The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Friday, January 19, 2018

सोऽहं-हंसोपनिषद
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश:- ६)



अमृतधाराया स्वामींच्या पहिल्या साहित्यकृतीत सोऽहंसंबंधी एकंदर १७ साक्या आहेत.(२३,२५,२६,११७,१३४ व १४४ ते १५५) यापैकी अखेरच्या बारा सलग साक्यांच्या समूहांत सोऽहंची विविध रूपं, छटा पहायला मिळतात, कुठे ते  स्मरण, तर कुठे संगीत, कधी मंत्र, कधी सहज-ध्वनि. कुठे ध्यान तर कधी सखा.
या संग्रहांतील साक्या ह्या देहबंध गळून पडल्यानंतरच्या आहेत, याची जाणीव पहिल्या ६ साक्या वाचताच येते. त्यांची सुरवातच, “जगीं जन्मुनी अभिनव-जीवन— ” अशी आहे. बव्हंशी साक्या स्वामींनीं त्यांच्या निवासस्थानी लिहिल्या आहेत. सुमारे ४० साक्या व अमृतधाराची सांगता स्वामीनीं अनंत निवासमधे आल्यावर केल्याचे आढळते. यातील अनेक साक्या भक्तिप्रेमानं ओथंबलेल्या आहेत. काहींत जगन्मातेबरोबरचा लडिवाळ संवाद आहे. अद्वैताव्स्थितींतील स्वामींचे मृदु मधुर शब्द स्वानुभूतीच्या भावगर्भांतून उमटले असल्याने साधकाला तसाच अनुभव देण्यास सक्षम आहेत. कारण ती अनुभूति त्या शब्दांतून झिरपते. पुढील साकीतील सोऽहंशब्दाचं विनावैखरी होणारं सहज-भजन पहा - 

        “ विनावैखरी होत अंतरीं सोऽहं शब्दोच्चार ।
       सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैतीं व्यापार ॥
                           अमृतधारा- १४९

ही साकी श्रीस्वामींच्या सोऽहंसाधनेची ओळख करुन देते ती  भजन-रुप आहे आणि सहज (जन्मना-सह) जन्मत:च, श्वासरुपाने मिळालेली देणगी आहे.आवश्यक आहे ते त्या श्वासावर लक्ष देणं.
यालाच स्वामी अनुसंधान म्हणतात. एका अभंगात ते सांगतात -

श्र्वासोच्छ्वासीं देख राम-नाम-जप । होतो आपेंआप अखंडित ॥
  तेथें रात्रं-दिन ठेवीं अनुसंधान । सांडुनी मीपण सोऽहं-भावें ॥
सोऽहं-भावें जीव पूजी नारायणा। सांडुनी मीपण स्वामी म्हणे ॥
                संजीवनी गाथा २४८/१-२ आणि १३६/४



यांत स्वामी सोऽहंसाधनेची दोन वैशिष्टय सांगतात.१) मी-पणा सांडणं, म्हणजेच मी-पणानें रिकामे होणे. असं झालं कीं सहजच परमात्म्याला आपल्या हृदयांत मुबलक जागा मिळते.दुसरी गोष्ट आहे २)सोऽहं-भाव”. आतां या संदर्भातील माऊलींच्या ओव्या पाहु

आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंत:करण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥ जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाही । तरी कर्तृत्व कैचें काई उरे सांगें” “ तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जैं सोऽहंभाव प्रतीति । प्रगट होय ॥ ज्ञानेश्वरी. ॥५/२०-३८ आणि २/३०९ ॥ 
माऊलींच्या व स्वामींच्या उपदेशांत कमालीची एकवाक्यता आहे
 “मी माझें भ्रांतीचे ओझें उतर खालती आधी । तरिच तत्वतां क्षणांत हातां येते सहज-समाधी ॥ अमृतधारा- ११० ॥
याधींच्या लेखांत लिहिल्याप्रमाणें, “सोऽहंसाधनेमुळे अहं चा प्रभाव कमी होत हळूहळू अहंकाराचा लोप होतो. मात्र ही साधना सोऽहंभावाने, गुरुपदिष्ट मार्गानें व नित्य करायला हवी.
नित्य सोऽहं भावें करूं या स्मरण । समूळ सांडून अहंकार ॥ अहंकारें आलें जीवासी बंधन । येऱ्हवी तो जाण नित्यमुक्त ॥
            स्वरुप-पत्र-मंजुषा पत्र क्र.२३/१-२

हा सोऽहंभाव म्हणजे काय हे मात्र समजून घेतलं पाहिजे. हा म्हणजे जेथे अहं, कोहं, व सोऽहं हे तिन्ही भाव विराम होतात. 
आपलं अस्तित्व केवळ देहापुरतं व इंद्रियजन्य सुखांपुरतं देहोहं  मानणाऱ्या व्यक्तींबद्दल, श्रीस्वामी सांगतात जन्मोनियां नाही साधिलें स्व-हित। तयाचें जीवित मातीमोल॥ कासया जन्मला आला तैसा गेला । वायां कष्टविला निजदेह॥ सुखासाठीं केला संसाराचा धंदा।भोगिली आपदा नानापरी ॥सुखासाठीं वृथा केली धडपड । यातना उदंड भोगियेल्या ॥ स्वामी म्हणे तरी सरे चि ना हांव।आठवेना देव पामरातें॥संजीवनी गाथा १०४ व १२७.

मीकोण अशी जिज्ञासा ज्यांच्या मनांत उत्पन्न होऊन कोण मी कोठील कां गा जन्मा आलों।नाम-रुप ल्यालों कासयासी ॥ कर्म तें करावें कोंणतें उचित।पावें आत्म-हित कैशापरी ॥ अशी तळमळ उत्पन्न झालेल्या,“कोहंया प्रश्नाचं उत्तर शोधूं पाहणाऱ्यां बद्दल, मुमुक्षुं बद्दल ते सांगतात, “स्वामी म्हणे ऐसी पावतां हे दशा।सद्गुरू आपैसा भेटेचि गा॥ सं. गाथा/२३४.
सद्गुरूंची कोणत्या ना कोणत्या रुपांत आपसुकच भेट होते. काहीं जणांनां हा लाभ पूर्व सुकृतामुळे/संचितामुळे सहजच घडतो. जसं माझ्या बाबतींत घडलं. शरणागत शिष्याला सद्गुरू,“तत्वमसिहे महावाक्य विवरून, ते परम तत्व तूच आहेस असं सांगतात. जसं

ओळखीं स्वरूप नको होऊं भ्रांत । अनादि अनंत आहेसी तूं ॥ देह मिळें अंतीं पंच-महाभूतीं । स्थिति त्यापरती असे तुझी ॥ नामरुपात्मक मायिक संसार । नित्य निर्विकार तूं चि एक ॥ स्वामी म्हणे सोडीं सोडीं देहाहंता।सुखें भोगीं सत्ता सोऽहं-रुप॥२४२

कोहंचं उत्तर सोऽहंरुपाने मिळून त्याचा अभ्यास सुरु झाला, तरी स: अहं, स: अहं, मधे अहं चा अडसर रहातोच. या तो”“मीद्वैता मधल्या अहंला मीला जसं बांबू-उडी (Pole Vault) मधे उडी मारणारा त्या बांबू ला सोडून देत, स्वत:ला हवेत, अनन्तांत झेपावतो तसं झोकून देताच अहं नाहीसा होतो व उरतो फक्त स: फक्त स: हाचसोऽहंभाव. मात्र त्यासाठी स्वामी म्हणतात तशी “ ‘सोऽहं-भावेंउडी घेतली अनन्तांत चौखूर ॥अमृतधारा १४४॥
सर्व बंध झुगारुन अनन्यभावाने उडी घेणं आवश्यक आहे. मी देह आहे हे अज्ञान, मी ब्रम्ह आहे या ज्ञानानें नाहीसें झाल्यावर, ते ज्ञानही नाहीसं झालं पाहिजे, कारण मी ब्रम्ह आहे ही सुद्धा एक वृत्ति आहे आणि वृत्तियुक्त ज्ञान हें बंधनकारक आहे. ज्ञानं बंध:
सोऽहं-भावाचें हे स्वरूप आणखी स्पष्ट होण्यासाठी स्वामींचा हा  अभंग पहा- “ ‘अहं देहवृत्ति पावते विनाश ।येतां उदयास आत्म -ज्ञान ॥ अज्ञानाचा नाश करोनियां ज्ञान । होतसे विलीन आत्म -रुपीं ॥ अहं आत्माह्याही वृत्तीची निवृत्ति । आत्म-रुप-स्थिति ती चि जाण ॥ स्वामी म्हणे कैंची प्रवृत्ति निवृत्ति । शब्दातीत स्थिति स्वरुपाची ॥संजीवनी गाथा २५५ ॥

अभंग-अमृतानुभवआणि अभंग-चांगदेव-पासष्ठीया श्री स्वामींच्या ग्रंथांतील सोऽहं-भावाचे संदर्भ पुढील लेखांत पाहूं. 
सोऽहं-हंसारुढ सद्गुरू श्रीस्वामी स्वरुपानंद यांचे चरणीं वंदन.

ranadesuresh@gmail.com                        माधव रानडे 
9823366958


No comments: