Monday, December 14, 2020

प्रसन्न होतां माता हाता चढलें सोऽहं-सार।हवा कशाला मला अतां हा वृथा शास्त्र- संभार

December 14, 2020

                           “सोऽहं-हंसोपनिषद” 


                                  अर्थात

                     श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)     

                          यांच्या साहित्यांतील 

                           ( चाकोरीबाहेरचे )     

                    मराठीतील पहिले उपनिषद

                              (क्रमश:-२६)

              “प्रसन्न होतां माता हाता चढलें 

          सोऽहं-सार।हवा कशाला मला अतां 

         हा वृथा शास्त्र- संभार”॥(अमृतधारा-१५४)


महाराष्ट्रात, माऊली म्हणताक्षणीं संत ज्ञानेश्वर, समर्थ म्हटलं कीं रामदास स्वामी, गुरुदेव म्हणताच रामभाऊ रानडे, डोळ्यांसमोर येतात. 


तसंच “सोsहं” शब्द बोलताच, स्वामी स्वरूपानंद व पांवस हे आतां जणुं समीकरणच बनलं आहे. 


कारण “ शुभ्र नेसणे, मधुर बोलणे, आशिर्वादा वरती हात ”असणाऱ्या पांवसेच्या स्वरूपनाथाने, “गौतमी कांठीं”  “सोsहं” चा मळा फुलवला, आड वाटेवरील पांवसेत “सोsहं” चा सडा केला “अनंत निवासा” च्या अंगणात “सोsहं” ची अमीट रांगोळी रेखाटली. “सोsहं” मंत्राच्या, होकायंत्राने, भवसागर सुखाने पार करण्याची वाट दाखविली/सोपी केली.


पूर्वसुकृताच्या, बळावर सद्गुरुंकडून प्राप्त “ गुरु- शिष्याच्या एकांतींचे ” “सोsहं” मंत्र गुज आणि शब्दाविण ध्वनीच्या अंतरंगाचं व ॐकाराच्या खुणेचं, श्रीस्वामींनी ममुक्षुंनां, मुक्तहस्ते दान केलं.


२२/१०/ ते ३०/१०/१९३४ मधील श्रीस्वामींच्या आत्मचिंतनातील आत्म - कल्याणा नंतरच्या जगत् कल्याण शब्दांनी, त्यांच्या अवतारकार्याचा हेतु, आराखडा स्पष्ट होतो, व “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति” उक्तीचा रोकडा प्रत्यय येतो. आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील ज्ञानेश्वर माऊली

शिवाय काही नामवंत विभूति आणि त्यांच्यातील सद्गुणांचे चिंतन याची नोंद लक्षणीय आहे. रामकृष्ण परमहंस यांचे नांव प्रत्येक नोंदीत सर्वप्रथम येते. 

             “रामकृष्ण परमहंस।थोर जगदंबेचा दास॥   

           जगन्माते संगें बोले।माता सांगे तैसा चाले”॥

                        (संजीवनी गाथा १६३/१-३)

स्वामींनी देखील असाच अनुभव घेतल्याचे अमृतधारेतील अनेक साक्यांतून वाचायला मिळते.


माऊलींनी अध्यात्माच्या क्षेत्रांत विलक्षण क्रांति केली. मराठी माणूस/भाषिक भाग्यवान कीं हा सर्व खजिना मराठीत आहे.त्यांच्या अद्वितीय साहित्याने, सारस्वताने त्यांनी मराठी भाषा समृद्ध केली. स्वामींच्या सर्व साहित्यात माऊलींचा वसा स्पष्ट दिसतो त्यातीलच एक अनमोल रत्न म्हणजे हरिपाठ. स्वामींनी देखील “संजीवनी गाथे” च्या २६१ पैकी २७ अभंगांची माऊलींच्या इच्छेनुरुप निवड करून, त्यांच्या हरिपाठ चे संकलन श्रीकांत उर्फ बाबुराव देसाई यांना अवगत केले होते. सेवा मंडळाने याची ॲाडिओ सी.डी. काही वर्षांपूर्वी काढली आहे.


या ॲाडिओ सी.डी मधे त्यांच्या शिकवणीच्या त्रिसूत्रीचं-सोsहं,भक्ति, नाम, ज्ञान आणि भक्तिचा समन्वय, स्वरूपानुसंधान, हरि भक्ति/हरि नामाची महति, सोहं साधना इ. नाथसांप्रदायिक वैशिष्ट्यं, तसेंच गुरू-शिष्य एकांतींचे गुज हरिपाठांद्वारें लोकांती नेण्याचा माऊलींचा ठसा  स्पष्ट दिसतो. २७ अभंगां व्यतिरिक्त यात मंगलाचरण आहे, ज्यात गुरूपरंपरा सांगितली ही गोष्ट विशेष आहे.


“ सोऽहं ” चा बोध हा स्वामींच्या सर्व साहित्याचा /उपदेशाचा कणा आहे, सार आहे. अमृतधारेतील  सोsहंच्या १७ साक्या वैशिष्ट्यपूर्ण आणि सूत्रबद्ध आहेत. स्वामींच्या स्वतंत्र साहित्यातील,“भावार्थ गीता” हें अमृतधारे वरील भाष्य, तर “संजीवनी गाथा” हे वार्तिक. स्वामींचे हे तीनही ग्रंथ त्यांच्या निज-जीवन-तत्वज्ञानाची,(अ.धा.१३३)प्रस्थानत्रयी 

(भाष्य मूळ ग्रंथाचा अर्थ सोपा करतं. वार्तिक त्या ग्रंथाच्या तत्वज्ञानातील अवघड कल्पनांचा खुलासा करते). 


१९५१ ते १९६३ या बारा वर्षांच्या काळांत स्वामींनीं सांप्रदायिकांना / इतर सुहृद्-सज्जनांना लिहिलेल्या ओवीबद्ध पत्रांचा संग्रह “स्वरूप-पत्र-मंजूषा” ही स्वामींच्या या प्रस्थाान त्रयीची पुरवणी.


स्वामींचं सर्वच साहित्य खरं तर,  “तैसे सत्य मृदु।मोजके रसाळ।शब्द ते कल्लोळ।अमृताचे”॥ अशा प्रकारचं. श्रीमद्भवदगीतेतील-

                  “ बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवानन्मां प्रपद्यते । 

                  वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ।।गीता ७/१९।।”

या श्लोकावरील,“अभंग ज्ञानेश्वरी” तील काहीं अभंगांत श्री स्वामी लिहीतात-  

“ करितां प्रवास । शतावधि जन्म । न गणोनि कर्म- । फल-हेतु ।।देह्तादात्म्याची । संपोनियां रात । जाहली प्रभात । कर्मक्षयें ।। गुरुकृपारूप । उजळली उषा । तेणें दाही दिशा । तेजोमय ।। ज्ञान-बालार्काचा । होतां चि उदय । देखे तो ऎश्वर्य । ब्रम्हैक्याचे ।। संपूर्ण हे विश्व ।वासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ।। म्हणोनि तो ज्ञानी।भक्तांमाजी राजा।जाण कपिध्वजा।निश्चयेसीं॥ ऐसा तो महंत।श्रेष्ठ ज्ञानी भक्त। दुर्लभ बहुत । धनुर्धारा ॥

श्रीस्वामी  उल्लेख करतात तो दुर्लभ ज्ञानी भक्ताच्या भक्तीचा.


स्वरुप पत्र मंजुषां” तील पत्र क्र.६३,६४,६५ ही तीनही पत्रं व ‘अमृतधारे’/ संजीवनी गाथा”तील  ‘सोऽहं’ संबंधी साक्या /अभंग म्हणजे स्वामींच्या साहित्यातून प्रकट होणाऱ्या ‘सोऽहं-हंसोपनिषद’ या मराठीतील पहिल्या उपनिषदाचा पाया. 


माझ्या वाचनात आलं की मारुतिरायाने द्रोणागिरी पर्वत नेला तेंव्हा त्याचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायातील नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात सविस्तर वर्णन आहे की दत्तगुरू व महादेव तेथील अरण्यात भ्रमण करत असतांनां, तिथे तपश्चर्या करणाऱ्यास सांगतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल. ''शाबरी विद्ये'' ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून होते. प्रेरणादायी ठरते. आदिशक्‍तिपीठांचा विचार केल्यास महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्‍तिपीठे आहेत, त्यापैकी वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते. सप्तश्रृंगी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून हे अर्धपीठ. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजतात. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. श्री माॅं जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार आदी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता. सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाते अशी मान्यता आहे.


गुरूपदिष्ट सांप्रदायिक सोsहं ध्यानात मग्न स्वामी, त्यांच्या १९३४ सालच्या आजारपणात,ज्ञानदेवांच्या याच कुलस्वामिनीला सप्तशृंग निवासिनी जगदंबेला सर्वभावे शरण गेले. मातेनेही प्रसन्न होऊन आपल्या अनन्यभक्ताला जवळ केले आणि सोऽहं-सार दिलं. म्हणूनच श्रीस्वामी म्हणतात-

                   “प्रसन्न होतां माता हाता चढलें 

               सोऽहं-सार । हवा कशाला मला अतां 

             हा वृथा शास्त्र- संभार”॥(अमृतधारा-१५४)


२०/२१ जुलै १९३४ नंतर,पार्थिवाच्या मर्यादित कक्षा ओलांडून, दृश्य आविष्काराच्या अस्तित्वाच्या परे, यशोदेहात कार्यरत स्वामींचे सर्व व्यवहार, मातेच्या मर्जीनुसार चालत. याचे दाखले ‘अमृतधारे’ त दिसतात जुलै १९३४ नंतर सर्व पत्रांच्या मथळ्यात ॥जय माताजी॥असा कृतज्ञतापूर्ण उल्लेख याच भावनेतून केलेला आढळतो. 


प्रेरणा-स्रोत चैतन्यस्वरूप, “सोsहं-हंसावतार” सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानंद(पांवस) यांच्या जन्मोत्सव दिनी ही लेखन सेवा त्यांच्या चरणी सादर समर्पण. 

माधव रानडे