श्री स्वामींच्या “ अमृतधारा ”
भावार्थ विवरण (४)
आज १५ आॅगस्ट, तारखेनं श्री स्वामींची पुण्यतिथी. या दिवशीं त्यांचे पुण्यस्मरण करून त्यांनीं पुढील पिढ्यांसाठी ठेवलेल्या अमूल्य विचारधनाचं चिंतन करणं विशेष आनंद देतं.
महासमाधीसाठीं श्री स्वामींनीं १५ आॅगस्ट ही देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची तारीख निवडली यामधें सगुणरूपाच्या
"देहीच विदेही" वा “मुक्ता”वस्थेत विहरत असलेले श्रीस्वामी सगुणातील देहबंधनसुद्धा त्यागून, देहोपचाराच्या परावलम्बनाच्या पारतंत्र्यातुन स्वतंत्र म्हणजे सर्वतोपरी मुक्त झाले, हा संदेश दिला का ? तेच जाणोत. पण महासमाधीपूर्वी, श्री स्वामींनीं त्यांच्या चैतन्य स्वरूपाबद्दल उघड प्रतिज्ञोत्तर केले होते ते सर्वश्रृत आहे.
या लेखाच्या सुरवातीला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. ती अशी की, पारमार्थिक चिंतन / अध्यात्मिक शंका यासाठीं, श्री स्वामींच्या चैतन्य लहरींशी सहस्पंदित ( Resonate ) झाल्यास, आपल्याला काय करावे/वाचावे याचे संकेत मिळतात. किंबहुना असे संकेत प्राय: माझ्या लेखनाचा प्रेरणास्रोत असतात. याचबरोबर हेही स्पष्ट करतो, की ही, माझी काय किंवा इतर कोणाही व्यक्तीची मक्तेदारी असू किंवा होऊं शकत नाही. जो कोणी श्रद्धेनं अशा लहरींशी सहस्पंदित ( Resonate ) होईल त्यालाही असा अनुभव येऊं शकेल, असं माझं मत आहे.
पण ग्रहण माध्यमाच्या /केंद्राच्या कुवतीवर/क्षमतेवर संकेतांची विश्वसनीयता/अवलंबनियता असते हे ही लक्षांत ठेवणं तेवढंच आवश्यक आहे.
वैयक्तिक रीत्या मला बऱ्याच वेळां असे अनुभव आले असले तरी वाचकांनां हा फक्त/केवळ भ्रम आहे असं वाटूं नये यासाठी एक उदाहरण देतो.
“ स्वरूप ज्ञानेश्वरी ” या श्री स्वामींच्या हस्ताक्षरांतील ज्ञानेश्वरीतील गी.श्लोक १८/७६ च्या पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द ‘संवादमिदमद्भुतम’ असा आहे. आत्तां मिळणाऱ्या कोणत्याही गीता प्रतींत हाच शब्द ‘संवादमिममद्भुतम’ असाच आढळतो.
श्री स्वामींच्या / सद्गुरूमाऊलीच्या हातून मूळ प्रतीची नक्कल करतांना चूक कालत्रयी घडणार नाही, अशी खात्री / अढळ श्रद्धा असल्यामुळे मी अनेक संस्कृत पंडितांना/तज्ञांना ‘ इदम् ‘ व ‘ इमम् ‘ पैकीं कोणतं रूप ग्राह्य व बरोबर याबद्दल विचारले असतां सर्वानुमतें ‘ इमम् ’ हेंच रूप बरोबर असल्याचा कौल मिळाला. शेवटी मी श्री स्वामींनाच शरण जाऊन खुलासा करायला विनविल्यावर अखेरचं पान पहाण्याचा संकेत मिळाला. श्री स्वामींच्या शिस्तबद्ध स्वभावाला अनुसरून, त्यांनी ही नक्कल ज्ञानेश्वरीच्या कोणत्या प्रतीवरून केली याचा स्पष्ट उल्लेख अखेरचं पानावर मिळाला. मग त्यांत उल्लेखिलेल्या , “निर्णयसागर”पाचव्या आवृत्तीचा शोध मी सुरू केला. याही बाबतीत थोड्याच अवधींत गुरूमाऊलींची कृपा झाली, व श्री रामभाऊ लिमये, माझे मेहुणे, यांनीं इ.स.१९१५ ती प्रत काढून दिली. त्यांत तो शब्द ‘संवादमिदमद्भुतम’ असाच आहे. तत्काल खातरजमेसाठीं (Ready Reference) वरील तिन्ही संदर्भांचे फोटो इथे दिले आहेत.
असाच अनुभव श्री स्वामींच्या खोलींतील “ अहमात्मा हें कधींचि विसरों नये ” पाटीबद्दल मला आला.त्याचा खुलासा मी “ शोध ‘मी’ चा.....बोध ‘स्वरूपा’ चा” या श्री स्वामींच्या जन्मशताब्दि सांगता विशेषांकांतील माझ्या लेखांत केला आहे. बुद्धिजीवी या गोष्टींना निव्वळ योगायोग म्हणोत बापडे, मी ही गुरूकृपा व दिव्य संकेत मानतो.
परमोच्च पारमार्थिक भूमिकेवर असतांना, श्रीस्वामींना आलेल्या अनुभवांची उत्स्फूर्त अभिव्यक्ति म्हणजे श्रीस्वामींच्या " अमृतधारा ” .
सर्वच संतांच्या बाबतीत हे शक्य होईल असं नाही. कारण आलेल्या अनुभवांचा तितकाच सक्षम आविष्कार, खास करून, अतींद्रिय अनुभूतींची अभिव्यक्ति तेवढ्याच समर्थपणे करणं हे श्री स्वामी अथवा त्यांच्या सारखेच कवीह्रदय, संतकवीच करू जाणोत.
दृश्य वस्तूंचे ज्ञान हे लौकिक असल्याने, बघणारा/पाहणारा/दृष्टा दृश्याहून निराळा असतो व वेगळेपणानं अनुभवतो. पण ब्रह्म/आत्मा/ईश्वर याचा अनुभव घ्यायचा असेल तर या गोष्टी दृश्य नसल्याने, ज्ञानेंद्रियानी,म्हणजे शब्द,स्पर्श, रूप,रस,गंध यांच्या जाणीवेच्या आधारे त्या ज्ञात होऊं शकत नाहीत,कारण, अदृश्य वस्तूंचे ज्ञान हे अलौकिक असल्याने अतींद्रिय असते त्यामुळं दृष्टा व दृश्य एकरूप झाले तरच हा अनुभव येऊं शकतो.
यासाठीं दोन मार्ग आहेत. पहिला भक्तिमार्ग. यामधे “मी” पणानें जाणणारा/पाहणारा द्रष्टा आणि “ तूं ” पणानें असणारें दृश्य या जोडीमधील द्रष्टा--
“ जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ”।। ज्ञा.१०/११८ या दृढ विश्वासानें दृश्यांत विलीन करणे. हा झाला भक्तिमार्ग. तर जें जें काहीं आपल्याला अनुभवाला येते तें तें तो नाही, ‘नेति, नेति’ असा निश्चय करीत व्यतिरेकाने सर्व दृश्य विलीन/निरास करून केवळ द्रष्टा उरवणं/बाकी ठेवणें हा झाला ज्ञानमार्ग.
बहुतेक ज्ञानीपुरूष व्यतिरेकानें येणाऱ्या आत्मानुभवांतच तृप्ति मानून राहातात. पण श्री स्वामी हे, व्यतिरेकानंतर, “ सर्वं खल्विदं ब्रह्म ”, असा अन्वयाचा, सर्व नामरूपासह एक सच्चिदानंद परमात्माच आहे, असा व्यापक अनुभव घेणाऱ्या, व त्यांतून मिळणाऱ्या अवीट आनंदाचे मुक्त हस्ते दान करणाऱ्या दुर्मिळ संतांपैकी एक आहेत. “लोकविलक्षण । करोनि वर्तन ।
न ह्वावें आपण ।अलौकिक ।।”
तर आत्मज्ञानानं कृतार्थ झालेल्यानीं,
“ डोळस तो जैसा । पुढें चाले नीट ।
दाखवीत वाट । आंधळ्यासी ।।
तैसा निजधर्म । स्वयें आचरोन ।
नेणत्यांलागोन । दाखवावा ।। ”
ह्या माऊलीच्या सांगण्याप्रमाणें नुसतेंच ‘आत्मकल्याण’ नाही तर त्याबरोबरच ‘जगत्कल्याण’ हे श्री स्वामींचे ध्येय होते,ब्रीदवाक्य होतं. व यासाठींच त्यांनीं ‘भक्तिमार्गा’ चा अवलंब केला.
एकदा पुण्याहून पावसला जातांना, मी माझे मामा वै. भाऊराव देसाई यांना ज्ञानेश्वरीवरील एका अभ्यासपूर्ण, सुप्रसिद्ध ग्रंथाविषयी ( ग्रंथ व ग्रंथकर्ता यांचा उल्लेख हेतुपुरस्सर टाळला आहे ) विचारले की तो कधी श्री स्वामींच्या वाचनांत आला का ? तेंव्हा ते म्हणाले कीं, त्यांतील बराच भाग श्री स्वामींनीं वाचून घेतला होता. त्यावर बोलतांना श्रीस्वामी म्हणाले होतें की,
“ संतांचे काम परमार्थ हा "सोपा" करून सांगणे हे असते, क्लिष्ट नव्हे ” .
खरं पाहतां ही काळाचीही गरज होती. जसें संस्कृतभाषेंतील या आत्मज्ञानाला, आत्मविद्येला, माऊलींनी देशी लेणं चढविलं आणि मराठी भाषिक सर्व थरांतील आबाल वृद्धांसाठीं ब्रम्हविद्येचा सुकाळ केला. तद्वतच, शेकडों वर्षांचा कालावधि मधे लोटल्यानें दुर्बोध वाटणारी भाषा, सोपी व सरळ करून तेंच तत्वज्ञान प्रचलित मराठीत मांडणे ही कालानुसार / कालानुरूप भासणारी निकड होती व श्री स्वामींनीं ती पूर्ण केली. कोणतीही गोष्ट सोपी करून सांगणे हे अत्यंत अवघड काम. त्यातकरून तत्वज्ञाना सारखा विषय असेल तर अधिकच मुष्किल. पण सद्गुरंवरील अपार श्रद्धेमुळे त्यांचे कृपाशिर्वाद, अभिजात काव्यगुण व परतत्व स्पर्श यामुळे हे आव्हान श्री स्वामींनीं लीलया पूर्ण केलं.
श्रीस्वामींच्या सर्व साहित्यांतून प्रकट होणाऱ्या त्यांच्या तत्वज्ञानाचं हे मर्म आहे, वर्म आहे, ईंगित आहे, उघड गुपित आहे. कोठेही काही गूढ, क्लिष्ट, अवघड नाही. त्यांनी सांगितलेलं सर्व साधन, नवीन पिढ्यांना, सध्या परवलीचा शब्द बनलेल्या (User friendly ) साधक सुलभ आहे. साक्षात्काराचं स्तोम नाही, संतत्वाचा बडेजाव नाही, शिष्यांचा लवाजमा नाही, गाड्या नाही, राहणं, करणं, जेवणं-खाणं, तप- साधना सारं सारं पारदर्शक.
श्रीस्वामींचे सर्व वाड्मय हे त्यांच्या या दृष्टिकोनाचा प्रत्यय शब्दागणिक देते. ते समजायला अत्यंत सुलभ व सोपे आहे.
उदाहरणादाखल “ अमृतधारेतील “ पुढील दोन साक्या पहा-
“ सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण ।
मित मधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण ।। ९६ ।। एवं षड्-विध सज्जन लक्षण अंगीं बाणतां पूर्ण ।
होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण ” ।। ९७ ।।
यांतील पहिल्या साकींत अगदी सोप्या शब्दांत स्वामींनीं सज्जन माणसाची सहा लक्षणं सांगितली आहेत व लगेच पुढच्याच साकींत जगदंबेची आण / शपथ घेऊन लिहिले आहे कीं ही सर्व ज्यानें पूर्णपणें अंगीं बाणली, त्याला परमेश्वर खचितच वश / प्रसन्न होतो.
पुढील दोन साक्यांमधेही मानवी जीवन धन्य कसे करता येईल याचा सहज साधा उपाय अतिशय सोप्या शब्दांत सांगताना स्वामी म्हणतात-
“ मी माझें भ्रांतीचें ओझें उतर खालती आधीं ।
तरिच तत्वतां क्षणांत हातां येते सहज समाधी ।।११०।।
सहज समाधी संतत साधी न लगे साधन अन्य ।
सुटुनि आधि व्याधि उपाधी होतें जीवन धन्य”।। १११ ।।
वर-प्रार्थनेतदेखील याचाच पुनरूच्चार व थोडा खुलासा करत ते सांगतात-
“ मी- माझें मावळो सर्व तूं तुझें उगवो अतां ।
मीतूंपण जगन्नाथा,होवो एकची तत्वतां ”।।
जिथें “ मी ”आला, तिथे माझे येणारच. ते मावळले तरच तूं व तुझे उगवणार. स्वामी तर म्हणतात हा वेगळेपणा नकोच, जसा मी-पणा नको तसा त्याच्या सापेक्ष असणारा तू-पणाही नको तर हे सर्व एकरूपच होऊंदे.
श्री स्वामींचें साहित्य जसे समजायला अत्यंत सुलभ व सोपे आहे, तसेंच निश्चयात्मतकही आहे.
कारण हे सहज शब्द एका साक्षात्कारी संताचे, एका तत्वज्ञ सत्कविवराचे स्वानुभवाचे बोल आहेत.
काव्याबद्ल विश्व विख्यात आंग्ल कवी WilliamWordsworth याचे Lyrical Ballads च्या प्रसिद्ध प्रस्तावनेत लिहिलेले “ काव्य म्हणजे उत्स्फूर्त भावनांचा उद्रेक ”,“ Poetry is the SPONTANEOUS OVERFLOW OF POWERFUL FEELINGs” हे वाक्य बव्हंशीं प्रमाणभूत मानले जाते.
पण श्री स्वामींच्या मनांत केवळ काव्यरचना नव्हती. तर त्यांचा मनोरथ होता, कीं आपल्या ईश्वर दत्त अभिनव जीवनामध्ये, सत्कविवर होऊन, स्वानुभवान्त:स्फूर्त, नवरसानीं परिपूर्ण,असें सत्यकाव्य निर्माण करण्याचा, स्वानुभव-सुधा शिंपडून, वसुधा (विश्व) नंदनवन बनविण्याचा.
इथें ध्यानांत ठेवलं पाहिजे, कीं सत्कविवर होणे हा, श्री स्वामींचा मनोरथ आहे, मनोदय (Aim), (Resolve) आहे, महत्वाकांक्षा (Ambition) नव्हे. आणि जगदंबेचा सेवक बनून, दास बनून, विश्व- बांधवांसहित सहित सर्वदा भक्ति-सुधा- रस सेवन करणे ही त्यांची मनीषा आहे.
आतां सत्कविवर कोणाला म्हणतां येईल याचे श्री स्वामींचे निकष / मापदंड काय आहेत हे त्यांच्याच शब्दांत पाहुया. ते लिहितात-
“ बाजारीं ह्या जो तो करितो व्यवहाराचा धंदा ।
क्रीडे काव्य-व्यवहारीं परि लाखांतुनि एखादा ”।। ८३ ।।
जगाच्या या बाजारांत जो तो काहींना ना काहीं धंदा व्यवहार करत असतो. मात्र काव्याशी क्रीडा करत तोच धंदा व्यवहार असं समजणारा / मानणारा लाखांतुन एखादाच असतो. हे श्री स्वामींचे शब्द “ काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् ”या प्रसिद्ध सुभाषिताची आठवण करून देतात.
पुढच्याच साकीत ते सत्कविवर कोण याचा खुलासा करतात.
“ तयांत विरळा सत्कवि निपजे अनुभवि जो निज- कविता। सत्कवींतही क्वचित संभवे अनुभवुनी आचरिता ” ।। ८४।।
या जगांत खरा यशस्वी कवी कोण व कृतार्थ कविता कोणाची याबद्दल ते लगेचच लिहितात-
“ अडूब सांगड जयें बांधिली काव्य-व्यवहाराची ।
खरा यशस्वी तो चि ह्या जगीं कृतार्थ कविता त्याची।। ८५
या साकींतील सांगड हा शब्द खास कोकणांतील आहे. कोकणांत पोहायला शिकवितांना दोन असोले (न सोललेले) नारळ, एका मजबूत नारळाच्या सुंभाला एकमेकांपासून थोडे दूर बांधतात.यालाच सांगड म्हणतात. अशी सांगड नवशिक्या पोहणाऱ्याच्या कमरेला बांधतात जेणेकरून तो बुडत नाही. श्री स्वामींनीं फार मार्मिकतेनें या शब्दाचा इथे उपयोग केला आहे. काव्य आणि व्यवहाराचा ज्याने समतोल राखला आहे. जो यापैकीं कोणत्याही एका गोष्टीमधें वाहावला नाही, एवंच काय, तर ज्याच्या काव्य आणि व्यवहारात पारदर्शिता आहे, प्रामाणिकपणा आहे, असा माऊलीं-समर्थां-तुकोबां सारख्याची कविता कालजयी, कालातीत ठरते. हाच निकष श्री स्वामींच्या काव्यासही तसाच लागू पडतो.
स्वामी त्यांचे मित्र पटवर्धन मास्तर यांना २०-१-१९२९ रोजीं लिहिलेल्या पत्रात लिहितात--
“ एकाच वेळीं दोन ठिकाणीं मन राहते हा माझा नेहेमींचा अनुभव आहे. मात्र त्यांत मौज ही कीं त्या दोहोंपैकीं सोहंकाराकडे जाणीव ही एक गोष्ट असावी लागते.”
“ तेंव्हा स्वरूपाची जाणीव ठेवून इतर गोष्टींकडे लक्ष पुरविणें हीच पायरी आपणांस तूर्त स्वच्छ आणि प्रज्वल केली पाहिजे.”
“ मनुष्य प्रारब्धाधीन असला तरी सर्वस्वी पराधीन नसतो. प्राणिमात्राला स्वत:च्या प्रयत्नांनीच परमेश्वराचे पद प्राप्त करून घ्यावयाचे असते; व ‘प्रयत्नांतीं परमेश्वर ’ हा सिद्धांतही सर्वमान्य आहे.”
हे पत्र स्वामींनी त्यांच्या आजारपणाच्या सुमारे ५वर्षे ६ महिने आधी लिहिलें आहे. आणि यावरून सहजच लक्षांत येतें कीं आजारपण हे केवळ निमित्तमात्र होते.
“ काल भविष्यत् स्वाधीन करूं वर्तमान-करणीनें ।
‘ प्रयत्न करितां परमेश्वरता प्राप्त ’ अशी सद्वचनें ” ।। ८१ ।।
स्वामींच्या बाबतींत या केवळ काव्य-पंक्ति नह्वत्या तर तें आहे त्यांच्या परमार्थाचे प्रवासवर्णन - “ प्रयत्नांति परमेश्वर ”,या प्रयोगाची प्रयत्नसिद्ध पाऊलवाट.
मन द्विधा असलं तरी त्यांतील एक जाणीव "सोsहं-हंकार" जाणीव हा अखंड अनुभव बोलका झाला व सहजच शब्द उमटले-
“ संतत संगे सोsहं जिवलग सांगे मज गुज गोष्टी
चिर-सुखद असा सखा न दुसरा जरी धुंडिली सृष्टी ।। १५२।।
श्री स्वामींनीं त्यांच्या सारस्वतांत सोsहं ला एका नव्या सोsहं- हंसोपनिषदाच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, ज्याचा स्वतंत्र विचार व अभ्यास होण्याची नितांत गरज आहे.
ranadesuresh@gmail.com
माधव रानडे.
९१९८२३३५६९५८