Saturday, April 6, 2019



              “ सोऽहं-हंसोपनिषद
                    अर्थात
           श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
               यांच्या साहित्यातील
                ( चाकोरीबाहेरचे )
           मराठीतील पहिले उपनिषद
                ( क्रमश :-१४ )


“ अज्ञाना प्रगटावा धर्मु तैसा।आचरोनि॥ज्ञा.३/१५६ ”


माऊलींचे वरील शब्द मला फार भावतात. महत्वाचं कारण “आचरोनि” हे. लष्करी, निमलष्करी दलात, राजपत्रित अधिकारी म्हणून उणीपुरी एकतीस वर्षे नौकरी केली म्हणून असेल कदाचित. कारण, तिथे आम्हाला “ Leading from the front ” म्हणजे आपण दुसऱ्याला जे करायला सांगतो ते स्वत: पुढाकार घेऊन करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.


ज्ञानेश्वर माऊलींचा प्रत्येक शब्द मंत्र वाटायचं हेच प्रमुख कारण आहे कीं त्याला कृतीचं, आचरणाचं बळ आहे. म्हणूनच, संत नामदेव, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या अठरापगड समकालीन संत प्रभावळीचे नेतृत्व, करणारे संत ज्ञानदेव जेंव्हा, गीता श्लोक ९/३२ वरील निरुपणात   
“ ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां । परि मजसीं तुकितां तुका । तुटी नाही॥९/४४९॥ म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण॥९/४५६॥तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यादि इया । जाति तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥९/४६०॥”


या ओव्या जेंव्हा “भावार्थ-दीपिकेद्वारा” सांगतात त्यातून वैचारिक, सामाजिक क्रांति घडते. याची साक्ष या संत मंडळीं च्या रचना देतात. एव्हढंच काय नामयाची दासी संत जनाबाई घरातील कामे करत असताना, गौर्‍या-शेण्या वेचतांनाही सतत नामस्मरण करत असत. त्यांनां विठ्ठल भक्तीचा एवढा ध्यास की त्या म्हणत, ‘ दळिता कांडिता तुज गाईन अनंता.
अध्यात्म व तत्वज्ञान प्राकृतात / मराठीत, अमृताहुन गोड काव्यात रचून माऊलींनी भाषिक-क्रांति केली. भागवत धर्म, वारकरी संप्रदाय, यांची गुढी रोविली. महाराष्ट्रांत नाथ-संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला.


सर्वात महत्वाचं म्हणजे, माऊलींनी ज्ञान व भक्तीचा समन्वय घालून ‘सोऽहं’-साधना त्यांच्या मांदियाळीत सोप्या भाषेत समजावली / रुजवली. “ महाविष्णूचा  अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर | ”असे अनन्य भक्तीने म्हणणाऱ्या संत जनाबाईंचा अभंग याचा प्रत्यय देतो-


“ धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || १ ||हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला || २ ||शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी || ३ ||सोहम शब्दाचा मारा केला ।विठ्ठल काकुळती आला || ४ || जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला ||५||”


उच्चवर्णीय नसलेल्या, अल्पशिक्षित संतमंडळींना, घरकाम करणाऱ्या एका अशिक्षित स्रीला, जी गोष्ट जमली, ती तुम्हा आम्हाला कां जमूं नये ?असा प्रश्न कोणाच्याही मनांत येईल. याचं कारण त्यांची पाटी कोरी होती, माऊली व विठ्ठलावर त्यांची अनन्य श्रद्धा होती.


पाठांतर भेदांमुळे अशुद्ध झालेली ज्ञानेश्वरी संत एकनाथांनी प्रतिशुद्ध केली आणि माऊलीं प्रमाणेच समाज प्रबोधन,व नाथसंप्रदायाचा वारसा सर्वतोपरी पुढे चालवला. ‘सोऽहंसाधना अधिक सोपी केली, एका अभंगात ते म्हणतात-


“ तरी सोऽहं नव्हे याग | सोऽहं नव्हे त्याग | आणि अष्टांग योग | सोऽहं नव्हे ||१ ||सोऽहं नव्हे वारा | पंचभूतांचा पसारा | सोऽहंच्या विचारा | साधू जाणती ||३||एका जनार्दने आपण आपणासी जाणणे | साक्षित्वे देखणे | तेचि सोऽहं ||४|| ”


ईश्वरी तत्त्वज्ञान हे शाश्वत असते. त्यामुळे ते निरंतर उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था, परमेश्वरी संकल्पाने या विश्वात आहे. भाषेच्या दुर्बोधतेमुळे, समजायला अवघड झालेल्या माऊलींच्या, कालातीत अध्यात्म ज्ञानाला, स्वामींनी अभंग-रूप दिलं, नवसंजीवनी दिली, तेही सोप्या प्रचलित मराठीत. हे ईश्वरेच्छेने होत असल्याचे अनेक दाखले “अमृतधारे” आहेत-


“आजकालचे नव्हों च आम्ही जुनेपुराणे जाणे।असे दाखला नमूद केला पहा दफ्तरीं तेणें॥१५८॥पाठवि येथें ती आम्हातें मातेची नवलाई । चाकर आम्ही दिधल्या कामीं न करूं कधिं कुचराई॥१५९ मजसि ह्या जगद्-रंगभूमिवर जसें दिलें त्वां सोंग।करीन संपादणी तशी मी राहुनियां नि:संग॥५१॥”


नाथसंप्रदायाच्या, विसाव्या शतकांतील, वारसदार स्वामींनी माऊली व नाथ-महाराजांचाच कित्ता गिरवीत हे कार्य सोऽहं’साधना सहज सोपी, करुन भक्ती-पथाने,माऊलींच्या अज्ञाना प्रगटावा धर्मु तैसा।आचरोनि न्यायाने, सोदाहरणाने सर्वदूर पोचविली.


“चाड भुक्तिची नाहिं जिवाला मुक्तिचें हि ना कोड
जगन्माउली दे अखंड तव भक्ति-सुखाची जोड॥ ५३
जगज्जननि तव भक्ति-सुधेची पावन भिक्षा घाल ।
दारिं पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल॥५२॥


अनन्य भक्तीच्या भक्कम पायावर, सोऽहं’साधने’ च्या यशाचं घोषवाक्य विश्वपटलावर कोरण्यासाठीं
स्वामी जगदंबेला ‘अमृतधारेत’ विनवणी करतात-
"जगीं जन्मुनी जगदंबेचे दास होउनि राहूं ।
विश्व- बांधवांसहित सर्वदा भक्ति-सुधा-रस सेवूं ॥७॥
भक्त होउनी त्वद-यशोध्वजा जगीं उभारूं उंच १६२


भक्तीची महती श्रीस्वामी खालील शब्दात करतात-


भक्तिवांचुनी आक्रमितां तो योग-मार्ग निभ्रांत ।
तयां पाडिती अणिमादिक त्या अष्ट-सिद्धी मोहांत ॥
भक्ती सुटतां मी ज्ञाता हा अहंकार थोरावे ।
असा झुंजता विरळा ज्ञाता ब्रह्म-पदातें पावे !१२/१९-२0 सोऽहं-भावें रत स्वरुपीं जगद्भान विसरुन |
तुज उपासिती परमात्म्यातें दुजा भाव सांडून। भा.गी. १२/९
सोऽहं-सिद्धि लाभतां तया सहज घडे मत्प्राप्ति | परी साधनीं भक्ति-पथाची असे सुगमता निरुतीभा.गी.१२/२१
स्वामी म्हणे जातां भक्तीचियां वाटे।बोचती ना काटे विकल्पाचे॥सं.गा.१८१/४॥आतां अहं सोऽहं मावळले भान।अवघें नारायणरूप झालें॥स्वामी म्हणे ऐसें भक्तीचें महिमान।ओळखावी खूण स्वानुभवें॥सं.गा.१८७/३-४॥


असे नि:संशय,नि:संदेह शब्द स्वामींनीं लिहिले याचं कारण हे त्यांचे,स्वानुभवान्त:स्फुर्त सत्य काव्य आहे.


स्वामींच्या भेटीला येणाऱ्या व अध्यात्मिक अथवा सांसारिक शंका विचारणाऱ्या सर्वांनाच ते प्रथमत: हेच सांगत की मी सोऽहं करतो तुम्हीही करा. त्यांना स्वत: करुन दाखवून करुनही घेत.
सोऽहं-हंसावतार श्रीस्वामींचा हा सोऽहं ध्यास व त्याचे फळ / परिणाम याचे प्रतिबिंब त्यांच्या पुढच्या अभंगात स्पष्ट दिसते.


"सोsहं सोsहं ध्यास लागता जीवास |
होतसे निरास संमोहाचा ||१||
त्रिगुणाचे भान हारपे मीपण |
होता सोsहं ध्यान निरंतर ||२||
अंती एकमय ध्याता ध्यान ध्येय |
होता ज्ञानोदय अंतर्यामी ||३||
स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग ।

होय तो हि साड्ग सुखरूप ||४|| सं.गा.१७६॥

वरील अभंगाचे सविस्तर विवेचन पुढील लेखात.
आज नवीन वर्षीच्या पहिल्याच दिवशी ही शब्द सुमनं सद्गुरु चरणीं वाहण्याची इच्छा त्यांच्याच कृपेनं फलद्रुप होत आहे.


सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरु
श्रीस्वामी स्वरुपानंदाय नम:
ranadesuresh@gmail.com   माधव रानडे


Conversation opened. 1 read message.

No comments: