15 Dec 2018 “ सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस)
यांच्या साहित्यातील
( चाकोरीबाहेरचे )
मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश :-१३)
आपल्या सत्- स्वरूपाचे आकलन करून घेण्याची उत्कट जिज्ञासा उरी बाळगणाऱ्या व त्यासाठी गुरुपदिष्ट मार्गावर चालत ‘ याचि देहीं याचि डोळां ’ ब्रह्मपद प्राप्त करणाऱ्या सद्गुरू स्वामी स्वरुपानंद यांचं जीवन चरित्र कठोपनिषद व मुण्डकोनिषद दोन्हीमधील खालील मूलभूत चिंतनाची, आठवण करुन देतात.
“ नायमात्मा प्रवचनेन लभ्य: न मेधया न बहुना श्रुतेन ।
यमेवैष वृणुते तेन लभ्य: तस्यैष आत्मा विवृणुते तनूं स्वाम् ”॥ (कठोपनिषद १.२.२३ व मुंण्डक ३.२.३)
माझा उपनिषदांचा अभ्यास नाही, पण जी काही थोडी तोंडओळख आहे, त्यावरुन मला वाटतं की, श्रीस्वामींच्या साहित्यातून मला प्रतीत होत असलेल्या ज्या प्रस्तावित “ सोऽहं-हंसोपनिषद ”या संकलनाचा मागोवा मी घेत आहे त्याचा आशय व भूमिका ही “मुंण्डक” उपनिषदाच्या सारखी व “सर्वं खल्विदं ब्रह्म ” बोधाप्रत नेणारी आहे.
अद्वयभक्तीमुळे द्वैताद्वैता पलिकडे गेलेल्या, आत्म-तृप्त स्वामींचा,एका सिद्धाचा, जीवनमुक्ताचा, सत्यदर्शनचा सोहळा त्यांत शब्दरुप झालेला आहे. सत्याचं दर्शन घडावे हेच जीवनाचें ध्येय. त्यात मन समर्पून, ध्येयांत तन्मय झालेल्या सत्कवीचे, हे अंन्त:त्स्फूर्त बोल आहेत.
“अमृतधारा” संग्रहात ‘सत्य’ शब्द अनेक साक्यांत आला आहे, त्यांतील काही आपण इथे पाहू -
“ ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ प्रत्यय ऋषिवर्यांचा
उपनिषद्मिषें करि दुंदुभिरव शाश्वत आत्मसुखाचा”।६४।
“ जरी सत्य अव्यक्त एक तें वाड्.मनोमतीपरतें ।व्यक्तांतून चि सदा होतसे तदाविष्कृति येथें ”॥७०॥
“ पूर्ण सत्य तें प्रसन्न-अन्त:स्फूर्तमात्र काव्यांत । वास्तव्य करी, व्यवहारीं न च तथैव इतिहासांत ”॥७२॥
“ जगीं जन्मुनी अभिनव-जीवन-सत्कविवर होईन
स्वानुभवान्त:स्फूर्त नवरसीं सत्य-काव्य निर्मीन ” ॥१॥
उपनिषदांद्वारे शाश्वत आत्मसुखाची गर्जना करणाऱ्या ऋषिवर्यांनी ब्रह्माचं स्वरुप लक्षण सांगितांना लिहिलंय की अनन्त, आणि ज्ञान-रूप, ब्रह्म हे अंतिम सत्य आहे.
ते सत्य स्वामींनी त्यांच्या काव्यातून व्यक्त केलं आहे -
मध्ययुगीन कालात ज्ञान आणि भक्ती यांत भेद कल्पिला गेला.वस्तुत: परमज्ञान व पराभक्ती या एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत.परमप्रेमरूपा ज्ञानभक्ती व अपरोक्षानुभव स्वरूप परमज्ञान यांचा दर्जा एकच. स्वामी ठाम सांगतात
“ भक्त तोचि ज्ञानी ।ज्ञानी तो चि भक्त । जाणावा सिद्धान्त । स्वामी म्हणे ॥ संजीवनी गाथा ॥४०/४ ” कारण “ दोहींचा भावार्थ सारिखा तत्वतां ।
एक चि हरि-सत्ता सर्वां ठायीं ॥”
मुण्डकोपनिषदामध्ये प्रामुख्याने प्रणवोपासना सांगितली आहे, तशी स्वामींच्या स्वतंत्र साहित्यांत ‘सोऽहं साधना’
स्वर्ग प्राप्तीच्या हेतूने सकाम कर्मकांड व पुरोहिती संस्कृतीच्या काल्पनिक भीतीचें प्रस्थ माजलेले असतांनां ब्रह्मविद्येच्या अज्ञानाचं निराकरण करून समाजाला योग्य अध्यात्मिक प्रेरणा देणं स्वामींना आवश्यक वाटलं.
“ पुण्य-पातक स्वर्ग-नरक ह्या शुष्क कल्पना मात्र।भय दावुनि सत्पथा न्यावया प्रसृत जरी सर्वत्र ”॥अ.धा.८६॥
“ काय भय करी खरी उन्नति प्रेमळता किंवा ती।निर्णय दिधला आत्मकृतींनीं जगती प्रेमळ संतीं ”॥अ.धा.८७॥
“ ‘असतो मा सद् गमय’ उपनिषद्वाणी दर्षवि ऋषिची । निज-उन्नतिची स्वाभाविक जी वृत्ति जीवमात्राची”।७१॥
म्हणून व प्रत्येक जीवमात्राची आत्मज्ञानाची स्वाभाविक वृत्ति ध्यानांत ठेऊन श्रीस्वामींनी प्रेमानं व निजआचरणातून ‘सोऽहं’ च्या सहज साधनेची प्रेरणा सर्वांना दिली.
अखंड ‘सोऽहं-स्मरण’, आणि सततचा ‘सोऽहं-भाव’ हा
“ सोऽहं-हंसोपनिषद ” चा आत्मा आहे, प्राण आहे. व श्रद्धा आणि शुचिर्भूति याशिवाय काही बंधने नसल्याने नवीन पिढीतील कोणालाही आचरण्यास सरळ व सोपा. सोऽहं साधने संबंधीच्या गैरसमजांमुळे भ्रांतचित्त झालेल्या साधकांच्या मनातील शंका दूर करणें याचा उद्देश आहे.
श्री स्वामींसारख्या ज्ञानीभक्तांचे आत्मानंदमग्न लौकिक बाह्यजीवन, आणि त्यांच्या साक्या व अभंगांतून प्रतीत होणारी अंतर्यामी चालणारी परमात्म्याची आत्म-क्रीडा-
“ विनावैखरी होत अंतरीं सोऽहं शब्दोच्चार ।
सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैतीं व्यापार ”।१४९।
“ नाम रूप कुळ सांडोनी सकळ ।
झालों मी केवळ आत्मरूप ॥
भेद-भाव मळ गेला अमंगळ ।
झालों मी निर्मळ आत्मरूप ” ॥सं.गा. ४३/२-३॥
“मुण्डका” तील पुढील श्लोकांची आठवण करून देतात-
“ आत्मक्रीड आत्मरति: क्रियावानेष ब्रह्मविदां वरिष्ठ: ”
“ यथा नद्या: स्यन्दमाना: समुद्रेऽस्तं गच्छन्ति नामरूपे
विहाय।तथा विद्वान् नामरूपाद्विमुक्त:
परात्परं पुरषमुपैति दिव्यम् ”
मुण्डकोपनिषद - (३.१.४) व (३.२.८)
तारखेनं आज श्रीस्वामींचा जन्मोत्सव त्या निमित्ताने
“ सोऽहं-हंसोपनिषद ” वरील चिंतन-मनन-लेखन परत सुरु करण्याच्या अंत:प्रेरणेतून उमललेली ही शब्दसुमनं सद्गुरूचरणी सर्वभावे समर्पित.
“ ॐ रामकृष्ण हरि ”