श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ”
भावार्थ-विवरण. (3)
श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ” हा संग्रह म्हणजे आधुनिक युगांतील जणूं सोsहं-हंसोपनिषद. तें उपनिषदांसारखं सूत्रमय असल्यानें, त्यांच्या इतर स्वतंत्र साहित्यातील, “ भावार्थ गीता ” हें त्यांचे
त्यावरील भाष्य, तर “ संजीवनी गाथा ” हें “ अमृतधारा ” या संग्रहाचे वार्तिक, असें मी मानतो.
या दृष्टीनें, श्रीस्वामींच्या साहित्याकडे पाहिल्यास वरील तीन ग्रंथ हे त्यांच्या तत्वज्ञान दर्शनाची प्रस्थानत्रयी मानतो. अर्थातच हें माझें पूर्णतया व्यक्तिगत मत आहे व तें मी कोणावरही थोपवुं इच्छित नाही, व याबद्दल कोणाचे दुमत असल्यास वादही करुं इच्छित नाही.
हे लिहिण्याचे कारण / हेतु हा की माझ्या विवरणांत मी त्यांच्या सर्व साहित्याचा साकल्याने विचार करतो व त्यांतील उदाहरणें देतो त्याबद्दल गैरसमज होऊं नये एह्वढंच.
भाष्य म्हणजे त्या ग्रंथाचा अर्थ अधिकाधिक सोपा करणं. तर वार्तिक म्हणजे त्या ग्रंथांत तत्वज्ञानाच्या अंगाने जे काही उणे राहिलें असेल त्याचा खुलासा करणें. खरं तर त्यांचं सर्वच साहित्य साधं, सोपं व सरळ आहे. श्रीस्वामींनीं माउलींची प्रसिद्ध ओवी आपल्या शब्दांत अभंग रूपांत मांडिली आहे तसे-
“ तैसे सत्य मृदु । मोजके रसाळ । शब्द ते कल्लोळ अमृताचे ”
श्रीमद्भवदगीतेतील--- “ बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवानन्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ।।गी ७/१९।। ”
या श्लोकावरील,“अभंग ज्ञानेश्वरी” तील काहीं अभंगांत श्री स्वामी लिहीतात-
“ करितां प्रवास । शतावधि जन्म । न गणोनि कर्म- । फल-हेतु ।।
देह्तादात्म्याची । संपोनियां रात । जाहली प्रभात । कर्मक्षयें ।।
गुरुकृपारूप । उजळली उषा । तेणें दाही दिशा । तेजोमय ।।
ज्ञान-बालार्काचा । होतां चि उदय । देखे तो ऎश्वर्य । ब्रम्हैक्याचे ।।
संपूर्ण हे विश्व । वासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ।।
म्हणोनि तो ज्ञानी । भक्तांमाजी राजा । जाण कपिध्वजा । निश्चयेसीं ।।
ऐसा तो महंत । श्रेष्ठ ज्ञानी भक्त । दुर्लभ बहुत । धनुर्धारा ।।
१५ ऑगस्ट २०१४ च्या अभंग-ज्ञानेश्वरी(य) ( एक ईश्वरी संकल्प ) या लेखांत लिहिल्याप्रमाणे, ईश्वरी तत्त्वज्ञान व परमेश्वराचा संकल्प हे शाश्वत असते, त्यामुळे ते निरंतर अबाधित व उपलब्ध राखण्याची व्यवस्था या विश्वात आहे.
त्यानुसार १९ व्या शतकाच्या सुरवातीलाच, १५ डिसें १९०३ रोजी, असा एक अति दुर्लभ, श्रेष्ठ ज्ञानी भक्त पांवस गावांतील गोडबोले कुटुंबात, त्यांच्या हातून धडलेल्या, स्वयंभू विश्वेशाच्या भावभक्तिपूर्ण सेवेच्या पुण्याईचे फळ म्हणून जन्माला आला.
संपूर्ण हे विश्व । वासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ।।
संपूर्ण हे विश्व । वासुदेवमय । ऐसा चि प्रत्यय । आला तया ।।
एक योगी, तत्वज्ञ, संत, व अभिजात काव्यगुण यापैकीं एखादा गुणविषेश असणे हेही फार क्वचित आढळून येते. तर श्री ज्ञानेश्वर माऊलींसारखे हे सर्वच दुर्मिळ गुणविशेष एकत्रितपणे पाहायला मिळणें तर फारच अवघड. युगा-युगांतून कधीकाळी संभावणारा असा महात्मा पाहायला मिळतो तो श्रीस्वामी स्वरूपानंद यांच्यामध्ये.
त्यांच्या अभंगांतील वर उल्लेख केलेल्या भावाचा शब्दश: प्रत्यय देणारे काही वेचे पाहूं. श्रीस्वामी म्हणतात--
“ वासुदेवमय विश्व हे आघवें । भ्रांतीचें निनांवे शून्याकार ।। नाम स्वरूपातीत । वसे वासुदेव । विश्वीं स्वयमेव ।एकलाचि II ”
किंवा,
“ वासुदेवाविण न देखे दर्शन । वासुदेवीं मन स्थिरावलें ।आतां अंतर्बाह्य वसे वासुदेव । नसे रिता ठाव अणुमात्र ।।”
अथवा,
“ जेथे पाहे तेथे दिसे वासुदेव । वेडावला जीव जडे पायीं ।।”
तसेच,
“ वासुदेवावीण विश्वीं नाही दुजें । नांदतो सहजें एकला चि ”
“अणुअणूंतून राहिला भरून । सकळ संपूर्ण वासुदेव ।।
किंवा
“ एक वासुदेव नांदे चराचरीं I त्याविण दुसरी वस्तु नाही II
वासुदेव येथे। वासुदेव तेथे। व्यापितो सर्वांते। वासुदेव।।
व्याप्य तो व्यापक । सर्व सर्वात्मक । सर्वातीत एक ।वासुदेव ।।
ध्याता ध्यान ध्येय । वासुदेवमय । एक तो अद्वय स्वामी म्हणे ।। ”
२१ जुलै १९३४ च्या रात्री
“देह्तादात्म्याची । संपोनियां रात । जाहली प्रभात । कर्मक्षयें ।।”
व श्रीस्वामींनी लिहिले-----
“ शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढींची नवमी I अठराशें छप्पन्न शकाब्दीं मृत्यु पावलो आम्ही II ”
पार्थिवाशी झालेल्या ताटातुटीच्या धक्क्यानं शरीराला प्रचंड थकवा आला होता. अशक्तपणा तर इतका
होता कीं एका दिवसात, कधी एक, कधी दोन, व कधी फारतर ४-५ साक्या एवढंच लिहूं शकत होते.
पण शरीराच्या तशा विकल अवस्थेतही -
“ आत्मानुभवें जग चि आघवें वासुदेवमय झालें ।
बहु दुर्लभ तो महंत विश्वीं विश्व होउनीं खेळे ”
अशा विश्वात्मक झालेल्या श्री स्वामींच्या कानी-
“ अभंग-ज्ञानेश्वरी-(य) हा ईश्वरी संकल्प असल्याची व या कार्याचे ते माध्यम असल्याची आकाशवाणी आली ”
या संकल्प पूर्ततेसाठी साक्षात परमात्माच पाठीशी उभा असल्याचे त्यांना जाणवत होते. तीच जाणीव आपल्या रसाळ शब्दांत स्वामींनीं त्यांच्या २७ नोह्वेंबर १९३४ रोजीं लिहिलेल्या पहिल्या साकीत व्यक्त केली.
“ सदैव मार्गीं चालत असतां मजला देतो हात । उठतां बसतां उभा पाठीशीं त्रैलोक्याचा नाथ ।। ” अ.धा.९८
पण या आधींच्या काळांत, २२-१०-१९३४ पासून ते २५-१०-३४ या कालावधींतील त्यांच्या सखोल (More & more of less & less ) आत्मचिंतनाबद्दल “ अमृतधारा ” भावार्थ-विवरणाच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. विषेश म्हणजे हे तारीखवार व श्री स्वामींच्या हस्ताक्षरांत आहे.
आजारपणानंतर तीन महिन्यानीं थोडी ताकत अंगात आल्यावर लिहिलेल्या या नोंदींवरून काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात-
(१) त्यांच्या आयुष्यातील “ आत्मनो मोक्षार्थं ” या अध्यायाची समाप्ति होऊन “ जगदुद्धारायच ” या पर्वाची नांदी झाल्याची चाहूल व संकेत त्यांना मिळाले होते, हे त्यांच्या “ आत्मकल्याण जगत् कल्याण ” या प्रतिदिनींच्या टिपणावरून दिसून येतें.
या अनुरोधानें काही साक्यांचा जो भावार्थ उलगडतो तो असा--
“ अमृतधारा ” या ग्रंथांतील पहिल्या सात साक्यांमधे, “ जगीं जन्मुनी ”, सहा मधें “ जगीं जन्मुनी अभिनव- जीवन ”, व “ स्वानुभव /अनुभव ”, तसेंच पहिल्या पांच साक्यांमधे याशिवाय “ सत्य ” या शब्दांचा पुनरुच्चार/ शब्दसमूहाची पुनरावृत्ति आढळते.
रामभाऊ ( आप्पा ) गोडबोले या व्यक्तीचा / व्यक्तिरेखेचा अंत होऊन “ स्वरूपानंद ” या साक्षात्कारी संताचे व्यक्तिमत्व उदयाला आल्याचे त्यामुळे दिसून येते. पण या अभिनव जीवनाचा जगत्कल्याणासाठी कसा उपयोग करायचा हा निर्णय मात्र श्री स्वामींनीं सर्वस्वीं “ जगदंबे ” वर सोंपवलेला आहे, असे पुढील साकीवरून दिसेल-
“ मजसि ह्या जगद्-रंगभूमिवर जसें दिलें त्वां सोंग । करीन संपादणी तशी मी राहुनियां नि:संग II५१ II ”
त्यांनीं मातेला सांगितलं कीं, “ सत्कविवर, गायकवर, तंतकार, चित्रकार, शिल्पकार, बागवान थोडक्यांत काय जे देशील तें सोंग / काम मी नि:संग राहून वठवीन / संपादन करीन, व कोणत्याही रूपांत जगदंबेचे दास होऊन भक्ति-सुधा-रस सेवन करण्याची इच्छा प्रकट केली आहे, व ७ व्या साकीत “ वसुधा ” तर ८ व्यांत “ विश्वबांधवांसहित ” हे शब्द त्यांच्या विश्वात्मक पातळीची / विचारांची साक्ष देतात. जगदंबेनंही आपल्या लाडक्या भक्ताचे मनोगत व गुणविशेष ओळखत वर दिला-
“ काव्यसेवका जगदंबेचे असे तुला वरदान । ऐकुनि कविता जगत्-रसिकता मुदें डोलविल मान ” ।।८।।
एव्हढंच नाही तर स्व-शपथपूर्वक हे देखील सांगितलं कीं--
“ प्रमाण मानिल आणि आपुली स्वयें वाहते आण । अनुपम अभिनव तव कवनाला जनता देइल मान “ ।।९।। अमानित्वाची जणुं मूर्ति अशा श्रीस्वामींनी तो मान मातेलाच अर्पण करीत म्हटलं-
“ दिला मान तो तिला वाहिला मला कशाला भार । पुरे माप पदरांत घातलें तोलुनि भारंभार ” ।। १० ।।
गंमत म्हणजे ३०-१०-३४ नंतर “ आत्मकल्याण जगत् कल्याण ” ही नोंद दिसत नाही, कारण श्री स्वामींनीं, अभिनव जीवनाचा जगत्कल्याणासाठी कसा उपयोग करायचा याचा मार्ग जगदंबेने आपल्या वरदानानं दाखवून दिला होता, व अनन्य-शरण आलेल्या आपल्या या लाडक्या भक्ताला, “ सोsहं ” सार प्रदान करून, साधनेचा मार्ग दाखवीत प्राण संकटातून रक्षणही केलं होतं म्हणूनच स्वामी म्हणतात-
“ प्रसन्न होता माता हाता चढलें ‘सोsहं’ सार । हवा कशाला मला आतां हा वृथा शास्त्र संभार ”।।
“ सद् भक्ताची सदा वाहणें भगवंतानें चिंता । तो चि तयाचा पथ- दर्शि तथा रक्षिता समुद्धर्ता ” ।।११६।।
(२) या हस्तलिखित नोंदींमधे श्रीमत् रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, जे.कृष्णमूर्ति, श्री शंकरराव देव, महात्मा गांधी या सर्वांच्या नांवाची नोंद, १७/११/३४ पर्यंत केलेलीआढळते. तसेंच त्याआधीं वेगवेगळ्या तारखांनां श्री जे.कृष्णमूर्ति, यांचे पुढील लिखाण उद्धृत केलेले आढळते.
I laugh with him, with him I play. (30/10/34). He is before me forever. Look where i may, He is there. I see all things through Him.(2/11/34) True self-discipline is not repression, but it is born out of understanding.(4/11/34). The liberated man is the most practical man in the world, because he has discovered the true value of all things. That discovery is illumination. (6/11/34).
श्री स्वामींच्या “ अमृतधारा ” संग्रहांतील अखेरीस लिहिलेल्या इंग्रजी कडव्यांचं व पुढील साकीचं मूळ या चिंतनांत व या नोंदीत सापडते असं मला वाटतं, असें मी श्री सुदेश चोगले यांना, “ अमृतधारे ” वरील आमच्या चर्चेंत सांगितले होते.
“ निधान सन्निध परि घोर तमीं इतस्तत: भ्रमलो मी । ज्ञानकिरण दर्शनें आतां सत् प्रकाश अंतर्यामीं ।।”
(३) पण २२-११-३४ नंतरच्या सर्व नोंदी मात्र फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्याच आहेत ही खास
लक्षणीय गोष्ट आहे व त्यापुढें उल्लेख आहे - “ज्ञानेश्वर”, अशा ज्ञानेश्वरमय झालेल्या श्रीस्वामीजींचे
श्री ज्ञानेश्वर माऊली व श्रीज्ञानेश्वरीचे महात्म्य वा थोरवी सर्वार्थाने अभिव्यक्त करण्याचे कौशल्य वा प्रतिभा ती काय वर्णावी!!
॥ श्री ज्ञानदेव वंदन ॥
नमितों योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत |तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ॥१॥
स्मरण तयाचें होतां साचें चित्तीं हर्ष न मावे |म्हणुनि वाटते पुन: पुन्हां ते पावन चरण नमावे ॥२॥
अनन्यभावें शरण रिघावें अहंकार सांडून | झणिं टाकावी तयावरुनियां काया कुरवंडून ॥३॥
आणि पहावें नितांत - सुंदर तेजोमय तें रूप |सहज साधनीं नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ॥४॥
ज्ञानेशाला नमितां झाला श्रीसद्गुरुला तोष |वरदहस्त मस्तकीं ठेवुनी देई मज आदेश ॥५॥
।। श्रीज्ञानेश्वरी गौरव ॥
श्रीज्ञानेश्वरी अमृतगंगा | बहुत सुकृतें लाभली जगा |पावन करी अंतरंगा | अंगप्रत्यंगा जीवाचिया ॥१॥
भक्तिभावें करितां स्नान | निर्मल होय अंत:करण |जीवासी परम समाधान | साक्षात् दर्शन श्रीशिवाचें ॥२॥
जिवा-शिवाची होता भेटी | मावळोनि ज्ञाता-ज्ञेयादि त्रिपुटी |प्रकटे सोऽहंभाव-प्रतीती |उरे शेवटीं ज्ञप्तिमात्र॥
॥ श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ फलश्रुति ॥
श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ गहन | गुरुपुत्रांसी सुगम सोपान |भावें घडतां श्रवणमनन | लाभे समाधान अखंडित ॥१॥
उपासनामार्ग सांपडे | योगसार हाता चढे |उघडती ज्ञानाचीं कवाडें | सहज घडे निष्कामकर्म ॥२॥
होवोनि अंतरंग अधिकारी | भावें अवलोकितां ज्ञानेश्वरी |
साक्षात् प्रकटे भगवान् श्रीहरि |स्वयें उद्धरी निजभक्तां ॥३॥
नित्य अंतरीं ज्ञानदेव | सर्वां भूतीं भगवद्भाव |
देव-भक्तां एक चि ठाव | अपूर्व नवलाव अनुभवावा! ॥४॥
अंतरंग अधिकारी होऊन नित्य अंतरीं ज्ञानदेव | सर्वां भूतीं भगवद्भाव | हा स्थायी भाव झाल्याने
हा अपूर्व नवलाव श्री स्वामीजींनी स्वत: प्रत्यक्ष अनुभवला होता!!
म्हणूनच ते लिहितात-
“ नसानसांतुनि तें संताचे नाचे अस्सल रक्त । जाण साजणी आजपासुनी आम्ही जीवन्मुक्त ” ।। १२३।।
“ अखंड-जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा । हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा ” ।।१०५।।
(४) श्री स्वामींचे एक खास वैषिट्य हे आहे की त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रयोगशाळेत काही बोलण्याआधी त्या प्रत्येक गोष्टीचा प्रयोग स्वतःवर केला व त्यानंतरच ते प्रयोगसिद्ध ज्ञान / तवत्ज्ञान लोकांपुढे ठेवले.
त्यामुळें त्यांचे बोल हे केवळ अनुभवसमृद्ध न राहातां प्रयोगसिद्ध आहेत असें ठामपणें म्हणतां येतें.
या दृष्टीने “ मृत्युपत्र ” या त्यांच्या अप्रकाशित साहित्यांतील, एका कडव्याच्या, ३-११-३४ रोजीं केलेल्या नोंदीचा फक्त उल्लेख करून हा लेख संपवितो.
“ अन जन्मुनि आत्मज्ञ बनावें हा माझा हव्यास । प्रयोगांत आयुष्य आघवें वेचावें हा ध्यास । असा ध्यास लागतां जिवाला झाला साक्षात्कार । वृथा नव्हे कीं बोल ; सांगतो अनुभव हा साचार ” ।।
( टीप- वर उल्लेखिलेल्या २२/१०/३४ ते २५/१२/३४ या काळातील श्रीस्वामींच्या हस्ताक्षरांतील या अमुल्य नोंदींची प्रत मला माझा मामेभाऊ श्री श्रीकांत देसाई ( उर्फ बाबुराव ) यांनीं मोठ्या प्रेमाने ७-८ वर्षांपूर्वी दिली होती. यांसाठी मी त्यांचा सदैव ऋणी आहे. )
भ्रमणध्वनी- ९८२३३५६९५८ माधव रानडे.
ranadesuresh@gmail.com