The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Monday, July 23, 2018

              सोऽहं-हंसोपनिषद
                      अर्थात
        श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
             यांच्या साहित्यातील
              ( चाकोरीबाहेरचे )
        मराठीतील पहिले उपनिषद
                ( क्रमश :-१२)

माझ्या मावशीने, (ताई आत्ते) मला अनुग्रह देण्याची स्वामींना विनंती केली. त्यांनी तिच्या शब्दाचा आदर करीत १९६८ साली पदरात घेतलं. आजही तो प्रसंग आठवला, कीं महात्मा संत कबीर यांचे एक भजन व त्याचं ध्रुवपद, आणि १ व ४ ही कडवी आठवतात ती

         “ हमारे, गुरु मिले, ब्रह्मज्ञानी
            पाई, अमर निशानी..   (ध्रुवपद)
           काग पलट गुरु, हंसा किन्है
             दीन्हीं, नाम निशानी..
          हंसा पहुचे.. सुख सागर पर
            मुक्ति भरै, जहाँ पानी      (१)
     अनुभव का ज्ञान, उजलता की वानी
            सो है, अकथ कहानी
           कहै कबीर गुंगे की सेन
            जिन जानी, उन मानी ”   (४)

सद्गुरू स्वामी स्वरुपानंद (पांवस) यांच्या बाबतीतही
“अनुभव का ज्ञान, उजलता की वानी” यामुळे तीही “कहानी अकथअवर्णनीय आहे.पण “गुंगे की सेन” प्रमाणे ते मला उमजतं. पण ? मूकरसास्वादनवत्.

पांवसला, देसायांच्या “ अनंत-निवास ” त सगुणांत वावरणाऱ्या परब्रह्मानं, त्या ब्रह्मज्ञानी सद्गुरू स्वामींनी मलादेखील सांप्रदायिक “सोऽहं मंत्र” गुज सांगितलं  “शब्दाविण ध्वनि” ऐकविलाही व करविला देखील.
एव्हढंच नाही तर एका भेटींत स्वामींनी स्वत: मला “आत्मप्रभा ” हे पुस्तक दिलं होतं व त्यातील काही उतारे वाचूनही घेतले होते. पुढे एका भेटीत मी त्यांना  “ सोऽहं ” संबंधीं काही प्रश्न विचारले असतां त्यांनीं मला,म.दा. भटांचं “ सोऽहं साधना ” हे पुस्तक घेऊन वाच म्हणून सांगितलं. असं सगळं असतांना “सोऽहं” ऐवजी, मला नामाचीच जास्त गोडी वाटु लागली.
हे सर्व इतक्या कालावधीनंतर लिहीण्याचं कारण-

        “ भाविकाची चिंता वाहे भगवंत।
      पाहे हिताहित तो चि त्याचे ॥सं.गा.१०३/१  
तसंच “ तुका म्हणे नाही चालत तांतडी ।
         प्राप्तकाळ घडी, आल्याविण  ॥”

या वचनांचा मला प्रत्यय आला. “सोऽहं” साधनेसाठी  माझी तयारी व्हावी असं जाणवलं म्हणूनही असेल कदाचित, माझ्या मनांत नामाची पेरणी श्री स्वामींनीं १६/६/७२ च्या,मला बीकानेरला पाठवलेल्या पत्राने केली.पण त्यांत मला मिळालेलं नाम सबीज आहे,हा  उलगडा व्हायला सहा वर्षे लागली. स्वामींनीं लिहिलं

       “ रामकृष्ण हरि उच्चारी वैखरी ।
          भक्त तो संसारी भाग्यवंत ॥”

मग नामातच गोडी वाटू लागली, गोडी वाढू लागली पण सद्गुरू वेगवेगळ्या प्रकारांनी मला सोऽहं-साधने कडेच वळवीत आहेत याची मला सतत जाणीव होते ते माझ्याकडून जो गृहपाठ करुन घेतात तोच मी या लेखांतून वाचकांसमोर ठेवतो.स्वामी मला दाखवतात  तो रस्ता नामस्मरण व अनन्यभक्ती द्वारे,सोऽहंभाव”, हाच स्वभाव बनवणारा सहज,सरळ,सोपा मार्ग आहे. म्हणूनच माझी अढळ श्रद्धा आहे स्वामींच्या-

“ एकलव्यासारिखी गुरुभक्ती । जीवासी देई परमशांति । बैसल्या ठायीं ज्ञानप्राप्ति । जाण    निश्चिती होतसे गा॥” या व अशा अनेक वचनांवर

“नाम तेथें राम भक्तांचा आराम ।निष्कामांचा काम नांदतसे ॥ अंतरीं चि नाम अंतरीं चि राम ।अंतरीं विश्राम स्वामी म्हणे ॥ तुझ्या चि नामाचा घेउनी आधार । पाववीन पार जड जीवां॥स्वामी म्हणे मज तुझें कृपा-बळ।म्हणोनि हा खेळ खेळतसे ॥”    
“ जीव-शिवाचा संयोग।हाचि माझा राजयोग॥दूर  झाली आधि-व्याधि।लागे अखंड समाधि ”॥
   (संजीवनी गाथा २४५-२४७/३-४, १४/१-३)

जीव-ब्रह्मैक्य योगाचा, अखंड समाधीचा स्वानुभव घेणारे स्वामी स्वत: अलौकिक राजयोगी होते पण माऊलींच्या पाऊलावर पाऊल ठेवत सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनीं स्वतः भक्तिपंथ आचरला व  मग उपदेशिला

   “ मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें ।
   अलौकिक नोहावें ।लोकांप्रति ॥ज्ञा.३/१७१॥
            म्हणूनच स्वामी लिहितात-
          मोक्ष-रुप हातीं घेउनी संपत्ति ।
             जनालागीं देती भक्ति-पंथें  ॥
       स्वयें विश्व-रुप होउनी आपण  ।
            साधिती कल्याण जगताचें   ॥
      “भक्तांसी साचार विश्वाचा संसार ।
               परि अहंकार नसे चित्तीं ॥
           (संजीवनी गाथा- १३/३-२-१)

“अहंकार” हा आत्मज्ञान प्राप्ती मधील सर्वात मोठा अडसर आहे. तोच ‘मी’ पणे द्वैत निर्माण करतो. व तो मावळून जाण्यासाठी स्वामी भक्तीचा मार्ग सांगतात
     “अहंकार जो मन-बुद्धीचा घेउनियां आधार ।
 जीवा भुलवी सदा दाखवी जन्म-मरण-संसार ॥
     तोचि मावळे विलीन होतां तीं मद्रूपीं जाण ।
  जेंविं इंद्रियें निष्प्रभ होतीं निघुनीं जातां प्राण” ॥
आणि यासाठीं ते साधा, सोपा उपाय सुचवितात कीं
“सहजें माळी नेइ त्या स्थळीं वळे चि जैसें पाणी ।
तेंविं करावीं सर्व हि कर्में अहंकार  सांडोनी”।कारण
मदर्थ पार्था कर्में करितां धरुनि भावना चित्तीं ।
त्या भाव-बळें गळुनि अहंता होइल तुज मत्प्राप्ति॥
नाहीतर “ज्ञानचि तें आंधारेंज्ञानासि करी।असं होते
कारण भक्ती सुटतां मी ज्ञाता हा अहंकार थोरावे। असा झुंजता विरळा ज्ञाता ब्रह्म-पदाते पावे” ॥
त्यांचं सांगणं आहे कीं साधन कोणतही असलं तरी
  “सर्व साधनीं हेतु एक हा अहंकार निरसून ।
   तुझें स्वभावें चित्त रहावें मद्रूपीं चि जडून ”॥
भक्तिचं श्रेष्ठत्व व सुगमता सांगतानां ते लिहितात
“सोऽहं-सिद्धि लाभतां तया सहज घडे मत्प्राप्ति ।
परी साधनीं भक्ति-पथाची असे सुगमता निरुती”॥
संत तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाबाई एका अभंगात भक्तभागवतांची महती कशी सांगतात पहा-
“संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २ ॥
नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ॥ ३
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ॥ ४ ॥
तुका झालासे कळस।भजन करा सावकाश॥५॥
बहिणी म्हणे फडकती ध्वजा।निरूपणा केलें वोजा
आषाढी वारीला घरदार विसरुन लाखोंच्या संख्येने पंढरीकडे धांव घेणारे वारकरी हे या देवालयातील चालते बोलते पुजारी आहेत व आपण साक्षीदार.
जगन्माउलीच्या आज्ञेनं लेखणी खाली ठेवून ती परत उचलण्याचं आश्वासन देतांना स्वामींनी लिहिलं-
“जगन्माउली, आज्ञा होतां ती पुनरपि उचलूंच ।भक्त होउनी त्वद-यशोध्वजा जगीं उभारूं उंच!॥”
सुमारे एक तपाच्या दीर्घ तपस्येनंतर स्वामींनी घेतला वसा पूर्ण करण्यास पाऊल उचललं आणि व्रताची सांगता करुनच थांबले.सातशे वर्षांपूर्वी माऊलींनी जे भक्तिमंदिर उभारलं,त्याला अभंग कुंपण केलं आणि
सोऽहं-हंसोपनिषद” रुपी नवं दालन असं जोडलं-
“लाभतां अभेद-भक्तीचें निधान।एक चि आसन जिवा-शिवा॥अपार अभेद-भक्तीचें महिमान स्वामी म्हणे खूण ओळखावी॥” “आतां अहं सोऽहं मावळले भान।अवघें नारायणरूप झाले॥स्वामी म्हणे ऐसें भक्तीचें महिमान। ओळखावी खूण स्वानुभवें॥
(संजीवनी गाथा २३/१-४+१८७/३-४)
आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहुर्तावर पांवस ते पंढरी या श्री स्वामी स्वरुपानंद यांच्या पालखीवर ही शब्द-सुमनं अर्पण करतांनां अत्यंत आनंद होत आहे.
    सोऽहं-हंसावतार सच्चिदानंद सद्गुरू स्वामी  
                   स्वरुपानंदाय नमो नम:

ranadesuresh@gmail.com       माधव रानडे
09823356958