Monday, January 9, 2017

      इ.सन २०१७ साठीं शुभेच्छा व २०१६ चा आढावा               

सर्वप्रथम, “ स्वामी म्हणे ” या २००७ साली सुरूं केलेल्या, ब्लाॅगच्या सर्व वाचकांनां, दशकपूर्तिच्या निमित्तानें, थोडसं उशिरा का होईना,२०१७ चें वर्ष सुख-समृद्धी समाधानाचे जावो अशी प्रार्थना मी श्री स्वामींचे चरणीं करतो.
माझं सर्व लेखन, श्री स्वामींचे नित्य स्मरणीय चैतन्यमय विचारधन, आणि अनुकरणीय चरित्र ह्याचा सर्वदूर, प्रसार-प्रचार झाल्यास त्याचा समाज प्रबोधन / सुधारणेस मोठा लाभ होईल ह्या हेतूनं केलेले आहे. व हे सर्व मी स्वामींच्याच प्रेरणेनं, आजवर करत आलो आहे.

या दृष्टीनें २०१६ चं वर्ष फारच छान गेले. वर्षाच्या सुरवातीला, २७ जानेवारीला,१५डिसें. १९८१ मधे प्रकाशित “जेथे जातो तेथे” या माझ्या पुस्तिकेची द्वितीयावृत्ती “स्नेहल प्रकाशन” पुणें यांनीं प्रकाशित केली. 
एप्रिल मधे, “ योगदा ज्ञानेश्वरी ” चे लेखक स्वामी योगेश्वरानंद यांचा, श्री स्वामींचे प्रति असलेला आदरभाव व त्यासंबंधींचा, त्यांच्या ग्रंथात असलेला स्पष्ट उल्लेख माझ्या वाचनांत आला. त्यांची शैक्षणिक योग्यता आणि अध्यात्मिक अधिकार विचारांत घेऊन मी त्यांना,        “ज्ञानेश्वरी नित्यपाठ ” चं ईंग्रजीत Versification / translation/ transliteration करण्याची विनंती केली. त्यांनीही अल्पावधीतच ते केलं. हे लेखन Academia.edu च्या https://www.academia.edu/2481731/Nityapatha_Dnyaneshwari या link वर उपलब्ध आहे. अनेक वाचकांनी या संकेतस्थळाला भेट दिली असं ते म्हणाले.
 “ योगदा ज्ञानेश्वरी ” च्या दोन्ही खंडांची एक प्रत समाधी मंदीराला भेट देण्याचें त्यांच्या मनांत आहे. सेवा मंडळाने याचा विचार अवश्य करावा.
याच वर्षी “श्रीक्षेत्र पांवस” च्या दोन्ही अंकात लेखही प्रसिद्ध झाले.
वर्ष अखेरीस, श्री स्वामींचे जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर, मार्गशीर्ष वद्य द्वादशी रोजी,२५ डिसें २०१६ ला, “अक्षर स्वरूप ” या पुस्तिकेच्या द्वितीयावृत्तीच्या, प्रकाशनाचे सौभाग्यही, सौभाग्यवतीला मिळाले.
२०१६ मधे ब्लाॅगवर ४-५ लेखही लिहून झाले.

श्री स्वामींच्या साहित्यांतून प्रतीत होणाऱ्या त्यांच्या निज-जीवन-तत्वज्ञानावर लघुपट काढण्याचा विचार फार दिवस मनांत होता व योगायोग असा की २०१६ मध्येच कामाला सुरवात होऊन, १५ मिनिटांचा लघुपट आतां लवकरच “ यू-ट्यूबवर ” (जे सोशल मिडियाचे फार सशक्त माध्यम आहे) व सी.डी.च्या रूपात उपलब्ध होईल.
आम्हा उभयतांनाही, अर्थातच, या गोष्टीची सतत जाण व भान आहे कीं हे सर्व केवळ  सद्गुरूंच्या कृपाप्रसादामुळेंच शक्य झाले आहे. 
याच भावनेतून, आम्ही उभयता हे मानतो, की प्राधिकरण निगडी येथील, १९८१ साली बनलेली, “ स्वरूप सावली ” ही वास्तू हे श्री स्वामींचे मंदिर आहे व आम्ही येथील पुजारी आहोत. 

या माझ्या विधानाबद्दल गैरसमज होऊ नये, म्हणून माझे एकेकाळचे निकटचे स्नेही, ज्ञानेश्वरभक्त कै. श्रीकृष्ण भोमे ( १ फेब्रु. २०१४ ला ते परलोकवासी झाले.) यांचे विचार खाली देत आहे.

                         “ स्वरूप-सावली ".
" स्वरूप सावली " । सुखद सुशांत ।  लोकांती एकांत । येथे वाटे ॥१ ॥ सर्व कोलाहल । सर्व गजबज । होति येथे सहज शान्तिमय॥ २ ॥ न लावता येथे । लागते समाधी । साऱ्या आधी व्याधी । नष्ट होती ॥ ३ ॥ आहे या वास्तूत । स्वामींचा रहिवास । हा क्षेत्रसंन्यास । असे त्यांचा ॥ ४ ॥ वास्तुतील वस्तु ।  वस्तु स्वामीमय । अचेत चिन्मय । पहा झाल्या ॥५॥  हा नव्हे प्रासाद । आहे हा प्रसाद । जणु आर्त साद । माउलीची ॥६॥ दगड विटांचे । नाहीच हे घर । हे आहे जिव्हार । हृदींचे माझ्या ॥ ७॥ हृदयाच्या आंत । थेट गाभाऱ्यात । आहे विराजित । चरणद्वय॥ ८॥ स्वरूपासहित । सांवली हि आहे । ब्रह्म माया राहे । एकेठायीं ॥ ९॥ सगुण निर्गुण ।  दोन्ही रूपें स्वामी । पाहतो नित्य मी ।  वास्तुत या ॥ १० ॥ हेचि निजधाम । हेचि परमधाम । । येणे जाणे श्रम । नाही आतां ॥ ११ ॥ आतां माझा न मी ।राहिलो मी स्वामी । माझ्या निजधामी । स्वामी माझा ॥ ”

                                                    
२०१६ चा आढावा घेण्याची काही कारणं आहेत. महत्वाचं हे कीं १० सप्टें. ला डेंग्यूच्या आजारानं दवाखान्यांत होतो, त्यावेळी ताप वाढला व हातून श्री स्वामींच्या साहित्याचा व्हावा तसा प्रचार-प्रसार होत नाही ह्याची खंत वाटून भ्रांतचित्त झालो. श्री स्वामींनीं प्रेरणा दिली, कृपा केली व काही सेवा हातून घडली त्याचा लेखाजोखा म्हणून हा आढावा घेतला. त्यामुळे खूप दिलासा मिळाला. 

यापुढे मात्र नजर कमजोर झाल्यामुळे व प्रकृतीच्या काहीना काही अस्वस्थतेमुळे, हातून विशेष काही होईल असं वाटत नाही. ब्लाॅगवर एखादा लेख होईल तसा व होईल तेंव्हा लिहायचा प्रयत्न करीत राहीन.

ranadesuresh@gmail.com
Mobile   +919823356958.                                                                                                                                                                                           माधव रानडे