स्वामी स्वरूपानंद (पांवस)
मानवरूपातील परब्रह्म
“ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या” १०८ निवडक ओव्यांतील क्र.३७ व ४६ च्या ओव्या आठवताच अलिकडे, चैतन्यरूप श्री स्वामींचा सदा सर्वकाळ “ सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, मित, व मधु भाषण ” करणारा चेहेरा डोळ्यांसमोर येतो आश्चर्याची गोष्ट ही, की अगदी लहानपणापासून “अनंत निवास” च्या ओटीवर बसून संध्याकाळी सातच्या ठोक्याला सुरु होणाऱ्या ह्या सामुहीक पाठाला, अनेक मे महिन्यात मी हजर असे. पण श्री स्वामींचा सुस्मित चेहेरा स्पष्टपणे दिसणे हा अनुभव मात्र हल्लींचा. काय आहेत या ओव्या पाहुया;
(३७)“ज्ञानाग्नीचेनि मुखें | जेणें जाळीली कर्में अशेखे | तो परब्रह्मचि मनुष्यवेखें |वोळख तूं ॥ज्ञानेश्र्वरी ४/१०५॥ (४६) तयाहि देह एक कीर आथी । लौकिकीं सुख दु:ख्खी तयातें म्हणती । परी आम्हातें ऐसी प्रतीती । परब्रह्मचि हा ॥ज्ञानेश्र्वरी ६/४०८॥
(३७) तयासी हि असे । शरीर तें एक । म्हणे तया लोक । सुख दु:ख्खी ॥परी आमुचा तो । ऐसा अनुभव । पार्था, सावयव । ब्रह्म चि तो ॥ अभंग ज्ञानेश्र्वरी ६/७७५-७७६॥
(४६) सर्व हि कर्माची । जेणें ऐशा रीती । टाकिली आहुती । ज्ञानाग्नींत ।मानवाच्या रूपें ।आकारलें जाण ।तें चि पार्था जाण । परब्रह्म ॥अभंग ज्ञानेश्र्वरी ॥ ४/१८३-१८४॥
अमृतधारात स्वामी लडिवाळपणे जगदंबेला म्हणतात-“ नटलो मी परी त्या कामीं होता ना तुझा हात । आतां ठेविसी न मम म्हणुनी कां कानांवरती हात ॥ मजसि या जगद् रंगभूमिवर जसें दिलें त्वां सोंग करीन संपादणी तशी मी राहुनियां नि:संग ”॥ साकी क्र. ५०-५१
छत्रपती शिवरायांच्या काळांतील बहिर्जी नाईक या हेर प्रमुखाची आठवण करून देणारे, त्यांचे हे सोंग, स्वामींनीं इतके बेमालूमपणे वठवले की अनेक वर्षे त्यांच्या निकट सहवासात राहिलेले देखील मानवरूपातील हे परब्रह्म ओळखुं शकले नाहीत. माऊलींनी याचें फार छान उत्तर दिले आहे - “तूं जयाप्रति लपसी । तयां जग हें दाविसी । प्रकटु तैं करिसी । आघवेंचि तूं ॥ कीं पुढिलाचि दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परि नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरे ॥ जे तूंचि तूं सर्वां यया ।मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेंआप लाघविया । नमों तुज” ॥ ज्ञानेश्र्वरी १४/४-५-६ ॥ स्वामींचा दैनंदिन व्यवहार, “मार्गाधारें वर्तावें। विश्र्व हे मोहोरें लावावें । अलौकिक नोहावे । लोकांप्रति”॥ज्ञानेश्र्वरी ३/१७१॥ असा असे. आपण विचार केला तर, “देह तंव पांचाचें झालें । हें कर्माचे गुणीं गुंथलें । भंवतसे चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या ” ॥ ज्ञानेश्र्वरी १३/११०३ हा पंचमहाभूतांचा जो देह आहे, त्यामुळे मी आहे की, मी आहे म्हणून देह आहे ? स्वामी म्हणतात - “मी” “मी” म्हणसी परी जाणसी काय खरा “मी” कोण ?॥असे काय “मी” मन बुद्धी वा प्राण ? पहा निरखोन । “मन” “बुद्धी” अन् “काया” माझी परी “मी” त्यांचा नाही । ती ही नव्हती माझी कैसी लीला कौतुक पाही !॥ गूढ न काहीं येथ सर्वथा उघड अर्थ वाक्याचा । जाण चराचरिं भरुनि राहिलों “मी” एकला साचा ” ॥आत्मतृप्त जीं ऐशा रीती होती नि:स्त्रैगुण्य । असोत नारी नर अक्षरश: संसारी तीं धन्य ॥अ.धारा/११२, ११३, ११४,११५ ॥ नाम, रूप वेष्ठित, त्रिगुणांच्या पडद्याआड लपलेला, अवगुंठित, शुद्ध मी फक्त तत्वज्ञ संत, वा स्वामीं सारखे आत्मतृप्त ओळखतात. “ या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्वज्ञ संत । स्विकारिती ”॥ज्ञानेश्र्वरी२/१२६ काही पारमार्थिक संकल्पनांचा, संज्ञांचा खुलासा करीत आहे (१) उपाधी = देह (२) ब्रह्म तसेच आत्मा सर्वव्यापी, सर्वातीत, गुणातीत, कार्यकारण अतीत, आहे (३) देश काल, वस्तु यानीं मर्यादित होत नाही म्हणून सर्वत्र, सदैव, समान आहे (४)अ.धा.१५५ मधे वाक्याचा लिहिले आहे त्याचा संदर्भ ॐ तत् त्वम् असि या महावाक्याशी आहे (५)सोsहं साधनेद्वारा ही अनुभूति घेता येते. “ सोsहं-भाव-प्रचीत येतां सहज-संयमी झाला आत्मरूप जगिं एक संचलें हा दृढ निश्चय केला ”भा.गी.१२/४७ “जें अपेक्षिजे विरक्ती । सदा अनुभविजे संतीं । सोsहं भावे पारंगती रमिजे जेथ ज्ञानेश्र्वरी १/५३॥ “एऱ्हवी सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहे ऐशी । बुद्धि स्फुरे जी अहर्निशी । ते वस्तु गा मी ॥ परी संतांसवें वसतां । योगज्ञानीं पैसतां । गुरुचरण उपासितां । वैराग्येसी ॥ येणेचि सत्कर्में । अशेषही अज्ञान विरमे । जयांचे अहं विश्रामे । आत्मरूपीं” ॥ ज्ञानेश्र्वरी १५/४२१-४२२-४२३ ॥ १८,१९,२० हे कठोपनिषदातील व ह्याच क्रमांकाचे भगवद्गीतेतील अध्याय २ चे श्लोक या क्लिष्ट संकल्पनांचा खुलासा करतात ज्याचे स्वामी चालतं बोलतं उदाहरण होते. इहलोकींचं विहित/नियत कर्म उत्तम प्रकारे करून ब्रह्मपदी चैतन्यरूपांत विसावणाऱ्या स्वामींच्या सोप्या शब्दांत वरील विस्तृत विवरणाची सारांशाने सांगता करतो. “अविनाशी अ-प्रमेय अ-व्यय जीवात्म्याचे देह । नाशिवंत ते, न च जीवात्मा ह्यांत नसे संदेह ॥ नाम-रूप हें मिथ्या पाहें न करीं शोक सु-धीरा, उभा ठाक नि:शंक संगरीं करीं शस्त्र घे वीरा ! ॥ वधिता समजे ह्यातें किंवा वध्य गणी जो कोणी वध्य न वधिता हा ह्यास्तव ते उभयतां हि अज्ञानी ॥होउनि गेला होणार पुढे असा न ह्यातें जाण । जन्म न पावे न निमे अज हा शाश्वत नित्य पुराण ॥ जाण विनाशी देह जाय परि भंग नसे आत्म्यातें । शस्त्रें छाया तोडिली तरी काय रुते अंगातें ? अ-ज अ-क्षर अ-व्यय अविनाशी आत्म्यातें जो जाणे मरणें किंवा कुणा मारणें कसें तिथे संभवणें ! भा.गी. २/३९-४०-४१-४२-४३- ४४
“ब्राह्मी- स्थितिही लाभतां तया मोह न राहे चित्तीं प्रयाणीं ही ती टिकुनी होते ब्रह्म-पदाची प्राप्ती”॥भा.गी २/१४२
चैतन्यरूप स्वामींच्या कृपा-प्रसादाने स्फुरलेली ही शब्द-सुमनें त्यांच्या चरणीं सर्वभावें समर्पण.
माधव रानडे
“
No comments:
Post a Comment