श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ”
भावार्थ-विवरण. (२)
आज “अमृतधारा” भावार्थ-विवरणाचा दुसरा लेख लिहितांना एक जुनी आठवण मनांत येऊन गंमत वाटली, आणि हसूं आलं. मी व बाबुराव (श्री श्रीकांत देसाई) श्रीस्वामींच्या बद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल बोलत होतो. श्रीस्वामींचा विषय म्हणजे आम्हां साऱ्यांच्याच आवडीचा. ते म्हणाले की “अमृतधारा” पुस्तकाच्या पहिल्या पानावर श्रीस्वामींच्या फोटोच्या वर “साधकावस्थेतील भाव-विलास” हे शब्द आहेत. श्रीस्वामी त्यावेळीच सिद्धावस्थेत असतांना व त्याच पुस्तकातील अनेक साक्यांवरुन असं स्पष्ट दिसत असतांना हे लिहिणं बरोबर आहे का ? मलाही त्यांचा मुद्दा त्यावेळी पटला. ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वीची आहे. आज हसूं आलं, कारण आतां डोळ्यांसमोर येतात समर्थांच्या पुढील ओव्या-
“ बाह्य साधकाचे परी । आणी स्वरुपाकार अंतरी । सिद्ध लक्षण तें चतुरीं । जाणिजे ऐसें ।।
आणि स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या या ओळी-
“ मंत्र -विद्या-बळें । टाकी जादूगार । बांधोनि नजर । आणिकांची ।।
परी तुझी लीला । लोकविलक्षण । आपणा आपण । चोरिसी तूं ।। ”
व लक्षांत येतं की-
“ आपुलें अस्तित्व । कळूं नये लोकां । नामरूप जें का । तें हि लोपो ।।”
याच भावनेतून, प्रकाशकांनी घातलेल्या या शब्दांना स्वामींनी तसेंच राहू दिले असावे.
“ अमृतधारा ” संग्रहाचा भावार्थ पहायचा असेल तर समर्थांच्या पुढील ओव्या पहाव्या
“ शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे ते यथार्थ । पण आपण मिथ्या । भूंस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्यजावा । कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ।। ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष । स्वानुभव तो अलक्ष । लक्षिला न वचे ।। ”
सारांश:- शब्द हे स्थूल आहेत तर लक्ष्यांश अर्थात भावार्थ सूक्ष्म. जगद्भान हारपलेल्या, भावसमाधीत तल्लीन, श्रीस्वामींच्या स्वानुभवाचा अल्पसा कां होईना मागोसा घेण्यासाठी, त्या काव्यातील भावार्थ विवरणाचा हा खटाटोप.
माझं हे लिहिणं कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटेल, पण भावार्थाचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, मला हे लिहावसं वाटतं, की जसे श्री ज्ञानेश्वर माउली हे भगवान विष्णूचे अवतार असल्याकारणाने, ते योगेश्वर श्रीकृष्णाच्या भूमिकेशी, तत्त्वज्ञानाशी, तदाकार झाले आणि कल्पनातीत ईश्वरी योजनेचा भाग होऊन त्यांनी गीतेवर प्राकृताच लेणं चढविले,“ “भावार्थ दीपिकेचं ” निरुपण केले, अपूर्व ज्ञानगंगा, समाजातील सर्वांसाठी खासकरून तळागाळातील उपेक्षितांसाठी, बहुजनांसाठी प्रवाहित केली व म्हणूनच ती आज सातशेहून अधिक वर्षांनंतरही तेव्हढीच लोकप्रिय आहे. नेमकी हीच गोष्ट “ईश्वरी संकल्पाचा” च भाग म्हणून २०-२१ शतकांतील नाथ संप्रदायाच्या या थोर वारसदारानं, श्री स्वामी स्वरूपानंद, यांनी केली. माउलींच्या पावलावर पाऊल टाकीत, नाथसंप्रदायाची पालखी तर पुढे नेलीच, शिवाय “गीता” व “भावार्थ दीपिका” अर्थात “ज्ञानेश्वरी”, या दोन्हीं ग्रंथांतील प्रतिपाद्य तत्वज्ञानाशी, ग्रंथकर्त्यांच्या भूमिकांशी तद्रूप होऊन, समरस होऊन “भावार्थ गीतेचा ”, आविष्कार केला. व तेही पूर्णपणे अकर्तृत्वाच्या भावनेतून. “अमृतधारा” या संग्रहाच्या, अर्पणपत्रिकेत “इदं न मम”, या भावनेतून श्रीस्वामींनी, “करी ‘अमृत-धारा’ ह्या तुझ्या तुज समर्पण”, व हे करता आलं यासाठी स्वत:ला भाग्यवान मानलं, त्याप्रमाणे, श्रीमद्भगवद्गीतेचा मुख्यत्वे श्रीज्ञानेश्वरीच्या आधारे केलेल्या सुबोध, सरळ मराठीत केलेल्या रसाळ पद्यमय अनुवादाचा ग्रंथकर्ता ते “हृदयस्थो जनार्दन” मानतात आणि त्याचेच चरणयुगुली सर्वभावे समर्पण करतात. हे सर्व लिहिण्याचं कारण हे की, श्रीस्वामींसारखे साक्षात्कारी संत आत्मबुद्धीच्या भूमिकेवर असतात. त्यांची अनुभूति व आविष्कार हे आत्मज्ञानाच्या सत्प्रकाशात उजळून निघालेले असतात म्हणून त्यांतील भावार्थ शोधायचा. आणि स्वामी म्हणतात तसं-
“शब्दाची वरील । काढोनिया साल । गाभा जो आंतील । अर्थरूप ।।
त्या चि अर्थब्रह्मीं । होवोनि तद्रूप । सुखें सुखरूप । भोगावें हें ।।
या आधीच्या लेखांत लिहिल्याप्रमाणे, “अमृतधारा”, हा संग्रह मला स्वामींच्या अवतारकार्याचा, त्यांच्या दिव्य मनाला प्रतित झालेला स्पष्ट आराखडा (Road Map) व क्वचित त्यांच्या पुर्वायुष्याच्या खुणा दाखवणारा वाटतो.
भावार्थ विवरणासाठी मी मुख्यत्वेकरून श्रीस्वामींच्याच साहित्याचे, त्यांच्या चरित्राचे, बोट धरिले आहे. तसेंच श्रीस्वामींच्या चैतन्यरूपाशी, चैतन्य लहरींशी सहस्पन्दित होण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यातून मिळणारा आनंद वाचकांशी वाटून घेण्याचा या सर्व लेखांतून करणार आहे.
अशाच प्रयत्नातून, माझे भावार्थ गीतेच्या ध्वनिमुद्रिका (Audio CD) चे स्वप्न, सेवा मंडळातर्फे प्रत्यक्षांत आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाट आहे, असे माझे तरुण साधक मित्र श्री सुदेश चोगले यांचेशी वारंवार होत असलेल्या चर्चेतून काही उद्बोधक माहिती समोर आली ती पुढे त्यांच्याच शब्दांत देणार आहे. “भावार्थ गीते” बद्दल इतकं लिहिण्याची विशेष कारणं आहेत ती थोडक्यांत पण ठळकपणे अशी:- "
(१) “अमृतधारा”, ह्या संग्रहातील साकी क्र. १ व ६ ते ९ यांचा थेट संबंध श्रीस्वामींच्या इतर "अभंग " साहित्या बरोबरच मुख्यत्वेकरून त्यांच्या सर्वप्रथम प्रकाशित “भावार्थ गीतेशी” आहे असं माझं ठाम मत आहे.
(२) कारण “भावार्थ गीता” ही श्रीस्वामींची स्वतंत्र साहित्यकृती आहे व ती अनुपमेय आहे.
(३) ही साहित्यकृती गीतेचा विस्तार ७०० श्लोकांचा १६१९ साक्या तर ज्ञानेश्वरीच्या ९०३३ओव्यांचे सार आहे.
(४) ती गेय आहे एव्हढेच नव्हे तर आतां तिची ध्वनिमुद्रिका (Audio CD) उपलब्ध आहे
(५) मी या संग्रहाला गंमतीने Two in One म्हणतो
(६) माझं म्हणणं आहे की “ गीता ज्ञानेश्वरी । आतां घरोघरीं । भक्तांचा कैवारी । स्वरूपानंद ।।
(७) श्री स्वामी स्वतः त्यांच्या पत्रांतून “भावार्थ गीतेचा” उल्लेख करतात. “स्वरूप-पत्रमंजूषा” (४१,४२/८,६/१२) यातील पत्र ४१ सर्वांत लहान पत्र असून असे निश्चयात्मक उद्गार इतरत्र आढळत नाहीत. यावर “आत्मानुभवाची गुरुकिल्ली” या शीर्षकाखाली माझा एक लेख श्रीक्षेत्र पावस या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. तसेच “भावार्थ गीतेचा” लेख या संकेत स्थळावर पहावयास मिळेल (दिनांक २१ नोव्हेंबर २००८).
(८) “भावार्थ गीतेचे” गीत रामायणासारखे Programme केले व गीतेच्या मूळ ७०० श्लोकांचा अंतर्भाव करून वेगळी आवृत्ती काढल्यास त्याचे अद्भुत परिणाम दिसतील व उपयुक्तता वाढेल.
श्री सुदेश चोगले म्हणतात :-
*************************************************************************
“ संतसाहित्य म्हणजे प्रतिभेच्या स्त्रोतातून प्रकट झालेला स्वानुभव! त्याच्या वाचनाचे अंतिम पर्यवसान वाचकांस अनुभूति होण्यात जर झाले तर ते साहित्य वा ते वाचन-मनन यशस्वी ठरेल अन् तशी ताकद त्यात निश्चितच असते.
अनुभव ---> भावावस्था + प्रतिभा ---> शब्द वा काव्य ---> वाचन + मनन ---> भावनिर्मिती ---> अनुभव
म्हणजेच भावाची अभिव्यक्ति शब्दरूपाने काव्यात होते आणि त्यामुळे ते काव्य त्या भावविश्वात प्रवेश करण्याचे द्वार आहे. संजीवनी गाथेत श्रीस्वामीजी एका अभंगात म्हणतात "भाव-बळे आम्हां हरिचें दर्शन". भाव हे भक्ताचे बळ आहे किंवा भाव हा इतका बलशाली आहे की तो हरीचे दर्शन करून देऊ शकतो.
याच अनुषंगाने आपण श्रीस्वामीजींच्या "अमृतधारा" या स्फुट काव्यरचनेचा भावाधारे मागोवा घ्यायला हवा जेणेकरून आपण श्रीस्वामीजींच्या त्या काळातील भावावास्थेशी अल्पसे तरी तादात्म्य पावू शकू व त्या अनुभवाचा अल्पांश तरी प्राप्त करू शकू.
श्रीस्वामींसारखे मितभाषी संत जेव्हा लिहितात तेव्हा त्याचा अर्थगाभा अत्यंत सखोल व विशाल असतो. अमृतधारेचे वैशिष्ट्य म्हणजे
१. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर असताना काव्यस्फूर्ति होणे अशी उदाहरणे विरळाच असावीत.
२. स्वत:च्या प्रकृती अस्वास्थ्याचे वर्णन जरी अमृतधारेत असले तरीही त्याबद्दल तक्रार मात्र नाही. यातून शरणागति प्रतित होते.
अमृतधारेच्या सुरवातीच्या काही साक्या वाचल्या तर त्या प्रत्येकात स्वानुभव व अनुभव हा शब्द आलेला दिसतो व स्वानुभव-सुधा म्हणजे स्वानुभवाचे अमृत शिंपून भूतलावरील सर्वांना स्वानुभवी बनवीन अशी श्रीस्वामीजींची सदिच्छा त्यांत दिसून येते.
श्रीस्वामीजींनी तरुणपणी जरी गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी व इतर अनेक संत साहित्याचा सखोल अभ्यास केलेला होता तरीही अमृतधारा पाहिल्यास या काळात केवळ सोहम् साधनेखेरीज दुसरा आधार त्यांनी घेतलेला नाही हे दिसून येते व केवळ तोच त्यांना आत्मदर्शन करवून देण्यास कारणीभूत झाला हेसुद्धा पुढील साक्यांत सिद्ध होते. पुस्तकी विद्या वा पोपटपंची दूर सारून त्या अनंताच्या प्रांतात श्रीस्वामीजींनी सोहम् साधनेद्वारा अक्षरश: उडी घेतली. शेवटच्या साक्यात अद्वैत तत्वज्ञानाच्या सर्वोच्च अनुभूतीचे वर्णन आढळते, ज्यामुळे श्रीस्वामीजी आत्मतृप्त झाले व पुढील काळात ते आपल्या पत्रव्यवहारात "आत्मतृप्त स्वरूपानंद" असे लिहित असत. यावरून अध्यात्मसाधनेत गुरुप्रणित साधनेचे महत्त्व विशद होते. पण हे लक्षात न घेता सर्वसाधारणपणे बहुतांश साधक आध्यात्मिक वाचनाच्याच जास्त आहारी जातात व त्यातच साधनेपेक्षा जास्त काळ व्यतीत करतात व त्यामुळे अनुभूतीस मुकतात असे दिसून येते. दुसरे असे की प्रकृती अस्वास्थ्य असताना पुस्तकी विद्येचा विशेष आठव होत नाही वा ती विशेष उपयोगीसुद्धा पडत नाही तर अंतरंग साधनाच सहायक ठरते असे कळून येईल.
अमृतधारेतील साधकांस उपयुक्त ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:- ध्येयनिश्चिती व ध्येयवेड, जीवनाची स्पष्ट संकल्पना, निश्चय वा करारीपणा, वैराग्य, अलिप्तता, अखंड साधनाभ्यासाचे महत्व, ईश्वरनिर्भरता, शरणागति, स्वानुभूति
श्रीस्वामीजीच्या संजीवनी गाथेतील अभंगांचा अभ्यास करताना शेवटचा चरण आधी वाचला तर त्यांना काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे कळते व मग सुरवातीपासूनचे चरण वाचल्यावर ते त्या पुष्ट्यर्थ आहेत हे ध्यानात येते. अमृतधारेतसुद्धा याप्रमाणे शेवटच्या काही साक्या वाचल्या तर हे लागू पडते असे ध्यानात येईल.
श्रीस्वामीजीनी भगवतीची उपासना केलेली नसताना अमृतधारेत असलेले जगदंबा, जगन्माता, माताजी असे उल्लेख मात्र प्रज्ञ अभ्यासकांस निश्चितच विचारप्रवृत्त करतील!!
श्रीस्वामीजी अन् जगन्माता जगदंबा:-
श्री बाबूराव पंचविशे (मास्तर), मालाड - मुंबई, ज्यांनी श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य पूज्य बाबा बेलसरे यांची श्रीज्ञानेश्वरीवरील निरुपणे लिहून काढली व आज ती आपणांस पुस्तकरूपाने उपलब्ध होत आहेत, ते पंचविशे मास्तर, श्रीस्वामीजींचे अनुग्रहित शिष्य आहेत. चित्रकार कै. अनंत सालकर व मास्तर हे घनिष्ठ मित्र. सालकर हे श्रीस्वामींचे अनुग्रहित त्यामुळे त्यांना वाटायचे की आपल्या परममित्राने म्हणजेच बाबूरावांनीसुद्धा श्रीस्वामीजींचा अनुग्रह घ्यावा. त्यानुसार मास्तरांना घेऊन ते पावसला गेले. कै. मधुभाऊ पटवर्धन व सालकर हे पण मित्र. मधुभाऊसुद्धा सोबत होते. मधुभाऊंनी श्रीस्वामीजींस विनंती केली की आपण बाबुरावांना अनुग्रह देऊन आपले कृपांकित करावे.
त्यानुसार मास्तर श्रीस्वामीजींच्या खोलीत दर्शनास गेले असता श्रीस्वामीजींनी मास्तरांना श्रीरामकृष्ण परमहंसांचे एक पुस्तक हाती दिले व कुठलेही पान काढून वाचा असे सांगितले. ते उघडल्यावर अध्याय ४२(?) मधील राखाल, राम, केदार, तारक, एम. इत्यादी ठाकुरांच्या दर्शनाला जातात त्या प्रसंगाचे वर्णन आले. केदार ठाकुरांची कृपा प्राप्त होण्यासाठी ठाकुरांचे अंगठे धरून बसत असे. ठाकूर आईला (कालीमातेला) सांगत आहेत की याचे (केदारचे) पैशावरील प्रेम नष्ट होत नाही, बाईवरील प्रेम नष्ट होत नाही, आई याला माझ्यापासून दूर कर. मास्तर तर अनुग्रहाच्या इच्छेने श्रीस्वामीजींपाशी आले होते आणि आली तर ही अशी गोष्ट! मास्तरांच्या डोळ्यातून घळघळा अश्रूधारा वाहू लागल्या. तितक्यात श्रीस्वामीजी म्हणाले, "असू दे, असू दे, या आपल्या त्या काळच्या आठवणी". दोनदा हेच म्हणाले. त्यानंतर आपणास दुपारी बोलावितो असे सांगून निरोप दिला. दुपारी मग मास्तरांना श्रीस्वामीजींचा अनुग्रह प्राप्त झाला.
या घटनेमुळे मास्तराचे असे मत आहे की गेल्या जन्मी श्रीस्वामीजी व आपण स्वत: बंगालमध्ये होतो व श्रीस्वामीजींची जगन्मातेची उपासना असावी. तोच धागा पुढे आल्यामुळे जगन्मातेचा उल्ल्लेख अमृतधारेत आला असावा. तसेच श्री स्वामीजींच्या पत्रव्यवहारात सुरवातीस "जय माताजी" असे लिहिलेले असे.
‘जगन्माता म्हणजे ब्रह्म’ असाही उल्लेख श्रीठाकुरांच्या मुखातून आलेला आहे.”
याबाबत कै. श्री. म. दा. भट यांनी श्रीस्वामीजींस एकदा प्रश्न केला होता की, स्वामीजी आपण पत्राच्या सुरवातीस “जय माताजी” असे कां लिहिता?.
तेव्हा श्री स्वामीजींनी उत्तर दिले की भिलवडीजवळील भुवनेश्वरी देवी ही श्रीदत्तगुरुंची (श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची) देवी होय. पण आणखी काही खुलासा केला नाही.
सर्वांस माहित आहेच की श्री दत्तगुरुंच्या आशीर्वादानेच श्रीस्वामींचा जन्म झालेला आहे!
*************************************************************************
माझं असं मत आहे की “अमृतधारा” हे सोsहं चं दर्शन आहे. त्या “अमृतधारा”चे रचयिता, सोsहंचे अनुभवी (श्रीस्वामींच्या आरतीत आहे नां - सोsहं-हंसारूढ) व सोsहं उपदेशकर्ता (जीवनभर श्रीस्वामींनी सोsहंचाच उपदेश केला - श्रीस्वामींच्या आठवणींचे “स्मृतिसौरभ” हे पुस्तक पहावे) म्हणून श्रीस्वामी स्वरूपानंद यांना “सोsहं-हंसावतार” म्हणावं.
(२३.०४.२०१६)
क्रमश:
माधव रानडे.
९१९८२३३५६९५८