The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Monday, May 21, 2018

                 “ सोऽहं-हंसोपनिषद
                         अर्थात
          श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
               यांच्या साहित्यातील
                 ( चाकोरीबाहेरचे )
           मराठीतील पहिले उपनिषद
                  ( क्रमश :-१०)


एका भगिनीनी विचारले, काका, “सोऽहं” भाव म्हणजे नक्की काय हो ? संभाषण दूरध्वनि वर चाललं होतं. आंतून उत्तर आलं की, “एखाद्या सुरेल गाण्याच्या समारंभातून आपण घरी आलो, कीं आपण ते सूर घरी घेऊन येतो. ते स्वर आपल्या मनांत घर करुन आपण ते गाणे गुणगुणत रहातो. त्या सुरांच्या व शब्दांच्या अंतरंगाशी,आपण तद्रुप होतो,एकरूप होतो. आणि यासाठी तानसेन तर सोडाच पण साधं कानसेन देखील होणं जरुरी नाहीये. तद्वतच “सोऽहं-भाव” जागृत होण्यासाठी, प्रथम “सोऽहं” नं साधकाच्या मनांत घर करायला हवं. पण फक्त मनांत घर करुन उपयोग नाही. कारण संसार-चित्र हे मनाच्या पडद्यावर उमटतं. म्हणून पुढे, “सोऽहं” रोम रोमांत, नसा-नसांत भिनून, “सोऽहं”नं स्फुरणांत घर केलं पाहिजे”.
संभाषण संपले, पण स्वामींच्या ज्या साक्या व अभंगांचे,शब्द डोक्यात रुंजी घालत होते-


नसानसांतुनि तें संताचे नाचे अस्सल रक्त जाण साजणी आजपासुनी आम्ही जीवन्मुक्त”॥अन्तरांतुनी सहज-ध्वनि तो निघतो ‘सोऽहं’ ‘सोऽहम्’ विनाश्रवण ऐकतां तोषतो माझा आत्माराम।” “विनावैखरी होत अंतरीं‘सोऽहं’ शब्दोच्चार सहज-भजन अभ्यसन जंव नसे अद्वैतीं व्यापार” “असे सहज परी ‘सोऽहं’- भावे करी सतत अभ्यास। हीच साधना जोंवरी न तो झाला मोहनिरास” ॥ (अमृतधारा१४८,१४९,२३)
श्वासोश्वासीं देख रामनाम जप। होतो आपेंआप अखंडित ॥ तेथें रात्रंदिन ठेवी अनुसंधान। सांडुनी मी पण । ‘सोऽहं’ भावे”॥ (संजीवनी गाथा २४८/१-२)


स्वामी वारंवार हेच सांगतात कीं सोऽहंची देणगी मानवमात्राला निसर्गत: जन्मत: सहज (जन्मना सह=सहज) असल्यानं त्याचा अभ्यास सहज विना-सायास करावा.


‘अजपानिरुपण’ समासात समर्थ लिहितात- देहधारक तितुकाप्राणी श्वेतजउद्भिजादिक खाणी।
स्वासोस्वास नस्तां प्राणी।कैसे जिती ॥ ऐसी हे अजपा सकळासी।परंतु कळे जाणत्यासी।
सहज सांडून सायासीं पडोंच नये॥” (दासबोध-१७/५/१२-१३॥)
यच्चयावत् देहधारक प्राणी श्वासोश्वासा शिवाय जगूंच शकत नाही. ही सहज क्रिया, सर्वांमध्ये आहे,
मात्र ती जाणत्यांच्या लक्षात येते. सहज सोडून,कष्टाची साधने करुं नका स्वामींनाही
याचेंच वाईट वाटते. ते म्हणतात-
अंतरीं स्वानंद असे स्वयंसिद्ध।
परि मति-मंद भोगी चि ना।
खंड भजन चाले रात्रंदिन।
तेथें सावधान राहे चि ना॥” म्हणून ते लिहितात, “अखंड अंतरीं सहज-स्फुरण। तेथें ठेवी मन।स्वामी म्हणे॥”
“शब्दाविण ध्वनि ।करोनि श्रवण। ठेवीं अनुसंधान ।आत्मरुपीं॥ अंतरीं भजन ।चाले रात्रं-दिन। तेणें समाधान ।अनिर्वाच्य॥ (संजीवनी गाथा ७२/१-३,७१/४,१७१/३-१)


तत्वत: “सोऽहं-भाव” म्हणजे ‘सच्चिदानंद परमात्मा हेंच माझें मूळरूप आहे(“सोऽहं”) याची अखंड जाणीव, हाच निदिध्यास व अभ्यास, आणि मी रूपानें प्रत्ययाला येणारी जाणीव, सच्चिदानंदरूप परमात्म्यांत विलीन करण्याची भावना आणि तसा अनुभव.
“अहंमात्मा हे कधींचि विसरों नये” हा सद्गुरू मुखें मिळालेला समर्थांचा उपदेश स्वामींच्या खोलीत केवळ पाटीपुरता मर्यादित न राहतां त्यांचा स्वभाव बनला. स्वामींसारखे वेदान्ती, ज्ञानीभक्त ‘सोऽहं’- भावात तन्मय होतात, तदाकार होतात. म्हणूनच आत्मविश्वासानें स्वामी सिद्धान्त सांगतात “भक्त तो चि ज्ञानी। ज्ञानी तो चि भक्त
जाणावा सिद्धान्त। स्वामी म्हणे॥”     (संजीवनी गाथा ४०/४)


हे सर्वश्रृत आहे की माऊलींचे (१) ज्ञानेश्वरी (२)अमृतानुभव (३)चांगदेव पासष्ठी हे तीनही ग्रंथ मराठी
सारस्वताला केवळ ललामभूतच नाहीत तर
संतसाहित्यात प्रस्थानत्रयी म्हणून मान्यता प्राप्त
आहेत, त्यांतही चांगदेव पासष्ठी म्हणजे साऱ्याचा मुकुटमणी. या पासष्ठ ओव्या म्हणजे “तत् त्वम्
असि” या महावाक्याचा काव्यरुप सूत्रमय बोध. त्यांतील प्रत्येक ओवी ‘सोऽहं’ बोधाची चढती पायरी. माऊलींची असामान्य प्रतिभा, प्रातिभ ज्ञान प्रत्येक
ओवीत दिसते.या सर्व बोधाचे सार ओवी क्र.६४ मधे आहे
“नाहीं तें चि काय नेणों असे।दिसें तें चि कैसें नेणों दिसे ।
       असें तें चि नेणों आपैसे । तें कीं होइजे॥”


यातील प्रत्येक शब्द सोपा आहे पण पूर्ण ओवीचा अर्थ समजणं ? महाकठीण काम. “चांगदेव पासष्ठी” वर
अनेक पुस्तके आहेत. पण  इंग्रजीतील प्रभाकर
अडसुळ यांचे “युनिटो मिस्टिका” हे पुस्तक पुंज
भौतिकी सिद्धान्ता नंतरच्या आधुनिक विज्ञानाशी
माऊलींच्या सूत्रांची सांगड घालून दृष्टा, दृश्य, दर्शन
या त्रिपुटीची उकल करते. विदेशातही गौरविले गेलेले हे पुस्तक म्हणून उल्लेखनीय वाटते. माऊली प्रणीत ज्ञानोत्तर भक्तीचा पुरस्कार, व तद्वतच आचरण करणाऱ्या स्वामींच्या
साहित्यात “सोऽहंभावा” चा विचार, करणारे अनेक संदर्भ
आहेत. पण ओवी क्र.६४ वरील
“परमात्मा जैसा।स्वयें सच्चिद्घन।
आनंद निधान।परिपूर्ण॥ आपण  हि तैसें।
व्हावें परिपूर्ण।तद्रूप होवोन। सोऽहं भावें
     (स्वरुपानंद-अभंग चांगदेव पासष्ठी १३०-३१)


हे अभंग वाचले की, “सोऽहं-भावा”नें परमात्म्याशी
तद्रुप झालेल्या स्वामींची “सोऽहं-भावा” चे सगुण रुप, सजीव
पुतळा म्हणून ओळख होण्यामागचं कारण स्पष्ट होतं.


“सोऽहं-हंसावतारसच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरुपानंद यांचे चरणीं शत शत वंदन.


09823356958                                  माधव रानडे
ranadesuresh@gmail.com