविकारी | अभेद-चित्तें मज एकातें सर्वत्र नमस्कारीं "|| ऐशा रीती जी अद्वैतीं भक्ति संभवे पूर्ण | आत्मानुभवी तो चि अनुभवी अनिर्वाच्य ती खूण " || १८/११४ व ९८ || असे निक्षून सांगणारी स्वामींची  “भावार्थ-गीता”  ही काळाची गरज आहे.

कारण तथाकथित नेत्यांकडून केली जाणारी उलट सुलट विधाने, अत्यंत निकृष्ट दर्जाची भाषा यामुळे मराठी समाजमन, सध्या काय बरोबर काय चूक, काय सत्य आणि न्याय्य काय असत्य व काय अन्याय्य याचा निर्णय घेण्यात फार गोंधळून गेलेलं आहे.
आत्म-रूप दृष्टी गवसलेल्या श्री स्वामींचा १९७४ ला महासमाधी घेईपर्यंतचा, शब्द न् शब्द व साहित्य ही स्वानुभव-सुधा आहे. म्हणूनच श्रीमद्भगवद्गीता, आणि माऊलींची “ज्ञानेश्वरी” यांच्यातील सेतू - "मन मी चि करीं तूं प्रीति धरीं मद्भजनीं अविकारी | अभेद-चित्तें मज एकातें सर्वत्र नमस्कारीं "|| ऐशा रीती जी अद्वैतीं भक्ति संभवे पूर्ण | आत्मानुभवी तो चि अनुभवी अनिर्वाच्य ती खूण " || १८/११४ व ९८ || असे निक्षून सांगणारी स्वामींची  “भावार्थ-गीता”  ही काळाची गरज आहे.

कारण तथाकथित नेत्यांकडून केली जाणारी उलट सुलट विधाने, अत्यंत निकृष्ट दर्जाची भाषा यामुळे मराठी समाजमन, सध्या काय बरोबर काय चूक, काय सत्य आणि न्याय्य काय असत्य व काय अन्याय्य याचा निर्णय घेण्यात फार गोंधळून गेलेलं आहे.

अशा रणांगणावरील अर्जुन सदृश्य संभ्रमात योग्य तो निर्णय घेण्याच्या दृष्टीने श्रीमद्भगवद्गीता आणि त्यातील प्रत्येक श्लोकाखालील आजच्या प्रचलीत मराठीतील चैतन्य स्वरूप स्वामींच्या साक्या उद्बोधक आहेत.

आज 15 डिसेंबर (श्री स्वामींची जन्मतारीख), सोsहं स्वरूप सद्गुरु स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या कृपाशीर्वादाने स्फुरलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणी अर्पण 
- माधव रानडे 
9823356958





Foot note:  
Having published the book myself due to Swamiji's blessings I didn't have to spend for Publisher. 
Additionally my friend Sham Shinde of Pranav Media did type setting & art work of cover 📔 page free of cost.Therefore I can easily afford to send copy of this to anyone by Book Post in India, at 50% rebate @ ₹ 225/- who writes his/her name Mob No +Postal address in India & GPays on my No.