The articles i write and post on my blog primarily cover life, literature & philosophy of Swami Swaroopanandajee of Pawas in Ratnagiri district of Maharashtra. He was the the TORCHBEARER of NATH SAMPRADAY of 20th Century. His primary contribution is transliteration of three major works of Saint Jnyaneshwar viz- 1) Jnyaneshwari 2) Amrutanubhav & 3) Changdev Pasashti in Abhang meter in present day Marathi. I was initiated in Nath Sampraday by him in the year 1968.

Friday, August 15, 2014

 अभंग-ज्ञानेश्वरी(य)
 
( एक ईश्वरी संकल्प )


परमात्म्यानं मानव जातीच्या कल्याणाच्या हेतूनं अपौरुषीय वेद, उपनिषदे, व त्याचं साररूप श्रीमद्भगवद्गीता आपल्या हाती दिलं. ईश्वरी तत्त्वज्ञान व परमेश्वराचा संकल्प  हे शाश्वत असते त्यामुळे ते निरंतर अबाधित व उपलब्ध राखण्याची व्यवस्था या विश्वात आहे. त्यानुसार गीता, श्री ज्ञानेश्वरीच्या रुपानं माऊलींनी प्राकृतात सुलभ केली. पुढे ती प्रचलित मराठीत रूपांतरित करण्यास विसाव्या शतकांत  श्री ज्ञानेश्वरमय झालेले पावसनिवासी परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद अवतरले.

श्री स्वामीजींच्या रूपाने भगवंतानी माऊलींच्या तीनही प्रमुख ग्रंथांचं रूपांतर अतिसुलभ अभंगरूपात केले.
जीवाचं रूपांतर शिवात झाल्यानं, शिवाचा संकल्प, एक  ईश्वरी संकल्प; त्या शिवस्वरूप जीवातून, जीवभावाचा स्पर्श न होता, प्रवाहित  झाला. व  अभंग-ज्ञानेश्वरी(य) च्या परीधानानं शब्दरूपानं प्रत्यक्षांत आला.
या ईश्वरी संकल्पाची वाटचाल कशा रीतिने झाली ते आपण आता पाहूया.

भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला स्नेहपाशाच्या, मोह-ममतेच्या  बंधनातून बाहेर काढण्याच्या उद्देशानं जो उपदेश केला तो श्रीमद्भगवद्गीतेच्या रुपानं आज जगप्रसिद्ध आहे.जो आपणा सर्वांसाठी आजही तितकाच संयुक्तिक व उपयुक्त आहे. महर्षी श्री व्यासमुनी यांच्या " महाभारत " या महाकाव्याच्या " भीष्मपर्वात " संस्कृत मध्ये तो प्रथमतः ग्रथित करण्यात आला." व्यासोच्छिष्टम जगत्रयं " असं म्हटलं जातं कारण,

" म्हणौनी महाभारती जे नाही । ते नोहेचि लोकी तीही ।
येणे कारणे म्हणिपे पाही । व्यासोच्छिष्ट जगत्रय॥ज्ञा.१/४७॥ "

कालांतरान संस्कृत समजणारे कमी कमी होऊ लागले, एव्हढच नव्हे तर, वेदोक्त उपदेशाची मिरासदारी सुरु झाली.समाजाचा काही  वर्ग त्यापासून वंचित राहू लागला. कर्मठ्पणाचा कळस होऊ लागला. समाज वेठीला धरिला जाऊ लागला. आत्मज्ञानाचा अपप्रचार होऊ लागला. समाजाचा बिघडलेला समतोल वाचविण्याच्या दृष्टीन," परित्राणाय साधूनां-" ( गीता ४/८ ) या भगवंताच्याच उक्ति प्रमाणे,ब्रम्हा,विष्णु,महेश या त्रिमूर्तीन आदिशक्तिसहित प्रकट व्हायचं ठरवलं.

" ते वेळी आपुल्याचेनि कैवारे I मी साकारु होऊनि अवतरे ।
अज्ञानाचे आंधारें । गिळूनि घाली ॥ ज्ञा. ४/५१॥ "

या वेळी भगवंताना बुद्धी प्रामाण्याचा बडिवार मिरवणाऱ्या पढतमुर्खांचा अहंकार दूर करावयाचा  होता,व तोही राजमार्गान, त्यांच्याच भाषेत.म्हणून त्या सर्वांनी  यदुकुळा ऐवजी एका आचारविचार-संपन्न गरीब ब्राह्मण कुळात अवतार घेतला. वाचकांपैकी अनेकांनी “ज्ञानेशो भगवान विष्णुः” असा उल्लेख अनेकदा ऐकला असेल. जनाबाई श्रद्धायुक्त अन्तःकरणाने, त्रिमूर्तीच्या, आदिशक्तिसहित साक्षात अवतारांची ओळख आपल्या अभंगामधून देतांना  म्हणते : --
  " सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ।
महाविष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ।
ब्रह्मा सोपान तो झाला । भक्ता  आनंद वर्तला ।
आदिशक्ती मुक्ताबाई । दासी जनी लागे पायी । "   
सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद त्यांच्या "श्री ज्ञानदेव वंदन " अभंगात  आदराने म्हणतात, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत,तो सत्काविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत
श्री ज्ञानेश्वर माउलीच्या समग्र साहित्याचा, वयाचा, चरित्राचा विचार केला की कोणाच्याही सहज लक्षांत येत कि ते जीवकोटीतले नसून ईशकोटीतले आहेत.अनेक संतांचे याविषयी पुरावेही आहेत. त्यांच्या आरतीतील दुसर्या कडव्यात म्हटलं आहे "लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग नाम ठेवियले ज्ञानी ।" जगामध्ये आत्मज्ञानाचा लोप झाल्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग माउलीच्या रुपान अवतरले. अशा श्री महाविष्णूच्या अवतारान, “नित्य नूतन गीता”- तत्वावर कोणत्याही भाषेत भाष्य करायचं ठरवलं असतं तरी ते शक्य होत. पण आज सातशे वीस वर्षांहून अधिक काळ मराठी भाषेला ललामभूत आणि वारकरी संप्रदायाला शिरोधार्य होऊन राहिलेल्या "भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी" च्या रुपान ते प्राकृतात / मराठीत व्हावं  हे आपणा  सर्व मराठी वाचकांचं परमभाग्य. अर्थातच, " प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्म चि केलें ", ही क्रांतिकारी किमया माउली सारख्या ईशावतारालाच शक्य.शिवाय " चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः " या उक्ती संबंधीच्या गैर समजुतीही स्वतःच उघडपणे दूर कराव्या असंही देवाच्या मनांत असेल कदाचित असं पुढील ओव्यांतील उद्गारांवरून वाटत. “म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ।। ज्ञा ९/४५६ ।। वेदु संपन्नु होय ठाई । परी कृपणु ऐसा आनु नाही । जें कानीं लागला तिहीं । वर्णाचांचि ।। येरां भवव्यथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां । अनवसरु मांडूनियां ।राहिला आहे ।। तरी मज पाहतां । तें मागील उणें । फेडावया गीतापणें । वेदु वेठला भलतेणें । सेव्य होआवया ।। ज्ञा १८/१४५७-५९।। पण केवळ त्यासाठी त्यांनी गीता या वैदिक साहित्याच्या प्रस्थानत्रयी मधील ग्रंथाची निवड केली असं नाही.त्या मागे इतरही अनेक कारणं दिसून येतात ती आपण पाहूच.
   ज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या सद्गुरुंच्या उपस्थितीत, त्यांच्या आशीर्वादानं  संत श्रोत्यांसमोर गीतेच्या प्रत्येक श्लोकावर जी काव्यमय उत्स्फूर्त टीका प्रवचनं केली तीच सच्चिदानंद बाबानं लिहून घेतलेली, " भावार्थ दीपिका / ज्ञानेश्वरी ". त्यांमध्ये २,३,५,७,८ हे पांच अध्याय सोडले तर बाकी तेरा अध्यायांना प्रास्ताविके आहेत.त्यापैकी ४, ६ व १३ हे तीन अध्याय सोडले तर इतर दहा अध्यायांच्या प्रास्ताविकात मुख्यत्वेकरून  गुरुमहिमा आहे. हे सर्व विस्तारपूर्वक लिहिण्याचं कारण हे की माउली स्वतः सांगतात:-"एवं गुरुक्रमे लाधले । समाधिधन जे आपुले । तें ग्रंथें बांधोनि दिधले । गोसावी मज।।”
आतां हे काय दिले तर
"क्षीरसिंधुपरिसरीं । शक्तीचां कर्णकुहरी । नेणो कै श्रीत्रिपुरारी । सांगितलें जें ।। ” …… …. " मग तिहीं तें शांभव । अद्वयानंदवैभव । संपादिले सप्रभव । श्रीगहिनीनाथा ।।…… ते आज्ञा श्री निवृत्तिनाथा । दिधली ऐसी ।। ना  आदिगुरु शंकरा । लागोनी शिष्य परंपरा । बोधाचा हा संसारा । जाला जो आमुते ।।
यापुढील अवतरणं समजायला सोपी पडावी म्हणून "अभंग ज्ञानेश्वरीतील" दिली आहेत
“परंपरा प्राप्त । सर्व तें घेवोन । आमुच्याकडोन । मग तूं हि ।।
कळिकाळग्रस्त । जीवां सर्वां परी । सोडवी सत्वरीं । दुःखातून ।।
मग भवदुःखे । जाहले जे दीन । करुणा येवोन । जीवांची त्या ।।
सद्गुरु दयाळ । श्री निवृत्तिनाथ । करोनी निमित्त । गीतार्थाचे ।।
वर्षले अद्भुत । ब्रह्मरस जो का । तो ची तो हा देखा । टीकाग्रंथ ।।”
वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल कीं अद्वैतामृत वर्षिणी श्रीमद्भगवद्गीता व त्यावरील टीका ज्ञानेश्वरी, हे ग्रंथ  नाथ संप्रदायाच्या दृष्टीनें किती अपूर्व आहेत, अमूल्य आहेत. आदिनाथां पासून गुरू-शिष्य परंपरेनं शतकानुशतक चालत आलेलं शाम्भव / अद्वैत आनंदाचे वैभव,गुरू-शिष्यपरंपरा या सर्व गोष्टी हे नाथांचं धन आहे. सद्गुरू व गुरुकृपा याला नाथसंप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे.  शिवाय                                   
"पिंडे चि करावा । पिंडाचा तो लय । नाथ-संप्रदाय । ऐसा जो का ।।
आदिनाथाची ती । अंतरंग खूण । दिली दाखवून । नारायणे ।।
त्या गूढार्थाची । सोडोनि गाठोडी   । झाडोनियां घडी । यथार्थाची ।।
उघडोनि तीच । दाखविली येथें । ग्राहक हे श्रोते । जाणोनियां ।।”
आदिनाथाची अंतरंग खूण, “नारायणे” दाखवून दिली; असं सांगून हरी-हरात भेद नाही हे ज्ञानेश्वर माउलींनी स्पष्ट केलं.गीताशास्त्र हे केवळ शब्द पांडित्याचे शास्त्र नसून  ते संसार जिंकणारे शस्त्र आहे,  आत्म्याचे साक्षात दर्शन घडविणारे मंत्र आहेत, व गोडीत अमृताहून सरस अशा मराठी बोलांनी मी हे सिद्ध करीन अशी ज्ञानेश्वर माउलींनी छातीठोकपणे प्रतिज्ञा केली. अशा बहु उद्देशीय हेतूनं माउलींनी गीतेवर पद्यमय निरुपण केलें. संस्कृताचे बिकट तट तोडून अध्यात्म-शास्त्र मराठीत आणून एक अपूर्व क्रांती केली.माउलींनी आपला वाःग्यज्ञ ई.स. १२९०(शके १२१२) मध्ये नेवासे स्थित महालया / मोहिनीराज मंदिरात, पूर्ण करतांना,
“आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञे तोषावें । तोषोनि मज द्यावें ।पसायदान हें ……… वर्षत सकाळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ।।”
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ।। …… ("सर्वसुखीं पूर्ण । होवोनि त्रिलोक । नित्य भजो एक । ईश्वराते ।।अ. ज्ञा.”)
अशा अलौकिक प्रार्थनेने पूर्ण केला. केवळ हा वरप्रसाद मागून ते थांबले नाहीत तर, लोकजागरण करून, जनप्रबोधन करून महाराष्ट्रातील एका सर्व समावेशक, अद्वैतमतवादी अत्यंत लोकप्रिय अशा वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप दिलें.एव्हढंच नव्हे तर संतश्री नामदेव,सावता माळी, चोखोबा, गोरा कुंभार, जनाबाई, बहिणाबाई, संत सेनामहाराज, निळोबा, विसोबा खेचर  व पुढे संत  तुकाराम आदि  अशी एक " ईश्वरनिष्ठांची मांदियाळी "/ परंपरा निर्माण केली  ज्यायोगें पूर्वापार चालत आलेल्या पण खंगत चाललेल्या भागवत धर्माचं पुनरुज्जीवन झालं आणि रूढीवादाला काही प्रमाणात आळा बसला.  पुढे २९४ वर्षांनी ई.स. १५८४ (शके १५०६) मध्ये संत एकनाथांनी, पाठान्तरीं अशुद्ध झालेली ज्ञानेश्वरी, माउलींच्या आज्ञा, अनुज्ञा व आशिर्वादानं शुद्ध केली. ज्ञानेश्वर माउलींनी एकनाथांना ग्रंथ शुद्ध करण्याचा द्दृष्टान्त दिला होता. यासंबंधीचा एकनाथ महाराजांचा अभंग असा आहे :
" श्री ज्ञानदेवे येऊनि स्वप्नांत । सांगितली मात मजलागि ।।
दिव्य तेजःपुञ्ज मदनाचा पुतळा । परब्रम्ह केवळ बोलतसे ।।
अजानवृक्षाची मुळी कंठासी लागली । येउनि आळंदी काढी वेगी ।।
ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी । तंव नदी माझारी देखिले द्वार ।।
एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले । श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वर ।।
एकनाथ हे ज्ञानेश्वरीचे मराठीतील पहिले संशोधक होत. त्यांनी केवळ ज्ञानेश्वरी शुद्ध केली एव्हढच नाही तर, " ज्ञानेश्वरीपाठी । जो ओवी करील मराठी । तेणे अमृताचिये ताटी।जाण नरोटी ठेविली " अशा शब्दांनी अपपाठांवर प्रतिबंध घातला.माउलींनी अशी प्रेरणा देण्यास संत एकनाथांनाची निवड करण्याचं कारण हे दिसतं की एकनाथांनी, यापूर्वी " रूक्मिणी स्वयंवर " व श्रीमद्भागवताच्या " एकादश स्कंध|वर " एकनाथी भागवत " ई. स. १५७० ते १५७३ ( शके १४९२ ते १४९५ ) मध्ये प्राकृतात लिहून त्यांच्या निखळ भगवद्भक्तीचा, भागवत होण्याचा दाखला दिला होता. आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्या भाषेत अध्यात्मज्ञान देण्याचा संतांचा अधिकार प्रस्थापित केला होता." एकनाथी भागवत " हे देखील "ज्ञानेश्वरी" वरील जणुं विरक्त भाष्य असल्याचे जाणवते.
      माउलीच्या कार्याचा वारसा एकनाथांनी ज्या पद्धतीन चालवला ते पाहूनच त्यांना "ज्ञानाचा एका" किंवा ज्ञानदेवांचा अवतार म्हणतात. पुढे जसजशी वर्षे, … दशके …  गेली, शतकांनी कूस बदलली, तसतशी कालानुक्रमाने  भाषेतील बदलामुळे,  श्री ज्ञानेश्वरीची भाषा, सर्व सामान्य लोकांना दुर्बोध वाटू लागली.ही अमृतगंगा,ही ज्ञानगंगा लुप्त होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवाय  यावेळी प्रश्न फक्त ज्ञानेश्वरीचा  अथवा त्यातील अपपाठाचा नव्हता तर माउलीच्या तत्वज्ञानातील एकाहून एक वरचढ अशा इतरही दोन ग्रंथांचा म्हणजेच   " अमृतानुभव " व " चांगदेव पासष्टीचा " असा वैदिक तत्वज्ञानातील प्रमाणभूत मानल्या जाणाऱ्या “ ज्ञानेश्वरीय ” साहित्याचा, संत साहित्यातील “ प्रस्थात्रयीचा देखील होता. भगवंत योग्य प्रेषिताचा शोध घेऊ लागले. माउलीची नजर पडली ती, वडील विष्णु व आई सौ रखमाबाई यांच्या पोटी  साक्षात दत्तगुरूंच्या आशिर्वादान जन्मलेल्या, घरातील धार्मिक वातावरणान, " बाल्यापासुनि गीताध्यायनी…. बहु छंद " असलेल्या,  "तारुण्यी तत्कथित ( गीता कथित ) अगाध तत्वसुख " भोगत असलेल्या,नाथसंप्रदायी तरुण रामचंद्रावर. वयाच्या केवळ १८ व्या वर्षीच स्वतःच्या शिक्षणाचा  महत्त्वाकांक्षी स्वार्थ बाजूला सारून पावस सारख्या आड खेड्यांत “ स्वावलम्बनाश्रम " नावाची  शाळा स्वबळावर सुरु करून विद्यादानाचं लोकसेवाव्रत आचरणारा, आपल्या सदगुरुची हस्तलिखित ज्ञानेश्वरीची प्रत जुनी झाल्याने त्यांना ती वाचतांना कष्ट पडतात हे लक्षांत येताच,शाई,बोरू ही सर्व तयारी करून, ज्यांनी स्वहस्ते संपूर्ण ज्ञानेश्वरी गीतेच्या मूळ श्लोकांसह लिहून ती गुरुचरणी अर्पित केली आहे असा, अन ज्याला नाथपन्थिय श्री सद्गुरुनी " पुण्यपत्तनी श्री सद्गुरुनी पथदर्शी होऊन । ओम तत्वं सोहम सः । अशी श्रुतीची खूण । दाखविताच, माउलींनी म्हटल्याप्रमाणे  "तैसें जया कोणासि दैवें । गुरुवाक्य श्रवणाचिसवें । द्वैत गिळोनि विसंवे ।आपणया वृत्ती ।। कानावचनाचिये भेटी । सारिसाची पै किरीटी ।वस्तु  होऊनी उठी । कवणि एकु जो ।। असा. आणि ज्याने,       " स्वरूपी  विश्वरूप, आणि विश्वरूपी स्वरूप " पाहिले आहे  असा." अहं आत्मा हें कधीची  विसरुं नये ” ही समर्थांची उक्ति, हे ज्याचं ब्रीदवाक्य होतं, जो प्रपंच विटाळा पासून अलिप्त होता. ज्यानी नाम-रूप व  कुळाची ओळख यांचा त्याग केला होता.जो अयाचित वृत्तीनं राहत होता. ज्याने " आपुले मरण पाहिले म्यां डोळा " असा अनुपम्य सोहळा अनुभविला आहे असा.
श्री स्वामीं बद्दल श्री सत्यदेवानंद म्हणतात:-
"गोडबोले कुळ धन्य धन्य झाले । जये वंशी " श्री रामचंद्र " आले ।
नामरूपाचा पांघरोनि शेला । प्रकट परमात्मा होइ पांवसेला ।।”.
पण केवळ एव्हढ्यावरच भगवंत समाधानी नव्हते या कार्यासाठी लागणारे ' भगीरथ प्रयत्न ' करण्याचं अग्निदिव्य करुं शकेल, ह्या प्रासादिक साहित्याचं शिवधनुष्य त्यांमधील शब्दांच्या पलिकडील सूक्ष्म विचारांशी समरस होऊन, त्यांतील भावाशी तादात्म्य पाऊन तेव्हढ्याच समर्थपणे पेलू शकेल अशाच व्यक्तीची निवड या महान कार्यासाठी व्हायची होती.  मनांत उठणाऱ्या नित्य नवीन उन्मेषाला प्रकट होऊ न देता हृदयांत साठवून ठेवण्याची ताकद असणारी, बृहस्पतीच्या तोडीची सर्वज्ञता अंगी बाणली असतांनाही,        " पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी । ",  " चातुर्य लपवी ", " महत्व हारवी" असं अमानित्व त्या व्यक्तीच्या  अंगी मुरलं आहे का ? याची खातीरजमा करून घ्यावी असं ठरवून, माउलींनी परीक्षा घ्यायचं ठरवलं व जगन्मातेकरवी लेखणी खाली ठेवण्याची आज्ञा श्री स्वामींना केली. ज्ञानी भक्तानं ती शिरसावंद्य मान्य केली. व म्हटलं,
"स्थैर्य प्रज्ञेप्रति त्वत्कृपे पूर्ण तपस्या झाली। त्वदाज्ञेस अनुसरून आतां ठेवुं लेखनी खाली  
पण त्याचवेळी हे वचनही दिलं की,
"जगन्माउली आज्ञा होतां ती पुनरपि उचलूंच ।
भक्त होउनी त्वद-यशोध्वजा जगीं उभारुं उंच ! "।।
सुमारे बारा वर्षांच्या लेखन-संन्यासाच्या अग्निपरिक्षेनंतर जगन्माउलींनी व माउलींनी या ध्येयवेडया भक्तावर कृपा केली व श्री स्वामींनीच लिहिल्याप्रमाणे " मज अंतरींचा जाणोनिया भाव । पूर्ण करी देव मनोरथ ।। परमात्म्यान, श्री स्वामींच्या,"सत्कविवर" होऊन "स्वानुभवाधिष्ठित","सत्य काव्य" निर्माण करण्याच्या मनोरथ पूर्तीची मुहूर्तमेढ केली. भ. गीता अध्याय २/५४ मधील  स्थितप्रज्ञाच्या लक्षणांवर  चिंतन करत असतांना त्यांच्या मनांत " अंगावरती जरी कोसळती डोंगरही दुःखाचे, असे अढळ मन सदा जयाचे नांव न उद्वेगाचे ". अशा काव्यपंक्ति स्फुरल्या/झंकारल्या,अन एका महान साहित्यिक पर्वाची / कार्याची नांदी झाली. श्री स्वामींनी  हे स्फुरण  हाच जगन्मातेचा कौल मानला. ते लिहितात " पुसतां गीता भावार्थास्तव ज्ञानेशाते वाट । ठेवि मस्तकी वरद हस्त हा माझा सद्गुरुनाथ ।।" अन "अंतरंग अधिकारी" होऊन श्री ज्ञानेश्वरी  "भावे अवलोकिल्याची" साक्ष  "भावार्थ-गीते" च्या रूपानं  श्री स्वामींच्या लेखणीतून अवतरली / प्रकट झाली.याही ग्रंथाचा-- ग्रंथकर्ता- ' हृदयस्थो जनार्दनः ' असाच उल्लेख स्वामी करतात  असाच काहीसा प्रकार " अभंग-ज्ञानेश्वरीच्या " वेळी घडला. श्री बाबीकाका लिमये यांनी श्री ज्ञानेश्वरीची एक प्रत श्री स्वामींकडे आणून दिली व त्यावर आशिर्वादपर काही लिहून देण्याची विनंती केली. त्यावर श्री स्वामीनी "अपूर्व नवलाव अनुभवावा", हे  श्री ज्ञानेश्वरीच्या  " फलश्रुति " चे   अभंग लिहून लिहिले ही प्रत श्री स्वामीकडेच असतांना श्री ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीवर चिंतनाचे वेळीं  त्यांना " आत्मरूपा तुज करी  नमस्कार । तुझा जयजयकार । असो देवा ।। " हा अभंग स्फुरला व हीच आपल्या विहित कर्माची सुरुवात असा मनोमन निश्चय करून ती प्रत स्वतःकडे ठेवून घेतली आणि तिथून पुढे दरदिवशी १० ओव्यांवर चिंतन व मग त्यावर अभंग निरुपण हा क्रम अव्याहत सुमारे अडीच वर्षे सुरु राहिला “कोकजे" गुरुजी लेखनिक झाले व पुढे १९५६ साली "अभंग ज्ञानेश्वरीच्या " प्रकाशनान या ज्ञान यज्ञाची सांगता झाली तो सोहळा अनुपम्य झाला. या साहित्य कृतीचं संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्वक स्वागत झालं व माउलींच्या इतर दोन ग्रंथांच्या अभंग रूपांतराच काम भक्तांच्या आग्रहास्तव श्री स्वामींना करावं लागलं, शिवाय ध्येय पूर्तीचा आनंद होताच.
मानवाचं माध्यम शब्दांचं, तर परमेश्वराचं माध्यम हे घटनांच असतं. फक्त वेगवेगळ्या घटना, व त्यांचं वर्म यांचं नीट आकलन करून त्यांतून मिळणारे परमात्म्याचे संकेत, याचा   योग्य तो बोध आपल्याला घेता आला पाहिजे. कारण तेच, आपलं विहित कर्म असतं,  ईश्वराचं मनोगत असतं. श्री स्वामीनी त्यांच्या जीवनातील घटनांतून योग्य बोध कसा घेतला हे त्यांचे मित्र व गुरुबंधू श्री काका लिमये यांना १९३५ साली त्यांनी लिहिलेल्या पत्रावरून दिसून येते. हे पत्र बरेच मोठे आहे त्यामुळे त्यांतील संदर्भाला उपयुक्त तेवढा भागच इथे घेतला आहे.
"मी गृहस्थाश्रम स्वीकारावा असे योग जमून येत चालले. मला मोह आवरता येईना. ---- हे सर्व चालू असता, ' ईश्वरा, मला शुद्ध वासना दे, बुद्धि आणि सामर्थ्य दे ' अशी प्रार्थना वारंवार करीतच होतो. प्रपंची होऊन ' परिणामे विषमिव ' असेच सुख भोगायचे ना ? मला तर अनासक्त जीवन उपभोगायचे होते.” तुकाराम महाराजांना संसारपाश तुटण्याचे प्रसंग जसे ईश्वरी कृपेचे द्योतक वाटले स्वामीनाही नेमके तसेच वाटले ते लिहितात--”मेलों म्हणून सांगण्याकरिता पुन्हा जन्म झाला पाहिजे.” साक्षात्कारी संतांच्या बाबतीत तो तसा होतो. यालाच आत्म्याची काळरात्र ( Dark night of the soul ) असं म्हटलं जातं. देहबुद्धीचा पूर्ण नाश होऊन त्याची जागा आत्मबुद्धी घेते.  व संताना  याची देहीं यांचि डोळा तो सोहळा भोगत येतो.  जसे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे --
" तुका म्हणे आम्ही मरोनि जन्मलो। आपुलें पावलो अधिष्टान ।।"
ईश्वराने हा प्रश्न कसा अचूक आणि सुंदरपणें सोडविला!”.
स्वामीजी त्यांच्या ' मृत्युपत्र ' या अप्रकाशित काव्यांत एके ठिकाणी म्हणतात, “अन जन्मुनि आत्मज्ञ बनावे हा माझा हव्यास । प्रयोगांत आयुष्य आघवें वेचावें हा ध्यास ।। प्रान्त अनन्तत्वाचा लागे जीव समाधीमग्न । क्षणी त्याच या आयुष्याचा प्रयोग झाला पूर्ण ।। ---अन प्रयोग संपला, पावलो आज परम पदवीला । त्या प्रेमाचें     ‘विश्वप्रेमी’  झालें पर्यवसान । आनंदी आनंद जाहला स्वयेंच मी भगवान ।।.”
स्वामी वाःमय-विशारद्च्या ज्या परीक्षेला बसणार होते त्याच्या राहिलेल्या चार विषयांची तयारी पावसला घरी राहून करावी असा विचार करून ते पुण्याहून पांवसला आले. ८-१५ दिवस जातात न जातात तों ते मलेरियाने दोनचार दिवस आजारी पडले थोडी हुशारी वाटल्यावर आणि ताप कमी झाल्यावर ते सायंकाळी दोन चार फर्लांग फिरून आले. काही खाल्ले नसल्याने त्यांना थकवा आला व डोळ्यांपुढे अंधारी आली.देहावसान समीप आले आहे हा विचार प्रबळ होताच मेंदूला एकाएकी जबर आघात बसला . एका झटक्यासरशी कामक्रोधादि विकारांचा चक्काचूर उडाला आणि अन्तःकरण भयाने व्यापिले गेलें. स्वामी लिहितात "भयांतून भक्तीचा उदय झाला आणि भक्तीनें चिरशांति प्राप्त झाली". श्री स्वामीनी, "आपुलें मरण पहिलें म्यां डोळां" चा अनुपम्य सोहळा अनुभवला. त्याची नोंद करतांना ते लिहितात, “शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढीची नवमी।अठराशे छपन्न शकाब्दी मृत्यु पावलों आम्ही ।। नवजीवनामध्ये, सत्काविवर बनून स्वानुभवाधिष्टीत, नवरसपूर्ण "सत्य काव्य" निर्मितीचा संकल्प त्यांनी केला . “अमृतधारा” या त्यांच्या ग्रंथांत पहिल्याच साकीत श्री स्वामी लिहितात--
“जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कविवर होईन ।
स्वानुभवान्तस्फूर्त नवरसी सत्य काव्य निर्मीन ।। ”

प्रयत्न केला तर स्वतःच्या वर्तमान करणीनं, मनुष्य परमेश्वर होऊ शकतो हे श्री स्वामींनी त्यांच्या स्वतःच्याच उदाहरणानं सिद्ध केलं. आजच्या कलियुगांत, जिथे " नराचा   वानर " झालेली उदाहरणं प्रामुख्यानं पाहायला मिळतात अशा काळांत  " नर करणी करे, तो नर का नारायण हो जाय ", ही उक्ती  स्वामीनी सार्थ करून दाखविली. श्री स्वामींची श्री ज्ञानदेवांवरील अपार भक्ती व आदर त्यांच्या "ज्ञानदेव-वंदन","श्री ज्ञानेश्वरी गौरव" या त्यांच्या " अभंग ज्ञानेश्वरी " तील  पूर्वार्धात दिलेल्या विविध  रचनांच्या शब्दा शब्दांतून प्रतीत होते. विस्तार भयास्तव त्या सर्व रचना इथे न देता त्यांचा फक्त उल्लेख केला आहे.
श्री स्वामींना आपलं अवतारकार्य संपत आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी सांगितलं "  हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, अहो, आजकालचे नहोच आम्ही।। माउलीनेच आम्हाला इथं पाठवलं. दिलं काम तिच्याच कृपेनं पुरं झालं ".  " अमृतधारा " या श्री स्वामींच्या ग्रंथातील साकी क्रमांक- १५८,१५९ तसंच ५०,५१ या देखील याच अर्थाच्या आहेत. ज्ञानेश्वरांविषयी त्याचं प्रेम किती प्रगाढ होतें यासंबंधी एक आठवण त्यांच्या चरित्रात दिली आहे. दिनांक ८/३/७४ ह्या दिवशीं श्री स्वामींच " स्वामी निज धामीं चालले, अंतरीं   निजनामीं रंगले " हे भावकाव्य अक्षररूप झाले. तें त्यानीं एका पाकीटांत बंद करून स्वामी सत्यादेवानंद  यांचेपाशी दिले व प्रथम हें आळंदीला श्री ज्ञानेश्वरांच्या समाधीवर अर्पण करा आणि नंतर तें वाचा म्हणून सांगितलें. स्वामीना " तुम्ही आळंदीला किती वेळां गेलात " विचारलं, तेंव्हा स्वामींनी उत्तर दिलं " मुळीच नाही " व खुलासा केला की " श्री रामकृष्ण परमहंस ज्याप्रमाणे गयेला गेल्यावर तेथे आपण एकरूप होऊन परत देहावर येणार नाही म्हणून गदाधर दर्शनाला गेले नाहीत त्याप्रमाणेच हे आहे. म्हणजे तेथे गेलो असतो तर भावावेशाने जीवितच संपले असते. हा भाव म्हणून निर्याणाची सिद्धता झाल्यावर ही त्यांची पत्रभेट"       
"अपूर्व नवलाव अनुभवावा”  ( हे अभंग संदर्भास सुलभ व्हावे म्हणून लेखाच्या शेवटी  दिले आहेत.)  ही श्री स्वामींनी लिहिलेली, श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाची (फलश्रुति) हा श्री स्वामींचा स्वानुभव आहे, किंबहुना हा श्री स्वामींचा जीवनपटच आहे असं म्हटलं तर ते योग्यच ठरेल. ते श्री ज्ञानेश्वरीचं नित्य श्रवण मनन सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे करत असत. श्री स्वामींना उपासना मार्ग सापडून योगसार हस्तगत झालें हे त्यांच्या खालील शब्दांवरून स्पष्ट दिसतं :- " अन्तरातुनी सहज ध्वनि तो निघतो सोsहं सोsहम । विनाश्रवण ऐकता तोषतो माझा आत्माराम ।। विनावैखरी होत अंतरीं सोsहं शब्दोच्चार । सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैती व्यापार ||अमृतधारा/१४८-१४९।।अद्वय भक्ति येतां हातीं सरली यातायाती । बुडतां अमृतीं मरण तरी का संभवेल कल्पान्ती ।।अ.धारा/१५७।। संत ज्ञानेश्वर अद्वैतवादी आहेत त्याचप्रमाणे सद्गुरु स्वामी स्वरूपानंदही  अद्वैतवादी आहेत माउलींनी ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय १८ ओव्या १२०० तसेच १७५७ मध्ये अद्वैत शब्दाच्या जागी अद्वय शब्दाचा उपयोग केला आहे स्वामीनी ही तसाच प्रयोग केला आहे.
।। स्वरूपीं लागली अखंड समाधि आटली उपाधि अविद्येची ।।सं. गा.२१/५ राम नाम बीज मंत्र स्वामी जपे अहोरात्र सं. गा. ३६/५. ' नेति ' वेद बोले ते चि म्यां देखिलें । गुरु-कृपा-बळें स्वामी म्हणे ।। सं. गा. १२४/४. सहज घडे निष्काम कर्म - ' अमृतधारे ' च्या अर्पणपत्रिकेत स्वामी म्हणतात-- 'माताजी हे जगन मातर, भाग्यवान तव नंदन । करी 'अमृतधारा' ह्या । तुझ्या तुज 'समर्पण' ।। "भावार्थ गीते " चा ग्रंथकर्ता "हृदयस्थो जनार्दनः" असं अर्पणपत्रिकेत लिहून त्याचेच चरण-युगुली समर्पण करतात. " अभंग ज्ञानेश्वरी " च्या उत्तरार्धाच्या अखेरीला  आपल्या सद्गुरूंचा गणेश वैद्य असा उल्लेख करून पुढे लिहितात- "ग्रंथरूपें ऐसा । तेणे चि साचार । केला उपकार । जगावरी ।।६।। जी गोष्ट अ.ज्ञाने.ची तीच अ.अमृ.व अ.चां.पा.ची श्री ज्ञानेश्वरीत क्रममार्ग, साधना व अनुभूति सांगितली आहे व तेही गीतेच्या आधारे, तर श्री अमृतानुभव व श्री चांगदेव पासष्टी यांत केवळ स्वानुभवाधीष्टीत अद्वैतानुभूति विशद आहे. हे इतक्या सोप्या शब्दात अभिव्यक्त करणे केवळ तसाच अनुभव असलेल्या श्री सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांसारख्या साक्षात्कारी सत्कविवर संतांनाच शक्य आहे.“ चांगदेवासंगे | ह्या परी निःशब्द | केला जो संवाद | ज्ञानदेवे || तया संवादाचा | अभंगी सुबोध | झाला अनुवाद | गुरुकृपे । चां पा पृ ३०।। इति श्री ज्ञानदेव कृत अनुभवामृत ग्रंथ जो का तया ओवीबद्ध ग्रंथाचा सुबोध अभंगानुवाद केला येथे ।नाथसंप्रदायी सद्गुरुसमर्थ श्री गणेशनाथ योगीराज नित्य निरंतर राहोनि अंतरी मज ऐशापरी बोलवितो ” अ. अमृ. पृ. २००-२०१. श्री स्वामींचे हे शब्द आठवले  की सहजच माउलींची पुढील ओवी मनांत डोकावते.  “ जे पार्था तया देही । मी ऐसा आठऊ नाही । तरी कर्तृत्व कैचे काई । उरे सांगे ।। ऐसे तनुत्यागेविण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्ता ।।” ज्ञा ५/३८-३९.  साक्षात प्रकटे भगवान श्रीहरि -- श्री स्वामी लिहितात- " रूप चतुर्भुज सुंदर सांवळे । आजि म्यां देखिले । श्रीहरीचे ।। " आणि, "भाग्य हे उदेलें धन्य झाले डोळे । देखिलें सांवळे हरि-रूप ।। सं गा ।। ९५/१ , १३०/१   

अभंग हा छंद श्री स्वामीनी का निवडला याचा विचार करता अस दिसून येत की अभंग हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे. काव्यप्रकार म्हणून अभंगाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव,संत ज्ञानेश्वर , संत एकनाथ इ संतमेळा्याचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे. छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.श्री स्वामींचे अ. ज्ञा. तील १६००० हून अधिकतर अभंग हे २२ अक्षरी म्हणजेच मोठे अभंग आहेत  ज्यामध्ये  पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा अक्षरे आहेत. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे आहेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले आहे. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा आहे. अध्याय २/४७२ ते ५२९ तसेच अध्याय ११ /२५२ ते  २८८ व ५५२ ते ६३२ किंवा अशा काही ठिकाणीच स्वामींनी ८ अक्षरांचे २ चरण असलेले १६ अक्षरी लहान अभंग रस परीपोषाचे दृष्टीन लिहिले आहेत.व शेवटी यमक जुळवलेले आहे
१३ व्या शतकातील नामदेव-ज्ञानेश्वरांपासून १७ व्या शतकातील निळोबांपर्यंत अनेक संतांनी प्रचंड अभंगरचना केली आहे. असे असले तरी संत तुकाराम यांनीच या काव्यप्रकाराला सर्वाधिक उंचीवर नेले. अभंग रचना लोकप्रिय केली .
तरीही श्री स्वामींनी या छंदाचा उपयोग कधीही भंग न पावणारा तो अभंग हे अभंगाचे माहात्म्य लक्षांत घेऊन केला असावा असं राहून राहून वाटतं.
ज्ञानेश्वरीय प्रस्थानत्रयीला अभंग लेणं चढलं अन अलंकापुरीत अजानवृक्षाला नवी पालवी फुटली. टवटवी आली. माउलीच्या संजीवन समाधीवर स्मिताची कोर उमटली. कारण आता अमृतगंगा / ज्ञानगंगा पुनरुज्जीवित झाली होती संत साहित्यातील प्रस्थानत्रयी पुनःप्रवाहित झाली होती. " ज्ञानेश्वरी ", " अमृतानुभव ", तसेच "चांगदेवपासष्टी" या ज्ञानेश्वरीय साहित्याला अभंगरूप मिळालं. तुकाराम महाराजांनी गाथेंत लिहिल्याप्रमाणे-
“सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ।
तुका म्हणे नाही चालत तांतडी । प्राप्तकाळ घडी आल्याविण ।।
प्राप्तकाळ आला होता, "सत्य संकल्पाचा दाता भगवान" हे पुनःप्रत्ययाला आलें होते.    जीवाचं रूपांतर शिवात झाल्यानं, जिवाचा संकल्प शिवाचा झाला.
 अभंग-ज्ञानेश्वरी(य) एक  ईश्वरी संकल्प झाला.

माधव रानडे

email ID: ranadesuresh@gmail.com


ता. क.-- ।। अपूर्व नवलाव अनुभवावा ।।
                           (फलश्रुति)
श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन । गुरुपुत्रांसी सुगम सोपान । भावें घडतां श्रावण मनन । लाभे समाधान अखंडित । उपासना मार्ग सांपडे । योगसार  हातां चढे ।उघडती ज्ञानाचीं कवाडें । सहज घडे निष्काम कर्म । होवोनि अंतरंग अधिकारी । भावें अवलोकितां ज्ञानेश्वरी । साक्षात प्रकटे भगवान श्रीहरि । स्वयें उद्धरी निजभक्तां । नित्य अंतरी ज्ञानदेव । सर्वां भूतीं भगवद्भाव । देव भक्तां एक चि ठाव अपूर्व नवलाव अनुभवावा ।।