“ सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
यांच्या साहित्यातील
( चाकोरीबाहेरचे )
मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश :-२१)
“अंतरीं विरक्ति नाहीं भाव-भक्ति।तयां अधोगति चुके चि ना॥
भाव-भक्तिहीन।कोरडे कठीण जळो तें जीवन।स्वामी म्हणे॥”
आज कार्तिकी एकादशीच्या दिवशी, पांवसच्या पांडुरंगाची, शब्दसुमनांनी पूजा करावी, या इच्छेने नवीन लेखाला सुरवात केली आहे.
या आधी क्र.२०च्या लेखात, आनंद अनेक कारणांनी होत असल्याचं लिहिलं होतं. त्यातील बाकी कारणं-
(१) १५ ॲागस्ट २०१९ ला हा निश्चय केला / निर्णय घेतला की, सद्गुरु श्रीस्वामी स्वरुपानंद (पावस) यांचे बद्दल प्रिंट अथवा इलेक्ट्राॅनिक माध्यामांतून यापूर्वी व इथून पुढे प्रसिद्ध झालेले माझे वैयक्तिक विचार “स्वरुप प्राॅडक्शन” बॅनर(झेंड्या)खाली एक-संधपणे येतील. “ स्वरुप प्राॅडक्शन ” नाव निश्चित करण्याचं कारण हे की, माझा प्रतिपाद्य विषय, ज्यांच्या प्रेरणा व कृपेने हे शक्य होतं, सर्व काही स्वामी स्वरुपानंद. मग याहून अधिक समर्पक नांव ते काय असणार ?
(२) १५ ॲागस्ट १९७४ला श्रीस्वामी समाधिस्थ झाले ती तिथी होती श्रावण वद्य द्वादशी. त्यामुळे तारखेला वरील निर्णय अमलात आणला व तिथीला सं.गाथा अ. क्र.७४ वर “ दृष्टि Vision” ह्या शीर्षकाखाली नवीन ह्विडीओ “ स्वरुप प्राॅडक्शन ” च्या बॅनरखाली यूट्यूबवर ठेवण्याचा संकल्प केला. विषम शारीरिक अवस्थेतही, सद्गुरुकृपेने, तो तिथीने, २७ ॲागस्टला वेळेत सिद्धीस गेला, आणि स्वामीभक्तांना आवडलाही. त्याची Link-
एकेक घटना श्रीस्वामींच्या पुढील शब्दांच्या सत्यतेचा प्रत्यय देतात कारण तो त्यांचा स्वानुभव आहे
“ सद्गुरु-स्वरूप अगाध अपार ।
काय मी पामर कैसें वानूं ॥
स्वामी म्हणे भाव ठेवा पायापासी ।
तरीच तुम्हासी ।आतुडेल ”॥सं.गा.२४१/१–४॥
“ पोटीं भाव तरी पाणी होय तीर्थ ।
पर्ण तें यथार्थ पत्रीरूप ॥
स्वामी म्हणे जेथें भाव तेथें देव ।
भावाचें गौरव काय वानूं ॥सं.गा.२१३/१–४॥
“ आवडीनें भावें हरि-नाम गावें ।
निर्लज्ज नाचावें संकीर्तनीं ॥
स्वामी म्हणे भावें आकळे वेदान्त ।
भेटे मूर्तिमंत पर-ब्रह्म ”॥सं.गा.६८/१–४॥
“ भाव बळें आम्हां हरिचें दर्शन ।
नित्य समाधान स्वामी म्हणे ”॥सं.गा.६९/४॥
अशी विधानं स्वामी अधिकारवाणीने करतात, कारण त्यांचे स्नेही भगवद्भक्त डॅा.रा.य. परांजपे लिहितात तसे
“ आधीं जेणें केलें मग सांगितलें ।
त्याच्या शब्दा आलें सामर्थ्य कीं ॥
उपदेशायोग्य अधिकारीपण ।
तरी प्रबोधन जना होय ॥
आणि श्रीस्वामींच्या शब्दांचं सामर्थ्य काय व किती आहे याचा रोकडा अनुभव मी स्वत: घेतला आहे. कारण माझ्याकडे भाव व भक्ति सोडून आणि काहीच नाही
भाव असो वा भक्ति दोन्हीमधे अनन्यता हवी. अनन्यता शब्दाची फोड नारद “भक्ति-सूत्रामध्ये ” “ अन्याश्रयाणां त्यागोऽनन्यता ” अशी केली आहे. थोडक्यांत एक श्रद्धेय सोडून अन्य नाही.
संजीवनी गाथेतील अभंग भक्त व भक्ति चा महिमा सांगत सुरु होतात तर त्यांचा अंत सच्चिद्-घन स्वामी रामनामांत रंगत राममय होण्यांत होतो. संजीवनी गाथेतील खालील अभंग अवश्य वाचावेत (४९,५२,६८,११२,१२८,१७५,२१३,२१४,२२२)
श्रीस्वामींचं विचारधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण किमान दहा नवीन वाचकांपर्यंत पाठवायची विनंती सर्वांना याच ब्लाॅगमधील क्र. १९ च्या लेखात मी केली होती. त्या सद्भाव जागृति अभियाना ला फार चांगला प्रतिसाद मिळाला हे ब्लाॅग वाचकांच्या नित्य वाढत्या संख्येवरून समजून येतंय. या वर्षींच्या जाने. मधे ४१००० च्या घरात असणारी पेज व्ह्यूजची संख्या ॲाक्टो. अखेरीला ४६१०० हून अधिक आहे. यासाठीं आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद/आभार.
मोबाइल फोन नवीन पिढीचं अभिन्न अंग बनला आहे ही वस्तुस्थिती आहे. आपल्याही अनेक दैनंदिन व्यवहारांसाठी त्याची किंवा संगणकाची आवश्यकता आपण नाकारूच शकत नाही. मी स्वत: या सर्व साधनांचा वापर शिकूनच आपणा पर्यंत पोचूं शकतोय.
सद्भाव जागृति अभियाना चा हेतु या साधनांचा दुरुपयोग टाळायचा. दुष्प्रवृत्तीला आळा घालून समाजाला सतप्रवृत्त करायचं. भक्ती व नाम या अविनाशी तत्वांच्या साधनांनी सहज “सोऽहं” ची त्यांच्या मनांत आवड निर्माण करायची हाच आहे.
आज कार्तिकी(त्रिपुरी) पौर्णिमेच्या दिवशी श्रीगुरुनानकदेव यांच्या ५५० व्या जयंतीला सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या कृपेनं माझी इच्छा पार पडली
“ स्वामी म्हणे वंदीं सद्गुरु-पाउलें
भलें आकारलें पर-ब्रह्म II संजीवनी गाथा. १७५/४ ”
माधव रानडे
ranadesuresh@gmail.com
The links to the YouTube videos and blog on the life, literature, & philosophy of Swami Swaroopanand (Pawas) produced/financed/dreamt by me are given below.
(1) The Art of Happy Living सुखी
जीवनाची कला
https://youtu.be/rXoNczKaaio
(2) दृष्टि Vision
(3) Blog Address -
www.swamimhane.blogspot.com
No comments:
Post a Comment