“सोऽहं-हंसोपनिषद ”
अर्थात
अर्थात
श्रीस्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील
पहिले उपनिषद
( क्रमश:-३)
दृश्य विश्व, परमात्मा आणि व्यक्ति यांचा किंवा, व्यष्टि-समष्टि यांत परस्पर संबंध काय याबाबतीत उत्तरकालीन वेदांन्त विचारांत वेगवेगळ्या संकल्पना उदयाला आल्या.
श्री ज्ञानदेवांनी मात्र,व्यष्टि-समष्टि मध्ये नित्य ऐक्यस्थिति आहे व विश्वाचें आदितत्व प्रणव असून त्याचा वाचक ॐ आहे,असा श्रुतीशी संवादी दृष्टीकोन स्वीकारला. सर्व श्वासधारक प्राणी “त्या मूळ तत्वाच्या” व्यष्टिसंकल्पानें मूळ समष्टि तत्वाशी एकरूप असल्याचा, व संपूर्ण विश्व त्याचाच आविष्कार असल्याचा सिद्धान्त,‘ चिद्विलासवाद ’, त्यांनी त्यांच्या सर्व साहित्यांतून स्पष्टपणे मांडला. जसें- “ माझेया विस्तारलेंपणा नांवें । हें जगचि नोहे आघवें ।--- तैसा मज एकाचा विस्तारू । तें हें जग ।। ज्ञाने९/६४-६५“ प्रकाशु तो प्रकाशकी । यांसी न वंचे घेई चुकी । म्हणोनि जग । असिकी वस्तुप्रभा ” ।। “ विभाति यस्य भासा । सर्वमिदम् हा ऐसा । श्रुति काय वायसा । ढेकर देती ”।। अमृता. ७/२८९-९० ।।“----। प्रकाशें तें संवित्ति । जगदाकारें ” ।।“--। तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण “---। तेंवि विश्वस्फूर्ति स्फुरे । स्फूर्तिचि हे ” ।। चांग.पा.१३-१४-१५, ज्ञानेश्वर माऊलींनी ‘पंथराज’ च्या विवरणांतून ‘ सोऽहं ’ साधनेचं अंतरंगही उलगडलं.
ईश्वरी संकल्पाने सुमारे ६५० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृति झाली. प्रति ज्ञानेश्वर, श्रीस्वामींनीं, माऊली प्रणीत चिद्विलास दृष्टी, त्यांच्या साहित्यांतून प्रचलित मराठीत सोप्या भाषेत पुनरुज्जीवित केली. बद्ध /अज्ञानी व्यक्तींची विश्वदृष्टि ही सहाजिकच, ज्ञानेंद्रियप्रामाण्य, इंद्रियगोचर असते. पण श्रीस्वामींसारख्या जीवन्मुक्ताचे बाबतीत, शाब्दिक ज्ञान वा अज्ञान व ज्ञानेंद्रिय प्रचीतीशी निगडीत विज्ञान, या सर्वच सीमा ओलांडल्या जातात. श्रीस्वामी लिहितात “ झुंज कशाचें कौतुक साचें हे जीवन्मुक्ताचें । तो विश्वाचे मूळ जाणुनि ब्रम्हानंदीं नाचे ” ।।“ चित् शक्तीचा गभीर सागर जगद्रूप हा फेन । मी स्वानुभवे सत्य नित्य या तत्वज्ञानीं जगेन ” ।।
विश्वाची समग्रता ही श्रीस्वामींची स्वानुभवाधिष्ठित प्रज्ञाप्रचीती आहे. तर जनीं जनार्दन, विश्वीं विश्वंभर हा साक्षात्कार आहे. “ गेलें मी-तूं-पण एकला अभिन्न।जनीं जनार्दन प्रकटला ।। स्वामी म्हणे मज ऐसा साक्षात्कार । जनीं जनार्दन प्रकटला ” ।। श्रीस्वामींचे पुढील उद्गार त्यांच्या स्वसंवेद्य आत्मप्रचीतीची साक्ष देतात. “ स्वामी म्हणे झालो । मी चि चराचर।नांदतो साचार । एकलाचि ”।। सत्यान्वेषणासाठीं लोक-सेवा व्रत-रत स्वामींचे बाबतींत, “सत्याचें दर्शन घडावे संपूर्ण।ध्येय हे लक्षून जीवनाचे ।। प्रेम-अहिंसेचें घवोनियां व्रत लोक-सेवा-रत राहे सदा” ।। आत्मकृपा झाली व कठ तसेंच मुण्डक उनिषदांतील “ नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन।यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनूं स्वाम् ”।। या श्रुती उक्तीचा पुन:प्रत्यय आला. “ काय न झाली अजुनि माउली मत्कर्माची राख । दाविं पाउलें भक्तवत्सले, ब्रीद आपुलें राख ”।। असा प्रेमोत्कटतेचा टाहो फोडणाऱ्या, स्वामींच्या निरागस मोकळ्या मनाची निवड करून (वृणुते) आत्मा निजरूपानं प्रकटला (विवृणुते). खऱ्या ‘मी’ च्या शोधांतून स्वामींनां ‘स्वरूपाचा’ बोध झाला. कविहृदय स्वामींनीं त्यांचा अनुभव शब्दबद्ध केला “ ‘मी मी’ म्हणसी परी जाणसी काय खरा ‘मी’ कोण । असें ‘ ‘काय’ मी ‘मन’ ‘बुद्धी’ वा ‘प्राण’ ? पहा निरखोन ।। निष्णात शिक्षकानं अवघड प्रमेय सोपे करून सांगावं, तसंच स्वामींनी समजावले“ प्राण बुद्धी मन काया माझी परि मी त्यांचा नाहीं । तींहि नव्हती माझीं कैसें लीला कौतुक पाहीं !”आणि यांत गूढ काहींच नाहीं “गूढ न काहीं येथ सर्वथा उघड अर्थ वाक्याचा । जाण चराचरिं भरुनि राहिलों मीच एकला साचा ” “सोऽहं” साधनेला पायाभूत, “ सर्वं खल्विदं ब्रह्म ”या महावाक्याचा असा सोपा अर्थ त्यांनी दिला.
वास्तवाच्या आकलनासाठीं, संदर्भाच्या चौकटी व गृहीतकांच्या पांगुळगाड्याचा त्याग करून, आत्म-बळावर अनंतात झेप घेण्याची आवश्यकता असते. श्रीस्वामींनी नेमके हेंच केलें “ ढोल फोडिला झूल-घुंगुरां दिलें झुगारुनि दूर । ‘ सोऽहं - भावें ’ उडी घेतली अनन्तांत चौखूर ”।। हा ढोल होता रूढींचा,परंपरागत प्रचलित कर्मकांडाचा, झूल होती वेदांताच्या थोतांडाची, घुंगरू होते विषयांचे, आणि “ मी-पणा ” च्या भ्रामक कल्पनांनीं फुगलेला देहरूपी नंदीबैल पुढे-मागे पाउलें टाकित, त्या तालावर मुंडके हलवत होता. देहाहंकाराशी निगडीत अशा सर्व भाव-भावनांची होळी करून, राख- रांगोळी करून, स्वामींनीं , ‘सोऽहं’ भावाने, माउलीला अनन्यभावानें साद घातली. साधी ठेच लागली तरी आपल्या तोंडून ‘आई’ ग असा सहजोद्गार निघतो. स्वामींच्या बाबतींत तर त्यांचे प्राण पणाला लागले होते. जगन्मातेनही आपल्या लाडक्या भक्ताला निराश केलं नाही “ अनन्यभावें कड्यावरूनि जैं उडी घेतली खाली । भक्त-वत्सला माउली मला फुलासारखें झेली ”।। एव्हढंच नव्हे तर “ निढळावरती नीट लाउनी आत्म-स्मृतिची तीट । भक्ति- सुखाचा मुखी घालिते साखरघांस अवीट ”।। श्रीस्वामींनां त्यांच्या नवजीवनांत साक्षात् जगन्माउलीनेंच “आत्म-स्मृतिची” तीट लावल्याने त्यांच्या उक्तींना श्रुतीचा/उपनिषदाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
श्रीस्वामींनीं ‘सोऽहं’ हा ध्वनि व सहज-ध्वनि असल्याचे, ठामपणें आणि वारंवार सांगितले आहे. जसे “अन्तरांतुनी सहज-ध्वनि तो निघतो सोऽहं सोऽहम् । विनाश्रवण ऐकतां तोषतो माझा आत्माराम ” ।। किंवा “ नाभीपासूनि ब्रह्मरंध्रांत । सोऽहं ध्वनि असे खेळत ”।। “शब्दाविण ध्वनि करोनि श्रवण । ठेवीं अनुसंधान आत्म-रूपीं ”।। “ सोऽहं मंत्र गुज सांगितलें कानीं । शब्दाविण ध्वनि ऐकविला ”।। “कैसा शब्दाविण होतो ‘सोऽहं-ध्वनि’ । घेई विचारोनी संतांपासीं ”।। प्रणवाची शब्द आणि ध्वनी ही दोन रूपे आहेत. शब्दरूप प्रणव म्हणजे शब्दसृष्टी किंवा भाषा व्यवहार होय. पण, ‘सोऽहं’ ही शब्दसाधना नसून तो अंतर्यामी उठणारा अनाहत प्रणवध्वनी आहे.प्रणववाच्य परमात्मात्मतत्वाशी तद्रूपभाव ही ‘सोऽहं’ भाव उपासना आहे. त्या दिव्यनाद श्रवणांत चित्तलय होऊन निर्वृत्तिक उन्मनी स्थिती येते परमानंद प्राप्त होतो. या संदर्भांत श्रीस्वामींचे पुढील महत्त्वपूर्ण शब्द पहा- "प्राणाचा प्रणव मनाचें उन्मन । होतां समाधान स्वामी म्हणे ”। तसेच, “ होतां सोऽहं-भजनीं तन्मय । एकवटोनि ज्ञाता ज्ञेय । येई आत्मसुखाचा प्रत्यय । अतींद्रिय स्वभावें जें ।। नाद- श्रवण प्रकाश-दर्शन । तेथें श्रोता द्रष्टा कोण । तो आत्माचि मी हें ओळखून । तदनुसंधान राखावें ।। सदा स्व-रूपानुसंधान । हेचि भक्ति हेंचि ज्ञान । तेणें तुटोनि कर्म-बंधन । परम समाधान प्राप्त होय ।।
अल्पाक्षररमणीय, मितभाषी स्वामी, अधोरेखित या एका कडव्यांत सगळा परमार्थ सांगतात. भक्ति म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, आणि कर्म-बंधनांतून मुक्ति मिळून परम समाधान कसं प्राप्त होईल.
सद्गुरू गणेशनाथांच्या आज्ञेनुसार, स्वामींनीं सदा सर्वकाळ ज्ञानेश्वरीचेच श्रवण, मनन, चिंतन केले.आणि फलस्वरूप माऊलींचे तत्वज्ञान सुगम सोपं केलं. श्रीज्ञानेश्वरी गौरवांत श्रीस्वामी लिहितात की श्रीज्ञानेश्वरी अमृतगंगा आहे. त्यांत भक्तिभावानं अवगाहन केल्यामुळे चमत्कार होतो- “जिवा-शिवाची होता भेटी । मावळोनि ज्ञाता-ज्ञेयादि त्रिपुटी ।प्रकटे सोऽहं भाव प्रतीती।उरे शेवटीं ज्ञप्तिमात्र”
भक्तवत्सल श्रीस्वामींनीं, हाच अनुभव तुम्हा आम्हाला देण्यासाठी “ अभंग-ज्ञानेश्वरी ” च्या रूपानं नाव उभारली, “भावार्थ-गीता” सारखा निष्णात नावाडी दिला. व सोबत “संजीवनी-गाथा”, “स्वरूप-पत्र-मंजुषा” सारखे मार्गदर्शक सवंगडी.
श्रीस्वामींनीं त्यांच्या साहित्यांतून, ‘ सोऽहं ’ साधनेबद्दलचा बागुलबोवा दूर करून ती सर्वसामान्यांच्या आवाक्यांत / आटोक्यात असल्याचे प्रतिपादन करून, प्रस्थापित कल्पनांचे बंड मोडीत एक प्रकारे सीमोल्लंघन केलं आहे.
आज विजयादशमीच्या पावन पर्वावर श्रीसद्गुरूंना वंदन करून, ही लेखन सेवा त्यांचे चरणीं अर्पण करतो.
९८२३३५६९५८ माधव रानडे.
ranadesuresh@gmail.com