“ सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
यांच्या साहित्यातील
( चाकोरीबाहेरचे )
मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश :-२२ )
“ स्वामी म्हणे देव भावाचा भुकेला।ओ देई हांकेला भक्ताचिया॥”
आज गीता जयंती मोक्षदा एकादशी या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा संमोह
दूर करण्यासाठी, अर्जुनाला, स्वमुखे गीतामृत दिलं. शके १२१२(इ.स.१२९०) मधे
बदलत्या काळानुसार तत्कालीन समाज मनाला रुचेल अशा सोप्या भाषेत ज्ञानेश्वर
माऊलींनी त्या तत्वज्ञाना मधील भक्तीचं अंतरंग ज्ञानेश्वरीच्या माध्यमांतून
प्राकृतात सर्वप्रथम उलगडलं. अध्यात्मात क्रांति केली अजरामर शब्दलेणं निर्माण
केलं. आता काळ आणखीनच बदलला मानसिक भावनिक गुंत्यांचे स्वरूप अधिक
गुंतागुंतीचे झाले. हे सर्व लक्षात घेऊन स्वामी स्वरूपानंदांनी यशस्वी व आनंदी
जीवनाची सूत्रे क्रमाक्रमाने एकेक अभंग/साकी मधे मांडतांना माऊलींचा आदर्श ठेवत
भक्ती/सोऽहं भाव केंद्रबिंदु ठेवला. स्वामी स्वत: एक आदर्श अलौकिक क्रमयोगी होते.
माझ्या वरील विधानाच्या पुष्टीसाठी मी वाचकांना गीता अध्याय ११/५४ खालील
ज्ञानेश्वरीतील ओव्या ११/६८६ ते ६९५ तसेच गीता १८/५५ खालील ज्ञानेश्वरीतील
ओव्या १८/११३० ते १२४५ आणि अभंग ज्ञानेश्वरीतील अभंग ११/१३६६ ते १३८३ व
१८/१९३८ ते १८/२१४४ मूळ पुस्तकांतून आवर्जून वाचण्याची विनंती करतो.
असो. क्र.(२१) च्या लेखात मी संजीवनी गाथेतील काही अभंगांचे क्रमांक दिले होते त्यात सर्वात शेवटी अभंग क्र. २२२ दिला होता. त्यांत स्वामींनी इतर परमार्थ साधनांबरोबर भक्ती-भावा ची सहजच तुलना केली आहे.
“ आदरोत कोणी सुखें लोक-सेवा।आम्हांसी बरवा भक्ति-मार्ग ॥
सांगोत ते कोणी वेदांताचे ज्ञान।न मानूं प्रमाण भक्तीविण ॥
करोत ते कोणी जप-तप-ध्यान।आम्हासी साधन भोळा भाव ॥
स्वामी म्हणे देव भावाचा भुकेला।ओ देई हांकेला भक्ताचिया ॥”
जाणकार वाचकांनी हे सर्व वाचून काय सुलभ सोपं हें स्वत:च ठरवावं.
मोबाईल फोन्सच्या आहारी गेल्यामुळे, समाजातील वाढते गुन्हे व गुन्हेगारी प्रवृत्ती
पाहातां पुढील पिढ्यांचं मानसिक आरोग्य / संतुलन धोक्यात आहे हे सांगायला
कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही.
अशा वेळी राहून राहून आठवण येते ती दृष्ट्या श्रीस्वामींच्या संजीवनी गाथा अभंग
॥ २३०/१-४ ॥ मधील खालील ओळींची -
“ यंत्र-युगे घोर माजला आतंक । बळावला प्रांत दुर्जनांचा ।
पाशवी संस्कार घालिती ते पिंगा।गुप्त झाली गंगा मानव्याची॥ ”
पाशवी संस्कारांना आळा घालून समाजाला सतप्रवृत्त करायचं असेल तर “ सद्भाव
जागृति अभियाना ” ला देशव्यापी चळवळ बनवलं पाहिजे तसंच संसाधनांचा
दुरुपयोग टाळण्याची नितांत आवश्यकता आहे.
ह्या लेखाच्या अंती हा खुलासा करणं मला आवश्यक वाटतं की या विषयावर या
आधी २१ लेख लिहून झाले आहेत. याचा प्रारंभ २१/०७/१७ ला, खरंतर त्याही
आधीपासून, ०८/०४/१६ ला “अमृतधारा” भावार्थ-विवरण (१) या लेखाने झाला.
त्यामुळे काही ठिकाणी पुनरुक्ति दोष आहे. त्यासाठी मी दिलगीर आहे.
स्वामींच्या शिकवणीचे आजच्या जगात नेमके काय प्रयोजन आहे? सगळ्यात
महत्वाचे म्हणजे स्वामींच्या साहित्यांतून आजच्या भरकटलेल्या समाजाला, वाट
हरवलेल्या माणसांना, दिशादर्शन मिळते.
मला जेंव्हा विचारत, कीं, या लेखमालेत अजून किती लेख आहेत, तेंव्हा मला
स्वत:लाच याचं उत्तर माहिती नव्हतं. पण आतां असं वाटतंय की १-२ लेखात, हा
विषय संपेल. मग झालं लेखन या अथवा “ स्वामी म्हणे - ” शीर्षकाखाली प्रसिद्ध
करुन, प्रकृती साथ देत नसल्याने लेखन-प्रपंचला पूर्ण विराम द्यावा.
श्रीस्वामींचं जीवन जवळून पाहिल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड आदर मनांत घर करून
आहे. त्यांच्याबद्दल अगदीं थोडक्यांत वर्णन करावयाचं तर असं म्हणावसं वाटतं -
“ समर्थांसारिखे पूर्ण वैराग्य ज्याचें । ज्ञानदेवा परी ज्ञान योगेश्वराचें ॥
कवी तुकारामा परी मान्य ऐसा । नमस्कार माझा तया गणेशदासा ”॥
ranadesuresh@gmail.com माधव रानडे
The links to the YouTube videos and blog on the life, literature, &
philosophy of Swami Swaroopanand (Pawas) produced/financed
under the banner of
“ Swaroop Production ” are -
(1) The Art of Happy Living “ सुखी जीवनाची कला ”
(2) दृष्टि Vision
https://youtu.be/MJuh4xx4Vus
(3) Blog Address -
www.swamimhane.blogspot.com