“ सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
यांच्या साहित्यातील
( चाकोरीबाहेरचे )
मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश :-१६ )
( क्रमश :-१६ )
“ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ”
श्रीज्ञानेश्वरीच्या सातवा अध्याय, ज्ञान-विज्ञान योगावरील ओव्यांत माऊली सांगतात, हजारो लोकांत एखादाच, ज्ञान प्राप्तीची तीव्र इच्छा मनांत धरून त्यासाठी यत्नशील असतो.त्यापैकीं क्वचितच कुणी पूर्ण ज्ञानी होतो. (ज्ञाने.७/१०)
शेकडों जन्मांचा सत्संग, सन्मार्ग,फलाशे शिवाय केलेले सत्कर्म, व गुरुकृपेनं ज्ञानी भक्त ब्रह्मैक्य ऐश्वर्य अनुभवतो. (ज्ञाने.७/१२८-१३१) आणि-
“ मग ज्ञानरूप । होवोनि आपण । स्वभावें स्वाधीन । करी विश्व ॥ संपूर्ण हें विश्व । वासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ॥ म्हणोनि तो ज्ञानी । भक्तांमाजीं राजा । जाण कपिध्वजा । निश्चयेसीं ॥ प्रतीति-भांडारीं । जयाच्या साचार । विश्व चराचर । साठवलें ॥ ऐसा तो महंत । श्रेष्ठ ज्ञानी भक्त । दुर्लभ बहुत। धनुर्धरा ”॥अभंग ज्ञाने.७/२६५-२६८॥आणि (श्रीमद्भगवतगीता श्लोक ७/३ व १९)
सद्गुरू श्रीस्वामी स्वरूपानंद (पांवस) हे अशा अति दुर्मिळ श्रेणीतील, वासुदेवमय, झालेले विसाव्या शतकांतले साक्षात्कारी ज्ञानी भक्त.
स्वामींच्या स्वप्रतीतीचे अभंग याची साक्ष देतात.
“ एक वासुदेव नांदे चराचरीं । त्याविण दुसरी वस्तु नाही ॥ध्याता ध्यान ध्येय वासुदेवमय ।एक तो अद्वय स्वामी म्हणे ॥” “ वासुदेवाविण विश्वीं नाहीं दुजे । नांदतो सहजें एकला चि । आत्मा बुद्धि मन इंद्रियें विषय ।वासुदेवमय स्वामी म्हणे ” ॥सं.गा.१५१-१४८ ॥ असे भक्त-
“ स्वयें विश्व-रूप होउनी आपण । साधिती कल्याण जगताचें ॥ मोक्ष-रूप हातीं घेउनी संपत्ति । जनालागीं देती भक्ति-पंथें ”॥
( संजीवनी गाथा १३/२-३ )
“ जगीं जन्मुनी अभिनव-जीवन-बागवान होईन । स्वानुभव-सुधा शिंपुनि वसुधा नंदनवन बनवीन ”॥अमृतधारा/६॥
या विश्व-कल्याणाच्या भावनेतून, आध्यात्मिक मार्गात प्रगति करू इच्छिणाऱ्या, साधक विश्व- बांधवांनां मार्गदर्शन करण्याच्या हेतूनें, स्वामींनीं “अभंग-ज्ञानेश्वरी”(य) व स्वतंत्र साहित्य लिहून वाग्यज्ञ केला, तर सांगता वर-प्रार्थनेने केली.
म्हणून त्यातील साकी “ सोऽहं-हंसोपनिषद ” चा शांतिपाठ म्हणून निवडली, शिवाय त्यांत नाथ- संप्रदायाच्या, “सोऽहं-साधनेच्या”खुणा आहेत.
“ स्वामी म्हणे माझा नाथ-संप्रदाय । अवघें हरिमय योग-बळें ” ॥सं.गा.१२२/४॥
“ नर नारी हरीरूप दिसो बाहेर-अंतरीं ।
आपला संबंध येतो ते नर नारी अंतरीं व बाहेर हरीरूप दिसणं,तसा भाव आणि वर्तन असणे ही
अवघें हरिमय वाटण्या पूर्वची अवस्था होय.
“ ॐरामकृष्ण हरी ” हा नाथ-संप्रदाय चा मंत्र. वैखरीवाटे याचा अखंड उच्चार व्यक्तीला स्वरुप -साक्षात्कार घडवूं शकतो. ३० जुलै १९७४ च्या रात्रीं स्वामींनीं हा मंत्र स्वत: सांगत पहाटेपर्यंत करवून घेतला. “सोऽहं-साधना” करणारानीं नाम स्मरण आपल्या संप्रदायां बसत नाही असे मानूं नये.भविष्यात सांप्रदायिक अनुग्रह-वंचित कोणी स्वरुप-सुखास मुकुं नये असा व्यापक असावा. (स्वा.स्व.जीवन-२७७ व२८७. सं.गाथा ६८/४)
वर-प्रार्थना (१) साकीत स्व-स्वरूपानुसंधानाचा वर मागतात कारण ही प्रक्रिया हे सार/मर्म आहे
स्व.प.मं. क्र.६४/७ मधे स्वामींनी लिहिलं आहे -
“सदा स्व-रूपानुसंधान।हेचि भक्ति हेंचि ज्ञान।
आद्य लेखक मुकुंदराज यांच्या ‘परमामृत’ या मराठीतील पहिल्या ग्रंथापासून तर अलिकडील अनेक संतांनीं याच प्रक्रियेवर भर दिला आहे. श्रीस्वामीनी तर बदलत्या काळाची दखल घेत द्रष्टेपणानं आधीच लिहून ठेवलं आहे कीं-
“चालतां बोलतां । हिंडतां फिरतां । लिहितां वाचितां । खातां जेवितां ।- - -। निजात्मसत्ता । आठवावी ”॥॥किंवा “- -अनुसंधान ।प्रयत्नें करोन असों द्यावें ॥ स्व.प.मं ६३-६४/४ ”॥
वर्तमान काळांत हे सर्व व्यवहार करत असतांना आजची पिढी, भ्रमणध्वनि (Mobile) लीलया हाताळत असते त्यामुळे त्यांना अनुसंधान करणं अवघड न वाटतां प्रयत्न-साध्य वाटेल हे खचित.
स्वामींचं साहित्य, म्हणजे त्यांची वाड्:मय मूर्ति, अध्यात्माची काव्यात्मक सहल, ज्यांत नाम व भक्तीच्या भक्कम पायावर, सोप्या,सरळ, भाषेत “सोऽहं” साधना अनुस्युत आहे. गीता अ. १०/९ वरील ओव्यांचे स्वामींचे हे अभंग पहा.
“जाहलें मद्रूप । भक्तांचें तें चित्त । प्राण तो हि तृप्त । मद्रूपीं च ॥ जन्म-मरणाची । विसरले वार्ता । मद्रूपीं रंगतां । ज्ञानबोधें ”॥अ.ज्ञा.१०/ २३३-३४॥ रंगतां मद्रूपीं । भक्त तृप्त होती । उदंड गर्जती । धन्योद्गारें ॥ सद्गुरु शिष्यासी । एकांतीं नेवोन । ॐ काराची खूण । दाखवी जी॥ तो चि उपदेश । मेघांच्या समान । सांगती गर्जोन त्रैलोक्यासी ॥ अंतरींचा राखूं । नेणे मकरंद । पद्म-कळी मुग्ध । उमलतां ॥ मग रायारंकां । सर्वांसी समान । देतसे भोजन । सुगंधाचें ॥ तैसे चि ते मातें।वर्णिती विश्वांत । स्वानंद-भरांत । येवोनियां ”॥१०/२४८-५३॥
अक्षय्य-तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या लेख-माले तील हे पुष्प प्रेरणास्रोत सद्गुरूचरणीं समर्पण.
सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरु श्रीस्वामी स्वरुपानंदाय नम:
माधव रानडे
No comments:
Post a Comment