The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Saturday, March 10, 2018

                        “सोऽहं-हंसोपनिषद”
                                 अर्थात
          श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील
            ( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
                           ( क्रमश:- ७)

“सोऽहं” चा बोध हा स्वामींच्या सर्व साहित्याचा / उपदेशाचा कणा आहे, सार आहे. त्यामुळं त्यांत इतक्याच साक्या/अभंग “सोऽहं” संबंधी आहेत असा या आधींच्या लेखांत केलेला उल्लेख हे जरा धाडसी विधान होईल हे सांगणे मला आवश्यक वाटतं. त्या १७ साक्यांमधे “सोऽहं”चा उल्लेख आहे एव्हढं मात्र खरं.या संदर्भात ज्ञानेश्वरीतील एका ओवीकडे लक्ष वेधूं इच्छितो

        “ सात शतें श्लोक । अठरा अध्यायांचे लेख । 
         परी देवो बोलले एक । जे दुजें नाही ॥” ज्ञाने. १८/५८

तद्वतच स्वामींच्या रचनांचा निर्देश, सामान्यतः “सोऽहं” कडेच असतो. “स्वरूप पत्र मंजूषा” या स्वामींनीं लिहिलेल्या पत्रांपैकी,  अनेक पत्रांत “सोऽहं” बोध आहे. त्यापैकीं ६३,६४ व ६५ ह्या तीन पत्रांत स्वामी “सोऽहं” ची प्रक्रिया फार सोप्या शब्दांत सांगतात. पत्रक्र.६३ सर्व साधकांसाठी उपदेश आहे, तर क्र.६५ विशेषत्वानें सांप्रदायिक अनुग्रहितांसाठी आहे. या तीनही पत्रांचें आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्यातील “साक्षित्व” हा शब्द.

 आत्मरुपीं दृढ विश्वास । आत्माचि मी हा निदिध्यास।साक्षित्वें  साहोनि सुख-दु:खास । करावा अभ्यास नित्यनेमें ”॥६३/३॥
“नाना वृत्तींचें स्फुरण । अंतरीं होतसे कोठून ।साक्षित्वें पहावें  आपुलें आपण । अति अलिप्तपण ठेवोनिया ” ॥६४/२॥
 “ विवेकाचा घेवोनि आधार । साक्षित्वें करावे सर्वहि व्यापार । सुख-दु:खें प्रारब्धानुसार । भोगावीं साचार यथाप्राप्त ”॥६५/५

स्वामी आपल्याला समजावतात कीं देह म्हटला, संसार म्हटला, कीं सुख-दु:ख ही येणारच. त्यांचा स्वीकार तटस्थ वृत्तीनं करणं, म्हणजे  साक्षित्व. जसं कोर्टातील केसमधे जो साक्षीदार असतो, त्याला तो साक्ष देतो त्या घटनेबद्दल काही सुख-दु:ख नसतं. त्याने काय पाहिलं ते तो त्रयस्थपणे सांगतो. “सोऽहं”च्या अभ्यासाने, “सुखी संतोषा न यावे । दु:खी विषादा न भजावे । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजी ”॥ ही वृत्ती जसजशी अंगीं बाणूं लागेल, तसतशी “सोऽहं” भजनातील तन्मयता वाढून तीच साधना सोऽहं-भाव साक्षीत्व बनेल. ‘सोऽहं’ साधना, साधकाला आत्म-रूपाची, स्वरूपाची ओळख करून देते. सः अहं...तो मी,.. तो मी, इथे तो म्हणजे परमेश्वर!! माणसाचे सगळे आयुष्य ‘मी’, ‘मला’, ‘माझे’ करण्यात जाते. पण खरा ‘मी’ कोण? स्वामींच्या शब्दांत सांगायचे तर, “ देह म्हणजे का मी,मन म्हणजे का मी? बुद्धी म्हणजे का मी? आपण म्हणतो, हे माझे आहे, ते माझे आहे. हवे तेव्हा घेतो नाहीतर बाजूला ठेऊन देतो”. तसेच मन, बुद्धी यांचेही आहे. त्यांच्याहून मी वेगळा आहे. देहाहून, मनाहून, बुद्धीहून मी निराळा आहे. हे आपले स्वरूप आपण ओळखले पाहिजे, जाणले पाहिजे. देहाचे, मनाचे, बुद्धीचे व्यवहार साक्षित्वाने पाहता आले पाहिजेत. आपण देहच मी असे घोकत आलो आहोत. परमात्मा मी, सः अहं, तो मी, तो मी, हे मनांत ठसायला हवं. एकदा खरा ‘मी’ कोण ह्याचा बुध्दीत निश्चय झाला कीं, “सोऽहं” भावाचा उदय होतो. पत्र क्र.६४ हे आठ कडव्यांचं एक परिपूर्ण सोऽहं साधनाष्टक आहे. त्यांतील पुढील सहा कडव्यांत स्वामी “सोऽहं” भाव  समजावतात.


  “ नाना वृत्तींचें स्फुरण । अंतरीं होतसे कोठून । साक्षित्वें पहावें आपुलें आपण । अति अलिप्तपण ठेवोनिया ” ॥६४/२॥
 “ सर्वेंद्रियासहवर्तमान । मन बुद्धि आणि अहंपण ।
 आत्मारामीं समर्पून । निज-निवांतपण । उपभोगावें ॥६४/३॥             
चालतां बोलतां हिंडता फिरतां ।लिहितां वाचितां खातां जेवितां।                                
नाना सुख-दु:ख भोग भोगितां । निजात्मसत्ता आठवावी ६४/४॥
   होतां “सोऽहं”-भजनीं तन्मय । एकवटोनि ज्ञाता ज्ञेय ।
    येई आत्मसुखाचा प्रत्यय । अतिंद्रिय स्वभावें जें ॥६४/५॥
    नाद-श्रवण प्रकाश-दर्शन । तेथे श्रोता दृष्टा कोण ।  
  तो आत्माचि मी हें ओळखून । तदनुसंधान राखावें ॥६४/६॥
   सदा स्व-रुपानुसंधान । हें चि भक्ति हें चि ज्ञान ॥
 तेणें तुटोनि कर्म-बंधन । परम समाधान प्राप्त होय ॥६४/७॥

स्वामी समजावतात आपल्या अंतरांत वेगवेगळ्या वृत्तींचे स्फुरण कुठून होतं याचा आपण अत्यंत त्रयस्थपणे विचार करावा, शोध घ्यावा.आपण हें लक्षांत ठेवलं कीं अंतरांत कितीही वृत्ती उठल्या तरी त्या मूळ ज्ञानस्वरुप संवित्तीचीच, ती अनंत रूपं आहेत, मग त्यांच्याकडे अलिप्तपणानं / साक्षित्वानं पहातां येतं. यासाठीं सर्व इंद्रियांसहित मन, बुध्दी, व अहंभाव आत्मारामाच्या चरणीं ठेवून स्व-स्थ रहावं. हे साध्य व्हायला आपले जे काहीं दैनंदिन कार्यक्रम असतील ते करततांना, आत्मसत्ता आठवावी. कसं तर चालणारा, बोलणारा हिंडणा / फिरणारा, लिहिणा / वाचणारा इ.क्रिया करणारा मी दिसलो तरी ज्या अदृश्य शक्तीच्या, सत्तेच्या बळावर मी हे करु शकतो, त्या निजात्मसत्तेची सतत आठवण, हा खरा ‘सोऽहं’ भाव. हे खरं ‘सोऽहं’ भजन. परमात्मा ही व्यक्ती नसून विश्वचालक,  विश्वनियंत्रक शक्ती आहे याची सतत जाणीव, “खेळविसी तैसा। खेळेन साचार। तूंचि सूत्रधार। बाहुलें मी ॥ बोलविसी तैसे। बोलेन वचन । मज अभिमान। कासयाचा ”॥ हा भाव, आणि “ मी माझें मावळो सर्व, तू तुझें उगवो आतां । मी तू पण जगन्नाथा, होवो एकचि तत्वतां ”॥ ही प्रार्थना,साधकाचा अहंभाव हलके हलके नाहिसा करून ‘सोऽहं’ भाव / बोध प्राप्त करायला मदत करतात. या भावाने “सोऽहं”-भजनांत तन्मय झालं, कीं आपसुकच मी तू पण एकवटून, ज्ञाता ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीचा, अंत होतो. आणि साधकाला, अतिंद्रिय आत्मसुखाचा, जे  की इंद्रियांच्या पार आहे आहे त्याचा, अपरोक्ष प्रत्यय येतो.अदृश्य निजात्मसत्तेची कल्पना येण्यासाठी आपल्या घरांतील वीज व त्यावर चालणारी विविध उपकरणें यांचे सोपे उदाहरण घेऊया. घरात असणारी वीज आपल्याला एरवी दिसत नाही.पण आपण एखाद्या उपकरणाचं बटण दाबलं कीं आपल्याला त्या अदृश्य वीजेचा प्रत्यय येतो. जसं पंखा सुरु होतो, दिवा लागतो इत्यादी. तसेच आपल्या हातून होत / घडत असलेल्या प्रत्येक दैनंदिन व्यवहारांत निजात्मसत्ता, परमात्मसत्ता ती शक्ति आठवायची.आपली प्रत्येक बारीक सारीक हालचाल, कृती, हे त्या परमात्म्याचं प्रकटीकरण आहे याची जाणीव. त्या वेळी ऐकू येणारा नाद, व प्रकाशाचं दर्शन ही शुद्ध जाणीव. “‘अमुका मी’ ऐसे । बुद्धीचे स्फुरण । होय रात्रंदिन । सर्वांतरी ॥ तें तों पार्था जाण । पाहतां तत्वतां । स्वरुप सर्वथा । माझें चि गा”॥ आणि त्याचें, त्या स्वरुपाचें अनुसंधान कर, असे स्वामी वारंवार सांगतात. हेच स्व-रुपानुसंधान. दिसतं तें रुप, असतं तें स्वरुप, आणि भासते ती माया. हे सर्व सोपं करुन सांगणारे    स्वामी स्वत: कसे होते, तर “जयांची अहंता। आत्मस्वरुपांत। राहिली निवांत। स्थिरावोनि”॥ सदाचे “आत्मतृप्त”, पूर्णकाम “आधी जेणें केलें मग सांगितलें” असे. त्यामुळे स्वामी जेंव्हा सांगतात, “ वेदांताचे सार । सांगतो साचार । नका वारंवार । पुसों आतां ॥ सत्य एक आत्मा। नित्य निराकार। जाणा चराचर। मायाभास ॥ दिसें जें लोचना। भासे जें जें मना। तें तें मिथ्या जाणा। मायारुप ”॥ तें मनाला पटतं, ह्रदयावर बिंबतं, कारण त्या अंत:करणाचा ठाव घेणाऱ्या शब्दांतून स्वामींचा, स्वानुभव प्रतिबिंबीत झालेला दिसतो व याची खात्री ते मितुले व रसाळ शब्दच देतात. पुढच्याच चरणांत स्वामी सांगतात कीं “सदा स्व-रुपानुसंधान, हेचि भक्ति, हेचि ज्ञान” आणि असं केल्यानें कर्म-बंधनातून मुक्ति मिळते, परम समाधान प्राप्त होतं. समर्थही दासबोधांत हे, व हे साधुचें लक्षण का आहे ते सांगतात    “सदा स्व-रुपानुसंधान।हे मुख्य साधूचे लक्षण।
जनीं असोन आपण।जनावेगळा ॥दासबोध ८/९/९॥ 
यासाठीं, वर-प्रार्थनेच्या सुरवातीलाच स्वामी जगन्नियंत्याकडे, 
“उदारा जगदाधारा देई मज असा वर । 
स्व-स्व-रुपानुसंधानीं रमो चित्त निरंतर”॥ असा वर मागतात. 
व स्व-रुपानुसंधान हा धर्म आहे व तो कळण्यासाठी नित्य काय व अनित्य काय याचा विवेकानं विचार करायला सांगतात.
आतां पत्र क्र. ६४ चे पहिले व शेवटचे चरण पाहुं.  पहिल्या कडव्यांत फार थोड्या शब्दात मोठा आशय भरला आहे. 

       “ साधनीं असावें तत्पर । संकटीं न संडावा धीर ।
    सोऽहं स्मरणें वारंवार । निजांतर चोखाळावे ॥६४/१॥

साधनामधें तत्पर असावें म्हणजे असं की आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे साधना करण्यात दिरंगाई करतो, आपला टाळाटाळ करण्याकडे कल असतो. म्हणून स्वामी सांगतात,कीं त्यांत सदैव तत्पर असावं. साधना, करण्याचा प्राथमिकताक्रम Priority बदलू नये. आपण काही अडचण आली की लगेच, नेम नंतर करु असा सोयीस्कर विचार करतो व शेवटी साधना राहून जाते. संकटांत न घाबरुता मग ती भौतिक, आध्यात्मिक किंवा दैवी कशीही असो पण ती अनित्य आहेत हा विचार, विवेक करून न डगमगतां ‘सोऽहं’ च्या अनुसंधानाने वेळोवेळीं मनाला धीर द्यावा. 
आपलं वागणं अशा प्रकारचं असलं तर फलस्वरूप आपल्याला

 “ क्लेश-रहित संतोषी जीवन । प्रयाणकाळीं ‘सोऽहं’-स्मरण ।
घडो आवडी परमार्थ चिंतन । आशार्वचन तुम्हांसी हे ॥६४/८॥
    
अशा जीवनाचा अनुभव मिळेल असा आशिर्वाद स्वामी देतात.
श्री स्वामींसारख्या साक्षात्कारी सिद्ध संताचा आशिर्वाद म्हणजे परमात्म्याचं आश्वासन. काळ्या दगडावरची पांढरी रेघ. त्यांच्या पावन चरणी नतमस्तक होऊन, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर अग्रेसर होऊंया. 
             ‘सोऽहं’हंसावतार सच्चिदानंद सद्गुरू 
            श्रीस्वामी स्वरूपानंद महाराज की जय.

ranadesuresh@gmail.com
09823356958                                 माधव रानडे