The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Friday, May 26, 2017

             गोष्ट “ सुखी जीवनाची कला ” लघुपटाची
             गोष्ट “The Art of Happy Living”ची
            (क्रमश:- १)

“अक्षय्य-तृतीया”, साडेतीन मुहूर्तांपैकी एक,  कोणत्याही शुभ कार्याच्या दृष्टीने उत्तम मुहूर्त.
काही वर्षांपूर्वी याच तिथीला, परमात्म्याने आम्हाला, कन्यारत्नाची भेट दिली.
या वर्षीं अक्षय्य-तृतीयेच्या मुहूर्तावर, सद्गुरूमाऊलीला, काही परत-भेट व मुलीला वाढदिवसानिमित्त चिरंतन भेट देण्याचा आमचा मानस होता.
खरं तर, गुरूमाऊलीला काही देणारे आम्ही कोण?
व एक गुरूसेवेखेरीज आम्ही देणार तरी काय ?
श्री स्वामींच्याच साहित्य-वाटिकेंतील, काही सुंदर, सुगंधित फुलं वेंचून त्यांच्याच चरणी त्याचा हार वाहण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न मनांत होता.
“ भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ”, सदृश, एवढंच नव्हे, अगदी सतत तुझ्या बरोबरच आहे,(“ जेथे जातो तेथे ”) असं नि:संदिग्ध आश्वासन सप्टें २०१६ मधे डेंग्यूने दवाखान्यात असतांनां श्री स्वांमींकडून दृष्टांतरूपानं मिळालं, व त्याच बळावर,काही वर्षांपासून मनांमधे बाळगलेल्या एका गोड स्वप्नाचे, सत्य संकल्पांत रूपांतर झालं.
जुलै २०१४ मधे, “BABAI” या कविता दातिर व अमित सोनवणे यांच्या,“ सारद ” निर्मित, केवळ ४५ सेकंदांच्या यूट्यूबवरील व्हिडीओचे, परीक्षण साप्ताहिक सकाळ मध्यें वाचलं, व्हिडीओ पाहिला, परत परत पाहिला, आणि प्रकर्षांने असं वाटलं, कीं श्री स्वामींच्या साहित्यांतून स्रवणाऱ्या, भक्तिसुधारसाचं विश्वबांधवांसाठी पारणं करायचं असेल, तर यूट्यूब सारखं प्रभावी माध्यम नाही.
वाचकांनी “BABAI” हा लघुत्तम लघुपट, त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद व अगणित बक्षीसं यूट्यूबवर आवर्जून पहावीत.
काही (जेष्ठ) वाचकांच्या दृष्टीनं अप्रस्तुत व अप्रासंगिक वाटलं तरी युवा वाचकांच्या दृष्टीने मला मुद्दाम नमूद करावंसं वाटतं की, जगप्रसिद्ध होऊन, आज सर्व दृष्टीनं वैभवाच्या अत्युच्च शिखरावर असलेला जस्टीन बीबर हा तरुण पिढीला वेड लावणाऱा गायक सामान्य परिस्थितीतला. तो देखील सुरवातीला यूट्यूब वरच गाणी घालत, आज आहे तिथं, पंचविशीच्या आंत पोहोचलाय.
इथे, हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा असे सांगणें, हा माझा उद्देश नसून, बदलत्या प्रसार-माध्यमांची ताकद अधोरेखित करणं हा आहे.
तात्पर्य काय,की आज आपल्याला समाजासमोर एखादि गोष्ट वैश्विक स्तरावर, प्रभावीपणे व तीही अल्पावधीत मांडायची असेल तर कालानुसार झपाट्याने बदलणाऱ्या प्रसार माध्यमांना आत्मसात करीत त्यांच्या मदतीने चार पावलं पुढे जाणें ही काळाची गरज आहे.  
या दृष्टीकोनातूनच, श्री स्वामींच्या प्रेरणेने, २००७ पासून “स्वामी म्हणे” ह्या ब्लाॅग वर,गुरुसेवा / समाज प्रबोधनाच्या हेतूने,श्रीस्वामींच्या, चरित्र, साहित्य,व तत्वज्ञान यावर माझे विचार स्वतंत्रपणे मांडायला मी सुरवात केली.
मला आनंद वाटतो, की गुरूकृपेनें, आज पर्यंत ५० वर लेख ह्या ब्लाॅग वर लिहून ठेवतां आले.   
“BABAI” शीर्षकाचा यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिला या नव्या सशक्त प्रसार-माध्यमाबद्दलचं, माझं आकर्षण वाढलं, व स्वप्नरंजन सुरूं झालं.  
लगेचच कविता दातिर यांचा मेल आयडी काढला, त्यांच्या बरोबर मेलद्वारा संपर्क साधून, संवाद सुरू झाला.
यापूर्वीं,सुमारे एक वर्ष आधी, क्र-१९९,७४,१८६,१०९,९१ या संजीवनी-गाथेतील अभंगांवर, दोन वर्षांच्या विश्रांती नंतर, ३१ मे २०१२ ते ३० जुलै २०१३ या कालावधी मध्ये---           
            “Swami Swaroopanand (Pawas)-
                     A Cosmic Citizen” ( 1 to 5 )

या शीर्षकाखाली पाच लेख,मी “स्वामी म्हणे” ब्लॉगवर स्वामींच्या प्रेरणेने लिहीले होते.  
त्यामुळे, या लिखाणावर आधारित व्हिडिओ बनेल का असा मेल मी कविता दातिर यांना पाठवला ?
त्यांनी व्हिडिओ बनविण्याच्या दृष्टीने खर्चाचा अंदाज, वेळ, शूटिंग इत्यादि प्राथमिक गोष्टी कळविल्या. ती मेल,मी सेवा मंडळाकडे पाठविली.पण कांहीच प्रतिसाद मिळाला नाही.
२०१४ ची ए.जी.एम. तारीख कळल्यावर कविता दातिर यांना त्यावेळी भेटायला बोलावूं का असा मेल पाठवला, त्यालाही उत्तर मिळालं नाही.  
२०१५ च्या ए.जी.एम.मध्ये मी असा प्रस्ताव ठेवला की रेडिओ,टी.वी.द्वारा संस्थेच्या खर्चाने व संस्थेतर्फे श्री स्वामींचे नित्य स्मरणीय चैतन्यमय विचारधन, आणि अनुकरणीय चरित्र ह्याचा सर्वदूर, प्रसार-प्रचार झाल्यास त्याचा समाज प्रबोधन / सुधारणेस मोठा लाभ होईल. एव्हढंच नव्हे तर ज्या उद्देशानें / कारणासाठीं श्री स्वामीनीं सेवा मंडळाची स्थापना केली तो सफल होईल. 
माझं मत असं आहे,कीं काही महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा
त्यावरील निर्णय व अंमलबजावणी ह्या गोष्टी संस्थागत पातळीवर व्हाव्या.
पण तसे काही प्रयत्न २०१५, २०१६ मधे तरी झालेले दिसले नाहीत.
या सर्व पार्श्वभूमीवर, १० सप्टें.२०१६ ला डेंग्यूने आजारी असतांना जेंव्हा मला औंधला मेडिपाॅईंट हाॅस्पिटलमधे ठेवलं. ताप उतरत नसल्याने,  स्टिराॅइड्स् दिले गेले. मी २०१६ च्या ए.जी.एम. ला हजर राहूं शकणार नाही असं वाटल्यावर, हा मुद्दा आतां परत वर्षभर तरी पाठी पडणार इ. विचारांनी माझ्या मनाची घुसमट झाली, जीवाचा कोंडमारा झाला, डोकं सुन्न झालं, भावनांचा उद्रेक झाला.
त्या भरांत, वर उल्लेख केलेल्या कारणांसाठीं,  मी सेवा मंडळाच्या कार्यकारिणी विरूद्ध अविश्वासाचा ठराव मांडणार असं बोलूं लागलो.
माझ्या पत्नीने श्री स्वामींची मनापासून प्रार्थना केली, व मला शांत करण्याची विनवणी केली.
तिच्या प्रार्थनेचा, जादुसारखा परिणाम झाला. श्री स्वामींनी मला अगदी सोप्या भाषेंत समजावले, मला माझं डाॅक्यूमेंटरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं.
दुसऱ्याच दिवसापासून माझं वागणं, बोलणं बदलल. मी माझ्या चुकीच्या उद्गारांबद्दल सेवामंडळाच्या अध्यक्षांकडे दिलगीरीही व्यक्त केली. हेही सांगितलं की मी सर्वसाधारण सभेला येणार नाही.
ह्या घटनेनंतरचा माझा प्रत्येक श्वास हा स्वप्नांतून, संकल्प
पूर्तीच्या दिशेने पुढे पडणारे पाऊल होते.          
“ म्हणोनि माझे नीच नवे ।श्वासोच्छ्वासही प्रबंध होआवे
गुरूकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे ।। ज्ञा.१८/१७३४ ।

ह्या ओवीचा अनुभव मला, उजाडणाऱ्या दिवसागणिक येत होता.
वांचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणे स्वामीची ।ऐेसिया मज ग्रंथाची । योग्यता कें असे ।।ज्ञा.१८/१७६४

२८ अेप्रिलला, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर, आधी ठरविल्याप्रमाणे,
            “ The Art of Happy Living”
                 “ सुखी जीवनाची कला ”
हा श्री स्वामींच्या, जीवन, साहित्य व तत्वज्ञानावरील आमचा लघुपट यूट्यूबवर टाकलाय. तुम्ही तो खाली दिलेल्या संकेत स्थळावर पाहूं शकता असा मेल मला आला व डोळ्यांत आनंदाश्रु आले.
https://www.youtube.com/watch v=rXoNczKaaio&feature=youtu.be
एखाद्या परीकथेसारखा अद्भुतरम्य वाटेल असा, हा लघुपट बनविण्याचा प्रवास, मी पुढच्या १-२ लेखांत आठवेल तसा उलगडणार आहे.
मानवमात्राचं माध्यम शब्दांचं, तर परमात्म्याचं; परमात्मरूप झालेल्या, चैतन्यरूप श्री स्वामींचं; आपल्याशी संवाद साधायचं माध्यम, घटनांचं, संकेतांचं. आपल्याला त्यांचा अर्थ समजावा अस वाटेल, त्यांनीं त्या लहरींशी सहस्पंदित मात्र व्हायला हव.
यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केल्याचा मेल वाचतांच वाटलं गुरूमाउली आपला प्रत्येक हट्ट, छंद सिद्धीला नेत आहेत.
         
  “ मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्रु चेंडुवालागीं देयावा ।
हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ।ज्ञा.11/581

इथें, मला हे नमूद करायचं आहे, कीं या सर्व उद्योगांत मी खरोखरीच नाममात्र आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं तसा, केवळ निमित्तमात्र-
'मयैवैते निहता: पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्'
 या लघुपटाचे निर्माता, दिग्दर्शक, मार्गदर्शक, सर्व सर्व श्री स्वामी आहेत.          
सायिखडेयाचे बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले ।
 तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ।।१८/१७६८

पण या सगळ्याचं श्रेय आमच्या पदरांत टाकून श्रीस्वामीनीं आम्हाला कृतकृत्य केलं, धन्य केलं. 
“ काव्य- सेवका जगदंबेचें असे तुला वर- दान ।      
एैकुनि कविता जगत्-रसिकता मुदें डोलविल मान अधा८

श्री स्वामींनां माता जगदंबेनें दिलेलें हे वर- दान पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं ही जबाबदारी जशी सेवा मंडळाची आहे, तद्वतच आपापल्या परीनें आपणा सर्व स्वामीभक्तांची देखील आहे, हेच स्वामीनां यातून शिकवायचे आहे ही गोष्ट मात्र मला इथे नक्की सांगावीशी वाटते. 
जेष्ठ शुद्ध प्रतिपदेला, श्री स्वामी मंदिरांत आमची समृद्ध पूजा असते. या दिवशीं शरीरानें कुठेही असलो, तरी मनानं आम्ही उभयतां पांवसलाच असतो.
यावर्षीं या शुभदिनीं ही शब्दसुमनें श्री स्वामी चरणीं अर्पण.

919823356958
ranadesuresh@gmail.com                  माधव रानडे.

                                                              


          
 



No comments: