Monday, January 9, 2017


      इ.सन २०१७ साठीं शुभेच्छा व २०१६ चा आढावा               

सर्वप्रथम, “ स्वामी म्हणे ” या २००७ साली सुरूं केलेल्या, ब्लाॅगच्या सर्व वाचकांनां, दशकपूर्तिच्या निमित्तानें, थोडसं उशिरा का होईना,२०१७ चें वर्ष सुख-समृद्धी समाधानाचे जावो अशी प्रार्थना मी श्री स्वामींचे चरणीं करतो.
माझं सर्व लेखन, श्री स्वामींचे नित्य स्मरणीय चैतन्यमय विचारधन, आणि अनुकरणीय चरित्र ह्याचा सर्वदूर, प्रसार-प्रचार झाल्यास त्याचा समाज प्रबोधन / सुधारणेस मोठा लाभ होईल ह्या हेतूनं केलेले आहे. व हे सर्व मी स्वामींच्याच प्रेरणेनं, आजवर करत आलो आहे.

या दृष्टीनें २०१६ चं वर्ष फारच छान गेले. वर्षाच्या सुरवातीला, २७ जानेवारीला,१५डिसें. १९८१ मधे प्रकाशित “जेथे जातो तेथे” या माझ्या पुस्तिकेची द्वितीयावृत्ती “स्नेहल प्रकाशन” पुणें यांनीं प्रकाशित केली. 
एप्रिल मधे, “ योगदा ज्ञानेश्वरी ” चे लेखक स्वामी योगेश्वरानंद यांचा, श्री स्वामींचे प्रति असलेला आदरभाव व त्यासंबंधींचा, त्यांच्या ग्रंथात असलेला स्पष्ट उल्लेख माझ्या वाचनांत आला. त्यांची शैक्षणिक योग्यता आणि अध्यात्मिक अधिकार विचारांत घेऊन मी त्यांना,        “ज्ञानेश्वरी नित्यपाठ ” चं ईंग्रजीत Versification / translation/ transliteration करण्याची विनंती केली. त्यांनीही अल्पावधीतच ते केलं. हे लेखन Academia.edu च्या https://www.academia.edu/2481731/Nityapatha_Dnyaneshwari या link वर उपलब्ध आहे. अनेक वाचकांनी या संकेतस्थळाला भेट दिली असं ते म्हणाले.
 “ योगदा ज्ञानेश्वरी ” च्या दोन्ही खंडांची एक प्रत समाधी मंदीराला भेट देण्याचें त्यांच्या मनांत आहे. सेवा मंडळाने याचा विचार अवश्य करावा.
याच वर्षी “श्रीक्षेत्र पांवस” च्या दोन्ही अंकात लेखही प्रसिद्ध झाले.
वर्ष अखेरीस, श्री स्वामींचे जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर, मार्गशीर्ष वद्य द्वादशी रोजी,२५ डिसें २०१६ ला, “अक्षर स्वरूप ” या पुस्तिकेच्या द्वितीयावृत्तीच्या, प्रकाशनाचे सौभाग्यही, सौभाग्यवतीला मिळाले.
२०१६ मधे ब्लाॅगवर ४-५ लेखही लिहून झाले.

श्री स्वामींच्या साहित्यांतून प्रतीत होणाऱ्या त्यांच्या निज-जीवन-तत्वज्ञानावर लघुपट काढण्याचा विचार फार दिवस मनांत होता व योगायोग असा की २०१६ मध्येच कामाला सुरवात होऊन, १५ मिनिटांचा लघुपट आतां लवकरच “ यू-ट्यूबवर ” (जे सोशल मिडियाचे फार सशक्त माध्यम आहे) व सी.डी.च्या रूपात उपलब्ध होईल.
आम्हा उभयतांनाही, अर्थातच, या गोष्टीची सतत जाण व भान आहे कीं हे सर्व केवळ  सद्गुरूंच्या कृपाप्रसादामुळेंच शक्य झाले आहे. 
याच भावनेतून, आम्ही उभयता हे मानतो, की प्राधिकरण निगडी येथील, १९८१ साली बनलेली, “ स्वरूप सावली ” ही वास्तू हे श्री स्वामींचे मंदिर आहे व आम्ही येथील पुजारी आहोत. 

या माझ्या विधानाबद्दल गैरसमज होऊ नये, म्हणून माझे एकेकाळचे निकटचे स्नेही, ज्ञानेश्वरभक्त कै. श्रीकृष्ण भोमे ( १ फेब्रु. २०१४ ला ते परलोकवासी झाले.) यांचे विचार खाली देत आहे.

                         “ स्वरूप-सावली ".
" स्वरूप सावली " । सुखद सुशांत ।  लोकांती एकांत । येथे वाटे ॥१ ॥ सर्व कोलाहल । सर्व गजबज । होति येथे सहज शान्तिमय॥ २ ॥ न लावता येथे । लागते समाधी । साऱ्या आधी व्याधी । नष्ट होती ॥ ३ ॥ आहे या वास्तूत । स्वामींचा रहिवास । हा क्षेत्रसंन्यास । असे त्यांचा ॥ ४ ॥ वास्तुतील वस्तु ।  वस्तु स्वामीमय । अचेत चिन्मय । पहा झाल्या ॥५॥  हा नव्हे प्रासाद । आहे हा प्रसाद । जणु आर्त साद । माउलीची ॥६॥ दगड विटांचे । नाहीच हे घर । हे आहे जिव्हार । हृदींचे माझ्या ॥ ७॥ हृदयाच्या आंत । थेट गाभाऱ्यात । आहे विराजित । चरणद्वय॥ ८॥ स्वरूपासहित । सांवली हि आहे । ब्रह्म माया राहे । एकेठायीं ॥ ९॥ सगुण निर्गुण ।  दोन्ही रूपें स्वामी । पाहतो नित्य मी ।  वास्तुत या ॥ १० ॥ हेचि निजधाम । हेचि परमधाम । । येणे जाणे श्रम । नाही आतां ॥ ११ ॥ आतां माझा न मी ।राहिलो मी स्वामी । माझ्या निजधामी । स्वामी माझा ॥ ”

                                                    
२०१६ चा आढावा घेण्याची काही कारणं आहेत. महत्वाचं हे कीं १० सप्टें. ला डेंग्यूच्या आजारानं दवाखान्यांत होतो, त्यावेळी ताप वाढला व हातून श्री स्वामींच्या साहित्याचा व्हावा तसा प्रचार-प्रसार होत नाही ह्याची खंत वाटून भ्रांतचित्त झालो. श्री स्वामींनीं प्रेरणा दिली, कृपा केली व काही सेवा हातून घडली त्याचा लेखाजोखा म्हणून हा आढावा घेतला. त्यामुळे खूप दिलासा मिळाला. 

यापुढे मात्र नजर कमजोर झाल्यामुळे व प्रकृतीच्या काहीना काही अस्वस्थतेमुळे, हातून विशेष काही होईल असं वाटत नाही. ब्लाॅगवर एखादा लेख होईल तसा व होईल तेंव्हा लिहायचा प्रयत्न करीत राहीन.

ranadesuresh@gmail.com
Mobile   +919823356958.                                                                                                                                                                                           माधव रानडे 
                       
                                                                          
Thursday, September 22, 2016

                      श्री स्वामींच्या “ अमृतधारा ”
                             भावार्थ विवरण (५)
श्री स्वामी सांगतात- “ गुरूकृपेवीण नाहीं आत्मज्ञान । वाउगा तो शीण साधनांचा । १।
सहज - साधन गुरू कृपा जाण । जीवाचे कल्याण तेणें होय ।। सं.गा. ६५/१-२ ।।
याचा साक्षात अनुभव, अपरोक्ष अनुभव मी नुक्ताच माझ्या आजारपणात घेतला. “ जेथे जातो तेथे “” या माझ्या १९८१ सालपासूनच्या अनुभवांचा चरमबिंदु  अचानकच, अपरंपार गुरूकृपेने, प्रकट झाला. जवळपास शून्य साधना असतांना, केवळ गुरूकृपेच्या नायगारा सदृश धबधब्यानं, क्षणार्धात, आत्मज्ञान झालं. सारे काही, स्वच्छ,स्पष्ट दिसूं लगलं. माझ्या सभोवतालचे कोणतीही कोणतीही घटना मला वाचतां येऊं लागली. नेमक्या याच वेळीं मला फार ताप २-३ पर्यंत येऊं लागला. १० सप्टेंबर ला मला पत्नीने, हेमंत बापट, संकेत उपासनी या मित्रांच्या सहाय्यानें, मुला-सुनेच्या सतत येत असलेल्या फोनांमुळे रात्रीं १० वा. ॲडमिट केलं.सर्वच फार काळजीत होते मी शांत होतो, दोन कारणांनीं. अत्यंत महत्वाचं म्हणजे १००% टक्के खात्री की माझी सद्गुरूमाऊली माझी काळजी धेत या सर्वांना निमित्त करीत मला तळहातावरच्या फोडासारखं जपते आहे. दुसरें कारण, ही घटना व या पाठवा ईश्वरी संकल्प मी पुस्तकासारखा वाचूं शकत होतो.
पण यामुळेच फार गंभीर पेच निर्माण झाले, व त्याची नको ती परिणीती होत गेली ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
उदाहरणार्थ,  रक्त तपासणी आधारित Dengue चं Diagnosis झाल्यनंतरही. Plateslates count, ४२००० पर्यंत खाली गेल्यावरही व हाॅस्पिटलमधील सर्वजण ओरडून सांगत असतांनाही, मी विश्रांती तर घेत नह्वतोच, तर ८-१० तास फोनवर बोलत होतो. पाचपट जोरानं गुरूसेवा ( माझ्या ठाम समजूतीप्रमाणे ) करीत होतो. माझ्या बायकोला जी माझी अहोरात्र सेवा करत होती अत्यंत वाईट पद्धतीनं अपमानीत करत होतो. भेटायला येणाऱ्या जवळपास साऱ्यांचाच अपमान करत होतो. भेटायला बोलावून देखील श्री बाबुराव देसाई याच्याशी उद्दामपणानं वागून नको नको ते सांगितले.
कितीतरी, लेख होतील अशी विचित्र वागणूक. उदा.४२००० काउंट असतांना Med Specialist नां सांगितलं १५ सप्टें. ला १२५००० चा आकडा पार होईल व १६ ला घरी. सर्वांच्या दृष्टीनं आकांडतांडव करत होतो, पण मला जसं दिसत होतं मी सांगत होतो.बायकोला, वेड लागायची वेळ आली.
अचानक घडलेल्या बदलाला मीच तयार नह्वतो, तर आजूबाचूचे कसे असणार ?
आतां घरी आलो. बरा झालो. पत्नीनें, श्री स्वामींच्या गादीवर  वै. भाऊमामांच्या मार्फत घेतलेल्या अनुग्रहाला १५ सप्टें ला २० वर्षें पूर्ण झाली, तिच्या नियमित साधनेची पुण्याई, माझ्या अनेकपट आहे ही वस्तुस्थिति आहे. याची तिलाही जणीव नाही. पण तिने वारंवार भाकलेल्या करुणेने, श्री स्वामींनीं मला शांत केलं आहे.
श्री स्वामींच्या साहित्यांत मला “ सोsहं हंसोपनिषद “ दिसतंय, मला ते “ SWAMI SWAROOPANAND ( Pawas ) A COSMIC CITIZEN “ त्यांच्या ५ अभंगांतून दिसतात व त्यावर    Documentary काढायचीच हा माझा ( दु ) राग्रह. असे एक ना अनेक विषयांमुळें, मीच पेच उत्पन्न केले आहेत, पण आतां वादळ शांत झालं आहे. 
मी हळूहळू सर्व उलगडा करूं शकेन असा विश्वास मला आहे. कारण श्री स्वामींच हे सर्व माझ्याकडून करून घेणार आहेत, हे मला दिसतंय.
अातां मला थकवा आलाय, म्हणून हे अर्धवटच Upload करतोय. २६-२७ सप्टें नंतर हलके हलके ठीक करणार आहे. 
हे सर्व आज पूर्ण करायची आज्ञा होती, मी, गुरूमाऊलींची क्षमा प्रार्थना करून, विश्रांती घेतोय.

 “ चिरंजीव परि सांप्रत झाला वेदान्ताचा अंत । मात्र तयाचीं भुतें नाचती इथें भरतखंडांत ” ।। ५९ ।।
स्वानुभवाविण वेदान्ताची पोपटपंची वायां । स्वप्नीं अमृता पिउनि कुणाची अमर जाहली काया ।। ६१ ।
“ वेदान्ताच्या थोतांडाची पाठीवरती झूल । घालुनी तदा होतों सजलों तुंदिल नंदीबैल ।। १४१ ।। ” “अमृतधारेतील”वर दिलेल्या साक्यांचे शब्द सकृतदर्शनीं  (वरवर) पाहता परखड / तिखट वाटले तरी त्याच्या मागचा हेतू व भावना ही “ बुडते हे जन देखवेना डोळां । म्हणूनी कळवळा येतसे । ” अशी उदात्त आहे. 
त्यामागें अनेक वर्षांचा अभ्यास व सखोल चिंतन आहे, हे श्री स्वामींच्या पत्रांतील पुढील उताऱ्यावरून लक्षांत येईल.
श्री स्वामींनीं काका लिमये या त्यांच्या गुरूबंधूना दि.१२-३-१९३४ रोजीं लिहिलेल्या पत्रांत ते लिहितात--  “ काका, आपलें संप्रदाय-विशिष्ट तत्वज्ञान आज १२ वर्षें मी स्वानुभवाच्या कसावर नानाविध प्रसंगीं भिन्नभिन्न अंगानीं घासून पाहात आहे आणि प्रतिप्रसंगीं त्याची उज्वलता अधिकाधिकच प्रत्ययास येत आहे. पण त्याचबरोबर हेंही लिहिणें अवश्य आहे कीं, पूर्वींच्या माझ्या संप्रदायाविषयींच्या भ्रामक कल्पनांत अनुभवानें किती तरी पालट घडून आला आहे.”
वर दिलेल्या उताऱ्यातींल एक एक शब्द ध्यानांत घेतला की पुढे दिलेल्या साक्यांचे मूळ कशांत आहे हें सहजच लक्षांत येते-
“ पुरे पुस्तकी विद्या ती कीं अवघी पोपटपंची । रणार्थ सेना पत्र चित्रिता असे काय कामाची ।। ६० ।।
स्वानुभवाविण वेदान्ताची पोपटपंची वायां । स्वप्नीं अमृता पिउनि कुणाची अमर जाहली काया ।।६१।।
परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती । स्वयें आचरूं जाता वसते धारण पांचावरती ।। ६२ ।।
गतानुगतिकत्वाची ऐसी पाहुनियां जन-रीति । विटलें मन जाउनि बैसलें ह्रदयाच्या एकान्तीं ।। ६३ ।।


“ समाजाला धर्मप्रवण करण्याच्या उद्देशानें स्थापन झालेल्या धर्मपीठांनीं किंवा सांप्रदायींनीं साधनांत गुप्तपणा ठेवणें अत्यंत अनिष्ट आणि घातांक आहे. त्यायोगें सामान्य जनतेची दिशाभूल करणें सहज शक्य होतें. साधनें स्पष्ट आणि उघड असतील तर त्यांचा कस लावणें सामान्य जनतेला जड वाटत नाहीं; किंबहुना त्यांची विचारशक्ति जागृत करून त्यांना सत्याचा अगर ज्ञानाचा मार्ग दाखविण्याचा हा एकच उपाय आहे.”
“वस्तुस्थिति अशी आहे कीं, स्वत:चा उद्धार किंवा स्वत:ची उन्नति स्वत:च करावयाची असते.”
“ सोsहं वृत्ति अंगीं बाणवून घेण्यासाठीं पराकाष्ठेचा प्रयास करण्यामध्यें एकच हेतु असतो आणि असावा आणि तो म्हणजे आपल्या अंत:करणांत क्षुद्र भावनांचा प्रादूर्भाव होऊं न देणें. जसजशी ही वृत्ति मानवी अंत:करणांत मुरत जाईल तसतसें त्याचें प्रत्यंतर ‘वाचे दिठि करासि’ येऊन त्याच्या आचरणांतील प्रगति स्पष्ट दिसूं लागेल.”
“ आणि प्रयत्न हा स्वाधीन असल्यामुळे ‘ प्रयत्नांतीं परमेश्वर ’ पदाची प्राप्ति करून घेणें हेंच मानवी जीवनाचें इतिकर्तव्य आहे एवढें लिहून पत्र पुरें करतो. ”


                                                                                                   माधव रानडे 

Monday, August 15, 2016

                             
                                   

                        श्री स्वामींच्या “ अमृतधारा ”
                              भावार्थ विवरण (४)

आज १५ आॅगस्ट, तारखेनं श्री स्वामींची पुण्यतिथी. या दिवशीं त्यांचे पुण्यस्मरण करून त्यांनीं पुढील पिढ्यांसाठी ठेवलेल्या अमूल्य विचारधनाचं चिंतन करणं विशेष आनंद देतं.
महासमाधीसाठीं श्री स्वामींनीं १५ आॅगस्ट ही देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची तारीख निवडली यामधें सगुणरूपाच्या 
"देहीच विदेही" वा “मुक्ता”वस्थेत विहरत असलेले श्रीस्वामी सगुणातील देहबंधनसुद्धा त्यागून, देहोपचाराच्या परावलम्बनाच्या पारतंत्र्यातुन स्वतंत्र म्हणजे सर्वतोपरी मुक्त झाले, हा संदेश दिला का ? तेच जाणोत. पण महासमाधीपूर्वी, श्री स्वामींनीं त्यांच्या चैतन्य स्वरूपाबद्दल उघड प्रतिज्ञोत्तर केले होते ते सर्वश्रृत आहे.
या लेखाच्या सुरवातीला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. ती अशी की, पारमार्थिक चिंतन / अध्यात्मिक शंका यासाठीं, श्री स्वामींच्या चैतन्य लहरींशी सहस्पंदित ( Resonate ) झाल्यास, आपल्याला काय करावे/वाचावे याचे संकेत मिळतात. किंबहुना असे संकेत प्राय: माझ्या लेखनाचा प्रेरणास्रोत असतात. याचबरोबर हेही स्पष्ट करतो, की ही, माझी काय किंवा इतर कोणाही व्यक्तीची मक्तेदारी असू किंवा होऊं शकत नाही. जो कोणी श्रद्धेनं अशा लहरींशी सहस्पंदित ( Resonate ) होईल त्यालाही असा अनुभव येऊं शकेल, असं माझं मत आहे.
पण ग्रहण माध्यमाच्या /केंद्राच्या कुवतीवर/क्षमतेवर संकेतांची विश्वसनीयता/अवलंबनियता असते हे ही लक्षांत ठेवणं तेवढंच आवश्यक आहे.
वैयक्तिक रीत्या मला बऱ्याच वेळां असे अनुभव आले असले तरी वाचकांनां हा फक्त/केवळ भ्रम आहे असं वाटूं नये यासाठी एक उदाहरण देतो.
 “ स्वरूप ज्ञानेश्वरी ”  या श्री स्वामींच्या हस्ताक्षरांतील ज्ञानेश्वरीतील गी.श्लोक १८/७६ च्या पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द ‘संवादमिदमद्भुतम’ असा आहे. आत्तां मिळणाऱ्या कोणत्याही गीता प्रतींत हाच शब्द ‘संवादमिममद्भुतम’ असाच आढळतो.
श्री स्वामींच्या / सद्गुरूमाऊलीच्या हातून मूळ प्रतीची नक्कल करतांना चूक कालत्रयी घडणार नाही, अशी खात्री / अढळ श्रद्धा असल्यामुळे मी अनेक संस्कृत पंडितांना/तज्ञांना ‘ इदम् ‘ व ‘ इमम् ‘ पैकीं कोणतं रूप ग्राह्य व बरोबर याबद्दल विचारले असतां सर्वानुमतें ‘ इमम् ’ हेंच रूप बरोबर असल्याचा कौल मिळाला. शेवटी मी श्री स्वामींनाच शरण जाऊन खुलासा करायला विनविल्यावर अखेरचं पान पहाण्याचा संकेत मिळाला. श्री स्वामींच्या शिस्तबद्ध स्वभावाला अनुसरून, त्यांनी ही नक्कल ज्ञानेश्वरीच्या कोणत्या प्रतीवरून केली याचा स्पष्ट उल्लेख अखेरचं पानावर मिळाला. मग त्यांत उल्लेखिलेल्या , “निर्णयसागर”पाचव्या आवृत्तीचा शोध मी सुरू केला. याही बाबतीत थोड्याच अवधींत गुरूमाऊलींची कृपा झाली, व श्री रामभाऊ लिमये, माझे मेहुणे, यांनीं इ.स.१९१५ ती प्रत काढून दिली. त्यांत तो शब्द ‘संवादमिदमद्भुतम’ असाच आहे. तत्काल खातरजमेसाठीं (Ready Reference) वरील तिन्ही संदर्भांचे फोटो इथे दिले आहेत.
असाच अनुभव श्री स्वामींच्या खोलींतील “ अहमात्मा हें कधींचि विसरों नये ” पाटीबद्दल मला आला.त्याचा खुलासा मी “ शोध ‘मी’ चा.....बोध ‘स्वरूपा’ चा” या श्री स्वामींच्या जन्मशताब्दि सांगता विशेषांकांतील माझ्या लेखांत केला आहे. बुद्धिजीवी या गोष्टींना निव्वळ योगायोग म्हणोत बापडे, मी ही गुरूकृपा व दिव्य संकेत मानतो.
परमोच्च पारमार्थिक भूमिकेवर असतांना,  श्रीस्वामींना आलेल्या अनुभवांची उत्स्फूर्त अभिव्यक्ति म्हणजे  श्रीस्वामींच्या " अमृतधारा ” .
सर्वच संतांच्या बाबतीत हे शक्य होईल असं नाही. कारण आलेल्या अनुभवांचा तितकाच सक्षम आविष्कार, खास करून, अतींद्रिय अनुभूतींची अभिव्यक्ति तेवढ्याच समर्थपणे करणं हे श्री स्वामी अथवा त्यांच्या सारखेच कवीह्रदय, संतकवीच करू जाणोत.
दृश्य वस्तूंचे ज्ञान हे लौकिक असल्याने, बघणारा/पाहणारा/दृष्टा दृश्याहून निराळा असतो व वेगळेपणानं अनुभवतो. पण ब्रह्म/आत्मा/ईश्वर याचा अनुभव घ्यायचा असेल तर या गोष्टी दृश्य नसल्याने, ज्ञानेंद्रियानी,म्हणजे शब्द,स्पर्श, रूप,रस,गंध यांच्या जाणीवेच्या आधारे त्या ज्ञात होऊं शकत नाहीत,कारण, अदृश्य वस्तूंचे ज्ञान हे अलौकिक असल्याने अतींद्रिय असते त्यामुळं दृष्टा व दृश्य एकरूप झाले तरच हा अनुभव येऊं शकतो.
यासाठीं दोन मार्ग आहेत. पहिला भक्तिमार्ग. यामधे “मी” पणानें जाणणारा/पाहणारा द्रष्टा आणि “ तूं ” पणानें असणारें दृश्य या जोडीमधील द्रष्टा--
        “ जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।
        हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ”।। ज्ञा.१०/११८ या दृढ विश्वासानें दृश्यांत विलीन करणे. हा झाला भक्तिमार्ग. तर जें जें काहीं आपल्याला अनुभवाला येते तें तें तो नाही, ‘नेति, नेति’ असा निश्चय करीत व्यतिरेकाने सर्व दृश्य विलीन/निरास करून केवळ द्रष्टा उरवणं/बाकी ठेवणें हा झाला ज्ञानमार्ग.
बहुतेक ज्ञानीपुरूष व्यतिरेकानें येणाऱ्या आत्मानुभवांतच तृप्ति मानून राहातात. पण श्री स्वामी हे, व्यतिरेकानंतर,    “ सर्वं खल्विदं ब्रह्म ”, असा अन्वयाचा, सर्व नामरूपासह एक सच्चिदानंद परमात्माच आहे, असा व्यापक अनुभव घेणाऱ्या, व त्यांतून मिळणाऱ्या अवीट आनंदाचे मुक्त हस्ते दान करणाऱ्या दुर्मिळ संतांपैकी एक आहेत.                       “लोकविलक्षण । करोनि वर्तन । 
   न ह्वावें आपण ।अलौकिक ।।”
तर आत्मज्ञानानं कृतार्थ झालेल्यानीं,
       “ डोळस तो जैसा । पुढें चाले नीट । 
          दाखवीत वाट । आंधळ्यासी ।।
           तैसा निजधर्म । स्वयें आचरोन । 
             नेणत्यांलागोन । दाखवावा ।। ”
ह्या माऊलीच्या सांगण्याप्रमाणें नुसतेंच ‘आत्मकल्याण’ नाही तर त्याबरोबरच ‘जगत्कल्याण’ हे श्री स्वामींचे ध्येय होते,ब्रीदवाक्य होतं. व यासाठींच त्यांनीं ‘भक्तिमार्गा’ चा अवलंब केला.
एकदा पुण्याहून पावसला जातांना, मी माझे मामा वै. भाऊराव  देसाई यांना ज्ञानेश्वरीवरील एका अभ्यासपूर्ण, सुप्रसिद्ध ग्रंथाविषयी  ( ग्रंथ व ग्रंथकर्ता यांचा उल्लेख हेतुपुरस्सर टाळला आहे ) विचारले की तो कधी श्री स्वामींच्या वाचनांत आला का ? तेंव्हा ते म्हणाले कीं, त्यांतील बराच भाग  श्री स्वामींनीं वाचून घेतला होता. त्यावर बोलतांना श्रीस्वामी म्हणाले होतें की,
 “ संतांचे काम परमार्थ हा "सोपा" करून सांगणे हे असते, क्लिष्ट नव्हे ” .
खरं पाहतां ही काळाचीही गरज होती. जसें संस्कृतभाषेंतील या आत्मज्ञानाला, आत्मविद्येला, माऊलींनी देशी लेणं चढविलं आणि मराठी भाषिक सर्व थरांतील आबाल वृद्धांसाठीं ब्रम्हविद्येचा सुकाळ केला. तद्वतच, शेकडों वर्षांचा कालावधि मधे लोटल्यानें दुर्बोध वाटणारी भाषा, सोपी व सरळ करून तेंच तत्वज्ञान प्रचलित मराठीत मांडणे ही कालानुसार / कालानुरूप भासणारी निकड होती व श्री स्वामींनीं ती पूर्ण केली. कोणतीही गोष्ट सोपी करून सांगणे हे अत्यंत अवघड काम. त्यातकरून तत्वज्ञाना सारखा विषय असेल तर अधिकच मुष्किल. पण सद्गुरंवरील अपार श्रद्धेमुळे त्यांचे कृपाशिर्वाद, अभिजात काव्यगुण व परतत्व स्पर्श यामुळे हे आव्हान श्री स्वामींनीं लीलया पूर्ण केलं.
श्रीस्वामींच्या सर्व साहित्यांतून प्रकट होणाऱ्या त्यांच्या तत्वज्ञानाचं हे मर्म आहे, वर्म आहे, ईंगित आहे, उघड गुपित आहे. कोठेही काही गूढ, क्लिष्ट, अवघड नाही. त्यांनी सांगितलेलं सर्व साधन, नवीन पिढ्यांना, सध्या परवलीचा शब्द बनलेल्या (User friendly ) साधक सुलभ आहे. साक्षात्काराचं स्तोम नाही, संतत्वाचा बडेजाव नाही, शिष्यांचा लवाजमा नाही, गाड्या नाही, राहणं, करणं, जेवणं-खाणं, तप- साधना सारं सारं पारदर्शक.
श्रीस्वामींचे सर्व वाड्मय हे त्यांच्या या दृष्टिकोनाचा प्रत्यय शब्दागणिक देते. ते समजायला अत्यंत सुलभ व सोपे आहे.
उदाहरणादाखल “ अमृतधारेतील “ पुढील दोन साक्या पहा-
  “ सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण । 
मित मधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण ।। ९६ ।।     एवं षड्-विध सज्जन लक्षण अंगीं बाणतां पूर्ण । 
   होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण ” ।। ९७ ।।
यांतील पहिल्या साकींत अगदी सोप्या शब्दांत स्वामींनीं सज्जन माणसाची सहा लक्षणं सांगितली आहेत व लगेच पुढच्याच साकींत जगदंबेची आण / शपथ घेऊन लिहिले आहे कीं ही सर्व ज्यानें पूर्णपणें अंगीं बाणली, त्याला परमेश्वर खचितच वश / प्रसन्न होतो.
पुढील दोन साक्यांमधेही मानवी जीवन धन्य कसे करता येईल याचा सहज साधा उपाय अतिशय सोप्या शब्दांत सांगताना स्वामी म्हणतात-
   “ मी माझें भ्रांतीचें ओझें उतर खालती आधीं । 
 तरिच तत्वतां क्षणांत हातां येते सहज समाधी ।।११०।।
सहज समाधी संतत साधी न लगे साधन अन्य । 
 सुटुनि आधि व्याधि उपाधी होतें जीवन धन्य”।। १११ ।।
वर-प्रार्थनेतदेखील याचाच पुनरूच्चार व थोडा खुलासा करत ते सांगतात-
     “ मी- माझें मावळो सर्व तूं तुझें उगवो अतां । 
      मीतूंपण जगन्नाथा,होवो एकची तत्वतां ”।।
जिथें “ मी ”आला, तिथे माझे येणारच. ते मावळले तरच तूं व तुझे उगवणार. स्वामी तर म्हणतात हा वेगळेपणा नकोच, जसा मी-पणा नको तसा त्याच्या सापेक्ष असणारा तू-पणाही नको तर हे सर्व एकरूपच होऊंदे.
श्री स्वामींचें साहित्य जसे समजायला अत्यंत सुलभ व सोपे आहे, तसेंच निश्चयात्मतकही आहे.
कारण हे सहज शब्द एका साक्षात्कारी संताचे,  एका तत्वज्ञ सत्कविवराचे स्वानुभवाचे बोल आहेत.
काव्याबद्ल विश्व विख्यात आंग्ल कवी WilliamWordsworth याचे Lyrical Ballads च्या प्रसिद्ध प्रस्तावनेत लिहिलेले “ काव्य म्हणजे उत्स्फूर्त भावनांचा उद्रेक ”,“ Poetry is the SPONTANEOUS  OVERFLOW  OF POWERFUL FEELINGs” हे वाक्य बव्हंशीं प्रमाणभूत मानले जाते.
पण श्री स्वामींच्या मनांत केवळ काव्यरचना नव्हती. तर त्यांचा मनोरथ होता, कीं आपल्या ईश्वर दत्त अभिनव जीवनामध्ये, सत्कविवर होऊन, स्वानुभवान्त:स्फूर्त, नवरसानीं परिपूर्ण,असें सत्यकाव्य निर्माण करण्याचा, स्वानुभव-सुधा शिंपडून, वसुधा (विश्व) नंदनवन बनविण्याचा.
इथें ध्यानांत ठेवलं पाहिजे, कीं सत्कविवर होणे हा, श्री स्वामींचा मनोरथ आहे, मनोदय (Aim), (Resolve) आहे, महत्वाकांक्षा (Ambition) नव्हे. आणि जगदंबेचा सेवक बनून, दास बनून, विश्व- बांधवांसहित सहित सर्वदा भक्ति-सुधा- रस सेवन करणे ही त्यांची मनीषा आहे.
आतां सत्कविवर कोणाला म्हणतां येईल याचे श्री स्वामींचे निकष / मापदंड काय आहेत हे त्यांच्याच शब्दांत पाहुया. ते लिहितात-
   “ बाजारीं ह्या जो तो करितो व्यवहाराचा धंदा । 
   क्रीडे काव्य-व्यवहारीं परि लाखांतुनि एखादा ”।। ८३ ।।
जगाच्या या बाजारांत जो तो काहींना ना काहीं धंदा व्यवहार करत असतो. मात्र काव्याशी क्रीडा करत तोच धंदा व्यवहार असं समजणारा / मानणारा लाखांतुन एखादाच असतो. हे श्री स्वामींचे शब्द “ काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् ”या प्रसिद्ध सुभाषिताची आठवण करून देतात.
पुढच्याच साकीत ते सत्कविवर कोण याचा खुलासा करतात.
“ तयांत विरळा सत्कवि निपजे अनुभवि जो निज- कविता। सत्कवींतही क्वचित संभवे अनुभवुनी आचरिता ” ।। ८४।।
या जगांत खरा यशस्वी कवी कोण व कृतार्थ कविता कोणाची याबद्दल ते लगेचच लिहितात-
      “ अडूब सांगड जयें बांधिली काव्य-व्यवहाराची ।  
खरा यशस्वी तो चि ह्या जगीं कृतार्थ कविता त्याची।। ८५
या साकींतील सांगड हा शब्द खास कोकणांतील आहे. कोकणांत पोहायला शिकवितांना दोन असोले (न सोललेले) नारळ, एका मजबूत नारळाच्या सुंभाला एकमेकांपासून थोडे दूर बांधतात.यालाच सांगड म्हणतात. अशी सांगड नवशिक्या पोहणाऱ्याच्या कमरेला बांधतात जेणेकरून तो बुडत नाही. श्री स्वामींनीं फार मार्मिकतेनें या शब्दाचा इथे उपयोग केला आहे. काव्य आणि व्यवहाराचा ज्याने समतोल राखला आहे. जो यापैकीं कोणत्याही एका गोष्टीमधें वाहावला नाही, एवंच काय, तर ज्याच्या काव्य आणि व्यवहारात पारदर्शिता आहे, प्रामाणिकपणा आहे, असा माऊलीं-समर्थां-तुकोबां सारख्याची कविता कालजयी, कालातीत ठरते. हाच निकष श्री स्वामींच्या काव्यासही तसाच लागू पडतो.
स्वामी त्यांचे मित्र पटवर्धन मास्तर यांना २०-१-१९२९ रोजीं लिहिलेल्या पत्रात लिहितात--
“ एकाच वेळीं दोन ठिकाणीं मन राहते हा माझा नेहेमींचा अनुभव आहे. मात्र त्यांत मौज ही कीं त्या दोहोंपैकीं सोहंकाराकडे जाणीव ही एक गोष्ट असावी लागते.”
“ तेंव्हा स्वरूपाची जाणीव ठेवून इतर गोष्टींकडे लक्ष पुरविणें हीच पायरी आपणांस तूर्त स्वच्छ आणि प्रज्वल केली पाहिजे.”
“ मनुष्य प्रारब्धाधीन असला तरी सर्वस्वी पराधीन नसतो. प्राणिमात्राला स्वत:च्या प्रयत्नांनीच परमेश्वराचे पद प्राप्त करून घ्यावयाचे असते; व ‘प्रयत्नांतीं परमेश्वर ’ हा सिद्धांतही सर्वमान्य आहे.”
हे पत्र स्वामींनी त्यांच्या आजारपणाच्या सुमारे ५वर्षे ६ महिने आधी लिहिलें आहे. आणि यावरून सहजच लक्षांत येतें कीं आजारपण हे केवळ निमित्तमात्र होते.
“ काल भविष्यत् स्वाधीन करूं वर्तमान-करणीनें ।
‘ प्रयत्न करितां परमेश्वरता प्राप्त ’ अशी सद्वचनें ” ।। ८१ ।।
स्वामींच्या बाबतींत या केवळ काव्य-पंक्ति नह्वत्या तर तें आहे त्यांच्या परमार्थाचे प्रवासवर्णन - “ प्रयत्नांति परमेश्वर ”,या प्रयोगाची प्रयत्नसिद्ध पाऊलवाट.
मन द्विधा असलं तरी त्यांतील एक जाणीव "सोsहं-हंकार" जाणीव हा अखंड अनुभव बोलका झाला व सहजच शब्द उमटले-
  “ संतत संगे सोsहं जिवलग सांगे मज गुज गोष्टी
चिर-सुखद असा सखा न दुसरा जरी धुंडिली सृष्टी ।। १५२।।
श्री स्वामींनीं त्यांच्या सारस्वतांत सोsहं ला एका नव्या सोsहं- हंसोपनिषदाच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, ज्याचा स्वतंत्र विचार व अभ्यास होण्याची नितांत गरज आहे.ranadesuresh@gmail.com
                                                           माधव रानडे.
                                                        ९१९८२३३५६९५८
                              
                                    

                                    

Sunday, May 29, 2016

                      श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ” 
                      भावार्थ-विवरण. (3)

 श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ” हा संग्रह म्हणजे आधुनिक युगांतील जणूं सोsहं-हंसोपनिषद.  तें उपनिषदांसारखं सूत्रमय असल्यानें, त्यांच्या इतर स्वतंत्र साहित्यातील, “ भावार्थ गीता ” हें त्यांचे 
त्यावरील भाष्य, तर “ संजीवनी गाथा ” हें “ अमृतधारा ” या संग्रहाचे वार्तिक, असें मी मानतो. 
या दृष्टीनें, श्रीस्वामींच्या साहित्याकडे पाहिल्यास वरील तीन ग्रंथ हे त्यांच्या तत्वज्ञान दर्शनाची प्रस्थानत्रयी मानतो. अर्थातच हें माझें पूर्णतया व्यक्तिगत मत आहे व तें मी कोणावरही थोपवुं इच्छित नाही, व याबद्दल कोणाचे दुमत असल्यास वादही करुं इच्छित नाही. 
हे लिहिण्याचे कारण / हेतु हा की माझ्या विवरणांत मी त्यांच्या सर्व साहित्याचा साकल्याने विचार करतो व त्यांतील उदाहरणें देतो त्याबद्दल गैरसमज होऊं नये एह्वढंच. 
भाष्य म्हणजे त्या ग्रंथाचा अर्थ अधिकाधिक सोपा करणं. तर वार्तिक म्हणजे त्या ग्रंथांत तत्वज्ञानाच्या अंगाने जे काही उणे राहिलें असेल त्याचा खुलासा करणें. खरं तर त्यांचं सर्वच साहित्य साधं, सोपं व  सरळ आहे. श्रीस्वामींनीं माउलींची प्रसिद्ध ओवी आपल्या शब्दांत अभंग रूपांत मांडिली आहे तसे- 
                 “ तैसे सत्य मृदु । मोजके रसाळ । शब्द ते कल्लोळ अमृताचे ” 
     श्रीमद्भवदगीतेतील---  “ बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवानन्मां  प्रपद्यते ।
 वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ।।गी ७/१९।। ”                                                             
 या श्लोकावरील,“अभंग ज्ञानेश्वरी” तील काहीं अभंगांत श्री स्वामी लिहीतात- 
        “ करितां प्रवास । शतावधि जन्म । न गणोनि कर्म- । फल-हेतु ।।
            देह्तादात्म्याची । संपोनियां रात । जाहली प्रभात । कर्मक्षयें ।। 
                 गुरुकृपारूप । उजळली उषा । तेणें दाही दिशा । तेजोमय ।।
         ज्ञान-बालार्काचा । होतां चि उदय । देखे तो ऎश्वर्य । ब्रम्हैक्याचे ।।
             संपूर्ण हे विश्व । वासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ।।
       म्हणोनि तो ज्ञानी । भक्तांमाजी राजा । जाण कपिध्वजा । निश्चयेसीं ।।
                ऐसा तो महंत । श्रेष्ठ ज्ञानी भक्त । दुर्लभ बहुत । धनुर्धारा ।।    

१५ ऑगस्ट २०१४ च्या अभंग-ज्ञानेश्वरी(य) ( एक ईश्वरी संकल्प ) या लेखांत लिहिल्याप्रमाणे,  ईश्वरी तत्त्वज्ञान व परमेश्वराचा संकल्प  हे शाश्वत असते, त्यामुळे ते निरंतर अबाधित व उपलब्ध राखण्याची व्यवस्था या विश्वात आहे. 
त्यानुसार १९ व्या शतकाच्या सुरवातीलाच, १५ डिसें १९०३ रोजी, असा एक अति दुर्लभ, श्रेष्ठ ज्ञानी भक्त पांवस गावांतील गोडबोले कुटुंबात, त्यांच्या हातून धडलेल्या, स्वयंभू विश्वेशाच्या भावभक्तिपूर्ण सेवेच्या पुण्याईचे फळ म्हणून जन्माला आला. 
 संपूर्ण हे विश्व । वासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ।।
एक योगी, तत्वज्ञ, संत, व अभिजात काव्यगुण यापैकीं एखादा गुणविषेश असणे हेही फार क्वचित आढळून येते. तर श्री ज्ञानेश्वर माऊलींसारखे हे सर्वच दुर्मिळ गुणविशेष एकत्रितपणे पाहायला मिळणें तर फारच अवघड. युगा-युगांतून कधीकाळी संभावणारा असा महात्मा पाहायला मिळतो तो श्रीस्वामी स्वरूपानंद यांच्यामध्ये. 
त्यांच्या अभंगांतील वर उल्लेख केलेल्या भावाचा शब्दश: प्रत्यय देणारे काही वेचे पाहूं. श्रीस्वामी म्हणतात-- 
“ वासुदेवमय विश्व हे आघवें । भ्रांतीचें निनांवे शून्याकार ।। नाम स्वरूपातीत । वसे वासुदेव । विश्वीं स्वयमेव ।एकलाचि II ”
किंवा,
“ वासुदेवाविण न देखे दर्शन । वासुदेवीं मन स्थिरावलें ।आतां अंतर्बाह्य वसे वासुदेव ।  नसे रिता ठाव अणुमात्र ।।”
अथवा,
“ जेथे पाहे तेथे दिसे वासुदेव । वेडावला जीव जडे पायीं ।।” 
तसेच,
“ वासुदेवावीण विश्वीं नाही दुजें । नांदतो सहजें एकला चि ” 
“अणुअणूंतून राहिला भरून । सकळ संपूर्ण वासुदेव ।। 
  किंवा 
“ एक वासुदेव नांदे चराचरीं I त्याविण दुसरी वस्तु नाही II
वासुदेव येथे। वासुदेव तेथे। व्यापितो सर्वांते। वासुदेव।। 
व्याप्य तो व्यापक । सर्व सर्वात्मक । सर्वातीत एक ।वासुदेव ।। 
ध्याता ध्यान ध्येय । वासुदेवमय । एक तो अद्वय स्वामी म्हणे ।। ” 
२१ जुलै १९३४ च्या रात्री 
“देह्तादात्म्याची । संपोनियां रात । जाहली प्रभात । कर्मक्षयें ।।” 
                                        व श्रीस्वामींनी लिहिले-----
“ शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढींची नवमी I अठराशें छप्पन्न शकाब्दीं मृत्यु पावलो आम्ही II ”
पार्थिवाशी झालेल्या ताटातुटीच्या धक्क्यानं शरीराला प्रचंड थकवा आला होता. अशक्तपणा तर इतका
होता कीं एका दिवसात, कधी एक, कधी दोन, व कधी फारतर ४-५ साक्या एवढंच लिहूं शकत होते. 
पण शरीराच्या तशा विकल अवस्थेतही - 
        “ आत्मानुभवें जग चि आघवें वासुदेवमय झालें । 
बहु दुर्लभ तो महंत विश्वीं विश्व होउनीं खेळे ” 
अशा विश्वात्मक झालेल्या श्री स्वामींच्या कानी-
“ अभंग-ज्ञानेश्वरी-(य) हा ईश्वरी संकल्प असल्याची व या कार्याचे ते माध्यम असल्याची आकाशवाणी आली ”
  या संकल्प पूर्ततेसाठी साक्षात परमात्माच पाठीशी उभा असल्याचे त्यांना जाणवत होते. तीच जाणीव आपल्या रसाळ शब्दांत स्वामींनीं त्यांच्या २७ नोह्वेंबर १९३४ रोजीं लिहिलेल्या पहिल्या साकीत व्यक्त केली.    
“ सदैव मार्गीं चालत असतां मजला देतो हात । उठतां बसतां उभा पाठीशीं त्रैलोक्याचा नाथ ।। ” अ.धा.९८
पण या आधींच्या काळांत, २२-१०-१९३४ पासून ते २५-१०-३४ या कालावधींतील त्यांच्या सखोल (More & more of less & less ) आत्मचिंतनाबद्दल “ अमृतधारा ” भावार्थ-विवरणाच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. विषेश म्हणजे हे तारीखवार व श्री स्वामींच्या हस्ताक्षरांत आहे.
आजारपणानंतर तीन महिन्यानीं थोडी ताकत अंगात आल्यावर लिहिलेल्या या नोंदींवरून काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात- 
(१) त्यांच्या आयुष्यातील “ आत्मनो मोक्षार्थं ” या अध्यायाची समाप्ति होऊन “ जगदुद्धारायच ” या पर्वाची नांदी झाल्याची चाहूल व संकेत त्यांना मिळाले होते, हे त्यांच्या “ आत्मकल्याण जगत् कल्याण ” या प्रतिदिनींच्या  टिपणावरून दिसून येतें.
    या अनुरोधानें काही साक्यांचा जो भावार्थ उलगडतो तो असा--
“ अमृतधारा ” या ग्रंथांतील पहिल्या सात साक्यांमधे, “ जगीं जन्मुनी ”, सहा मधें “ जगीं जन्मुनी अभिनव- जीवन ”, व “ स्वानुभव /अनुभव ”, तसेंच पहिल्या पांच साक्यांमधे याशिवाय “ सत्य ” या शब्दांचा पुनरुच्चार/ शब्दसमूहाची पुनरावृत्ति आढळते.
रामभाऊ ( आप्पा ) गोडबोले या व्यक्तीचा / व्यक्तिरेखेचा अंत होऊन “ स्वरूपानंद ” या साक्षात्कारी संताचे व्यक्तिमत्व उदयाला आल्याचे त्यामुळे दिसून येते. पण या अभिनव जीवनाचा जगत्कल्याणासाठी कसा उपयोग करायचा हा निर्णय मात्र श्री स्वामींनीं सर्वस्वीं “ जगदंबे ” वर सोंपवलेला आहे, असे पुढील साकीवरून दिसेल- 
“ मजसि ह्या जगद्-रंगभूमिवर जसें दिलें त्वां सोंग । करीन संपादणी तशी मी राहुनियां नि:संग II५१ II ”
त्यांनीं मातेला सांगितलं कीं, “ सत्कविवर, गायकवर, तंतकार, चित्रकार, शिल्पकार, बागवान थोडक्यांत काय जे देशील तें सोंग / काम मी नि:संग राहून वठवीन / संपादन करीन, व कोणत्याही रूपांत जगदंबेचे दास होऊन भक्ति-सुधा-रस सेवन करण्याची इच्छा प्रकट केली आहे, व  ७ व्या साकीत “ वसुधा ” तर ८ व्यांत “ विश्वबांधवांसहित ” हे शब्द त्यांच्या विश्वात्मक पातळीची / विचारांची साक्ष देतात. जगदंबेनंही आपल्या लाडक्या भक्ताचे मनोगत व गुणविशेष ओळखत वर दिला-
“ काव्यसेवका जगदंबेचे असे तुला वरदान । ऐकुनि कविता जगत्-रसिकता मुदें डोलविल मान ” ।।८।।
  एव्हढंच नाही तर स्व-शपथपूर्वक हे देखील सांगितलं कीं--
“ प्रमाण मानिल आणि आपुली स्वयें वाहते आण । अनुपम अभिनव तव कवनाला जनता देइल मान “ ।।९।। अमानित्वाची जणुं मूर्ति अशा श्रीस्वामींनी तो मान मातेलाच अर्पण करीत म्हटलं- 
“ दिला मान तो तिला वाहिला मला कशाला भार । पुरे माप पदरांत घातलें तोलुनि भारंभार ” ।। १० ।।
गंमत म्हणजे ३०-१०-३४ नंतर “ आत्मकल्याण जगत् कल्याण ” ही नोंद दिसत नाही, कारण श्री स्वामींनीं, अभिनव जीवनाचा जगत्कल्याणासाठी कसा उपयोग करायचा याचा मार्ग जगदंबेने आपल्या वरदानानं दाखवून दिला होता, व अनन्य-शरण आलेल्या आपल्या या लाडक्या भक्ताला, “ सोsहं ” सार प्रदान करून, साधनेचा मार्ग दाखवीत प्राण संकटातून रक्षणही केलं होतं म्हणूनच स्वामी म्हणतात- 
 “ प्रसन्न होता माता हाता चढलें ‘सोsहं’ सार । हवा कशाला मला आतां हा वृथा शास्त्र संभार ”।।
“ सद् भक्ताची सदा वाहणें भगवंतानें चिंता । तो चि तयाचा पथ- दर्शि तथा रक्षिता समुद्धर्ता ” ।।११६।।
(२) या हस्तलिखित नोंदींमधे श्रीमत् रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, जे.कृष्णमूर्ति, श्री शंकरराव देव, महात्मा गांधी या सर्वांच्या नांवाची नोंद, १७/११/३४ पर्यंत केलेलीआढळते. तसेंच त्याआधीं वेगवेगळ्या तारखांनां श्री जे.कृष्णमूर्ति, यांचे पुढील लिखाण उद्धृत केलेले आढळते. 
I laugh with him, with him I play. (30/10/34). He is before me forever. Look where i may, He is there. I see all things through Him.(2/11/34) True self-discipline is not repression, but it is born out of understanding.(4/11/34). The liberated man is the most practical man in the world, because he has discovered the true value of all things. That discovery is illumination. (6/11/34).
श्री स्वामींच्या “ अमृतधारा ” संग्रहांतील अखेरीस लिहिलेल्या इंग्रजी कडव्यांचं व पुढील साकीचं मूळ या चिंतनांत व या नोंदीत सापडते असं मला वाटतं, असें मी श्री सुदेश चोगले यांना, “ अमृतधारे ” वरील आमच्या चर्चेंत सांगितले होते.  
“ निधान सन्निध परि घोर तमीं इतस्तत: भ्रमलो मी । ज्ञानकिरण दर्शनें आतां सत् प्रकाश अंतर्यामीं ।।”
(३) पण २२-११-३४ नंतरच्या सर्व नोंदी मात्र फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्याच आहेत ही खास
  लक्षणीय गोष्ट आहे व त्यापुढें उल्लेख आहे - “ज्ञानेश्वर”,  अशा ज्ञानेश्वरमय झालेल्या श्रीस्वामीजींचे
श्री ज्ञानेश्वर माऊली व श्रीज्ञानेश्वरीचे महात्म्य वा थोरवी सर्वार्थाने अभिव्यक्त करण्याचे कौशल्य वा प्रतिभा ती काय वर्णावी!! 
                                                ॥ श्री ज्ञानदेव वंदन ॥
नमितों योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत |तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ॥१॥
स्मरण तयाचें होतां साचें चित्तीं हर्ष न मावे |म्हणुनि वाटते पुन: पुन्हां ते पावन चरण नमावे ॥२॥
अनन्यभावें शरण रिघावें अहंकार सांडून | झणिं टाकावी तयावरुनियां काया कुरवंडून ॥३॥
आणि पहावें नितांत - सुंदर तेजोमय तें रूप |सहज साधनीं नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ॥४॥
ज्ञानेशाला नमितां झाला श्रीसद्गुरुला तोष |वरदहस्त मस्तकीं ठेवुनी देई मज आदेश ॥५॥
                                                 ।। श्रीज्ञानेश्वरी गौरव ॥
श्रीज्ञानेश्वरी अमृतगंगा | बहुत सुकृतें लाभली जगा |पावन करी अंतरंगा | अंगप्रत्यंगा जीवाचिया ॥१॥
भक्तिभावें करितां स्नान | निर्मल होय अंत:करण |जीवासी परम समाधान | साक्षात् दर्शन श्रीशिवाचें ॥२॥
जिवा-शिवाची होता भेटी | मावळोनि ज्ञाता-ज्ञेयादि त्रिपुटी |प्रकटे सोऽहंभाव-प्रतीती |उरे शेवटीं ज्ञप्तिमात्र॥ 
                                             ॥ श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ फलश्रुति ॥
श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ गहन | गुरुपुत्रांसी सुगम सोपान |भावें घडतां श्रवणमनन | लाभे समाधान अखंडित ॥१॥
उपासनामार्ग सांपडे | योगसार हाता चढे |उघडती ज्ञानाचीं कवाडें | सहज घडे निष्कामकर्म ॥२॥

होवोनि अंतरंग अधिकारी | भावें अवलोकितां ज्ञानेश्वरी |
साक्षात् प्रकटे भगवान् श्रीहरि |स्वयें उद्धरी निजभक्तां ॥३॥
नित्य अंतरीं ज्ञानदेव | सर्वां भूतीं भगवद्भाव |
देव-भक्तां एक चि ठाव | अपूर्व नवलाव अनुभवावा! ॥४॥

अंतरंग अधिकारी  होऊन  नित्य अंतरीं ज्ञानदेव | सर्वां भूतीं भगवद्भाव | हा स्थायी भाव झाल्याने
                   हा अपूर्व नवलाव श्री स्वामीजींनी स्वत: प्रत्यक्ष अनुभवला होता!! 
                                          म्हणूनच ते लिहितात-
“ नसानसांतुनि तें संताचे नाचे अस्सल रक्त । जाण साजणी आजपासुनी आम्ही जीवन्मुक्त ” ।। १२३।।
“ अखंड-जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा । हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा ” ।।१०५।।

(४) श्री स्वामींचे एक खास वैषिट्य हे आहे की त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रयोगशाळेत काही बोलण्याआधी त्या प्रत्येक गोष्टीचा प्रयोग स्वतःवर केला व त्यानंतरच ते प्रयोगसिद्ध ज्ञान / तवत्ज्ञान लोकांपुढे ठेवले.
 त्यामुळें त्यांचे बोल हे केवळ अनुभवसमृद्ध न राहातां प्रयोगसिद्ध आहेत असें ठामपणें म्हणतां येतें. 
या दृष्टीने “ मृत्युपत्र ” या त्यांच्या अप्रकाशित साहित्यांतील, एका कडव्याच्या, ३-११-३४ रोजीं केलेल्या नोंदीचा फक्त उल्लेख करून हा लेख संपवितो. 
         “ अन जन्मुनि आत्मज्ञ बनावें हा माझा हव्यास । प्रयोगांत आयुष्य आघवें वेचावें हा ध्यास ।          असा ध्यास लागतां जिवाला झाला साक्षात्कार । वृथा नव्हे कीं बोल ; सांगतो अनुभव हा साचार ” ।।
( टीप- वर उल्लेखिलेल्या २२/१०/३४ ते २५/१२/३४ या काळातील श्रीस्वामींच्या हस्ताक्षरांतील या अमुल्य नोंदींची प्रत मला माझा मामेभाऊ श्री श्रीकांत देसाई ( उर्फ बाबुराव ) यांनीं मोठ्या प्रेमाने ७-८ वर्षांपूर्वी दिली होती. यांसाठी मी त्यांचा सदैव ऋणी आहे. )
भ्रमणध्वनी- ९८२३३५६९५८                                                                         माधव रानडे. 
ranadesuresh@gmail.com   

Saturday, April 23, 2016

                          श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ”
                                       भावार्थ-विवरण. (२)


आज “अमृतधारा” भावार्थ-विवरणाचा दुसरा लेख लिहितांना एक जुनी आठवण मनांत  येऊन गंमत वाटली, आणि हसूं आलं. मी व बाबुराव (श्री श्रीकांत देसाई) श्रीस्वामींच्या बद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल बोलत होतो. श्रीस्वामींचा विषय म्हणजे आम्हां साऱ्यांच्याच आवडीचा. ते म्हणाले की “अमृतधारा” पुस्तकाच्या पहिल्या पानावर श्रीस्वामींच्या फोटोच्या वर “साधकावस्थेतील भाव-विलास” हे शब्द आहेत. श्रीस्वामी त्यावेळीच सिद्धावस्थेत असतांना व त्याच पुस्तकातील अनेक साक्यांवरुन असं स्पष्ट दिसत असतांना हे लिहिणं बरोबर आहे का ? मलाही त्यांचा मुद्दा त्यावेळी पटला. ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वीची आहे. आज हसूं आलं, कारण आतां डोळ्यांसमोर येतात समर्थांच्या पुढील ओव्या-


“ बाह्य साधकाचे परी । आणी स्वरुपाकार अंतरी । सिद्ध लक्षण तें चतुरीं । जाणिजे ऐसें ।।


आणि  स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या या  ओळी-


            “ मंत्र -विद्या-बळें । टाकी जादूगार । बांधोनि नजर । आणिकांची ।।
               परी तुझी लीला । लोकविलक्षण । आपणा आपण । चोरिसी तूं ।। ”


व लक्षांत येतं की-


         “ आपुलें अस्तित्व । कळूं नये लोकां । नामरूप जें का । तें हि लोपो ।।”


याच भावनेतून, प्रकाशकांनी घातलेल्या या शब्दांना स्वामींनी तसेंच राहू दिले असावे.  


“ अमृतधारा ” संग्रहाचा भावार्थ पहायचा असेल तर समर्थांच्या पुढील ओव्या पहाव्या   
“ शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे ते यथार्थ । पण आपण मिथ्या ।  भूंस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्यजावा । कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ।। ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष । स्वानुभव तो अलक्ष । लक्षिला न वचे ।। ”


सारांश:- शब्द हे स्थूल आहेत तर लक्ष्यांश अर्थात भावार्थ सूक्ष्म. जगद्भान हारपलेल्या, भावसमाधीत तल्लीन, श्रीस्वामींच्या स्वानुभवाचा अल्पसा कां होईना मागोसा घेण्यासाठी, त्या काव्यातील भावार्थ विवरणाचा हा खटाटोप.


माझं हे लिहिणं कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटेल, पण भावार्थाचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, मला हे लिहावसं वाटतं, की जसे श्री ज्ञानेश्वर माउली हे भगवान विष्णूचे अवतार असल्याकारणाने, ते योगेश्वर श्रीकृष्णाच्या भूमिकेशी, तत्त्वज्ञानाशी, तदाकार झाले आणि कल्पनातीत ईश्वरी योजनेचा भाग होऊन त्यांनी गीतेवर प्राकृताच लेणं चढविले,“ “भावार्थ दीपिकेचं ” निरुपण केले, अपूर्व ज्ञानगंगा, समाजातील सर्वांसाठी खासकरून तळागाळातील उपेक्षितांसाठी, बहुजनांसाठी प्रवाहित केली व म्हणूनच ती आज सातशेहून अधिक वर्षांनंतरही तेव्हढीच लोकप्रिय आहे. नेमकी हीच गोष्ट “ईश्वरी संकल्पाचा” च भाग म्हणून २०-२१ शतकांतील नाथ संप्रदायाच्या या थोर वारसदारानं, श्री स्वामी स्वरूपानंद, यांनी केली. माउलींच्या पावलावर पाऊल टाकीत, नाथसंप्रदायाची पालखी तर पुढे नेलीच, शिवाय “गीता” व “भावार्थ दीपिका” अर्थात “ज्ञानेश्वरी”, या दोन्हीं ग्रंथांतील प्रतिपाद्य तत्वज्ञानाशी, ग्रंथकर्त्यांच्या भूमिकांशी तद्रूप होऊन, समरस होऊन “भावार्थ गीतेचा ”, आविष्कार केला. व तेही पूर्णपणे अकर्तृत्वाच्या भावनेतून. “अमृतधारा” या संग्रहाच्या, अर्पणपत्रिकेत “इदं न मम”, या भावनेतून श्रीस्वामींनी, “करी ‘अमृत-धारा’ ह्या तुझ्या तुज समर्पण”, व हे करता आलं यासाठी स्वत:ला भाग्यवान मानलं, त्याप्रमाणे, श्रीमद्भगवद्गीतेचा मुख्यत्वे श्रीज्ञानेश्वरीच्या आधारे केलेल्या सुबोध, सरळ मराठीत केलेल्या रसाळ पद्यमय अनुवादाचा ग्रंथकर्ता ते “हृदयस्थो जनार्दन” मानतात आणि त्याचेच चरणयुगुली सर्वभावे समर्पण करतात. हे सर्व लिहिण्याचं कारण हे की, श्रीस्वामींसारखे साक्षात्कारी संत आत्मबुद्धीच्या भूमिकेवर असतात.  त्यांची अनुभूति व आविष्कार हे आत्मज्ञानाच्या सत्प्रकाशात उजळून निघालेले असतात म्हणून त्यांतील भावार्थ शोधायचा. आणि स्वामी म्हणतात तसं-


         “शब्दाची वरील । काढोनिया साल । गाभा जो आंतील । अर्थरूप ।।
               त्या चि अर्थब्रह्मीं । होवोनि तद्रूप । सुखें सुखरूप । भोगावें हें ।।


या आधीच्या लेखांत लिहिल्याप्रमाणे, “अमृतधारा”, हा संग्रह  मला स्वामींच्या  अवतारकार्याचा, त्यांच्या दिव्य मनाला प्रतित झालेला स्पष्ट आराखडा (Road Map) व क्वचित त्यांच्या पुर्वायुष्याच्या खुणा दाखवणारा वाटतो.


भावार्थ विवरणासाठी मी मुख्यत्वेकरून श्रीस्वामींच्याच साहित्याचे, त्यांच्या चरित्राचे, बोट धरिले आहे. तसेंच श्रीस्वामींच्या चैतन्यरूपाशी, चैतन्य लहरींशी सहस्पन्दित होण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यातून मिळणारा आनंद वाचकांशी वाटून घेण्याचा या सर्व लेखांतून करणार आहे.


अशाच प्रयत्नातून, माझे भावार्थ गीतेच्या ध्वनिमुद्रिका (Audio CD) चे स्वप्न, सेवा मंडळातर्फे प्रत्यक्षांत आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाट आहे, असे माझे तरुण साधक मित्र श्री सुदेश चोगले यांचेशी वारंवार होत असलेल्या चर्चेतून काही उद्बोधक माहिती समोर आली ती पुढे त्यांच्याच शब्दांत देणार आहे. “भावार्थ गीते” बद्दल इतकं लिहिण्याची विशेष कारणं आहेत ती थोडक्यांत पण ठळकपणे अशी:- "

(१) “अमृतधारा”, ह्या संग्रहातील साकी क्र. १ व ६ ते ९ यांचा थेट संबंध श्रीस्वामींच्या इतर "अभंग " साहित्या बरोबरच मुख्यत्वेकरून त्यांच्या सर्वप्रथम प्रकाशित “भावार्थ गीतेशी” आहे असं माझं ठाम मत आहे.
(२) कारण “भावार्थ गीता” ही श्रीस्वामींची स्वतंत्र साहित्यकृती आहे व ती अनुपमेय आहे.

(३) ही साहित्यकृती गीतेचा विस्तार ७०० श्लोकांचा १६१९ साक्या तर ज्ञानेश्वरीच्या ९०३३ओव्यांचे सार आहे.
(४) ती गेय आहे एव्हढेच नव्हे तर आतां तिची ध्वनिमुद्रिका (Audio CD) उपलब्ध आहे
(५) मी या संग्रहाला गंमतीने Two in One म्हणतो
(६) माझं म्हणणं आहे की “ गीता ज्ञानेश्वरी । आतां घरोघरीं । भक्तांचा कैवारी । स्वरूपानंद ।।
(७) श्री स्वामी स्वतः त्यांच्या पत्रांतून “भावार्थ गीतेचा” उल्लेख करतात. “स्वरूप-पत्रमंजूषा” (४१,४२/८,६/१२) यातील पत्र ४१ सर्वांत लहान पत्र असून असे निश्चयात्मक उद्गार इतरत्र आढळत नाहीत. यावर “आत्मानुभवाची गुरुकिल्ली” या शीर्षकाखाली माझा एक लेख श्रीक्षेत्र पावस या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. तसेच “भावार्थ गीतेचा” लेख या संकेत स्थळावर पहावयास मिळेल (दिनांक २१ नोव्हेंबर २००८).
(८) “भावार्थ गीतेचे” गीत रामायणासारखे Programme केले व गीतेच्या मूळ ७०० श्लोकांचा अंतर्भाव करून वेगळी आवृत्ती काढल्यास त्याचे अद्भुत परिणाम दिसतील व उपयुक्तता वाढेल.


श्री सुदेश चोगले म्हणतात :-  
*************************************************************************
“ संतसाहित्य म्हणजे प्रतिभेच्या स्त्रोतातून प्रकट झालेला स्वानुभव!  त्याच्या वाचनाचे अंतिम पर्यवसान वाचकांस अनुभूति होण्यात जर झाले तर ते साहित्य वा ते वाचन-मनन यशस्वी ठरेल अन् तशी ताकद त्यात निश्चितच असते.
अनुभव ---> भावावस्था + प्रतिभा ---> शब्द वा काव्य ---> वाचन + मनन ---> भावनिर्मिती ---> अनुभव


म्हणजेच भावाची अभिव्यक्ति शब्दरूपाने काव्यात होते आणि त्यामुळे ते काव्य त्या भावविश्वात प्रवेश करण्याचे द्वार आहे. संजीवनी गाथेत श्रीस्वामीजी एका अभंगात म्हणतात "भाव-बळे आम्हां हरिचें दर्शन".  भाव हे भक्ताचे बळ आहे किंवा भाव हा इतका बलशाली आहे की तो हरीचे दर्शन करून देऊ शकतो.


याच अनुषंगाने आपण श्रीस्वामीजींच्या "अमृतधारा" या स्फुट काव्यरचनेचा भावाधारे मागोवा घ्यायला हवा जेणेकरून आपण श्रीस्वामीजींच्या त्या काळातील भावावास्थेशी अल्पसे तरी तादात्म्य पावू शकू व त्या अनुभवाचा अल्पांश तरी प्राप्त करू शकू.


श्रीस्वामींसारखे मितभाषी संत जेव्हा लिहितात तेव्हा त्याचा अर्थगाभा अत्यंत सखोल व विशाल असतो.  अमृतधारेचे वैशिष्ट्य म्हणजे
१. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर असताना काव्यस्फूर्ति होणे अशी उदाहरणे विरळाच असावीत.
२. स्वत:च्या प्रकृती अस्वास्थ्याचे वर्णन जरी अमृतधारेत असले तरीही त्याबद्दल तक्रार मात्र नाही. यातून शरणागति प्रतित होते.


अमृतधारेच्या सुरवातीच्या काही साक्या वाचल्या तर त्या प्रत्येकात स्वानुभव व अनुभव हा शब्द आलेला दिसतो व स्वानुभव-सुधा म्हणजे स्वानुभवाचे अमृत शिंपून भूतलावरील सर्वांना स्वानुभवी बनवीन अशी श्रीस्वामीजींची सदिच्छा त्यांत दिसून येते.


श्रीस्वामीजींनी तरुणपणी जरी गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी व इतर अनेक संत साहित्याचा सखोल अभ्यास केलेला होता तरीही अमृतधारा पाहिल्यास या काळात केवळ सोहम् साधनेखेरीज दुसरा आधार त्यांनी घेतलेला नाही हे दिसून येते व केवळ तोच त्यांना आत्मदर्शन करवून देण्यास कारणीभूत झाला हेसुद्धा पुढील साक्यांत सिद्ध होते. पुस्तकी विद्या वा पोपटपंची दूर सारून त्या अनंताच्या प्रांतात श्रीस्वामीजींनी सोहम् साधनेद्वारा अक्षरश: उडी घेतली. शेवटच्या साक्यात अद्वैत तत्वज्ञानाच्या सर्वोच्च अनुभूतीचे वर्णन आढळते, ज्यामुळे श्रीस्वामीजी आत्मतृप्त झाले व पुढील काळात ते आपल्या पत्रव्यवहारात "आत्मतृप्त स्वरूपानंद" असे लिहित असत. यावरून अध्यात्मसाधनेत गुरुप्रणित साधनेचे महत्त्व विशद होते. पण हे लक्षात न घेता सर्वसाधारणपणे बहुतांश साधक आध्यात्मिक वाचनाच्याच जास्त आहारी जातात व त्यातच साधनेपेक्षा जास्त काळ व्यतीत करतात व त्यामुळे अनुभूतीस मुकतात असे दिसून येते. दुसरे असे की प्रकृती अस्वास्थ्य असताना पुस्तकी विद्येचा विशेष आठव होत नाही वा ती विशेष उपयोगीसुद्धा पडत नाही तर अंतरंग साधनाच सहायक ठरते असे कळून येईल.
अमृतधारेतील साधकांस उपयुक्त ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:-  ध्येयनिश्चिती व ध्येयवेड, जीवनाची स्पष्ट संकल्पना, निश्चय वा करारीपणा, वैराग्य, अलिप्तता, अखंड साधनाभ्यासाचे महत्व, ईश्वरनिर्भरता, शरणागति, स्वानुभूति


श्रीस्वामीजीच्या संजीवनी गाथेतील अभंगांचा अभ्यास करताना शेवटचा चरण आधी वाचला तर त्यांना काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे कळते व मग सुरवातीपासूनचे चरण वाचल्यावर ते त्या पुष्ट्यर्थ आहेत हे ध्यानात येते. अमृतधारेतसुद्धा याप्रमाणे शेवटच्या काही साक्या वाचल्या तर हे लागू पडते असे ध्यानात येईल.


श्रीस्वामीजीनी भगवतीची उपासना केलेली नसताना अमृतधारेत असलेले जगदंबा, जगन्माता, माताजी असे उल्लेख मात्र प्रज्ञ अभ्यासकांस निश्चितच विचारप्रवृत्त करतील!!
श्रीस्वामीजी अन् जगन्माता जगदंबा:-
श्री बाबूराव पंचविशे (मास्तर), मालाड - मुंबई, ज्यांनी श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य पूज्य बाबा बेलसरे यांची श्रीज्ञानेश्वरीवरील निरुपणे लिहून काढली व आज ती आपणांस पुस्तकरूपाने उपलब्ध होत आहेत, ते पंचविशे मास्तर, श्रीस्वामीजींचे अनुग्रहित शिष्य आहेत. चित्रकार कै. अनंत सालकर व मास्तर हे घनिष्ठ मित्र.  सालकर हे श्रीस्वामींचे अनुग्रहित त्यामुळे त्यांना वाटायचे की आपल्या परममित्राने म्हणजेच बाबूरावांनीसुद्धा श्रीस्वामीजींचा अनुग्रह घ्यावा. त्यानुसार मास्तरांना घेऊन ते पावसला गेले. कै. मधुभाऊ पटवर्धन व सालकर हे पण मित्र. मधुभाऊसुद्धा सोबत होते. मधुभाऊंनी  श्रीस्वामीजींस विनंती केली की आपण बाबुरावांना अनुग्रह देऊन आपले कृपांकित करावे.


त्यानुसार मास्तर श्रीस्वामीजींच्या खोलीत दर्शनास गेले असता श्रीस्वामीजींनी मास्तरांना श्रीरामकृष्ण परमहंसांचे एक पुस्तक हाती दिले व कुठलेही पान काढून वाचा असे सांगितले. ते उघडल्यावर अध्याय ४२(?) मधील राखाल, राम, केदार, तारक, एम. इत्यादी ठाकुरांच्या दर्शनाला जातात त्या प्रसंगाचे वर्णन आले. केदार ठाकुरांची कृपा प्राप्त होण्यासाठी ठाकुरांचे अंगठे धरून बसत असे. ठाकूर आईला (कालीमातेला) सांगत आहेत की याचे (केदारचे) पैशावरील प्रेम नष्ट होत नाही, बाईवरील प्रेम नष्ट होत नाही, आई याला माझ्यापासून दूर कर.  मास्तर तर अनुग्रहाच्या इच्छेने श्रीस्वामीजींपाशी आले होते आणि आली तर ही अशी गोष्ट!  मास्तरांच्या डोळ्यातून घळघळा अश्रूधारा वाहू लागल्या. तितक्यात श्रीस्वामीजी म्हणाले, "असू दे, असू दे, या आपल्या त्या काळच्या  आठवणी".  दोनदा हेच म्हणाले.  त्यानंतर आपणास दुपारी बोलावितो असे सांगून निरोप दिला. दुपारी मग मास्तरांना श्रीस्वामीजींचा अनुग्रह प्राप्त झाला.


या घटनेमुळे मास्तराचे असे मत आहे की गेल्या जन्मी श्रीस्वामीजी व आपण स्वत:  बंगालमध्ये होतो व श्रीस्वामीजींची जगन्मातेची उपासना असावी.  तोच धागा पुढे आल्यामुळे जगन्मातेचा उल्ल्लेख अमृतधारेत आला असावा. तसेच श्री स्वामीजींच्या पत्रव्यवहारात  सुरवातीस "जय माताजी" असे लिहिलेले असे.


‘जगन्माता म्हणजे ब्रह्म’ असाही उल्लेख श्रीठाकुरांच्या मुखातून आलेला आहे.”


याबाबत कै. श्री. म.  दा.  भट यांनी श्रीस्वामीजींस एकदा प्रश्न केला होता की, स्वामीजी आपण पत्राच्या सुरवातीस “जय माताजी” असे कां लिहिता?.
तेव्हा श्री स्वामीजींनी उत्तर दिले की भिलवडीजवळील भुवनेश्वरी देवी ही श्रीदत्तगुरुंची (श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची) देवी  होय. पण आणखी काही खुलासा केला नाही.
सर्वांस माहित आहेच की श्री दत्तगुरुंच्या आशीर्वादानेच श्रीस्वामींचा जन्म झालेला आहे!


*************************************************************************


माझं असं मत आहे की “अमृतधारा” हे सोsहं चं दर्शन आहे. त्या “अमृतधारा”चे  रचयिता, सोsहंचे अनुभवी (श्रीस्वामींच्या आरतीत आहे नां - सोsहं-हंसारूढ) व सोsहं उपदेशकर्ता (जीवनभर श्रीस्वामींनी सोsहंचाच उपदेश केला - श्रीस्वामींच्या आठवणींचे  “स्मृतिसौरभ” हे पुस्तक पहावे) म्हणून श्रीस्वामी स्वरूपानंद यांना “सोsहं-हंसावतार” म्हणावं.
                                                                                                       
(२३.०४.२०१६)
क्रमश:
माधव रानडे.
ranadesuresh@gmail.com                                                            
९१९८२३३५६९५८