“सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश:- ४ )
श्रीमद्भगवद्गीता हें उपनिषदांचें सार आहे, म्हणून तो अध्यात्मशास्रांतील श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. पण गीतेच्या ७०० श्लोकांवर ९०३३ ओव्यांच्या “ज्ञानेश्वरी” प्रबंध टीकेचा पटल अवाढव्यआहे. त्यामधे गीतेत आहे ते सर्व आहेच पण माऊली त्याच्याही पुढे जाऊन गीता तत्वज्ञानाचा, एक नवीन दृष्टीकोन देते, ज्यांत चिद्विलास, पंथराज,“सोऽहं” भाव आहेत. “सोऽहंभावा” चा उल्लेखही,पहिल्या अध्यायात प्रास्ताविकांच्या ओव्यांत ते करतात. तो अभंगरूपांत सांगताना श्री स्वामी लिहितात-
“ज्ञानाग्निच्या योगें । कढवितां विवेकें ।
पावे परिपाकें । साजूकता ॥
इच्छिती विरक्त । भोगिती जें संत ।
ज्ञाते रमती जेथ । सोऽहंभावें॥”
ज्ञानेश्वर माऊलींच्या, आणि स्वामींच्या चरित्र व साहित्याकडे पाहिलं, कीं असं नि:शंकपणें म्हणावसं वाटतं कीं, त्यांच्याही मतें “सोऽहंभाव” हा गीतेच्या तत्वज्ञानाचा निष्कर्ष आहे ही गोष्ट गीतेत वेगवेगळ्या शब्दात वर्णन केली आहे. या दृष्टीनें गीता व ज्ञानेश्वरीचा दुसऱा अध्याय विशेष महत्वाचा मानतात. स्वामी लिहितात -
“ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ मिळवावा । द्वितीयाध्याय अवलोकावा ।
मननें भाव ध्यानीं घ्यावा ।
अमोल ठेवा साधावा ॥स्व.प.मं.४२/८॥”
“ भावार्थ गीता सार सूत्रण ।
द्वितीयाध्याय महत्त्वपूर्ण ।
नित्य करावें श्रवण मनन ।
परम समाधान पावाल ॥
हे स्वप्रचीतीचे बोल ।
कल्पांन्तींहि न होती फोल । आत्मानुभवें शाश्वताचा अमोल ।
ठेवा लाधेल तुम्हांसी ॥४१/२-३॥
श्री स्वामींच्या वरील लिखाणाच्या पार्श्वभूमिची माहिती साधक आणि सांप्रदायिकांच्या दृष्टीनें अत्यंत बोधप्रद आणि मोलाची.१९३४ पासूनच्या त्यांच्या आयुष्यातील, अखंड “ सोऽहं भाव ” व अनाहत नादनिनादित या कालांत, २२/१०/ ते २५/१२/१९३४ मध्ये त्यांनीं चिंतन-मननासाठीं ज्ञाने.अ २ मधील ओव्यांची १५ वेळां नोंद केलेली आहे. त्यांतही २९३/३००/३०२ ची नोंद अधिक आढळते.त्यांच्या२३/१०/३४ नोंदीतही
“सोऽहंभाव”दिसतो-
“देह ठेवुनी बाजूला जणु साक्षीभूत रहावे ।
क्षणक्षणा साक्षित्वे अंतर संशोधूनि पहावे अलिप्त आत्मा निर्विकार नि:संग निरंतर नित्य
निराकार निर्गुण अविनाशी अभेद शाश्वत सत्य
आणि रहावे असे स्वभावे अखंड अनुसंधान ।
अनुपमेय आनंद, जाहले क्षणात आत्मज्ञान ।”
तोंडानें जरी आपण, “तूं चि कर्ता, आणि करविता, शरण तुला भगवंता”, असे म्हणालो, तरीही, सर्वसामान्यपणे आपले विचार, मी कर्ता, मी ज्ञाता, मी भोक्ता असे स्व-केंद्रीत असतात. ‘मी आणि माझे’ ची ही चौकट, दुःखांचे मूळ कारण आहे. म्हणूनच स्वामी बजावतात-
“ मी-माझें भ्रांतीचें ओझें उतर खालतीं आधीं ।
तरिच तत्वतां क्षणांत हाता येते सहजसमाधि
सहज-समाधि संतत साधीं न लगे साधन अन्य
सुटुनि आधि-व्याधि-उपाधि होतें जीवन धन्य॥”
असा उपदेश त्यांच्या भक्तांनां करतात. तसेंच स्वामी, “ज्ञानेश्वरी” चें भक्तिभावानं श्रवण मनन करा सांगतात ज्यायोगें-
“ जिवा शिवाची होतां भेटी ।
मावळोनि ज्ञाता-ज्ञेयादि त्रिपुटी ।
प्रकटे ‘सोऽहंभाव’- प्रतीती ।
उरे शेवटीं ज्ञप्तिमात्र ॥”
स्वत: स्वामी, सदा सर्वदा “सोऽहं” भावांत, अथवा, व्यावहारिक कारणांमुळे द्वैतांत असतांनां, “सोऽहं” भजनांत तन्मय / तल्लीन असत.
“सोऽहं” भावांत जरी भाव शब्द आला तरी प्रत्यक्षात ती भावातीत अवस्था आहे. व्यवहारामध्ये अथवा साहित्यात भाव शब्द आपण अनेक अर्थांनी वापरत असतो. जसं बालभाव, भोळाभाव, भक्तिभाव,स्वभाव इ.
पण “सोऽहं” भावाचा विचार करतांनां, देहभाव, आत्मभाव, ब्रह्मभाव किंवा अहंभाव, कोहंभाव, सोऽहं भाव अशा क्रमा क्रमाने चढत्या वाढत्या अवस्थांबद्दल, स्वामींच्या साहिेत्य-विचारांचं बोट धरून समजून घेऊ.
यच्चयावत मनुष्यमात्राच्या ठिकाणी, देहभावाशी तद्रूप, नाम व रूपाचा अभिमान बाळगणारा अहंभाव स्वभावत:च असतो. फक्त प्रसंगानुरूप त्याचं रूप सतत बदलत असतं.
तो पितृभाव, पुत्रभाव, मित्रभाव, शत्रुभाव, पतिभाव,पत्नीभाव, शिष्यभाव अशा विविध रूपानं प्रकट होत असतो, त्यामुळे, अहं-ममत्वा च्या भ्रांतींत गुंतुन स्वरूपाचा विसर पडतो. स्वामी अभंग ज्ञानेश्वरीत लिहितात-
“ तैसे भूतजात । सर्व हे माझेच ।
अवयव साच । धनंजया॥
परी मायायोगें । जीवदशे आले ।
पाहे कैसे झाले । विषयांध ॥
अहं-ममत्वाच्या । भ्रांतींत गुंतोन ।
गेले विसरोन । मजलागीं ॥
म्हणोनि माझेच । मज नोळखिती ।
माझे चि न होती । मद्रूप ते ॥”
खरं तर सर्वांच्या हृदयामध्ये स्वरूपाचं शुद्ध स्फुरण अहर्निश होत असतं-
“ ‘अमुका मी’ ऐसें । बुद्धीचें स्फुरण ।
होय रात्रंदिन । सर्वांतरी ॥
तें तों पार्था जाण । पाहतां तत्वतां ।
स्वरूप सर्वथा । माझें चि गा ॥”
पण त्या खऱ्या मी ची ओळख व्हायची कशी ? स्वामी सांगतात-
“ ‘मी मी’ म्हणसी परी जाणसी
काय खरा ‘मी’ कोण ।
असे ‘काय’ मी ‘मन’ ‘बुद्धी’ वा ‘प्राण’ ?
पहा निरखोन ॥
प्राण बुद्धी मन काया माझीं
परि मी त्यांचा नाहीं ।
तींहि नव्हती माझीं कैसें लीला- कौतुक पाहीं ॥
गूढ न काही येथ सर्वथा उघड अर्थ वाक्याचा ।
जाण चराचरिं भरुनि राहिलों मीच एकला साचा
वरील साक्या वाचल्यावर लक्षांत येतं, की देहो अहं ला कोहं चा ध्यास लागला, व खरा मी कोण हे निरखून पाहिलं, म्हणजे समजतं कीं, काया, मन, बुद्धी, व प्राण हे माझेच असले तरीही खरा ‘मी’ त्यांचा नाही.
सद्गुरूंकडून मिळालेल्या खुणेप्रमाणें ‘सच्चिदानंद परमात्मा हेंच माझं मूळरूप आहे’ असा निदिध्यासपूर्वक अभ्यास, आणि ‘मी’ रुपाने अनुभवाला येणारी जाणीव ही शुद्ध सच्चिदानंदरुप परमात्म्यांत विलीन करण्याची भावना म्हणजे ‘सोऽहं’ भाव. भावार्थ गीतेतील पुढे दिलेल्या साक्या स्वामींचेच मूर्तिमंत चित्रणच वाटते.
“ सोऽहंभावें रत स्वरुपीं जगद्भान विसरून ।
तुज उपासिती परमात्म्यातें दुजा भाव सांडून सोऽहं-भाव-प्रचीत येतां सहज संयमी झाला
आत्म-रूप जगिं एक संचलें हा दृढ निश्चयकेला
व यासाठी पाहिजे संतसंग व सद्गुरू कृपा. अ.ज्ञाने. स्वामी लिहितात-
“ परी घडोनियां । संतांची संगति ।
रिघोनियां मति । योग-ज्ञानीं ॥
सद्गुरू-चरण । उपासितां जाण ।
वैराग्य बाणोन । अंतरांत ॥
ह्या चि सत्कर्माच्या । योगें हारपोन ।
अशेष अज्ञान । धनंजया ॥
जयांची अहंता । आत्मस्वरूपांत ।
राहिली निवांत । स्थिरावोनि ॥”
संत एकनाथ महाराज सद्गुरू कृपेचा आपला अनुभव सांगतानां म्हणतात-
“जेणें मस्तकीं ठेवितां हात।अहंभावा होय घात । सोऽहं-भाव होय प्राप्त ।
दावी अप्राप्त अद्वयानंद ॥”
सोऽहं-भाव कसा अनुभवावयाचा ? देहधर्म चालू असतांनां त्यापासून अलिप्त राहून, अभ्यासाने परमात्म्याशी एकरूप होऊन स्वरूपाचा अवीट आनंद भोगतां येईल का ? या सर्व प्रश्नांना स्वामी अमलानंद यांचे एकच उत्तर असे, कीं पांवसला जा, तिथे रहा, व त्यांचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांन पहा. ते सद्गुरूंवर श्रद्धा ठेवतात व मलाही तोच बोध करतात -
“ सोऽहं ” भाव कैसा आहे ।
स्वामीपाशीं राहे, पाहे ॥
रात्रं दिन एकरूप । भोगी आनंद स्वरूप ॥
अभ्यासानें प्राप्त होये ।
स्वामी म्हणे धरा सोये ॥
स्थूल, सूक्ष्म त्यागा मनीं ।
गुणातीत पूर्ण ध्यानीं ॥
देह धर्म चालो सुखें ।
“सोऽहं” भावें न ती दु:खें ॥
गुरूनिष्ठें स्वामी वर्ते । बोधी तैसाचि बाळातें ॥
सर्वां घटीं तो राहिला।स्वामी तोचि पूर्ण झाला ॥
ऐसा स्वामी पावश्यासीं । बाळ वंदी चरणासी ॥
अमलगाथा भावदर्शन अ.क्र.७०
स्वामी अमलानंद, त्यांच्या सद्गुरूंहून, वयानं थोडे मोठे असूनही स्वत:ला,स्वरूपानंद यांचं बाळ म्हणूनच संबोधित असत. सद्गुरूंना पूर्ण शरण जाण्यानेंच त्यांच्याशी आंतरिक संवाद साधू शकतो व मगच वृत्ती अखंड तदाकार होते. विस्तारभयास्तव, अ.क्र.७१ मधील दोनच कडवी देतो-
“ ब्रह्ममूर्ति मी देखिली । तेंचि अंतरीं ठसली ॥
पराशांतिचें स्वरूप । भोगी स्वानंद अमूप ॥
‘सोऽहं’ भावच प्रत्यक्ष।बाळा दिली त्याची साक्ष
नको अटापीट काहीं । ऐशी स्थिती भोगी तूहीं ॥
आज श्री स्वामी देहाने आपल्यामधे नसले तरी, चैतन्यरूपाने व 'कहनी' च्या रुपात ते आपल्या तच आहेत.नाथसंप्रदायात आध्यात्मिक दृष्ट्या
सिद्धयोग्याच्या शब्दांना (कहनी) ला फार महत्व असतं. स्वामी सांगतात-
“सहज चाले सोऽहं भजन।
धारणा ध्यान सुखें होय ॥
मनाचें मनपण जावें ।
चित्त चैतन्यीं समरस व्हावें ॥
तदाकारें विश्व आघवें ।
वाटे मजसवें ध्यान करी ॥
मन-पवनाचा धरोनि हात ।
प्रवेश करितां गगनांत ॥
आकळे आत्मा सर्वगत ।
येई प्रचीत आपणातें ॥
सोऽहं म्हणजे आत्मा तो मी ।
शुद्ध बुद्ध नित्य स्वामी ॥
अलिप्त; न गवसे रुप नामीं ।
बाणला रोमरोमीं भाव ऐसा ॥
गगन लंघोनियां जावें ।
अखंड आत्मरुपीं रहावें ॥
विश्व आघवें विसरावें ।
स्वयें चि व्हावें विश्वरूप ॥
ऐसा नाथपंथींचा संकेत ।
दाविती सद्गुरू कृपावंत ॥
मस्तकीं ठेवोनि वरद-हस्त ।
अभय देती मजलागीं ॥”
आज १५ डिंसे. २०१७ तारखेप्रमाणें श्री स्वामींचा ११५ वा जन्मोत्सव. या पावन पर्वावर त्यांच्या चैतन्यरूपाला शत शत वंदन करुन त्यांची ही शब्दसुमनं त्यांनांच अर्पण.
ranadesuresh@gmail.com माधव रानडे
No comments:
Post a Comment