Friday, June 9, 2017

                गोष्ट “ सुखी जीवनाची कला लघुपटाची
              गोष्ट “ The Art of Happy Living ” ची
                              (क्रमश:-२)
        
यापूर्वींच्या लेखांत लिहिल्याप्रमाणें, श्री स्वामींच्या साहित्य / तत्वज्ञान यावर डाॅक्यूमेंटरी काढायचं स्वप्न मी हाॅस्पिटलमध्येपण पहात होतो.
माझ्या पत्नीने मनोभावे केलेल्या प्रार्थनेच्या फलस्वरूप, श्री स्वामींनीं मला समजावले कीं, दुसऱ्या कोणीही, मग बेशक ते सेवा मंडळ असो किंवा कोणी व्यक्ती असो, काय करावे, याबद्दल आग्रह न धरतां स्वत: काय करतां येईल तेवढं करावं.
श्री स्वामींनीं सुचवले कीं माझ्या मनांत त्यांच्यावर डाॅक्यूमेंटरी काढायची आहे तर ती मीच कां काढूं नये ? वर त्यांनीं आश्वासनही दिले कीं या प्रयत्नांत ते सतत माझ्या पाठीशी असतील.
या घटनेनंतर मात्र स्वप्नाची परिणीती संकल्पात झाली. श्री स्वामींच्या कडून मिळालेल्या प्रेरणेंतून, “ सारद ” च्या  कविता दातिर ” यांच्या ऐवजीं दोन दुसरींच नवीन नांवं डोक्यांत आली.
सौ. मृणाल मायदेव-धोंगडे, व शशांक म्हसवडे. खरं तर तेंव्हापर्यंत या नांवाच्या दोन व्यक्तींबरोबर माझी फक्त तोंड-ओळख होती.
आम्ही रहात असलेल्या प्राधिकरण भागातील, “ज्ञानप्रबोधिनी ” नवनगर विद्यालय स्नातक संघाच्या “प्रबोध रत्न ” या २०१५ साली सुरू झालेल्या पुरस्कार उपक्रमांत दोन्ही वर्षीं मी परीक्षक होतो, त्या निमित्तानें.
मृणाल चं दोन्ही वर्षी “ प्रबोध रत्न ” पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं. २०१६ साली तिची यासाठी निवड देखील झाली.त्यामुळं परीक्षक या नात्यानं मला तिच्या शैक्षणिक व बौद्धिक पातळीची आणि तिच्या व्यवसायाची बऱ्यापैकी कल्पना होती.
तर शशांकने या कार्यक्रमाची व पुरस्कारासाठी निवड झालेल्यांची पार्श्वभूमी सांगणारी चित्रफीत बनवली होती.
खरंतर एवढ्या जुजबी माहिती व ओळखीवर एका संपूर्ण माहितीपटाची जबाबदारी या दोघांवर टाकणे कितपत योग्य असंच कोणालाही वाटेल.
पण अशा बाबतींत मी स्वामींच्याच एका अभंगातील-

   “ खेळविसी तैसा । खेळेन साचार । 
तूंचि सूत्र-धार । बाहुलें मी ।।
      बोलविसी तैसे । बोलेन वचन । 
मज अभिमान । कासयाचा ।। ”

हे सूत्र कायम लक्षांत ठेवतो व त्याप्रमाणें कृती करतो. पावले उचलतो.
मी दवाखान्यांतूनच मृणालचा नंबर मिळवला. ती आणि शशांक मिळून ही जबाबदारी पार पाडूं शकतील असा मला विश्वास वाटतो ही ईश्वरी योजना आहे. असा मी तिला फोन केला.
आता जवळपास २७०० लोकांनी यूट्यूबवर हा श्री स्वामीं
वरील लघुपट पाहून झाला, अनेकांनी तोंडभरून कौतुक केलं.  आतां मागे वळून पहातांनां, तिला काय वाटतं, अस मी तिला विचारलं, ती काय म्हणाली, ते मृणालच्याच शब्दांत पाहूं-

“ १५ सप्टेंबर.... चिकन गुनियामुळे आलेला ताप नुकताच गेला होता आणि मी असह्य सांधेदुखी सोसत, अजूनही झोपूनच होते.... तशात मला रानडे काकांचा फोन आला. रानडेकाका आणि माझी ओळख तशी जुजबीच...म्हणजेच ज्ञान प्रबोधिनी च्या प्रबोधरत्न  पुरस्काराच्या निमित्ताने  १-२ वेळा भेटलो होतो इतकंच ! , ते परीक्षक...तेवढीच काय ती  ओळख. काकांचा फोन  उचलला तर ते म्हणाले माझ्या डोक्यात काही कल्पना आहे. त्यासाठी तू काही करू शकशील का? मी आजारपणामुळे  अजून काम सुरु केले नव्हते आणि आतून मला उभारी देखील वाटत नव्हती. तसे मी काकांना सांगितले तर ते म्हणाले.. मी तुझ्याशी हॉस्पिटलमधून बोलतोय. डेंग्यू  झाल्याने मी ऍडमिट आहे.... हे ऐकल्यावर माझी बोलतीच बंद... ७८  वर्षाच्या तरुणाला ऍडमिट  असताना ही काम सुचतंय तर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही.  मी त्यांना लगेच सांगितले की मला होईल ते सगळं मी नक्कीच कारेन पण मला या विषयाची काहीच माहिती  नाही. तेव्हा त्याच फोनवर  काकांनी मला सांगितले की गीता जशी ज्ञानेश्वरांनी सोपी केली तशी ज्ञानेश्वरी स्वामीजींनी अधिक सोपी केली पण तरीही आताच्या समाजाला कळेल अशा अधिक सुलभ स्वरूपात डॉक्युमेंट्री च्या रूपात आपल्याला त्यांची शिकवण पोचवायची आहे. त्यासाठी तू आणि शशांकने काम करावं  असं  मला  वाटतं ....मी शशांकशी  बोलले. त्यानेही  तयारी दाखवली पण तो हैद्राबादमध्ये, मी आजारपणामुळे  घर-ग्रस्त ...   भेटून चर्चा करणार तरी कशी  ... पण म्हणतात ना.... इच्छा तेथे मार्ग.... आम्ही कॉन्फरन्स  कॉल  वर बोलायचे ठरवले ...त्यानुसार २३  सप्टेंबर ला रात्री कॉन्फरन्स कॉल  झाला...अनेक नवीन लोकांची फोन -ओळख झाली. मी स्क्रिप्ट  लिहायची व शशांक ने त्यानुसार व्हिज्युअल  करायचे हे ठरले . तरीही माझ्या डोळ्यासमोर काहीच नीटसे चित्र येईना वेदनेमुळे डोके ही बहुधा थोडे मंद झाले होते. म्हणून कामाला नक्की सुरुवात कशी करायची ते कळेना. काका फोनवर काही काही माहिती द्यायचे पण मला स्वरूपानंद, त्यांचे काम....काहीच माहित नव्हते.
काका म्हणले तू इथे येतेस का एकदा? मी महिनाभर घराबाहेर पडले नव्हते इतकी सांधेदुखी तीव्र होती. म्हणून त्यांना म्हणलं की फोनवर नाही का सांगता येणार...ते म्हणले नाही...एकदा तरी ये...कॅब करून ये...स्वतःचे हाल करू नको ...आणि केबिन लगेजची बॅग घेऊन ये..मला वाटले काका गम्मत करत आहेत पण मी खरंच तेवढी मोठी बॅग घेऊन गेले. नवरात्रात म्हणजे साधारण ऑक्टोबर मध्ये त्यांना भेटायला गेले. ती मीटिंग सर्वात महत्वाची होती. काकांनी मला स्वामींचे चरित्र, त्यांचे कार्य याविषयी खूप काही सांगितले आणि १७-१८ पुस्तके बरोबर घेऊन मी परतले. त्या दिवशी दुसरे काही केले नाही. मनन मात्र चालू होते. दुसऱ्या दिवशी एक-एक पुस्तक उघडून वाचायला सुरुवात केली ... ....केवढा हा आवाका....केव्हढे साहित्य...केवढे कार्य....आपल्या बुद्धीला झेपणारे का हे स्क्रिप्ट लिहणे...एक नाही अनेक प्रश्न मनात फेर धरत होते...एकदा वाटले...सरळ काकांना सांगावे की मला काही कळत नाहीये...मला नाही वाटत मी लिहू शकेन....काका मधून मधून फोन करत होते आणि माझ्याकडे असलेली पुस्तकामधील साक्या, अभंग, मला पान नंबर सांगून, तोंडपाठ म्हणून दाखवत होते....त्यांचे inputs देत होते....अगदी खरं सांगते....त्यांचा उत्साह, त्यांची यातील involvement आणि त्यांना माझ्यावर असलेला विश्वास पाहून मला वाटले....मी हे करू शकणार नाही असे मी म्हणूच शकत नाही...मला हे केलेच पाहिजे....खूप मंथन होऊन...एक दिवस अचानक मी....लिहायला सुरु केली.. 
क्षणात येते मनात माझ्या...” काकांनी ही साकी सांगितल्यापासून मनात घोळत होती...तिनेच स्क्रिप्टचा श्रीगणेशा झाला आणि जे काही थोडेफार लिहिले होते ते रेकॉर्ड करून मी काकांना पाठवले. काकांचे लगेचच फीडबॅक आला की तू तर सुरवातीलाच सिक्सर मारला आहेस. हे कौतुक ऐकून खरच खूप हुरूप आला आणि मग बघता बघता स्क्रिप्टला आकार आला...रफ स्क्रिप्ट झाल्यावर, मी, शशांक आणि काका-काकू भेटलो. त्या दिवशी स्क्रिप्टचे गुण, दोष, काय हवे काय नको याची सांगोपांग चर्चा झाली आणि त्यानुसार बदल करून साधारण डिसेंबरच्या मध्यात स्क्रिप्ट तयार झाले. त्यानंतर शशांक पावसला जाऊन शूटिंग करून आला. बऱ्यापैकी जुळवाजुळव झाली होती. शशांकने एक रफ ड्राफ्ट करून पाठवला आणि सगळ्यांनाच जाणवले की आपल्या हातून काहीतरी चांगले काम व्हावे ही ईश्वरी योजना आहे. काका तर पहिल्या फोनपासून मला तसे सांगत होते...माझ्यापेक्षा जास्त त्यांचा माझ्यावर विश्वास होता. त्यामुळेच की काय, डोक्युमेंट्री आकार घेत गेली आणि १५ एप्रिलला आमची जी मीटिंग झाली त्यात तिचा नीटस आकार दिसू लागला. काका-काकूंचे प्रेम, विश्वास, काकूंचे कमालीचे आदरातिथ्य, अनेकांशी केलेली चर्चा...या सगळ्या गोष्टी या प्रवासात लक्षात राहतील अशा होत्या! अक्षय तृतीयेला डाॅक्युमेंट्री रिलीज करायची हे ठरले आणि त्यानुसार काम होत राहिले....बदल केले गेले, सुधारणा केल्या गेल्या...यात अनेकांनी खूप मोलाचे सल्ले दिले...आणि ठरल्याप्रमाणे रिलीज झाली!

लोकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला....तो केवळ अवर्णनीय! खूप कौतुक होत होते...आपण नक्की याला पात्र आहोत का...हा प्रश्न सतत मनात येतो...कारण 
मी खरं तर, सागरातून केवळ २ थेंब उचलण्याचा प्रयत्न केला आहे...पण ते तरी माझ्या हातून झाले याचा मला खूप खूप आनंद आहे. या कामाने जे समाधान मिळाले त्याचे वर्णन करणे अशक्य आहे ”

मृणाल जसं म्हणते-- कीं
आपल्या हातून काहीतरी चांगले काम व्हावे ही ईश्वरी योजना आहे. काका तर पहिल्या फोनपासून मला तसे सांगत होते...माझ्यापेक्षा जास्त त्यांचा माझ्यावर विश्वास होता.”

या माझ्या अतूट, अढळ विश्वासाचं कारण, केवळ गुरु-कृपा

“ तैसी सद्गुरूकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ” म्हणूनच आम्ही या लघुपटाद्वारें- 
“ बोलीं अरूपाचे (स्व)रूप---” दाखवूं शकलो. शिवाय श्री स्वामी म्हणतात तसं-
       भक्ताचे मनोगत पुरवितां श्री सद्गुरू समर्थ ।      
देव भक्त असे द्वैत दावोनि खेळत स्वयें तोचि ।। ”

सद्गुरूमाऊलींच्या शब्दांत मामुली बदल करत मी फक्त एव्हढंच म्हणेन-
  “ सदैव मार्गी चालत असतां मजला देतो हात ।       
उठतां बसतां उभा पाठीशी (त्रैलोक्या) पांवसचा नाथ।। ”

“ॐ रामकृष्ण हरि-ॐ रामकृष्ण हरि-ॐ रामकृष्ण हरि    



919823356958
ranadesuresh@gmail.com                  माधव रानडे.

No comments: