The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Saturday, March 10, 2018

                        “सोऽहं-हंसोपनिषद”
                                 अर्थात
          श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
            ( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
                           ( क्रमश:- ७)

“सोऽहं” चा बोध हा स्वामींच्या सर्व साहित्याचा / उपदेशाचा कणा आहे, सार आहे. त्यामुळं त्यांत इतक्याच साक्या/अभंग “सोऽहं” संबंधी आहेत असा या आधींच्या लेखांत केलेला उल्लेख हे जरा धाडसी विधान होईल हे सांगणे मला आवश्यक वाटतं. त्या १७ साक्यांमधे “सोऽहं”चा उल्लेख आहे एव्हढं मात्र खरं.या संदर्भात ज्ञानेश्वरीतील एका ओवीकडे लक्ष वेधूं इच्छितो

        “ सात शतें श्लोक । अठरा अध्यायांचे लेख । 
         परी देवो बोलले एक । जे दुजें नाही ॥” ज्ञाने. १८/५८

तद्वतच स्वामींच्या रचनांचा निर्देश, सामान्यतः “सोऽहं” कडेच असतो. “स्वरूप पत्र मंजूषा” या स्वामींनीं लिहिलेल्या पत्रांपैकी,  अनेक पत्रांत “सोऽहं” बोध आहे. त्यापैकीं ६३,६४ व ६५ ह्या तीन पत्रांत स्वामी “सोऽहं” ची प्रक्रिया फार सोप्या शब्दांत सांगतात. पत्रक्र.६३ सर्व साधकांसाठी उपदेश आहे, तर क्र.६५ विशेषत्वानें सांप्रदायिक अनुग्रहितांसाठी आहे. या तीनही पत्रांचें आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्यातील “साक्षित्व” हा शब्द.

 आत्मरुपीं दृढ विश्वास । आत्माचि मी हा निदिध्यास।साक्षित्वें  साहोनि सुख-दु:खास । करावा अभ्यास नित्यनेमें ”॥६३/३॥
“नाना वृत्तींचें स्फुरण । अंतरीं होतसे कोठून ।साक्षित्वें पहावें  आपुलें आपण । अति अलिप्तपण ठेवोनिया ” ॥६४/२॥
 “ विवेकाचा घेवोनि आधार । साक्षित्वें करावे सर्वहि व्यापार । सुख-दु:खें प्रारब्धानुसार । भोगावीं साचार यथाप्राप्त ”॥६५/५

स्वामी आपल्याला समजावतात कीं देह म्हटला, संसार म्हटला, कीं सुख-दु:ख ही येणारच. त्यांचा स्वीकार तटस्थ वृत्तीनं करणं, म्हणजे  साक्षित्व. जसं कोर्टातील केसमधे जो साक्षीदार असतो, त्याला तो साक्ष देतो त्या घटनेबद्दल काही सुख-दु:ख नसतं. त्याने काय पाहिलं ते तो त्रयस्थपणे सांगतो. “सोऽहं”च्या अभ्यासाने, “सुखी संतोषा न यावे । दु:खी विषादा न भजावे । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजी ”॥ ही वृत्ती जसजशी अंगीं बाणूं लागेल, तसतशी “सोऽहं” भजनातील तन्मयता वाढून तीच साधना सोऽहं-भाव साक्षीत्व बनेल. ‘सोऽहं’ साधना, साधकाला आत्म-रूपाची, स्वरूपाची ओळख करून देते. सः अहं...तो मी,.. तो मी, इथे तो म्हणजे परमेश्वर!! माणसाचे सगळे आयुष्य ‘मी’, ‘मला’, ‘माझे’ करण्यात जाते. पण खरा ‘मी’ कोण? स्वामींच्या शब्दांत सांगायचे तर, “ देह म्हणजे का मी,मन म्हणजे का मी? बुद्धी म्हणजे का मी? आपण म्हणतो, हे माझे आहे, ते माझे आहे. हवे तेव्हा घेतो नाहीतर बाजूला ठेऊन देतो”. तसेच मन, बुद्धी यांचेही आहे. त्यांच्याहून मी वेगळा आहे. देहाहून, मनाहून, बुद्धीहून मी निराळा आहे. हे आपले स्वरूप आपण ओळखले पाहिजे, जाणले पाहिजे. देहाचे, मनाचे, बुद्धीचे व्यवहार साक्षित्वाने पाहता आले पाहिजेत. आपण देहच मी असे घोकत आलो आहोत. परमात्मा मी, सः अहं, तो मी, तो मी, हे मनांत ठसायला हवं. एकदा खरा ‘मी’ कोण ह्याचा बुध्दीत निश्चय झाला कीं, “सोऽहं” भावाचा उदय होतो. पत्र क्र.६४ हे आठ कडव्यांचं एक परिपूर्ण सोऽहं साधनाष्टक आहे. त्यांतील पुढील सहा कडव्यांत स्वामी “सोऽहं” भाव  समजावतात.


  “ नाना वृत्तींचें स्फुरण । अंतरीं होतसे कोठून । साक्षित्वें पहावें आपुलें आपण । अति अलिप्तपण ठेवोनिया ” ॥६४/२॥
 “ सर्वेंद्रियासहवर्तमान । मन बुद्धि आणि अहंपण ।
 आत्मारामीं समर्पून । निज-निवांतपण । उपभोगावें ॥६४/३॥             
चालतां बोलतां हिंडता फिरतां ।लिहितां वाचितां खातां जेवितां।                                
नाना सुख-दु:ख भोग भोगितां । निजात्मसत्ता आठवावी ६४/४॥
   होतां “सोऽहं”-भजनीं तन्मय । एकवटोनि ज्ञाता ज्ञेय ।
    येई आत्मसुखाचा प्रत्यय । अतिंद्रिय स्वभावें जें ॥६४/५॥
    नाद-श्रवण प्रकाश-दर्शन । तेथे श्रोता दृष्टा कोण ।  
  तो आत्माचि मी हें ओळखून । तदनुसंधान राखावें ॥६४/६॥
   सदा स्व-रुपानुसंधान । हें चि भक्ति हें चि ज्ञान ॥
 तेणें तुटोनि कर्म-बंधन । परम समाधान प्राप्त होय ॥६४/७॥

स्वामी समजावतात आपल्या अंतरांत वेगवेगळ्या वृत्तींचे स्फुरण कुठून होतं याचा आपण अत्यंत त्रयस्थपणे विचार करावा, शोध घ्यावा.आपण हें लक्षांत ठेवलं कीं अंतरांत कितीही वृत्ती उठल्या तरी त्या मूळ ज्ञानस्वरुप संवित्तीचीच, ती अनंत रूपं आहेत, मग त्यांच्याकडे अलिप्तपणानं / साक्षित्वानं पहातां येतं. यासाठीं सर्व इंद्रियांसहित मन, बुध्दी, व अहंभाव आत्मारामाच्या चरणीं ठेवून स्व-स्थ रहावं. हे साध्य व्हायला आपले जे काहीं दैनंदिन कार्यक्रम असतील ते करततांना, आत्मसत्ता आठवावी. कसं तर चालणारा, बोलणारा हिंडणा / फिरणारा, लिहिणा / वाचणारा इ.क्रिया करणारा मी दिसलो तरी ज्या अदृश्य शक्तीच्या, सत्तेच्या बळावर मी हे करु शकतो, त्या निजात्मसत्तेची सतत आठवण, हा खरा ‘सोऽहं’ भाव. हे खरं ‘सोऽहं’ भजन. परमात्मा ही व्यक्ती नसून विश्वचालक,  विश्वनियंत्रक शक्ती आहे याची सतत जाणीव, “खेळविसी तैसा। खेळेन साचार। तूंचि सूत्रधार। बाहुलें मी ॥ बोलविसी तैसे। बोलेन वचन । मज अभिमान। कासयाचा ”॥ हा भाव, आणि “ मी माझें मावळो सर्व, तू तुझें उगवो आतां । मी तू पण जगन्नाथा, होवो एकचि तत्वतां ”॥ ही प्रार्थना,साधकाचा अहंभाव हलके हलके नाहिसा करून ‘सोऽहं’ भाव / बोध प्राप्त करायला मदत करतात. या भावाने “सोऽहं”-भजनांत तन्मय झालं, कीं आपसुकच मी तू पण एकवटून, ज्ञाता ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीचा, अंत होतो. आणि साधकाला, अतिंद्रिय आत्मसुखाचा, जे  की इंद्रियांच्या पार आहे आहे त्याचा, अपरोक्ष प्रत्यय येतो.अदृश्य निजात्मसत्तेची कल्पना येण्यासाठी आपल्या घरांतील वीज व त्यावर चालणारी विविध उपकरणें यांचे सोपे उदाहरण घेऊया. घरात असणारी वीज आपल्याला एरवी दिसत नाही.पण आपण एखाद्या उपकरणाचं बटण दाबलं कीं आपल्याला त्या अदृश्य वीजेचा प्रत्यय येतो. जसं पंखा सुरु होतो, दिवा लागतो इत्यादी. तसेच आपल्या हातून होत / घडत असलेल्या प्रत्येक दैनंदिन व्यवहारांत निजात्मसत्ता, परमात्मसत्ता ती शक्ति आठवायची.आपली प्रत्येक बारीक सारीक हालचाल, कृती, हे त्या परमात्म्याचं प्रकटीकरण आहे याची जाणीव. त्या वेळी ऐकू येणारा नाद, व प्रकाशाचं दर्शन ही शुद्ध जाणीव. “‘अमुका मी’ ऐसे । बुद्धीचे स्फुरण । होय रात्रंदिन । सर्वांतरी ॥ तें तों पार्था जाण । पाहतां तत्वतां । स्वरुप सर्वथा । माझें चि गा”॥ आणि त्याचें, त्या स्वरुपाचें अनुसंधान कर, असे स्वामी वारंवार सांगतात. हेच स्व-रुपानुसंधान. दिसतं तें रुप, असतं तें स्वरुप, आणि भासते ती माया. हे सर्व सोपं करुन सांगणारे    स्वामी स्वत: कसे होते, तर “जयांची अहंता। आत्मस्वरुपांत। राहिली निवांत। स्थिरावोनि”॥ सदाचे “आत्मतृप्त”, पूर्णकाम “आधी जेणें केलें मग सांगितलें” असे. त्यामुळे स्वामी जेंव्हा सांगतात, “ वेदांताचे सार । सांगतो साचार । नका वारंवार । पुसों आतां ॥ सत्य एक आत्मा। नित्य निराकार। जाणा चराचर। मायाभास ॥ दिसें जें लोचना। भासे जें जें मना। तें तें मिथ्या जाणा। मायारुप ”॥ तें मनाला पटतं, ह्रदयावर बिंबतं, कारण त्या अंत:करणाचा ठाव घेणाऱ्या शब्दांतून स्वामींचा, स्वानुभव प्रतिबिंबीत झालेला दिसतो व याची खात्री ते मितुले व रसाळ शब्दच देतात. पुढच्याच चरणांत स्वामी सांगतात कीं “सदा स्व-रुपानुसंधान, हेचि भक्ति, हेचि ज्ञान” आणि असं केल्यानें कर्म-बंधनातून मुक्ति मिळते, परम समाधान प्राप्त होतं. समर्थही दासबोधांत हे, व हे साधुचें लक्षण का आहे ते सांगतात    “सदा स्व-रुपानुसंधान।हे मुख्य साधूचे लक्षण।
जनीं असोन आपण।जनावेगळा ॥दासबोध ८/९/९॥ 
यासाठीं, वर-प्रार्थनेच्या सुरवातीलाच स्वामी जगन्नियंत्याकडे, 
“उदारा जगदाधारा देई मज असा वर । 
स्व-स्व-रुपानुसंधानीं रमो चित्त निरंतर”॥ असा वर मागतात. 
व स्व-रुपानुसंधान हा धर्म आहे व तो कळण्यासाठी नित्य काय व अनित्य काय याचा विवेकानं विचार करायला सांगतात.
आतां पत्र क्र. ६४ चे पहिले व शेवटचे चरण पाहुं.  पहिल्या कडव्यांत फार थोड्या शब्दात मोठा आशय भरला आहे. 

       “ साधनीं असावें तत्पर । संकटीं न संडावा धीर ।
    सोऽहं स्मरणें वारंवार । निजांतर चोखाळावे ॥६४/१॥

साधनामधें तत्पर असावें म्हणजे असं की आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे साधना करण्यात दिरंगाई करतो, आपला टाळाटाळ करण्याकडे कल असतो. म्हणून स्वामी सांगतात,कीं त्यांत सदैव तत्पर असावं. साधना, करण्याचा प्राथमिकताक्रम Priority बदलू नये. आपण काही अडचण आली की लगेच, नेम नंतर करु असा सोयीस्कर विचार करतो व शेवटी साधना राहून जाते. संकटांत न घाबरुता मग ती भौतिक, आध्यात्मिक किंवा दैवी कशीही असो पण ती अनित्य आहेत हा विचार, विवेक करून न डगमगतां ‘सोऽहं’ च्या अनुसंधानाने वेळोवेळीं मनाला धीर द्यावा. 
आपलं वागणं अशा प्रकारचं असलं तर फलस्वरूप आपल्याला

 “ क्लेश-रहित संतोषी जीवन । प्रयाणकाळीं ‘सोऽहं’-स्मरण ।
घडो आवडी परमार्थ चिंतन । आशार्वचन तुम्हांसी हे ॥६४/८॥
    
अशा जीवनाचा अनुभव मिळेल असा आशिर्वाद स्वामी देतात.
श्री स्वामींसारख्या साक्षात्कारी सिद्ध संताचा आशिर्वाद म्हणजे परमात्म्याचं आश्वासन. काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यांच्या पावन चरणी नतमस्तक होऊन, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर अग्रेसर होऊंया. 
             ‘सोऽहं’हंसावतार सच्चिदानंद सद्गुरू 
            श्रीस्वामी स्वरूपानंद महाराज की जय.

ranadesuresh@gmail.com
09823356958                                 माधव रानडे 











         

Friday, January 19, 2018

“सोऽहं-हंसोपनिषद”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश:- ६)



“अमृतधारा” या स्वामींच्या पहिल्या साहित्यकृतीत “सोऽहं” संबंधी एकंदर १७ साक्या आहेत.(२३,२५,२६,११७,१३४ व १४४ ते १५५) यापैकी अखेरच्या बारा सलग साक्यांच्या समूहांत “सोऽहं” ची विविध रूपं, छटा पहायला मिळतात, कुठे ते  स्मरण, तर कुठे संगीत, कधी मंत्र, कधी सहज-ध्वनि. कुठे ध्यान तर कधी सखा.
या संग्रहांतील साक्या ह्या देहबंध गळून पडल्यानंतरच्या आहेत, याची जाणीव पहिल्या ६ साक्या वाचताच येते. त्यांची सुरवातच, “जगीं जन्मुनी अभिनव-जीवन— ” अशी आहे. बव्हंशी साक्या स्वामींनीं त्यांच्या निवासस्थानी लिहिल्या आहेत. सुमारे ४० साक्या व “अमृतधारा” ची सांगता स्वामीनीं “अनंत निवास” मधे आल्यावर केल्याचे आढळते. यातील अनेक साक्या भक्तिप्रेमानं ओथंबलेल्या आहेत. काहींत जगन्मातेबरोबरचा लडिवाळ संवाद आहे. अद्वैताव्स्थितींतील स्वामींचे मृदु मधुर शब्द स्वानुभूतीच्या भावगर्भांतून उमटले असल्याने साधकाला तसाच अनुभव देण्यास सक्षम आहेत. कारण ती अनुभूति त्या शब्दांतून झिरपते. पुढील साकीतील “सोऽहं” शब्दाचं विनावैखरी होणारं सहज-भजन पहा - 

        “ विनावैखरी होत अंतरीं सोऽहं शब्दोच्चार ।
       सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैतीं व्यापार ॥ ”
                           अमृतधारा- १४९

ही साकी श्रीस्वामींच्या “सोऽहं” साधनेची ओळख करुन देते ती  भजन-रुप आहे आणि सहज (जन्मना-सह) जन्मत:च, श्वासरुपाने मिळालेली देणगी आहे.आवश्यक आहे ते त्या श्वासावर लक्ष देणं.
यालाच स्वामी अनुसंधान म्हणतात. एका अभंगात ते सांगतात -

“ श्र्वासोच्छ्वासीं देख राम-नाम-जप । होतो आपेंआप अखंडित ॥
  तेथें रात्रं-दिन ठेवीं अनुसंधान । सांडुनी मीपण सोऽहं-भावें ॥ ”
“सोऽहं-भावें जीव पूजी नारायणा। सांडुनी मीपण स्वामी म्हणे ॥”
                संजीवनी गाथा २४८/१-२ आणि १३६/४



यांत स्वामी “सोऽहं” साधनेची दोन वैशिष्टय सांगतात.१) मी-पणा सांडणं, म्हणजेच मी-पणानें रिकामे होणे. असं झालं कीं सहजच परमात्म्याला आपल्या हृदयांत मुबलक जागा मिळते.दुसरी गोष्ट आहे २)“सोऽहं-भाव”. आतां या संदर्भातील माऊलींच्या ओव्या पाहु

“ आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंत:करण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाही । तरी कर्तृत्व कैचें काई उरे सांगें” “ तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जैं सोऽहंभाव प्रतीति । प्रगट होय ॥ ” ज्ञानेश्वरी. ॥५/२०-३८ आणि २/३०९ ॥ 
माऊलींच्या व स्वामींच्या उपदेशांत कमालीची एकवाक्यता आहे–
 “मी माझें भ्रांतीचे ओझें उतर खालती आधी । तरिच तत्वतां क्षणांत हातां येते सहज-समाधी ”॥ अमृतधारा- ११० ॥
याधींच्या लेखांत लिहिल्याप्रमाणें, “सोऽहं” साधनेमुळे अहं चा प्रभाव कमी होत हळूहळू अहंकाराचा लोप होतो. मात्र ही साधना “सोऽहं” भावाने, गुरुपदिष्ट मार्गानें व नित्य करायला हवी.
“नित्य सोऽहं भावें करूं या स्मरण । समूळ सांडून अहंकार ॥ अहंकारें आलें जीवासी बंधन । येऱ्हवी तो जाण नित्यमुक्त ॥”
            स्वरुप-पत्र-मंजुषा पत्र क्र.२३/१-२

हा “सोऽहं” भाव म्हणजे काय हे मात्र समजून घेतलं पाहिजे. हा म्हणजे जेथे अहं, कोहं, व सोऽहं हे तिन्ही भाव विराम होतात. 
आपलं अस्तित्व केवळ देहापुरतं व इंद्रियजन्य सुखांपुरतं देहोहं  मानणाऱ्या व्यक्तींबद्दल, श्रीस्वामी सांगतात “जन्मोनियां नाही साधिलें स्व-हित। तयाचें जीवित मातीमोल॥ कासया जन्मला आला तैसा गेला । वायां कष्टविला निजदेह॥ सुखासाठीं केला संसाराचा धंदा।भोगिली आपदा नानापरी ॥” सुखासाठीं वृथा केली धडपड । यातना उदंड भोगियेल्या ॥ स्वामी म्हणे तरी सरे चि ना हांव।आठवेना देव पामरातें॥” संजीवनी गाथा १०४ व १२७.

“मी” कोण अशी जिज्ञासा ज्यांच्या मनांत उत्पन्न होऊन “कोण मी कोठील कां गा जन्मा आलों।नाम-रुप ल्यालों कासयासी ॥ कर्म तें करावें कोंणतें उचित।पावें आत्म-हित कैशापरी ॥ अशी तळमळ उत्पन्न झालेल्या,“कोहं” या प्रश्नाचं उत्तर शोधूं पाहणाऱ्यां बद्दल, मुमुक्षुं बद्दल ते सांगतात, “स्वामी म्हणे ऐसी पावतां हे दशा।सद्गुरू आपैसा भेटेचि गा॥ सं. गाथा/२३४.
सद्गुरूंची कोणत्या ना कोणत्या रुपांत आपसुकच भेट होते. काहीं जणांनां हा लाभ पूर्व सुकृतामुळे/संचितामुळे सहजच घडतो. जसं माझ्या बाबतींत घडलं. शरणागत शिष्याला सद्गुरू,“तत्वमसि” हे महावाक्य विवरून, ते परम तत्व तूच आहेस असं सांगतात. जसं

“ओळखीं स्वरूप नको होऊं भ्रांत । अनादि अनंत आहेसी तूं ॥ देह मिळें अंतीं पंच-महाभूतीं । स्थिति त्यापरती असे तुझी ॥ नामरुपात्मक मायिक संसार । नित्य निर्विकार तूं चि एक ॥ स्वामी म्हणे सोडीं सोडीं देहाहंता।सुखें भोगीं सत्ता सोऽहं-रुप॥”२४२

“कोहं” चं उत्तर “सोऽहं” रुपाने मिळून त्याचा अभ्यास सुरु झाला, तरी स: अहं, स: अहं, मधे अहं चा अडसर रहातोच. या “तो”“मी” द्वैता मधल्या “अहं”ला “मी” ला जसं बांबू-उडी (Pole Vault) मधे उडी मारणारा त्या बांबू ला सोडून देत, स्वत:ला हवेत, अनन्तांत झेपावतो तसं झोकून देताच अहं नाहीसा होतो व उरतो फक्त स: फक्त स: हाच“सोऽहं” भाव. मात्र त्यासाठी स्वामी म्हणतात तशी “ ‘सोऽहं-भावें’ उडी घेतली अनन्तांत चौखूर ”॥अमृतधारा १४४॥
सर्व बंध झुगारुन अनन्यभावाने उडी घेणं आवश्यक आहे. मी देह आहे हे अज्ञान, मी ब्रम्ह आहे या ज्ञानानें नाहीसें झाल्यावर, ते ज्ञानही नाहीसं झालं पाहिजे, कारण मी ब्रम्ह आहे ही सुद्धा एक वृत्ति आहे आणि वृत्तियुक्त ज्ञान हें बंधनकारक आहे. “ज्ञानं बंध:”
सोऽहं-भावाचें हे स्वरूप आणखी स्पष्ट होण्यासाठी स्वामींचा हा  अभंग पहा- “ ‘अहं देह’ वृत्ति पावते विनाश ।येतां उदयास आत्म -ज्ञान ॥ अज्ञानाचा नाश करोनियां ज्ञान । होतसे विलीन आत्म -रुपीं ॥ ‘अहं आत्मा’ ह्याही वृत्तीची निवृत्ति । आत्म-रुप-स्थिति ती चि जाण ॥ स्वामी म्हणे कैंची प्रवृत्ति निवृत्ति । शब्दातीत स्थिति स्वरुपाची ॥” संजीवनी गाथा २५५ ॥

“अभंग-अमृतानुभव” आणि “अभंग-चांगदेव-पासष्ठी” या श्री स्वामींच्या ग्रंथांतील ‘सोऽहं-भावा’ चे संदर्भ पुढील लेखांत पाहूं. 
सोऽहं-हंसारुढ सद्गुरू श्रीस्वामी स्वरुपानंद यांचे चरणीं वंदन.

ranadesuresh@gmail.com                        माधव रानडे 
9823366958


Sunday, December 24, 2017

“ सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश:- ५)
“तुझा जयजयकार । गुरुदेवा नित्य । करिसी तूं सत्य । सुखोदय
मी च ब्रह्म ऐसा । सोऽहंभाव जीवा । भोगविसी देवा । श्रीगुरो तूं अभंग ज्ञानेश्वरी 14/1-2 
श्री स्वामींचे वरील शब्द माऊलींच्या ज्ञाने.च्या ओवीचे अभंगरूप आहे हे खरे. पण स्वामींचे सर्व स्वतंत्र साहित्य नीट वाचले की लक्षांत येते कीं ते ‘सोऽहं’ भावाने ओतप्रोत आहे.शब्द वेगळे असले तरी त्या शब्दाशब्दातून ‘सोऽहं’ भाव ओसंडून वाहतो. त्यांच्या अभंगांतील पुढील कडवी पहा-


“स्वामी म्हणे झालों । मी चि चराचर ।
नांदतो साचार । एकला चि”
“ देह  नव्हे ऐसा केलो गुरु-रायें ।  
देखिली म्यां सोये स्वरुपाची ॥
आतां आत्म-रुप झालें त्रि-भुवन ।
हारपलें भान दिक्कालाचें॥
                                     संजीवनीगाथा. -१८६/४,२५९/१-३


आतां अभंग ज्ञाने. तील सुरूवातीला दिलेला व पुढील अभंग पहा.


“शुद्ध आत्मज्ञान । होतां चि जो सर्व । देखतसे विश्व ।स्व-रुपीं च
तया असो पार्था । रुप आणि नाम । सदेह तो ब्रह्म । मानूं आम्हीं



श्रीस्वामींचे वैशिष्टय म्हणजे अहंकाराचा लोप कसा करायचा हे फार सोप्या शब्दात त्यांच्या अभंगांतून व पत्रांतून समजावतात.


सोsहं साधने मधे जसजशी प्रगती होते तस तशी साधना अजपा चं रूप घेते.“विनावैखरी होत अंतरीं सोsहंशब्दोच्चार" असा प्रत्यय येऊ लागतो आणि हळूहळू अहंकाराचा आपसुकच लोप होतो.


त्यासाठीं देह म्हणजेच मी अशी ठाम समजूत असणाऱ्यांना त्यातून बाहेर पडायचा सहजसुलभ सोऽहं साधनेचा मार्ग ते दाखवतात. उदा. पुढील पंक्ति पहा-


  तुझे देह भिन्न माझे देह भिन्न । ऐसा हा अभिमान कासयासी ।
  चार हि देहांचा करोनि निरास । उन्मनीपदास गांठीं बापा ।
   “ देहीं उदासीन असो माझें मन । राहो सावधान अंतर्यामीं ।
 स्वामी म्हणे माझा जावो अहंकार । होवो साक्षात्कार स्वरुपाचा
    स्वामी म्हणे गेला देह-अहंकार । झाला साक्षात्कार स्वरुपाचा
म्हणतां ‘माझा’ देह । मी तों नव्हे देह । आहे निःसंदेह आत्मरुप
स्वामी म्हणे सोडीं सोडीं देहाहंता । सुखें भोगी सत्ता सोऽहं-रुप ॥
                         संजीवनीगाथा.107/133/219/242


गंमत म्हणजे याकरितां प्रपंच सोडा किंवा संन्यास घ्या असं ते अजिबात  सांगत नाहीत. किंबहुना प्रपंचात राहूनच त्यांत न गुंततां, त्याची आसक्ती न बाळगतां असं होऊ शकेल असा विश्वास ते उत्पन्न करतात. उदा.-


“ प्रपंचीं असावें उदास वर्तन । आवरावें मन विवेकानें ॥
“ सुखें वैराग्याचा करावा अभ्यास । प्रपंचाचा त्रास मानूं नये ।”
                                 
वाचणाऱ्याला सहाजिकच प्रश्न पडेल की प्रपंचांत राहून उदास वर्तन, वैराग्याचा अभ्यास व तोही सुखानं. हे सगळं न पटणारं व हा केवळ शाब्दिक खेळ वाटतो. म्हणून स्वामी लगेचच वैराग्याची खूण सांगतात -
  “असो घरदार । कुटुंब संसार । नये त्याचा भार । वाटों देवों ॥
स्वामी म्हणे देहीं । न जावें गुंतून । ही चि असे खूण ।वैराग्याची
                                         संजीवनीगाथा-203


अभंगाच्या ओळी स्वामींचा उपदेश मनांत रुजावा या हेतूनं पाठी पुढे दिल्या आहेत. कारण इतरत्रही ते हाच मुद्दा मनावर ठसवतात. उदा.-


  “ अंतरीं संतत करीं सोऽहं ध्यान । न जाई गुंतून संसारांत ॥
   धन सुत दारा असूं दे पसारा । नको देऊं थारा आसक्तीतें ॥
   स्वामी म्हणे राहें देहीं उदासीन । पाहें रात्रं-दिन आत्म-रुप॥”                                     संजीवनीगाथा-150
या सर्व गोष्टी केवळ तार्किक, शाब्दिक नाहीत.तूं याचं प्रत्यक्ष प्रमाण पहा हे दाखवण्यासाठी श्री स्वामींनी मला १७ डिसें २०१७ रोजीं परत एकदा पेणला पाठवलं.
या आधीं १८ जून १९७९ ला पाठवलं होतं. त्या माझ्या पेण व स्वामी अमलानंद यांच्या भेटीचा उद्देश,“योगी कथामृत”या परमहंस योगानंद यांच्या लोकप्रिय पुस्तकात ज्या “क्रियायोग” चा उल्लेख येतो ती क्रिया व “सोऽहं” एकच आहे हे माझ्या नजरेला आणणे हा होता. मी, “जेथे जातो तेथे” या माझ्या पुस्तकांत,हा खुलासा केला आहे.
याआधीही अनेक वेळां मी माझ्या बोलण्यांतून व क्वचित् लेखनांतून सांगितलं आहे की परमात्म्याला आपल्या बरोबर संवाद साधायचा असेल तर त्याचं माध्यम शब्दां-ऐवजी घटनांचं असतं. आपल्याला त्या समजल्या पाहिजेत, त्यांत डोकावतां आलं पाहिजे. पुस्तकासारख्या वाचतां आल्या पाहिजेत.चैतन्यरूप श्री स्वामीं बरोबरचा माझा संवाद हा अशा प्रकारचा असतो. त्या दिवशी पेणला उपस्थित स्वामी भक्तांनाही निरुपण सेवेत संगा-अभंग २०३ उलगडून सांगताना हेच परत सांगितलं.
प्रपंचात राहूनही त्यांत न गुंततां, त्याची आसक्ती न बाळगतां अध्यात्मांत किती प्रगती करता येते, याचा वस्तुपाठ म्हणजे वैकुं. मामांचा म्हणजेच, स्वामी अमलानंद यांचा प्रपंच व परमार्थ. ३९ वर्षे सरकारी नौकरी तीन मुलगे, दोन मुली, सर्वात लहान १९४७ सालची. असं भरलं घर. १९४८ नंतरच्या मामांच्या रोज-निशा त्यांच्या पारमार्थिक वाटचालीची माहिती देतात. मामांनां, विठ्ठलराव जोशी यांचे मार्फत सप्टें.५२ मध्ये स्वामी स्वरुपानंद यांची मंत्रदीक्षा मिळाली तरी स्वामींची प्रत्यक्ष भेट १९६० मधे १९५९ साली झालेल्या एका दृष्टांतानंतर झाली.मधल्या काळांत त्यांनी सोऽहं साधना केली. सोऽहं भावाचा प्रत्यय यावा असं होतं ते स्वप्न.  
           
              ऐसा आनंदाचा कंद । श्री स्वामी स्वरूपानंद ॥
                स्वामी सगुण निर्गुण । सर्वांघटीं राहे जाण  ॥
            जाण बाळा मुख्य खूण । सोऽहं भावें ब्रह्म पूर्ण ॥
           ऐसा स्वामी बोध करी । बाळ त्यासी नमस्कारी ॥


या १४/९/५९ च्या स्वप्न-दृष्टांताचं कारण होतं मामांची सात वर्षांची  “सोऽहं भाव” पूर्ण सोऽहं साधना.मामांना जी आज्ञा मिळाली ती अशी-


         “ ॐ विचित्र स्वप्न देखिलें । मच्छिंद्र नाथ बोलले ।
                  चौरंगीनाथ पाहिले।नाथ अमल संबोधिले  ॥
              स्वामी भेटी अज्ञापिली ।नाथपंथी खूण दिली ॥
          सिद्ध स्वामी रुपें आला । नाही केला हो गल्बला ॥
         सुखें ज्याचें त्याला देती । सर्वां कल्याण इच्छिती ॥”


नाथ सिद्धांच्या आज्ञेप्रमाणे, व स्वामींच्या अनुज्ञेने मामांनीं, पांवसला जाऊन, १७ जाने. १९६० ला त्यांचे,आपल्या सद्गुरूचें प्रत्यक्ष दर्शन घेतले
या भेटींत, स्वामींनीं मामांकडून, ज्ञाने.तील पुढील ओव्या वाचून घेतल्या


        “ हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।
           बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी ॥१/५८॥ज्ञानि/१०२॥
           जें अपेक्षिजे विरक्तीं ।सदा अनुभविजे संतीं ।
           सोऽहंभावें पारंगतीं ।रमिजे जेथ ॥१/५३॥ज्ञानि/१०३॥
आधीच्या लेखांत लिहिल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली गीता तत्वज्ञानातील “सोऽहं” भावाचा एक नवीन दृष्टीकोन देते, व हा उल्लेख प्रास्ताविकांच्या ओव्यांत येतो. श्रीस्वामींच्या नित्यपाठ संकलनांतील, ओव्यांचा बदलेला क्रम व ओव्या वाचून झाल्यावर स्वामी मामांना म्हणाले ते ध्यानात घ्यावे-  
“याचा अनुभव शब्दांनी येणारा नाही. मन, बुद्धी ह्यांच्या पलीकडील असे जे मोक्षसुख ते ‘सोऽहं’ भावानेच प्राप्त होणार. ‘सोऽहं स: अहम्, स: अहम्’ तो मी च आहे,तो मी च आहे, अशी दृढ श्रद्धा ठेवून देहबुद्धी च्या कचाट्यातून सुटून आत्मबुद्धी झाली की मगच त्याचा अनुभव येणार.”
श्री स्वामींच्या या शब्दांवर अंमल करीत, एकलव्यासारखी भक्ती करत असलेल्या मामांना, स्वामींनी २०/०९/१९७० च्या पत्रात, व १२/०९/१९७१ रोजी दिलेल्या “अमृतधारा” या प्रसादभेट म्हणून दिलेल्या पुस्तकावर, “अमलानंद”असे संबोधित करत वीसाव्या शतकांतील नाथसंप्रदायाच्या या वारसदारानं मामांना मिळालेल्या नाथपंथी खूणेचं शिक्कामोर्तब केलं मामांचे तीनही चिरंजीव स्वर्गवासी झाले. पण त्यांची नातवंड व मुली हा वारसा ज्या भक्तिभावानं पुढे नेत आहेत ते पाहून मामांच्या‘सोऽहं’ भावा’ ची बीजं किती खोलवर आहेत याचा प्रत्यय १७ डिंसे. ला आला.


       “ मायिक नश्वर विषयसुखास्तव माजविले बडिवारें ।
        आत्म-देव अव्हेरुनि आम्ही देहाचे देव्हारे ॥अ.धा.८८॥”  
श्रीस्वामींचे वरील शब्द, व त्यांच्या साहित्यांतून प्रकट होणारे त्यांचे निज जीवन तत्वज्ञान, (“देहबुद्धी च्या कचाट्यातून सुटून आत्मबुद्धी झाली की मगच त्याचा {सोऽहं भावाचा} अनुभव येणार”) एका नवीन शाश्त्रीय समीकरणाची मांडणी करत आहे असं वारंवार मनांत येतं.


मी = ME = यांतील M = Matter = देह = देहबुद्धी,  E = Energy = उर्जा = आत्मतत्व = आत्मरूप = आत्मबुद्धी
Therefore (Matter+Energy) ME-(Minus) M = E = Energy =आत्मबुद्धी
सोऽहं-हंसावतार सद्गुरू श्री स्वामी स्वरुपानंद यांचे चरणीं शतशत प्रणाम.


ranadesuresh@gmail.com                                                             Madhav Ranade

Annexure Section