The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Wednesday, August 5, 2020

“  अद्वय-भक्ति येतां हातीं सरली यातायाती ।।बुडतां अमृतीं मरण तरी कां संभवेल कल्पान्तीं ॥अ.धा.१५७॥”


              नि:संदेह येथ ।  भक्ति तशी प्राप्ती । घेतली प्रचीती । कृष्णदासें. 


 

खालील अभंग रचना कृष्णदास (सुदेश चोगले) यांचेद्वारा आलेल्या आहेत. ही सर्व स्फूर्ति म्हणजे त्यांचे सद्गुरू श्रीकृष्ण सरस्वती स्वामी कोल्हापूर व श्रीस्वामी स्वरूपानंद माऊलींची त्यांच्यावर असलेली पूर्ण कृपाच!

 

कृष्णदास हे श्रीस्वामी स्वरूपानंद कृपांकित माधव ऊर्फ श्रीसुरेश रानडे (Current "Swami Mhane" Blog Author), यांचे अगदी जिवलग! कारण दोघांचे श्रीस्वामीप्रेम. कृष्णदास हे व्यावहारिक जीवनात Software Consultant आहेत आणि अत्यंत Practical Approach ठेवणारे आहेत. त्यांच्या रचना म्हणजे कवित्व नव्हे तर हृदयातल्या भावाचा साकार आविष्कार आहे!

 

हे सर्व, त्यांनी दीर्घकाळ केलेल्या साधनेचे आणि श्रीसद्गुरुंच्या, श्रीस्वामींच्या परमकृपेचे फलित आहे हे वाचकांच्या ध्यानी येईलच... २१ व्या शतकात सुद्धा, नित्य साधनेने आणि श्रीस्वामींचे हयातीत प्रत्यक्ष दर्शन झालेले नसतानासुद्धा हे सर्व श्रीस्वामी प्रेम उत्स्फुर्तरित्या प्रकट होते हे नवलच!!

 

१.     ह्यातून हेच सिद्ध होते की श्रीस्वामी हे संप्रदायाच्या पलीकडे असून विनम्र भक्तांच्या कल्याणासाठी सदैव जागृत असतात व भक्ती, नम्रता आणि खरा भाव पाहून कृपावर्षाव करतात!!

 

२.     आणि दुसरे असे की, श्रीसद्गुरूंनी दिलेल्या साधनेच्या "अभ्यासाने" ते तोष पावतात व शिष्यास अनुभव देतात. त्यासाठी त्या साधनेव्यतिरिक्त इतर काही करण्याची आवश्यकता नसते.

 

३.     असो, वाचकांना ही अभंगधारा नक्कीच आवडेल व परमार्थमार्गात सकारात्मकतेने पुढे जाण्यास प्रेरणा देईल.त्यांच्याच आणखी काही अभंग रचना आणि श्रीस्वामींच्या चरित्र व साहित्याचा परामर्ष घेणारे त्यांचे गद्यलेखन आपण पुढील लेखात पाहु. 



 

नित्य निर्विकार, राही गा तू मना |

स्व-स्वरूप ध्याना, सोडू नको ||१||

कोरोना कोरोना, नको जप मना |

स्वामी आशीर्वचना, विसरू नको ||२||

भय मनी नाणा, कर्तव्या ना उणा |

दास श्रेष्ठ जाणा, सद्गुरूंचा ||३||

कृपेच्या त्या खुणा, दावितसे राणा |

पावसी शरणा, कृष्णदास ||४||


 

स्वामी स्वामी गात गात, चला जाऊ पावसेत |

आनंदाने डोलतसे, स्वामी माझा स्वरूपनाथ ॥१॥

कैसा आलो पावसेत, भक्ता आश्चर्य निश्चित |

स्वामी झाला कृपावंत, आणितसे नकळत ॥२॥

नकळत आलो परि, कळे खूण लई भारी |

जपा सोऽहं श्‍वासावरी, पोहोचाल पैलतीरी ॥३॥

ऐलतीरी भक्त सारे, स्वामी असे पैलतीरी |

पावसची नाव भारी, कृष्णदास पैलतीरी ॥४॥


 

ज्ञानोबांचे ज्ञान, भावार्थ-दीपिका |

आंगविले देखा, ऐसा कोण ||१||

येरा गबाळ्याचे, नाही आवाक्याचे |

शब्द-पंडितांचे, खेळणे ते ||२||

नाही आंगवणे, व्यर्थ मिरविणे |

दुज्या प्रवचने, झोडणे ते ||३||

निश्चयाचा मेरू, कमालीचा धीरू |

तोचि तो स्वीकारू, आव्हान हे ||४||

एक पावसीचा, रामचंद्र साचा |

परिपक्वतेचा, याच युगी ||५||

इतरांनी मौन, उगी ते धरावे |

नाथ ते स्मरावे, स्वरूपनाथ ||६||

अलौकिक होई, अप्रकट राही |

पाही नवलाई, कृष्णदास ||७||

 


सोsहं सुदर्शन, चक्र नवनाथ |

साधका रक्षित, सर्वकाळ ||१||

विषयांचे भय, मनाचा हो लय |

स्वरूपाची सोय, दावितसे ||२||

ज्ञानोबाने दिले, स्वरूपाते आले |

पावसी स्थापिले, तेचि पहा ||३||

शिरता चक्रात, खेचितो केंद्रात |

महाशून्याआत, कृष्णदास ||४||

 


निर्मळ जे मन, लक्षी ना जो मान |

नसे अहं भान, शिष्योत्तम ||१||

कुटील मत्सरी, व्यर्थ ताठा करी |

बरोबरी करी, सद्गुरूंसी ||२||

दंभ मनी परी, नम्र दावी वरी |

सर्वज्ञ तो हरी, काय नेणें ||३||

आपणचि श्रेष्ठ, इतर कनिष्ठ |

त्याची बुद्धि भ्रष्ट, स्पष्ट जाणा ||४||

गुरूंसी विनम्र, वर्ते विनयेसी |

पात्र तो कृपेसी, सद्गुरुंच्या ||५||

वाटे सोपे परी, मृत्यू जैसे वरी |

वर्णी शिष्य थोरी, कृष्णदास ||६||

 


शांत शांत प्रशांत रे, जाणिवेचा प्रांत रे |

नाही नाही भ्रांत रे, जाहलो निवांत रे ||१||

श्रांतले शांत रे, विचारांचा अंत रे |

भाग्य हे उदित रे, भेटले संत रे ||२||

पावसी अनंत रे, भेटला श्रीकांत रे |

करवीरी दत्त रे, माथा कृपाहस्त रे ||३||

गुरुकृपा वसंत रे, अहा हा फुलत रे |

कृष्णदास शांत रे, गातसे हे गीत रे ||४||

 


नको ती वैखरी, सांगू गोष्ट खरी |

संतसंग करी, सर्वकाळ ||१||

संतांची ती स्थिति, लाभते आयती |

चालवा ना मति, मौन धरी ||२||

संतापाशी जावे, चरण नमावे |

उगी ते पहावे, चमत्कार ||३||

देहात दिसती, निराकार स्थिति |

परेसी स्पर्शिती, तात्काळचि ||४||

गाभ्यासि स्पर्शणे, जागृतीचे देणे |

पराशांति लेणे, लेवविती ||५||

सांगितली खूण, घ्यावी हो जाणून |

कृष्णदासा जाण, गुरुकृपे ||६||


 

पावसी देखिली, स्वरूपाई मूर्ति |

गातसो ती कीर्ति, आम्ही बाळे ||१||

सोsहं ची अंगाई, बाळा जरी गाई |

जाग तेणें येई, नवलाई ||२||

करी उपदेश, कोमल शब्दांत |

मृदू नवनीत, जणू ते गा ||३||

स्वामी घेई कष्ट, गूढ करी स्पष्ट |

बाळ धष्टपुष्ट, कृष्णदास ||४||

 


सहज सोपारे, मार्ग अध्यात्माचा |

आड वळणाचा, नाही मुळी ||१||

वेढ्यात निजली, जागृत ती केली |

सहस्रारी नेली, ऊर्ध्व पंथे ||२||

आधी होता शून्य, अंती झाला शून्य |

शून्या उणे शून्य, शून्यचि गा ||३||

स्वरूपाने पावसी, किमया दाविली |

ती अनुभविली, कृष्णदासे ||४||

 


आळंदी ज्ञानाई, तीच स्वरूपाई |

दावी नवलाई, पावसेत ||१||

नाथपंथी दोहीं, सोsहं सोsहं गाई |

नवनीत दोही, जीवदेही ||२||

परमहंस ते, पद ते लाभते |

गूज आकळते, अध्यात्माचे ||३||

सोsहं साधनेची, दाविलीसे थोरी |

कृष्णदासा वारी, पावसेची ||४||

 


बोल मौनावले, ध्यान मौनावले |

मन मौनावले, पावसेत ||१||

तन विसावले, मन विसावले |

नेत्र विसावले, पावसेत ||२||

थकले भागले, स्वामींपासी आले |

निवांत जाहले, क्षणार्धात ||३||

भरुनिया आले, नेत्र झाले ओले |

लक्षितो पाऊले, कृष्णदास ||४||

 


संत झाले मुक्त, मुक्त झाले भक्त |

परि पावसेत, स्वामी वसे ||१||

वसे समाधीत, संजीवन त्यात |

भक्तांच्या हृदयात, स्वामी माझा ||२||

करुणा सागर, नित्य निरंतर |

कृपेची पाखर, भक्तांलागी ||३||

कृपाछत्र भव्य, अनुभव दिव्य |

स्वामी सदा सेव्य, कृष्णदासा ||४||

 


अलख अलख गर्जे नाथ, सोsहं सोsहं घ्यावी साथ |

तोचि असे परम स्वार्थ, साधा आपुलाले हित ॥१॥

नाथपंथ उपदेशत, निवृत्तीसी गुह्य कथित |

ज्ञानोबाने महाराष्ट्रात, उघडली मुक्ति पेठ ॥२॥

तोचि आला स्वरूपनाथ, रत्नागिरी पावसेत |

सोsहं सोsहं घोष करीत, वसतसे अनंतात ॥३॥

माथा ठेविताचि हस्त, सोsहं ह्रदयी प्रकटे खचित |

पावसी जाता भक्त, अनुभव होई त्वरित ॥४॥

जा रे जा रे धावा तेथ, पेठ असे पावसेत |

कृष्णदास ह्रदयी ध्यात, पावसीचा स्वरूपनाथ ॥५॥

 


पावसी पंतोजी, प्रेमळ अति जी |

छडी न हाती जी, स्वरूपाच्या ||१||

मग काय भीती, बालके नाचती |

खाऊ ती मागती, वारंवार ||२||

अभ्यासाच्या कथा, दूर त्या सारता |

राग नाही नाथा, कदाकाळी ||३||

स्वरूप साजिरे, ब्रह्म ते गोजिरे |

असे ते गोचरे, बालकांसी ||४||

ऐसीं स्वरूपाची, शाळा पावसची |

पूर्वपुण्याईची, कृष्णदासा ||५||

 


आगळे वेगळे स्वामी प्रेमळे, भक्तांचे सारे पुरविती लळे ||१||

मनीचे त्यांच्या जाणिती सगळे, इच्छा मनीच्या पुरवि तात्काळें ||२||

भक्त भावाचा मनी निर्मळें, कृपाछत्र तया लाभे आगळे ||३||

भोगविती त्यासी स्वानंद सोहळे, प्रेमाचा उत्सव पावसी आढळें ||४||

कृष्णदास श्रीस्वामी कृपाबळे, पावसी नित्य आनंदसोहळे ||५||

 


बाळ माते लक्षी, माता बाळ लक्षी |

दोहोंचे अलक्षी, लक्ष लागे ||१||

ऐसा परमार्थ, परम तो स्वार्थ |

दावाया समर्थ, स्वरूपराज ||२||

दावितसे खुणा, संपूर्ण लक्षणा |

लक्ष ज्याचे उणा, ठकलासे ||३||

अहंभाव पिसे, गुरूंसी नकोसे |

सांगे तुम्हां ऐसें, कृष्णदास ||४||

 


ब्रह्मांडाची काय मात, स्वामी नित्य हृदयात |

सोऽहं सोय या पिंडात, दावुनिया उघडे गाठ ॥१॥

खूण घ्यावी ध्यानी नीट, मार्ग असे जरी बिकट |

कृपा स्वामींची अचाट, लंघू सहजी सर्व घाट ॥२॥

माया करी थयथयाट, परि कृपेचा त्या काय थाट |

घेऊनिया सहजी घोट, कृष्णदास ब्रह्मांडात ॥३॥

 


ऐलथडी पैलथडी, खेळू खेळ दो घडी |

वाटाड्या स्वरूपनाथ, लाभलासे सवंगडी ॥१॥

मार्गामार्गाची ना वेडी, उरली ती काही कोडी |

लाभलीसे स्वामीसाथ, साथ कित्ती भली तगडी ॥२॥

लागता सोऽहं गोडी, नित्य जडे ती आवडी |

विषयाची सुटे खोडी, कार्यकारण तुटे बेडी ॥३॥

पावसची भेट जोडी, परमार्थाची बैसे घडी |

भक्त कृष्णदासा नित्य, स्वामीदर्शनाची ओढी ॥४॥

 


स्वरूपनाथ महासिद्ध, दास आम्ही त्याचे |

श्रीमंत जणू नृपाचे, प्रजाजन साचे ॥१॥

अष्टमहासिद्धि, लोळती चरणी |

दास-मनोरथ धणी, पुरवितो सहजी ॥२॥

काय मागू त्यासी वाचे, दास हो फुकाचे |

कृष्णदास खास त्याचे, लळे पुरवी साचे ॥३॥

 


स्मृति पावसेची, नित्य आम्हां साची |

वार्ता विरहाची, न बाधेचि ||१||

स्वामी स्मर्तृगामी, क्षणे येतो जातो |

ठायीच स्मरतो, आम्हीं त्यासी ||२||

ध्यानी मनी स्वामी, सोsहं सोsहं स्मरणी |

साधनेची खुणी, हीच असे ||३||

विश्वाकार स्वामी, दास आम्ही नामी |

आनंदा ना कमी, कृष्णदास ||४||

 


पावसची भक्ति, देईल हो मुक्ति |

स्वरूपाची शक्ति, वसे तेथ ||१||

अनंती अनंत, शक्ति ती अनंत |

न लागेचि अंत, कुणालाही ||२||

भजता निवांत, स्वरूपाचा प्रांत |

प्रवेश तो होत, अलगद ||३||

स्वामीकृपे तेथ, प्रवेशिता आत |

सद्गद तो होत, कृष्णदास ||४||

 


सोsहं सोsहं गूढ, वाटे अवघड |

बिकट तो चढ, साधकांसी ||१||

ऐसें नव्हे काही, कल्पना ती पाही |

तीच आड येई, प्रगतीच्या ||२||

स्वस्थ बैसोनिया, सद्गुरू स्मरावा |

श्वास निरखावा, कैसा वर्ते ||३||

तयाचेंचि ध्यान, करता अमन |

कृपेचि ती खूण, सद्गुरुंच्या ||४||

श्वासाचा तो लय, मनाचा विलय |

ब्रह्मरंध्री जाय, प्राण पाही ||५||

ऐसा लागे छंद, नित्य मकरंद |

चाखितसे मंद, कृष्णदास ||६||

 


सद्गुरूंचे दान, लाभतो तो धन्य |

सद्गुरू महान, दाता तो गा ||१||

धन्य ते जीवन, अध्यात्माची जाण |

अध्यात्माचे ज्ञान, जया होय ||२||

गुरूपायी लीन, जो का नम्र दीन |

लाभे त्या सुदिन, यथाकाळी ||३||

अहंपणा बळी, देवोनि तात्काळी |

ब्रह्मानंदी टाळी, लावावी गा ||४||

गुरुकृपा सत्य, आहे सर्वकाळी |

द्यावी की हो टाळी, कृष्णदासा ||५||

 


स्वरूपनाथ महासिद्ध, नाथपंथी थोर |

पावसग्रामी भरे नित्य, त्याचा दरबार ॥१॥

दर्शनासी आलो, चरणांवरी ठेवू शिर |

स्वामीमूर्ती देखोनिया, हर्षे भरे उर ॥२॥

शांत निवांत नीरव, ठाव घेतसे अंतर |

मन होय निर्विकार, ऐसा असे दरबार ॥३॥

सोऽहं सोऽहं वारंवार, श्वास चाले खालीवर |

त्याचा घेवोनि आधार, पद पाव निराकार ॥४॥

स्वामी उपदेशी सार, धरोनिया वर्ते धीर |

केला आहे अंगिकार, तुटेल की येरझार ॥५॥

नको होऊ उतावीळ, सोऽहंनेच लाभे बळ |

कृष्णदास बाळा कवळ, माय स्वामी दे तात्काळ ॥६॥

 


ज्ञानमुद्रा धरी, ज्ञानदान करी |

उभावुनि करी, स्वामीराय ||१||

नेत्रांचिये द्वारी, स्पर्शितो आधारी |

खेचितसे वरी, प्राण तो गा ||२||

सुषुम्नेची वारी, कृपे सुरू करी |

नेई सहस्रारी, अविलंबे ||३||

घेऊनि दर्शना, नमुनि चरणा |

स्वरूपाच्या स्थाना, कृष्णदास ||४||

 


ध्यास तो पावस, आस मनी पावस |

वास व्हावा पावस, नित्य आम्हां ॥१॥

मनी हीच आस, असे गा भक्तांस |

क्षणोक्षणी मानस, पावस लक्षे ॥२॥

सुमुख सुंदर, स्मित-हास्य मुखावर |

प्रेमळ स्वामीवर, आम्हां हृदयी॥३॥

स्वामी कृपाळुवा, लाविलासे लळा |

कृष्णदास बाळा, सांभाळितो ॥४॥

 


पावस आमुचे, पराशांति ठाणे |

ईश्वराचे देणे, भक्तांलागी ||१||

शांतीची पै शांति, करीते विश्रांती |

नाही काही भ्रांती, पावसेत ||२||

शरण चरणी, नाही रे विनवणी |

आपंगितो धनी, तात्काळचि ||३||

उघडेल जरी, पुण्याची हो खाणी |

कृष्णदास वाणी, प्रचितीची ||४||

 


पावसीचे बाळ आम्ही, कापे कळीकाळ |

गर्जे सदाकाळ, सोऽहं हृदयी ॥१॥

नाथपंथी स्वामी माझा, आम्ही हो सनाथ |

माथ्यावरी कृपाहस्त, जाहलो निश्चिंत ॥२॥

चालतो हळुहळू, निर्गुणाचा पंथ |

स्वामी सगुणात, लीला करी ॥३॥

अनंतात स्वामी, प्रत्यक्ष अनंत |

कृपेचा ना लागे अंत, कृष्णदासा ॥४॥

 


स्वामी सोsहं राजा, भक्तांचिया काजा |

करीतसे ये जा, ब्रह्मांडात ||१||

पावसच्या ठाणी, निर्विकल्प ध्यानी |

भक्त लक्षी मनी, सर्वकाळ ||२||

भक्तांच्या स्मरणी, वायुवेगे धनी |

त्वरित धावोनि, रक्षितसे ||३||

आम्हां चिंतामणी, पावसचा दानी |

नुरे चिंता मनी, कृष्णदासा ||४||

 


आता कैसे काय, सद्गुरुंसी ध्याऊ |

मना नाही ठावू, उरलासे ॥१॥

मन माझे नेले, सद्गुरूने विलया |

चरणांसी ध्याया, उरले काय ॥२॥

पावसीचा स्वामी, काम करी नामी |

हृदयीच विश्रामी, कृष्णदास ॥३॥

 


भक्त आले सारे नामी, पलंगासी हासे स्वामी |

दिसतसे दिवस नामी, भक्तिभावे नाचू आम्ही ॥१॥

ॐ राम कृष्ण हरी, नाम गर्जते वैखरी |

तोचि हरी पलंगावरी, कवतुक डोळेभरी ॥२॥

हास्य स्वामी मुखावरी, मोद भक्तांसी अंतरी |

कृष्णदास नाचे डोले, स्वरूपानंद हृदयांतरी ॥३॥

 


स्वामी कां गां मौनावला, देहभान विसरला |

सोऽहं जपता नामावळी, सोऽहं तो ही अस्तवला ॥१॥

भक्त तिष्ठे दर्शनाला, करीतसे प्रार्थनेला |

उगी उगी जागा होई, देई देई दर्शनाला ॥२॥

जागृत अंंतराला, स्वामी कधी अंतरला |

कृष्णदासासकट, गिळियेले ब्रह्मांडाला ॥३॥

 


दान काय मागो आम्हीं, स्वामींचे हो दास |

स्वामी हृदयी नित्य खास, करीतसे वास ||१||

स्वामीप्रेमसुख गोडी, लागली जीवास |

नाही आता नाही आस, स्वरूपाचा ध्यास ||२||

सोsहं तंतू ऊर्ध्व ऊर्ध्व, खेचे सावकाश |

स्वामी अलगद श्वास, नेई आकाशास ||३||

आकाशात विहरे स्वामी, भक्ता घेई बरोबरी |

कृष्णदास वर्णी थोरी, पावसेची तऱ्हा न्यारी ||४||

 


उठ उठ जागा होई, पावसेची माय पाही |

पुकारते तुज बाही, पावसेत येई येई ॥१॥

सोsहं सोsहं मृदुल कवळ, ये ग बाळा तुज देई |

गोड गाईल अंगाई, तेणे “जाग” तुज येई ॥२॥

विषयांचे भय नाही, स्वरूपीच “नीज” ठायी |

जन्म ऐसा सफळ होई, आत्मरूप ठाई ठाई ॥३॥

जन्मोजन्मींची पुण्याई, येणे रिती फळा येई |

धाव धाव कर घाई, खुणाविते स्वरूपाई ॥४॥

कृपाळू प्रेमळाई, लेकुरांसी गूज देई |

कृष्णदास बाळ गाई, स्वरूपाची नवलाई ॥५॥

 


-- कृष्णदासांची भावोत्कटता आणि हृदयस्पर्शी शब्द, गती आणि लय यांत अशी विलक्षण जादु आहे की ते स्वामी भक्तांना घरबसल्या श्रीक्षेत्र पावसची, “अनंत निवास” ची यात्रा घडवतात/ करवून आणतात. विनासायास व अलगदपणे श्रीस्वामींच्या सहवासाचा आनंद देतात. नकळतच स्व-स्वरूपाची, आत्मरूपाची, आत्मबोधाची ओढ मनात निर्माण करतात. चैतन्य-स्वरूपातील, स्मर्तृगामी, श्री स्वामी, चिरकाल, आपल्या आसपास, अगदी निकट असल्याचा अनुभव येतो. आपल्या लक्षात येतं की, त्यांच्या अभंग वाणीतून ते चिरसुखद सखा असल्याची जाणीव होते, द्वैताची जाणीव गळून पडते. भान हारपते, आणि या आनंद यात्रेचा मनमुराद आनंद आपल्याला सहजच मिळतो. 



सर्व भारतवासीयांच्या, भारतीय नागरिकत्व असलेल्या प्रत्येकाच्या आणि श्रीस्वामीभक्तांच्या दृष्टीने, ५ ॲागस्ट २०२० ( शके १९४२ श्रावण कृ.२) एक ऐतिहासिक मंगल दिवस आहे. प्रभु रामचंद्राचं जन्मस्थान अयोध्येत आज त्यांच्या मंदिराच्या निर्मिती साठी आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.सर्वांच्या आस्थापूर्तीचा दिवस आहे हा.



 श्री स्वामींच्या संकल्पनेतील भारताचा शुभारंभ होत आहे. चैतन्यरूप श्री स्वामींच्या ( पूर्वाश्रमींच्या रामचंद्र विष्णु गोडबोले ) दृष्टीकोणातील भारत, हा सर्वधर्मसमभाव, सामाजिक-आर्थिक विषमता विरहीत, चराचराशी समरसलेला राम - राज्याशी मिळता जुळता आहे ( अमृत-धारा साकी क्र.२९,७७,७८,१०१,१०२,१०४, ११४,१५०,१५१ ) विस्तार भयास्तव फक्त साकी क्रमांक दिलाय.


अशा या पावनमुहूर्तावर या लेखाचं अंतिम संकलन होऊन तो वाचकांसमक्ष ठेवतां येणं अखेर शक्य झालं हे श्री स्वामींच्याच कृपेचं फळ. सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानंद महाराज की जय!!

 



माधव रानडे