“ सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
यांच्या साहित्यातील
( चाकोरीबाहेरचे )
मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश :-१५ )
उपनिषदांचा सखोल अभ्यास, त्यांचं सार अशा गीता ज्ञानेश्वरीची आवड, उपजत कवित्व, नाथसंप्रदायात अनुग्रह व परतत्व स्पर्श या सर्वाचा झालेला एकत्रित परिणाम म्हणजे स्वामींचा औपनिषदिक दृष्टिकोन, (अ.धा२९). “सर्वेत्र सुखिनः सन्तु” ही वैश्विक दृष्टी.
उपनिषद्कार ऋषींनी/दृष्ट्या संतांनी समाजमनांतील अज्ञान/विपरीत ज्ञान दूर करत, स्वानंदाचा/शाश्वत सुखाचा मार्ग स्वत:च्या आचरणाने कालानुसार होणारे बदल लक्षात घेऊन त्यांच्या साहित्यातून दाखविला. वैचारिक प्रदूषण हटविले. या आधींच्या लेखांतील सं.गा.अभंग १७६ त्या संदर्भात पाहुया.
स्व-स्वरुपाचें विस्मरण हे अज्ञान व देह म्हणजेच मी, हे माझं ते माझं, ही मायाजन्य भ्रांति, हे विपरीत ज्ञान.
“ आपुलें आपणा । पडे विस्मरण । तेंचि रूप जाण । अज्ञानाचें ॥ अभंग ज्ञानेश्वरी १४/११७॥ ”
यावर स्वामी “सोsहं” मंत्रा चा साधा सरळ उपाय सांगतात. त्यांच्या एक अभंगी आत्मचरित्रात (असं मी म्हणतो) स्वामी स्वानुभव सांगतांना लिहितात-
“ ‘सोsहं’ मंत्र गुज सांगितले कानीं । शब्दाविण ध्वनि ऐकविला ॥
‘तत्वमसि’ महावाक्य विवरून । ॐ काराची खूण दाखविली ॥
पाहातां पाहातां गेलें देहभान । झाली ओळखण स्व-रुपाची ॥
मनाचें उन्मन होतां ध्याता-ध्यान । ध्येयीं चि संपूर्ण मिसळली ॥ ”
सं.गा.२१/५-६-७-९॥
पण गुरुकृपा होताच आत्मसिद्धी प्राप्त होणाऱ्या अशा भाग्यवान अधिकारी व्यक्ती दुर्मिळ व विरळ.
“ तैसें गुरुवाक्य । पडतां चि कानीं । समूळ गिळोनि । द्वैतभाव ॥
जया साधकाची । सुदैवें साचार । वृत्ति राहे स्थिर । आत्मरुपीं ॥काना-वचनाची । भेट होतांक्षणीं ब्रह्म चि होवोनि । राहे जो का ॥ ”
अ.ज्ञा.१८/१६८५
आता‘मंत्र’ म्हणजे काय? “मननात् त्रायते इति मंत्र:” त्रिगुणात अडकलेल्या मनाला त्रिगुणाच्या प्रभावातून श्रवण-मनन-निदिध्यासन मार्गाने सोडवतो तो मंत्र.
जीवाला “ सोsहं ” चा ध्यास लागला की मोहाचा नाश होतो. “सोsहं” च्या निरंतर ध्यानानं त्रिगुणामुळे उत्पन्न मीपणाचं भान जातं. शेवटीं आत्मज्ञान झालं कीं ध्याता, ध्यान, ध्येय एकमय होत त्रिपुटीचा अंत होतो.स्वामी हा संदेश साधकांना अ.१७६ मधे देतात.
हे सर्व घडतं कसं हे आपण “गुण-त्रय-विभाग-योग” या १४ व्या अध्यायात श्रीस्वामींच्या शब्दात पाहुया-
“सत्व रज तम त्रि-गुण जन्मती प्रकृतिपासुनि येथ ।
तेचि पांडवा अव्यय जीवा गुंतविती देहांत ॥
क्षेत्रज्ञ तदा गुंतुनी गुणीं ‘ मी देह ’ असें मानी ।
धरुनि अहंता होय सर्वथा क्षेत्राचा अभिमानी”॥
भा.गी.१४/७-८॥
सत्व रज तम हे तीनही गुण प्रकृती पासुनच जन्माला येतात आणि देहच मी या अहं पणाने जीव गुंततो. प्रकृति व पुरुष ही दोन अनादि तत्वें आहेत. यापैकीं प्रकृति-तत्व म्हणजेच क्षेत्र वा देह आणि देहाला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ म्हणजे केवळ सत्ता अथवा पुरुष.
जीवदशेमाजीं । आत्मा सुनिर्मळ । पार्था अळुमाळ । प्रवेशतां ॥
देह चि मी ऐसा । धरी अभिमान । विसर पडोन । आत्मत्वाचा ॥आत्मा गुण-संगें । बनोनि संसारी । प्रकृतीच्या घरीं । राहे जेंव्हा ॥
मी एक असूनदेखील त्रिगुणाच्या प्रभावाने नाना देहपाशात गुंतविला जातों. त्यावेळीं लक्षात घ्यावं -
“तैसे तिन्ही गुण । करोनि धारण । राहे तयांहून । वेगळें जें ॥आपल्या चि ठायीं । स्वयंसिद्ध असे । सोऽहंभावें वसे अंतरांत ॥सूर्यबिंबावेरीं । एक चि ती प्रभा । जैसी प्रतिबिंबा-। पासोनियां ॥
तैसा सोऽहंभाव । धनंजया पाहीं । भक्ताचिया ठायीं । अखंडित ॥सोऽहंभावें वृत्ति होतां तदाकार । मावळे साचार । सोऽहं तें हि ॥
तैसा भेदभाव । लयासी नेवोन । ज्ञान हि जिरोन । जाय पार्था ॥
मी तो पलीकडे । अलीकडे भक्त । उरे चि ना द्वैत । ऐसें काहीं ॥तेथें गुणातीत । जिंकितो त्रिगुण । उरेल कोठून । ऐसी भाषा ॥
अभंग ज्ञानेश्वरी अ.१४॥
पण याच्या शिकवणी व प्रत्ययासाठी सद्गुरू हवेत-
“मी च ब्रह्म ऐसा । सोऽहंभाव जीवा । भोगविसी देवा । श्रीगुरो तूं ॥अभंग ज्ञानेश्वरी अ.१४॥
पण ज्यांना सद्गुरू कृपेचा लाभ होऊ शकला नाही त्यांच्यासाठीं, श्रीस्वामींचं साहित्य व त्यांतून प्रकट होणारं “ सोऽहं-हंसोपनिषद ” पुरेसं आहे.
२१ जुलै २०१७ ला “ सोऽहं-हंसोपनिषद ” लेखमालेचा शुभारंभ करतांना शांतिपाठ म्हणून
“ नर नारी हरीरूप दिसो बाहेर-अंतरीं ।
रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी ॥”
ही वर-प्रार्थनेतील साकी निवडण्याचं कारण व विवरण पुढील लेखांत देणार आहे.
सद्गुरुकृपेनं व प्रेरणेनं उमललेली ही शब्द-सुमनं त्यांच्याच चरणीं सादर समर्पित.
सोऽहं-हंसावतार परमहंस सच्चिदानंद सद्गुरु
श्रीस्वामी स्वरुपानंदाय नम:
माधव रानडे
ranadesuresh@gmail.com