“ या देहाची हे दशा । आणि आत्मा
तो एथ ऐसा ।”
“ज्ञानेश्र्वरी-नित्यपाठ” या स्वामींच्या “भावार्थ-दीपिका” गीता-तत्वाचं सार, मर्म म्हणून सकृतदर्शनी एकमेंका विरोधी वाटणाऱ्या अध्याय १३ मधील ओव्या स्वामींनी केंद्रबिंदु, महत्वाचा मुख्य विषय म्हणून निवडल्या.
क्र.५७ नंतरच्या ओव्या वाचताच लक्षात येतं की पंचमहाभूत संघातातून प्रकृतीच्या संयोगाने झालेले सर्व देह नाशिवंत आहेत पण देह वेष्टणात असलेलं आत्म-तत्व, शाश्र्वत, अमर अविनाशी, अज, नित्य, सर्वत्र, सदैव, समान निराकार व निर्गुण आहे.
आत्मा निर्गुण असल्याने देह आवरणांत असूनही कर्मबंधांनी लिप्त होत नाही.
“आपुले मरण पाहिले म्या डोळां- -”
अशा आत्म-साक्षात्कार, आत्मज्ञानाच्या अनुपम्य सोहाळ्या नंतर ईश्र्वर प्रणीत आपले विहीत कर्म काय याची स्पष्ट जाणीव होऊन त्यांच्या नव जीवनाची वाटचाल निश्र्चित करण्यासाठी त्यांनी मा जगदंबेचा कौल घेऊन ठरवले कीं-
“सत्याचें दर्शन घडावे संपूर्ण।ध्येय हें लक्षून जीवनाचें॥१॥प्रेम-अहिंसेचे घवोनियां व्रत।लोक-सेवा-रत राहे सदा”॥२॥संजीवनी गाथा ६२॥
ध्येयाशी मनाने तन्मय स्वामी लिहितात-
“तन्मय होतां कुठली बोली ती द्वैताद्वैताची।स्वानुभवाविण कोण जाणता स्व-संवेद्यता त्याची”॥अमृत धारा६८॥
ज्याच्या अधिष्ठानावर देहाचे व्यापर चालतात, त्या द्वैताद्वैतातीत, आत्म- तत्वाचा अपरोक्ष अनुभव घेऊन स्वामींनी या प्रवासातील बारकावे, खाणाखुणा साहित्य रूपी वाटाड्या म्हणून आपल्या हाती दिले आहेत.
देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्यासाठी स्वामींनी सोsहं साधना सांगितली-
“असे सहज परी सोsहं भावे करी सतत अभ्यास।हीच साधना जोंवरीं न तो झाला मोह-निरास”॥अमृधारा२५॥
आणि मी म्हणजे देह ही भ्रामक कल्पना दूर करायला स्वामी सांगतात -
“ ‘मी मी’ म्हणसी परी जाणसी काय खरा ‘मी’ कोण असे ‘काय’ ‘मी’ ‘मन’ ‘बुद्धी’ वा ‘प्राण’ ? पहा निरखोन । ‘प्राण’ बुद्धी मन काया माझी परि मी त्यांचा नाही । तीं ही नव्हती माझी कैसें लीला-कौतुक पाही !॥ गूढ न कांहीं येथ सर्वथा अर्थ उघड वाक्याचा । जाण चराचरिं भरुनि राहिलों मीच एकला साचा”॥अ.धारा ११२ ते ११४॥
शेवटच्या साकींत वाक्याचा शब्दानें
स्वामी महावाक्याचा निर्देश करतात ज्या महावाक्याचा निर्देश करतात, ते “तत् त्वम् असि” महावाक्य
श्रुतिवचनांतील चार महावाक्यांपैकी एक आहे. हे छांदोग्य उपनिषदांत आहे. यात पिता आरूणि त्याचा पुत्र श्वेतकेतु
ला सांगतो तूं स्वत:च(परमात्मा) आहेसआपली उपनिषदें सत्य किंवा रूपक बोधकथांतून स्वामीं सारख्या सत्या- न्वेषकांना व विचारवंतांनां मार्गदर्शन करतात. मूलभूत चिंतन करणारे दोन उपनिषदातील एक श्रुतिवचन असे आहे
“नायमात्मा प्रवचनेन लभ्य: न मेधया न बहुना श्रुतेन । यमेवैष वृणुते तेन लभ्य: तष्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम”॥ कठोपनिषद (१/२/२३) मुंडक (३/२/३). थोडक्यात, एऱ्हवी असाध्य स्वयंप्रकाशी हा आत्मा जो सहस्पंदित होत त्याचा शोघ घेतो त्याची निवड स्वत: करतो.
“निधान सन्निध परि घोर तमीं इत स्तत: भ्रमलो मी ज्ञान-किरण-दर्शनें आतां सत्प्रकाश अन्तर्यामीं”॥अ.धारा १००॥ इथे लक्षात ठेवलं पाहिजे कीं ‘सोsहं’ सूत्र, मूळ ॐ चा ज्ञानमय, प्रकाशमय किरण आहे व ॐ या परब्रह्माची ‘सोsहं’ ही प्रकृती आहे
अन्वय दृष्टीने विश्र्वाकडे पहाणाऱ्या
स्वामींना सर्व दृश्य वस्तूंत परमात्माच दिसे म्हणून ते नि:शंक पणे लिहितात-
“पडे त्यासी पडो विश्र्वाचें हें कोडें । आम्हासी उघडें आत्म-रूप ॥१॥ जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं संपूर्ण । आत्म- रूप जाण प्रकटलें ॥३॥आत्मरूप दृष्टि आत्म-रूप सृष्टि आत्मा पाठीं- पोटीं स्वामी म्हणे ”॥४॥ किंवा “आत्म-रूप आतां आघवा संसार। ठेली येरझार एकसरां॥२॥पावलो नैष्कर्म्य देहीं विदेहत्व । डोळां परतत्व देखियेलें”॥३॥संजीवनी गाथा ७४ व २०॥असे हे आत्म-रूपा चे पारणे इतक्या सोप्या शब्दांत ‘सोsहं-हंसारूढ चैतन्य रूप स्वरूपानंद गुरू माऊलींनी सर्व भक्तांसाठी दिले आहे. त्यांच्याच चरण कमली अर्पण करून नैवेद्य म्हणून घेऊ.
माधव रानडे
No comments:
Post a Comment