“माझेनि अनुसंधाने देख।संकल्पु जाळणे नि:शेख। मद्याजी चोख। याचि नांव”॥ज्ञानेश्र्वरी ९/१५७॥
आळंदीतून निघणारी माऊलींची, देहूची तुकोबा राय यांची पालखी
या शुभघडीला ‘अहं’ चा धूप जाळून ‘सोsहं’तेजे ‘स्वरूपा’च्या आरतीचा मानसवारी चा प्रयत्न.
निरुपणासाठी ज्ञानेश्र्वरी तील ९/१५७ ही ओवी घेतली आहे.
“श्रीज्ञानेशो भगवान् विष्णु:” या उत्कट भावातून, परात्पर गुरूंशी पराकोटीचे तादात्म्य साधलेल्या, स्वामींनी “ज्ञानेश्र्वरी नित्यपाठा” च्या रुपाने “भावार्थ दीपिका” सार “ज्ञानेश्र्वरी” तील निवडक ओव्यांचा हार गुंफून आपल्या हाती दिला. श्रीमद्भगवद्गीतेचा व ‘ज्ञानेश्र्वरी’ चा नववा अध्याय अनेक दृष्टींनी विशेष महत्वाचा व माऊलींना प्रिय. अध्याय १० मध्ये ते सांगतात “आतां अठरां पर्वी भारतीं । तें लाभे कृष्णार्जुन वाचोक्तीं। आणि जो अभिप्रावो गीते सातेंशतीं। तो एकलाचि नवमीं ।।म्हणोनि नवमींचिया अभिप्राया।सहसा मुद्रा लावावया ।बिहालो मी वायां।गर्व कां करूं ॥हे ऐसे अध्याय गीतेचे।परि अनिर्वाच्यपण नवमाचें। तो अनुवादलों हें तुमचें।सामर्थ्य प्रभू ॥१०/३२,३३॥अशा या अनिर्वाच्य ९ व्या अध्यायातील सर्वात जास्त १९ ओव्या स्वामींनी ‘ज्ञानेश्र्वरी नित्यपाठा’ त घेतल्या
संजीवन समाधी वेळीं माऊलींनीं समोर ज्ञानेश्र्वरी ठेवली होती हे नामदेव महाराज- संजीवन समाधी अभंग ६७/७२ मुळे सर्वश्रुत आहे-
“देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥नदीचिया माशा घातलें माजवण।तैसें जनवन कालवलें ॥२॥दाही दिशा धुंद उदयास्ता विण । तैसेंचि गगन कालवलें ॥३॥जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥ तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥ डोळां
भीममुद्रा निरंजनीं लीन।जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥ नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥ मी असे ऐकले आहे कीं नववा अध्याय वाचतां वाचतां माऊली समाधीत गेले, समाधिस्थ झाले.
गीतेच्या नवव्या अध्यायाचे सर्वच ३४ श्र्लोक भगवंतांचे मुखांतील आहेत ज्यांत त्यांनी जीव-ब्रह्मैक्य योगाचे, परमात्म्याशी एकरूप होण्याचे गुज, वर्म सांगितले आहे
ज्ञानेश्वरी ची भाषा थोडी अवघड असल्याने‘अभंग ज्ञानेश्वरी’ तील स्वामींचे अभंग संदर्भसाठी दिलेत
“समूळ संकल्प।टाकावा जाळोन ।मदनुसंधान।राखोनियां॥पार्था, हें चि माझें ।निर्मळ यजन ।जेणें होय मन।निर्विकल्प ॥संकल्प विकल्प।जातां आपोआप सर्वथा मद्रूप। होसील तूं॥ अर्जुना, हें माझें।अंतरींचें गुज । सांगितलें तुज।आज येथें॥सर्वां हि पासून निज-गुह्य-ज्ञान।पार्था, लपवून। ठेविलें जें ॥ह्या चि भक्तिपंथें। लाभोनि तें तुज। होशील सहज। सुख-रूप॥ऐसें बोले भक्त।काम -कल्पद्रुम।देव मेघश्याम।परब्रह्म ॥अभंग ज्ञानेश्र्वरी९/९७८-९८४॥
अभंग ज्ञानेश्र्वरीची भाषा सोपी आहे. भगवंत पार्थाला सांगताहेत कीं त्यांच्या अनुसंधानाने संकल्प विकल्प समूळ जाळून टाकले तर तो परमात्मरूपच होईल संकल्प विकल्प रहित मन निर्विकल्प समाधीसुख अनुभवते हे भक्ति मार्गातील वर्म भगवंतांनी स्वत: पार्थाला सांगितले. इथे मना विषयीं भगवंत, माऊली व स्वामींचे विचार जाणून घेऊया.
“मन्मना भवमद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ।॥९/३४।।मन्मना भवमद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे”॥ १८/६५॥
गीतेच्या वरील दोन्ही श्र्लोकांत भगवंतांनी “मन्मना:भव, मद्भक्त: भव मद्याजी भव मामेवैष्यसि” (माम् एव एष्यसि- मलाच येऊन मिळशील)या वचनांची पुनरुक्ति केली आहे. तद्वतच विभूती योग गीता १०/२२ मधे इंन्द्रियांत मन ही माझी विभूती असे सांगितले. माऊली ज्ञानेश्र्वरीत सांगतात कीं “इंद्रियांआंतु अकरावें।मन तें मी जाणावें।भूतांमाजी स्वभावें। चेतना ते मी”॥पण हें अकरावें इंद्रिय मन जे केवळ काल्पनिक असूनही बाकी दहा इंद्रियांवर (पांच कर्मेंद्रिय व पांच ज्ञानेंद्रिय) सत्ता गाजवते. तें ताब्यांत ठेवण्याची विद्या, ज्ञान तत्वज्ञ संत जिज्ञासु साधकाला देतात स्वामी सांगतात:-
“ निरोगी निर्मळ असावें शरीर । जाण ते मंदिर देवाजीचे १॥
मन बुद्धि शुद्ध असों देई नित्य । तें पूजा-साहित्य देवाजीचें॥२॥
सर्वकाळ चित्त ठेवावें पवित्र।तें चि पूजा-पात्र देवाजीचे॥३॥ सोऽहं भावें जीव पूजी नारायणा ।सांडूनी मीपणा स्वामी म्हणे” ॥ ४॥संजीवनी गाथा १३६॥
स्वामी सांगतात अहं भाव त्यागून शरीराचे मंदिरातील नारायणाचे शुद्ध मन, बुद्धी व पवित्र चित्ताने सोऽहं भावे पूजन करावे.
जीवाला अधिष्ठानरूप ब्रह्माचा विसर पडतो व आपल्या आतच अमर्याद सुखाचा साठा असूनही ज्ञानवृत्ती बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न करते. मग तिची धाव बाह्य विषयांकडे असते. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने जीव विषयांचे ज्ञान करून घेतो कर्मेंद्रियांच्या सहाय्याने विषयांची प्राप्ती करून घेतो. विषय, देश वस्तु व कालाने मर्यादित असतो. त्या त्या विषयांपर्यंत ज्ञानवृत्ती पोचली की तिची धाव थांबते. तेथे ज्ञान विषयाचा आकार धारण करते. पूर्वी ज्ञात नसलेला विषय ज्ञात होतो. आत्मविस्मृतीतून जे ज्ञान उत्पन्न होते ते विपरीत ज्ञानच असते. अशा प्रकारे विषयाचे ज्ञान करून घेणार्या जीवाच्या ठिकाणी ज्ञातृत्वाची उभारणी होते व तो ज्ञाता होतो. त्याला जो विषय कळतो ते ज्ञेय होते. ज्ञानाचा असा व्यवहार होतो. ज्ञान ज्ञेय विषयाच्या हद्दीवर थांबते व पदार्थांना नावे देते. सामान्यपणे असे हे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय यांचे स्वरूप आहे.
आत्मविस्मृती झाल्यामुळे अज्ञानातून या त्रिपुटीचा जन्म व आत्मज्ञान झाले की हा त्रिपुटीचा डोलारा कोसळून पडतो.
‘अभंग ज्ञानेश्र्वरी’त लिहिलं आहे
“सर्व शरीरीं ह्या।वसे धनंजया। प्राणाची जी प्रिया । क्रियाशक्ति ॥तिचें ह्या च पांच। इंद्रियांच्या द्वारा।होत असे वीरा ।येणेजाणें ॥ सांगितलीं ऐसीं। इंद्रियें दहा हि।आतां 'मन' तें हि। स्पष्ट सांगूं॥ इंद्रियां- बुद्धीच्या।संधींत जें फिरे ।रजोगुणाधारें।चंचलत्वें ॥ मृगजळावरी।भासती लहरी। नातरी अंबरीं।नील-वर्ण ॥तैसा देहीं भासे। जयाचा आभास। नाहीं च जयास।‘वास्तवता’॥ रज आणि रेत । होवोनियां एक ।पंचभूतात्मक।देह घडे मग वायु तत्त्व।एक चि तें देहीं ।‘दशविध’ होई । स्थान-भेदे देह -धर्म बळें ।मग ते दहा हि।आपुलाल्या ठायीं।‘निवसतां’॥तेथ चांचल्य तें। एकलें चि राही । म्हणोनियां घेई । 'रजोबळ’॥ बुद्धीच्या बाहेरी।अहंकारावरी। थोर बळ धरी।माझारीं च॥वायां तयालागीं।मन ऐसे नांव।तें तों ‘सावयव’।कल्पना च॥ जयाचिया संगें।ब्रह्मालागी साच।आली नसती च।जीवदशा ॥ सर्व प्रकृतीचे। असे जे का मूळ ।वासनेसी बळ । मिळे जेणें ॥अहंकारालागीं। द्यावयासी भर। राहे निरंतर।तत्पर जें॥ वाढवी इच्छेतें।चढवी आशेतें। आधार जें देतें। भयालागीं ॥ जेणें चढे बळ । अविद्येलागोन। होय जन्म स्थान। दैताचें जें ॥जे कां इंद्रियांसी। लोटी विषयांत। रची मनोरथ। सवें मोडी॥ संकल्प-विकल्पें।अखंड ‘उदंड’। करी घडामोड़। सृष्टीची जें ॥ जेणें बंद केलें ।बुद्धीचे हि द्वार। भ्रांतीचे कोठार। होय जें का॥ वायु-तत्त्वाचिया।आंतील जे सार।तें चि गा साचार । मन जाण ॥१३/१६४ ते १८४॥
असे हे वायुतत्वाचें सार रजोगुणी चंचल मन बुद्धीचे दार बंद करून संकल्प-विकल्पां द्वारा इंद्रियांना क्षणिक विषय सुखांत ढकलते व मृगजळामागे धावत तडफडणारे जीव पाहून जगद्गुरु तुकोबा राय सांगतात ‘ उपकारासाठीं बोलो हे उपाय। येणेंविण काय आम्हा चाड। बुडतां हे जन देखवेना डोळां।येतो कळवळा।म्हणवोनि ॥आणि शाश्र्वत सुखाचा, अनुसंधान मार्गाचा बोध करतात. स्वामी सांगतात ‘चालतां बोलतां अनुसंधान प्रयत्नें करोन असों द्यावें’ किंवा “चालतां बोलतां हिंडतां फिरतां ।लिहितां वाचितां खातां जेवितां ।नाना सुखदुःख- भोग भोगितां। निजात्मसत्ता आठवावी’॥स्वरूप पत्र मंजूषा ६३-६४॥
चालतां बोलतां हिंडतां फिरतां यावरून आठवण झाली, स्वामी अनुसंधाना बाबत चिरपरिचीत दृश्य विहीर वा नदीवरून डोक्या वर घडे घागरी एकावर एक रचून गप्पा करत पाणी आणणार्या स्रियांचे उदाहरण देत असत त्या चालता बोलतानाही त्यांच्या घागरींना धक्का लागत नाही. ‘नाना सुखदुःख-भोग भोगितां। निजात्मसत्ता आठवावी’ याचा अर्थ हा की जीव मात्रांच्या सर्व क्रियांचे अधिष्ठान परमात्मा आहे याचें भान जाणीव ठेवून वागणे.
‘सदा स्व-रूपानुसंधान । हेचि भक्ति हेचि ज्ञान । तेणें तुटोनि कर्म-बंधन । परम समाधान प्राप्त होय’॥स्व.प.मंजूषा ६४॥
शेवटी, स्वामींच्या शब्दांत त्यांना
‘उदारा जगदाधारा देई मज असा वर। स्व-स्वरूपानुसंधानीं रमो चित्त निरंतर’ ॥१॥वरप्रार्थना॥
अशी प्रार्थना सद्गुरुं पाशी करून
त्यांच्या कृपेने स्फुरलेली ही शब्द सुमनें त्यांच्याच चरणीं समर्पण.
माधव रानडे