The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Friday, July 21, 2017

 “सोऽहं-हंसोपनिषद ” 
अर्थात 
श्री स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या साहित्यांतील 
( चाकोरीबाहेरचे ) मराठीतील पहिले उपनिषद
( क्रमश:- १ )


१९३४ साली एका मामुली आजाराच्या निमित्ताने जेव्हा साक्षात मृत्यू समोर उभा ठाकला तेव्हा स्वामींसाठीं गुरुपदिष्ट “सोऽहं” हा तारक मंत्र ठरला, त्याच 'सोsहं' भजनाच्या, सोsहंस्मरणाच्या, आधारे, स्वामींच्या जीवाची शिवाशी भेट झाली,त्रिपुटीचा अंत झाला. त्यांनीं “आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां ” चा साक्षात् अनुभव घेतला. मरण भयावर मात करीत ते निर्भय झाले, व अद्वय भक्तिसुखांत आकंठ डुंबत, " बुडतां अमृती मरण तरी का संभवेल कल्पांती '' असा अमरत्वाचा साक्षात्कारी अनुभव त्यांनी घेतला.
समग्र अस्तित्वाच्या मुळाशी केवळ एक “ आत्मरूप ” आहे या मूलभूत सत्याचा, अपरोक्ष अनुभव, श्री स्वामीनीं, २१ जुलै १९३४, शुक्रवारच्या रात्री अनुभूतीच्या अंगाने घेतला. ते लिहितात --
 “ शुक्ल पक्ष भृगु-वासर रात्रौ आषाढींची नवमी ।  
अठराशें छप्पन्न शकाब्दीं मृत्यु पावलों आम्ही"अधा२७
वरील साकी, ईशावास्योपनिषदांतील खालील श्लोकाच्या-
  “ सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयं सह
   विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्याऽमृतमश्नुते " ईशा.१४
संदर्भांत वाचली असतां,लक्षांत येते- कीं “ आपुलें मरण पाहिले म्यां डोळां ” हा आपल्या देह-भावाच्या मरणाचा   "अनुपम्य सोहळा ” पाहाणारे श्री स्वामीं सारखे साक्षात्कारी संतच, खऱ्या अर्थानें अमरत्व अनुभवतात.
“ विनाशेन मृत्युं तीर्त्वा ”, “ संभूत्याऽमृतमश्नुते ” मृत्यूची भीती दूर झाल्यानेच, वस्तुत: नव्याने जन्म (संभूति) होतो, नवजीवन सुरूं होते.
म्हणूनच श्री स्वामींच्या तोंडून सहजोद्गार निघाले- 
जगीं जन्मुनी अभिनव - जीवन - सत्कविवर होईन
स्वानुभवान्त:स्फूर्त नवरसीं सत्य-काव्य निर्मीन"अधा१
आपल्या या अभिनव - जीवनाची दिशा कोणती असावी व आपल्याला काय कार्य करावयाचे याबद्दल श्री स्वामी नि:संदेह असल्याचे त्यांच्या “ अमृतधारा ” मधील अनेक साक्यांमधून स्पष्ट होते.
 “ पाठवी येथें ती आम्हातें मातेची नवलाई ।
चाकर आम्ही दिधल्या कामीं न करूं कधिं कुचराई ”।।
अ.धा. १५९ ।।
ते नेमून दिलेलं काम म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रमुख तीन ग्रंथांचें  प्रचलित मराठीत रूपांतर. भाषेच्या दुर्बोधतेमुळे, पुढील पिढ्यांसाठी लुप्तप्राय होत चाललेल्या, श्री ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकट केलेल्या ब्रह्मरसाला, ब्रह्मानंदलहरींना, श्री स्वामींनीं त्यांच्या साहित्यसेवेतून, अभंग-रूपांत पुन:प्रवाहित केलं.
पण जग्नमातेनं नेमून दिलेल्या कामाची पूर्व कल्पना दृष्ट्या स्वामींना असल्याचे वरील साकीवरून स्पष्ट होते. एव्हढंच नव्हे तर त्यांनीं ते अभंग-रूप किती अनुपम अभिनव पद्धतीनं प्रस्तुत केलंय याचाही आपल्याला प्रत्यय आला आहे.
मात्र “ सोऽहं-हंसोपनिषद ” हे, सोऽहं-हंसावतार, सच्चिदानंद सद्गुरू, स्वामी स्वरूपानंद (पांवस) यांच्या सर्व साहित्यांतून,मला भावलेलं,मी निवडून संकलन करण्याचे योजलेलं  विसाव्या शतकांतील चाकोरी बाहेरचं असं आगळं वेगळं मराठीतील पहिले-उपनिषद असावें.
मी, मला, किंवा योजलेलं असं लिहिण्याचं कारण हे कीं सद्गुरूंच्या प्रेरणेंतून माझ्या मनांत उद्भवलेले हे वैयक्तिक विचार आहेत व सध्या तरी कल्पनारूपच आहेत. न पटेल त्यांनीं सोडून द्यावे. यांत कोणाला बदल करावा,वा भर टाकावी वाटल्यास मला त्यांत आनंदच वाटेल.
झपाटयानं बदलणाऱ्या समाज-मनाच्या आकलनांतून, एका साक्षात्कारी द्रष्ट्या संताच्या, चिंतन-मननांतून निघालेलं हें बोधामृत आहे.
देश यंत्रयुगाच्या उंबरठयावर असतांनाचं द्रष्ट्या, श्री स्वरूपानंद स्वामींचे तत्वज्ञान, हे सांप्रत संजीवनी ठरणारं आहे. स्वामी म्हणतात-     
       “ बाह्य सुखालागीं धांवतो हा जीव । यंत्र-युगें हांव वाढविली ।अंतरींच्या सुखा होउनी पारखा । दुःखाचिया नरकामाजीं पडे ।।मायिक नश्वर विषयसुखास्तव माजविले बडिवारे  आत्म-देव अव्हेरुनि आम्ही देहाचे देव्हारे ।।
केवळ देहाचेच चोचले पुरविणाऱ्या, व त्यांतच इतिकर्तव्यता मानणाऱ्या भोगवादी संस्कृतीची कीड समाजाला पोखरून टाकीत असल्याचे भान श्री स्वामींनां होते.
खालावत चाललेली संतभूमिका, अभावाने दिसणारे संतकार्य, आणि त्याचबरोबर परमार्थ क्षेत्रांतील  वाढता दांभिकपणा आणि व्यापारीकरण याचे दुःख वाटून त्यांचें मन व्यथित झाल्यामुळे खंत वाटून ते म्हणतात-
       पुरे पुस्तकी विद्या ती कीं अवधी पोपटपंची ।----
       स्वानुभवाविण वेदान्ताची पोपटपंची वायां ।----
        परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती ।-----                  देतसे व्याख्यान सांगे ब्रम्हज्ञान ।
                    पोटीं अभिमान पांडित्याचा ।------
     “ गतानुगतिकत्वाची ऐसी पाहुनियां जन-रीति ।
        विटलें मन जाउनि बैसलें हृदयाच्या एकान्तीं ।
“ लोकां सांगे ब्रह्मज्ञान पण आपण कोरडे पाषाण ” अशा बळावत चाललेल्या वृत्तीचा त्यांनां खेद वाटे.
‘लोक कल्याण’ व ‘जगदुद्धार’ हा स्वामींच्या सर्व लेखनाचा,शिकवणीचा पाया आहे ‘श्री स्वामीजींची सर्वांत प्रमुख शिकवण म्हणजे .." सोऽहं ”
यत्र तत्र सर्वत्र, सोऽहं चं संगीत अनुभवून ते तितक्याच समर्थपणे तुम्हा-आम्हासमोर मांडणारे  सोऽहं-हंसारूढ स्वरूपानंद स्वामींसारखे अनुभवसंपन्न साक्षात्कारी संत दिसतानां देहधारी दिसले तरी प्रत्यक्षात परब्रह्मच!
खरं सुख हे अमाप पैसै खर्च करून एकत्र केलेल्या अनेक वस्तुं मध्यें / वस्तूंपासून नसून, सर्वांच्या हृदयदेशीं वास करणाऱ्या त्या एकमेवाद्वितीय सहज-स्फुरणरूप वस्तूच्या अनुसंधानांत आहे.
सोऽहं साधनेचा सहज सोपा मार्ग सांगताना, स्वामीजी नेमके हेच सांगतात. खरं तर त्यांच्या नावांतच ही शिकवण एकवटली आहे: ‘स्व’’रूप’’आनंद’!
स्वतःचे रूप, स्वरूप, आत्मरूप ओळखणे आणि निष्ठेने कर्म करत असतानाही फळाचा मोह न ठेवणे, ही खरी समाधानाची गुरुकिल्ली!
यंत्र-युगामुळें बळावलेल्या,व भविष्यांत फोफावत जाणाऱ्या सामाजिक विषमतेची चाहूल लागल्यानें ते कमालीचे अस्वस्थ होते. ते म्हणतात-
  “ समानता मानव-धर्माचा नसेल भक्कम पाया ।
    तरी इमारत यंत्र-युगाची उठेल मनुजा खाया ” ।।
यंत्रें ही दुधारी हत्यारे आहेत याची जाणीव असल्यामुळे, ते लिहितात-
  “ अंतरीं सद्भाव । असेल जागृत । 
तरी यंत्रें हित । स्वामी म्हणें ”।।
श्री स्वामींची पुढील साकी यावर प्रकाश टाकते--
   “ तो चि महात्मा, ती च हिंद-भू, तें चि स्वातंत्र्य-रण ।
      दृष्टिकोण तो मात्र बदलला येतां चि मला मरण ”।।
वरील साकीतींल बदलेला दृष्टिकोण हें श्री स्वामींच्या कालातीत तत्वज्ञानाचं इंगित आहे, मर्म आहे. त्यासाठीं आवश्यक आहे मरण,
देह-अहंकाराचं मरण. जें स्वामींनीं अनुभवलं. म्हणून ते म्हणतात--
“ पूर्वीं तुम्ही आम्ही एकत्र बैसोन । 
केलें सोऽहं ध्यान काहीं काल ।।
   आतां रात्रंदिन सोऽहं ध्यानाविण । 
नाहींच स्फुरण मज दुजें ”  ।।
“ सोऽहंभाव प्रकट होतां । अहंकार नुरे चि तत्वतां ” ।। होतां स्वरूपाची ओळखण । सहज संपते जन्म-मरण ”
अंतरीं सद्भाव जागृत करण्याचा, दुष्टांची दुष्ट खोडी संपवण्याचा, शस्त्राविण दुष्टांचा प्रतिकार करण्याचा श्री स्वामींचा कानमंत्र आहे सोऽहं मंत्र.           
श्रीस्वामी हे अभिजात कवित्वाचे, उपजत वरदान लाभलेल्या, ज्ञानी भक्तांच्या, दुर्मिळ श्रेणीतील संत असल्यामुळे त्यांचे बोल ---
           “ साच आणि मवाळ । मितुले आणि रसाळ
                     बोल जैसे कल्लोळ।अमृताचे ”।।
असे आहेत. त्यामुळेंच “ अमृतधारे ” तील सोऽहं बद्दलच्या साक्या, ह्या   “ सोऽहं ” हा समस्त मानव जातीसाठी प्राणमंत्र असल्याचे सांगणाऱ्या अनुभूतीच्या अमृतधारा झाल्या आहेत.
   “ यावत् सावध तावत् सोऽहं स्मरण अखंडित जाण ।
          अढळ भाव सर्वथा मग राहो जावो प्राण ” ।।
स्वामींचे स्वानुभवान्तस्फूर्त शब्द आज समाजासाठी तारक मंत्र ठरणार आहेत.
“ संजीवनी गाथेतील ” सोऽहं संबंधीचे अभंग, हे एका सोऽहं सिद्धाचे, अनुभवाचे बोल सहज, सरळ, सोप्या भाषेत सोऽहं ची महति उलगडतात.
                 “ बैसोनि एकांति करी “सोऽहं ” ध्यान ।
                        तेणे तुझे मन स्थिरावेल ” ।।-----
तर “ स्वरूप-पत्र मंजुषा ” तील सोऽहं बद्दलचे उल्लेख हे सद्गुरू व शिष्य भक्त / वा साधकांबरोबरील प्रसंगोपात् संवादरूपानं “सोऽहं ” साधनेची  प्रक्रिया समजावतात. जसं-
 “ नाभीपासुनि ब्रह्मरंध्रांत । सोऽहं ध्वनि असे खेळत ।
   तेथे साक्षेपे देउनि चित्त । रहावे निवांत धडिघडि ”।।
     घडिघडी करावा विवेक । देहदि प्रपंच मायिक ।    सत्य नित्य शाश्वत एक | असे निःशंक आत्मरूप ।|  
 आत्मरूपी दॄढ विश्वास । आत्माचि मी हा निदिध्यास । साक्षित्वे साहोनि सुखदुःखास करावा अभ्यास
नित्यनेमें  इथे हे लक्षांत ठेवलं पाहिजे कीं, या साऱ्या साहित्याचं स्वरूप हे श्रीस्वामींकडून त्यांचें ईश्वर नियोजित कार्य होत असतांना घडलेली अनैच्छिक सहज-निर्मिती आहे.
माझ्या कल्पनेने त्यांची निवड व संकलन करून भविष्यांत सोहं-हंसोपनिषदा च्या रूपानं प्रस्तुत करण्याचे मनोगत आहे.
आज २१ जुलैलाच याचा शुभारंभ करतांना विशेष आनंद होत आहे.  
नियोजित “ सोऽहं-हंसोपनिषदा ” चा शांतिपाठ म्हणून वरप्रार्थनेतील पुढील साकी निवडली आहे-
                “ नर-नारी हरीरूप दिसो बाहेर अंतरीं ।
                रामकृष्ण हरि मंत्र उच्चारो मम वैखरी ” ।।

माधव रानडे 
09823356958
ranadesuresh@gmail.com