Saturday, April 23, 2016

                          श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ”
                                       भावार्थ-विवरण. (२)


आज “अमृतधारा” भावार्थ-विवरणाचा दुसरा लेख लिहितांना एक जुनी आठवण मनांत  येऊन गंमत वाटली, आणि हसूं आलं. मी व बाबुराव (श्री श्रीकांत देसाई) श्रीस्वामींच्या बद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल बोलत होतो. श्रीस्वामींचा विषय म्हणजे आम्हां साऱ्यांच्याच आवडीचा. ते म्हणाले की “अमृतधारा” पुस्तकाच्या पहिल्या पानावर श्रीस्वामींच्या फोटोच्या वर “साधकावस्थेतील भाव-विलास” हे शब्द आहेत. श्रीस्वामी त्यावेळीच सिद्धावस्थेत असतांना व त्याच पुस्तकातील अनेक साक्यांवरुन असं स्पष्ट दिसत असतांना हे लिहिणं बरोबर आहे का ? मलाही त्यांचा मुद्दा त्यावेळी पटला. ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वीची आहे. आज हसूं आलं, कारण आतां डोळ्यांसमोर येतात समर्थांच्या पुढील ओव्या-


“ बाह्य साधकाचे परी । आणी स्वरुपाकार अंतरी । सिद्ध लक्षण तें चतुरीं । जाणिजे ऐसें ।।


आणि  स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या या  ओळी-


            “ मंत्र -विद्या-बळें । टाकी जादूगार । बांधोनि नजर । आणिकांची ।।
               परी तुझी लीला । लोकविलक्षण । आपणा आपण । चोरिसी तूं ।। ”


व लक्षांत येतं की-


         “ आपुलें अस्तित्व । कळूं नये लोकां । नामरूप जें का । तें हि लोपो ।।”


याच भावनेतून, प्रकाशकांनी घातलेल्या या शब्दांना स्वामींनी तसेंच राहू दिले असावे.  


“ अमृतधारा ” संग्रहाचा भावार्थ पहायचा असेल तर समर्थांच्या पुढील ओव्या पहाव्या   
“ शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे ते यथार्थ । पण आपण मिथ्या ।  भूंस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्यजावा । कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ।। ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष । स्वानुभव तो अलक्ष । लक्षिला न वचे ।। ”


सारांश:- शब्द हे स्थूल आहेत तर लक्ष्यांश अर्थात भावार्थ सूक्ष्म. जगद्भान हारपलेल्या, भावसमाधीत तल्लीन, श्रीस्वामींच्या स्वानुभवाचा अल्पसा कां होईना मागोसा घेण्यासाठी, त्या काव्यातील भावार्थ विवरणाचा हा खटाटोप.


माझं हे लिहिणं कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटेल, पण भावार्थाचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी, मला हे लिहावसं वाटतं, की जसे श्री ज्ञानेश्वर माउली हे भगवान विष्णूचे अवतार असल्याकारणाने, ते योगेश्वर श्रीकृष्णाच्या भूमिकेशी, तत्त्वज्ञानाशी, तदाकार झाले आणि कल्पनातीत ईश्वरी योजनेचा भाग होऊन त्यांनी गीतेवर प्राकृताच लेणं चढविले,“ “भावार्थ दीपिकेचं ” निरुपण केले, अपूर्व ज्ञानगंगा, समाजातील सर्वांसाठी खासकरून तळागाळातील उपेक्षितांसाठी, बहुजनांसाठी प्रवाहित केली व म्हणूनच ती आज सातशेहून अधिक वर्षांनंतरही तेव्हढीच लोकप्रिय आहे. नेमकी हीच गोष्ट “ईश्वरी संकल्पाचा” च भाग म्हणून २०-२१ शतकांतील नाथ संप्रदायाच्या या थोर वारसदारानं, श्री स्वामी स्वरूपानंद, यांनी केली. माउलींच्या पावलावर पाऊल टाकीत, नाथसंप्रदायाची पालखी तर पुढे नेलीच, शिवाय “गीता” व “भावार्थ दीपिका” अर्थात “ज्ञानेश्वरी”, या दोन्हीं ग्रंथांतील प्रतिपाद्य तत्वज्ञानाशी, ग्रंथकर्त्यांच्या भूमिकांशी तद्रूप होऊन, समरस होऊन “भावार्थ गीतेचा ”, आविष्कार केला. व तेही पूर्णपणे अकर्तृत्वाच्या भावनेतून. “अमृतधारा” या संग्रहाच्या, अर्पणपत्रिकेत “इदं न मम”, या भावनेतून श्रीस्वामींनी, “करी ‘अमृत-धारा’ ह्या तुझ्या तुज समर्पण”, व हे करता आलं यासाठी स्वत:ला भाग्यवान मानलं, त्याप्रमाणे, श्रीमद्भगवद्गीतेचा मुख्यत्वे श्रीज्ञानेश्वरीच्या आधारे केलेल्या सुबोध, सरळ मराठीत केलेल्या रसाळ पद्यमय अनुवादाचा ग्रंथकर्ता ते “हृदयस्थो जनार्दन” मानतात आणि त्याचेच चरणयुगुली सर्वभावे समर्पण करतात. हे सर्व लिहिण्याचं कारण हे की, श्रीस्वामींसारखे साक्षात्कारी संत आत्मबुद्धीच्या भूमिकेवर असतात.  त्यांची अनुभूति व आविष्कार हे आत्मज्ञानाच्या सत्प्रकाशात उजळून निघालेले असतात म्हणून त्यांतील भावार्थ शोधायचा. आणि स्वामी म्हणतात तसं-


         “शब्दाची वरील । काढोनिया साल । गाभा जो आंतील । अर्थरूप ।।
               त्या चि अर्थब्रह्मीं । होवोनि तद्रूप । सुखें सुखरूप । भोगावें हें ।।


या आधीच्या लेखांत लिहिल्याप्रमाणे, “अमृतधारा”, हा संग्रह  मला स्वामींच्या  अवतारकार्याचा, त्यांच्या दिव्य मनाला प्रतित झालेला स्पष्ट आराखडा (Road Map) व क्वचित त्यांच्या पुर्वायुष्याच्या खुणा दाखवणारा वाटतो.


भावार्थ विवरणासाठी मी मुख्यत्वेकरून श्रीस्वामींच्याच साहित्याचे, त्यांच्या चरित्राचे, बोट धरिले आहे. तसेंच श्रीस्वामींच्या चैतन्यरूपाशी, चैतन्य लहरींशी सहस्पन्दित होण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यातून मिळणारा आनंद वाचकांशी वाटून घेण्याचा या सर्व लेखांतून करणार आहे.


अशाच प्रयत्नातून, माझे भावार्थ गीतेच्या ध्वनिमुद्रिका (Audio CD) चे स्वप्न, सेवा मंडळातर्फे प्रत्यक्षांत आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाट आहे, असे माझे तरुण साधक मित्र श्री सुदेश चोगले यांचेशी वारंवार होत असलेल्या चर्चेतून काही उद्बोधक माहिती समोर आली ती पुढे त्यांच्याच शब्दांत देणार आहे. “भावार्थ गीते” बद्दल इतकं लिहिण्याची विशेष कारणं आहेत ती थोडक्यांत पण ठळकपणे अशी:- "

(१) “अमृतधारा”, ह्या संग्रहातील साकी क्र. १ व ६ ते ९ यांचा थेट संबंध श्रीस्वामींच्या इतर "अभंग " साहित्या बरोबरच मुख्यत्वेकरून त्यांच्या सर्वप्रथम प्रकाशित “भावार्थ गीतेशी” आहे असं माझं ठाम मत आहे.
(२) कारण “भावार्थ गीता” ही श्रीस्वामींची स्वतंत्र साहित्यकृती आहे व ती अनुपमेय आहे.

(३) ही साहित्यकृती गीतेचा विस्तार ७०० श्लोकांचा १६१९ साक्या तर ज्ञानेश्वरीच्या ९०३३ओव्यांचे सार आहे.
(४) ती गेय आहे एव्हढेच नव्हे तर आतां तिची ध्वनिमुद्रिका (Audio CD) उपलब्ध आहे
(५) मी या संग्रहाला गंमतीने Two in One म्हणतो
(६) माझं म्हणणं आहे की “ गीता ज्ञानेश्वरी । आतां घरोघरीं । भक्तांचा कैवारी । स्वरूपानंद ।।
(७) श्री स्वामी स्वतः त्यांच्या पत्रांतून “भावार्थ गीतेचा” उल्लेख करतात. “स्वरूप-पत्रमंजूषा” (४१,४२/८,६/१२) यातील पत्र ४१ सर्वांत लहान पत्र असून असे निश्चयात्मक उद्गार इतरत्र आढळत नाहीत. यावर “आत्मानुभवाची गुरुकिल्ली” या शीर्षकाखाली माझा एक लेख श्रीक्षेत्र पावस या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. तसेच “भावार्थ गीतेचा” लेख या संकेत स्थळावर पहावयास मिळेल (दिनांक २१ नोव्हेंबर २००८).
(८) “भावार्थ गीतेचे” गीत रामायणासारखे Programme केले व गीतेच्या मूळ ७०० श्लोकांचा अंतर्भाव करून वेगळी आवृत्ती काढल्यास त्याचे अद्भुत परिणाम दिसतील व उपयुक्तता वाढेल.


श्री सुदेश चोगले म्हणतात :-  
*************************************************************************
“ संतसाहित्य म्हणजे प्रतिभेच्या स्त्रोतातून प्रकट झालेला स्वानुभव!  त्याच्या वाचनाचे अंतिम पर्यवसान वाचकांस अनुभूति होण्यात जर झाले तर ते साहित्य वा ते वाचन-मनन यशस्वी ठरेल अन् तशी ताकद त्यात निश्चितच असते.
अनुभव ---> भावावस्था + प्रतिभा ---> शब्द वा काव्य ---> वाचन + मनन ---> भावनिर्मिती ---> अनुभव


म्हणजेच भावाची अभिव्यक्ति शब्दरूपाने काव्यात होते आणि त्यामुळे ते काव्य त्या भावविश्वात प्रवेश करण्याचे द्वार आहे. संजीवनी गाथेत श्रीस्वामीजी एका अभंगात म्हणतात "भाव-बळे आम्हां हरिचें दर्शन".  भाव हे भक्ताचे बळ आहे किंवा भाव हा इतका बलशाली आहे की तो हरीचे दर्शन करून देऊ शकतो.


याच अनुषंगाने आपण श्रीस्वामीजींच्या "अमृतधारा" या स्फुट काव्यरचनेचा भावाधारे मागोवा घ्यायला हवा जेणेकरून आपण श्रीस्वामीजींच्या त्या काळातील भावावास्थेशी अल्पसे तरी तादात्म्य पावू शकू व त्या अनुभवाचा अल्पांश तरी प्राप्त करू शकू.


श्रीस्वामींसारखे मितभाषी संत जेव्हा लिहितात तेव्हा त्याचा अर्थगाभा अत्यंत सखोल व विशाल असतो.  अमृतधारेचे वैशिष्ट्य म्हणजे
१. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर असताना काव्यस्फूर्ति होणे अशी उदाहरणे विरळाच असावीत.
२. स्वत:च्या प्रकृती अस्वास्थ्याचे वर्णन जरी अमृतधारेत असले तरीही त्याबद्दल तक्रार मात्र नाही. यातून शरणागति प्रतित होते.


अमृतधारेच्या सुरवातीच्या काही साक्या वाचल्या तर त्या प्रत्येकात स्वानुभव व अनुभव हा शब्द आलेला दिसतो व स्वानुभव-सुधा म्हणजे स्वानुभवाचे अमृत शिंपून भूतलावरील सर्वांना स्वानुभवी बनवीन अशी श्रीस्वामीजींची सदिच्छा त्यांत दिसून येते.


श्रीस्वामीजींनी तरुणपणी जरी गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी व इतर अनेक संत साहित्याचा सखोल अभ्यास केलेला होता तरीही अमृतधारा पाहिल्यास या काळात केवळ सोहम् साधनेखेरीज दुसरा आधार त्यांनी घेतलेला नाही हे दिसून येते व केवळ तोच त्यांना आत्मदर्शन करवून देण्यास कारणीभूत झाला हेसुद्धा पुढील साक्यांत सिद्ध होते. पुस्तकी विद्या वा पोपटपंची दूर सारून त्या अनंताच्या प्रांतात श्रीस्वामीजींनी सोहम् साधनेद्वारा अक्षरश: उडी घेतली. शेवटच्या साक्यात अद्वैत तत्वज्ञानाच्या सर्वोच्च अनुभूतीचे वर्णन आढळते, ज्यामुळे श्रीस्वामीजी आत्मतृप्त झाले व पुढील काळात ते आपल्या पत्रव्यवहारात "आत्मतृप्त स्वरूपानंद" असे लिहित असत. यावरून अध्यात्मसाधनेत गुरुप्रणित साधनेचे महत्त्व विशद होते. पण हे लक्षात न घेता सर्वसाधारणपणे बहुतांश साधक आध्यात्मिक वाचनाच्याच जास्त आहारी जातात व त्यातच साधनेपेक्षा जास्त काळ व्यतीत करतात व त्यामुळे अनुभूतीस मुकतात असे दिसून येते. दुसरे असे की प्रकृती अस्वास्थ्य असताना पुस्तकी विद्येचा विशेष आठव होत नाही वा ती विशेष उपयोगीसुद्धा पडत नाही तर अंतरंग साधनाच सहायक ठरते असे कळून येईल.
अमृतधारेतील साधकांस उपयुक्त ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:-  ध्येयनिश्चिती व ध्येयवेड, जीवनाची स्पष्ट संकल्पना, निश्चय वा करारीपणा, वैराग्य, अलिप्तता, अखंड साधनाभ्यासाचे महत्व, ईश्वरनिर्भरता, शरणागति, स्वानुभूति


श्रीस्वामीजीच्या संजीवनी गाथेतील अभंगांचा अभ्यास करताना शेवटचा चरण आधी वाचला तर त्यांना काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे कळते व मग सुरवातीपासूनचे चरण वाचल्यावर ते त्या पुष्ट्यर्थ आहेत हे ध्यानात येते. अमृतधारेतसुद्धा याप्रमाणे शेवटच्या काही साक्या वाचल्या तर हे लागू पडते असे ध्यानात येईल.


श्रीस्वामीजीनी भगवतीची उपासना केलेली नसताना अमृतधारेत असलेले जगदंबा, जगन्माता, माताजी असे उल्लेख मात्र प्रज्ञ अभ्यासकांस निश्चितच विचारप्रवृत्त करतील!!
श्रीस्वामीजी अन् जगन्माता जगदंबा:-
श्री बाबूराव पंचविशे (मास्तर), मालाड - मुंबई, ज्यांनी श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य पूज्य बाबा बेलसरे यांची श्रीज्ञानेश्वरीवरील निरुपणे लिहून काढली व आज ती आपणांस पुस्तकरूपाने उपलब्ध होत आहेत, ते पंचविशे मास्तर, श्रीस्वामीजींचे अनुग्रहित शिष्य आहेत. चित्रकार कै. अनंत सालकर व मास्तर हे घनिष्ठ मित्र.  सालकर हे श्रीस्वामींचे अनुग्रहित त्यामुळे त्यांना वाटायचे की आपल्या परममित्राने म्हणजेच बाबूरावांनीसुद्धा श्रीस्वामीजींचा अनुग्रह घ्यावा. त्यानुसार मास्तरांना घेऊन ते पावसला गेले. कै. मधुभाऊ पटवर्धन व सालकर हे पण मित्र. मधुभाऊसुद्धा सोबत होते. मधुभाऊंनी  श्रीस्वामीजींस विनंती केली की आपण बाबुरावांना अनुग्रह देऊन आपले कृपांकित करावे.


त्यानुसार मास्तर श्रीस्वामीजींच्या खोलीत दर्शनास गेले असता श्रीस्वामीजींनी मास्तरांना श्रीरामकृष्ण परमहंसांचे एक पुस्तक हाती दिले व कुठलेही पान काढून वाचा असे सांगितले. ते उघडल्यावर अध्याय ४२(?) मधील राखाल, राम, केदार, तारक, एम. इत्यादी ठाकुरांच्या दर्शनाला जातात त्या प्रसंगाचे वर्णन आले. केदार ठाकुरांची कृपा प्राप्त होण्यासाठी ठाकुरांचे अंगठे धरून बसत असे. ठाकूर आईला (कालीमातेला) सांगत आहेत की याचे (केदारचे) पैशावरील प्रेम नष्ट होत नाही, बाईवरील प्रेम नष्ट होत नाही, आई याला माझ्यापासून दूर कर.  मास्तर तर अनुग्रहाच्या इच्छेने श्रीस्वामीजींपाशी आले होते आणि आली तर ही अशी गोष्ट!  मास्तरांच्या डोळ्यातून घळघळा अश्रूधारा वाहू लागल्या. तितक्यात श्रीस्वामीजी म्हणाले, "असू दे, असू दे, या आपल्या त्या काळच्या  आठवणी".  दोनदा हेच म्हणाले.  त्यानंतर आपणास दुपारी बोलावितो असे सांगून निरोप दिला. दुपारी मग मास्तरांना श्रीस्वामीजींचा अनुग्रह प्राप्त झाला.


या घटनेमुळे मास्तराचे असे मत आहे की गेल्या जन्मी श्रीस्वामीजी व आपण स्वत:  बंगालमध्ये होतो व श्रीस्वामीजींची जगन्मातेची उपासना असावी.  तोच धागा पुढे आल्यामुळे जगन्मातेचा उल्ल्लेख अमृतधारेत आला असावा. तसेच श्री स्वामीजींच्या पत्रव्यवहारात  सुरवातीस "जय माताजी" असे लिहिलेले असे.


‘जगन्माता म्हणजे ब्रह्म’ असाही उल्लेख श्रीठाकुरांच्या मुखातून आलेला आहे.”


याबाबत कै. श्री. म.  दा.  भट यांनी श्रीस्वामीजींस एकदा प्रश्न केला होता की, स्वामीजी आपण पत्राच्या सुरवातीस “जय माताजी” असे कां लिहिता?.
तेव्हा श्री स्वामीजींनी उत्तर दिले की भिलवडीजवळील भुवनेश्वरी देवी ही श्रीदत्तगुरुंची (श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची) देवी  होय. पण आणखी काही खुलासा केला नाही.
सर्वांस माहित आहेच की श्री दत्तगुरुंच्या आशीर्वादानेच श्रीस्वामींचा जन्म झालेला आहे!


*************************************************************************


माझं असं मत आहे की “अमृतधारा” हे सोsहं चं दर्शन आहे. त्या “अमृतधारा”चे  रचयिता, सोsहंचे अनुभवी (श्रीस्वामींच्या आरतीत आहे नां - सोsहं-हंसारूढ) व सोsहं उपदेशकर्ता (जीवनभर श्रीस्वामींनी सोsहंचाच उपदेश केला - श्रीस्वामींच्या आठवणींचे  “स्मृतिसौरभ” हे पुस्तक पहावे) म्हणून श्रीस्वामी स्वरूपानंद यांना “सोsहं-हंसावतार” म्हणावं.
                                                                                                       
(२३.०४.२०१६)
क्रमश:
माधव रानडे.
ranadesuresh@gmail.com                                                            
९१९८२३३५६९५८

Friday, April 8, 2016

                          श्रीस्वामींच्या “ अमृतधारा ”
                                       भावार्थ-विवरण.(1)
                                     
श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या “ अमृतधारा ” या १६२ साक्यांच्या संग्रहाला “ दिव्यामृतधारा ” ( श्री संत बाबा महाराज आर्वीकर यांच्या ग्रंथाशी याचा संदर्भ नाही ) म्हणावं लागेल एका वेगळ्या अर्थानं. कारण त्याला दिव्यत्वाचा स्पर्श आहे. “आत्म्याची काळोखी रात्र ” Dark Night of The Soul या अग्निदिव्याचा अनुभव घेतल्यानंतरच्या, दिव्य स्फुरणातून, उमटलेले हुंकार आहेत हे.
श्री स्वामींना इ.स. १९३४-३५ नंतरच्या पुढील ४० वर्षात त्यांच्या मार्फत होणार्या त्यांच्या अवतार कार्याचे संकेत या संग्रहाच्या लेखन काळात मिळालेले व त्यांनी अनेक साक्यां मधून स्पष्ट होते. निःसीम भक्ताला असे दिव्य संदेश मिळाल्याची उदाहरणं आहेत.  
मात्र ही केवळ “ नोस्त्रादमास ” सारख्यांनी केलेल्या भाविष्यवाणी सारखी नाही, तर एका आत्मज्ञ, योगिवर भक्ताने पुढील ४० वर्षात उलगडणाऱ्या नाट्याची, स्वहस्ते लिहिलेली संहिता आहे. नाट्य लिहिण्याचे कारण असं की श्री स्वामीच म्हणतात “ नटलो मी परि तुझाच कामी त्या होता ना हात ” (अ. धा. ५०) किंवा “ मजसि ह्या जगद-रंगभूमिवर जसें दिले त्वां सोंग ” (अ. धा. ५१) इ.
श्री स्वामींच्या वरील साक्या  आपण केवळ माध्यम असल्याची जाण आणि भान सतत असणार्या जगन्माउलीच्या  एका निःसीम भक्ताच्या आहेत.  १६३२ ते १६७७ मध्ये होऊन गेलेल्या  Baruch Spinoza या  Dutch philosopher च्या पुढील उद्गारांची आठवण करून देणाऱ्या आहेत. “ We are both actors and spectators in this drama of existence / Universe ”
इतर सर्व दैवी गुणांबरोबरच कमालीचा विनय, लीनता, अनाग्रही वृत्ती व अमानित्त्वाच्या मूर्तिमंत पुतळ्याने भविष्यातील घटनांच्या आधीच लिहिलेलं हे आत्मवृत्त पराकोटीच्या संयमी स्वभावामुळे,  “ “आधी केले मग सांगितले” या न्यायाने, कटाक्षाने प्रकाशांत आणल नाही, येऊ दिले नाही.   
श्री स्वामी यांचे चरित्र व साहित्य या बाबतच्या  माझ्या चिंतन- विचारांना मी माझ्या या Blog वरील लेखांद्वारे २००७ पासून, गुरुसेवेच्या दृष्टीने, माझा खारीचा वाटा म्हणून प्रकट करतआलो आहे.
या विषयावरील, स्वतःचे वैयक्तिक विचार स्वतंत्रपणे प्रकट करण्यासाठी, व देश परदेशांतील जास्तीत जास्त वाचकांपर्यंत श्री स्वामींनी त्यांच्या साहित्यांतून साध्या, सोप्या व प्रचलित मराठीतून विशद केलेलं गीता व ज्ञानेश्वरीचं अद्वैत तत्वज्ञान, पोचविण्याचं एक प्रभावी व्यासपीठ म्हणून मी या माध्यमा चा उपयोग करत आहे, व श्री स्वामीकृपेन तसं होतांना पहायलाही मिळतंय.          
“ Be a gentleman and God is yours for sure " या “ अमृतधारा ” मधील साकी क्र. ९६ व ९७ वर डिसेंबर २००९ मध्ये इंग्रजीत लिहिलेल्या एका स्वतंत्र लेखात तसेंच, " अभंग- ज्ञानेश्वरी(य) ” ( एक ईश्वरी संकल्प) या १५/०८/२०१४ ला लिहिलेल्या लेखात मी  " अमृतधारा " चा उल्लेख मोघमपणे केला आहे.
पण यावेळी या संग्रहाबद्दल श्री स्वामी प्रेरणेने एक वेगळा विचार मनांत आला, तो व्यक्त करण्याचा मानस आहे. माझे प्रेरणास्थान,अर्थातच माझी गुरुमाउली स्वामी स्वरूपानंदच आहेत.
श्री स्वामींची तपोभूमी, “अनंत -निवास”, हे पांवस येथील देसाई कुटुंबाचं निवास स्थान, हे माझ्या आईचं, सौ.रमाबाई (बनुताई) रानडे हिचं माहेर, ओघानं माझं आजोळ. श्री स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या त्या वास्तूंत, त्यांच्या आगमनानंतर,सुमारे ४ll वर्षांनंतर माझा जन्म झाला.
             “ हेचि पुण्यफळ l लाधलो सकळ  l जन्मोनि केवळ l त्या वास्तूत ll  
यामुळे मला समजायला लागल्यापासून तर १९६८ पर्यंत “आप्पा ” म्हणून, १९६८ साली मला लाभलेल्या सांप्रदायिक अनुग्रहानंतर, “गुरु तोचि देव” या भावनेतून साकारलेल्या सगुण ब्रम्हरूपांत, तर १५ ओगस्ट १९७४ ला श्री स्वामींच्या समाधीनंतर आजतागायत चैतन्यरूप निर्गुण ब्रह्मरूपाने अशा तिहेरी सहवासाचा लाभ मला मिळाला.
चैतन्यस्वरुप श्रीस्वामींच्या सहवासाला तर देश-स्थल-काल या कशाचंच बंधन नसल्याने तो तर  नित्याचाच झाला आहे आतां.
खरं तर श्री स्वामींच्या समाधीनंतर मनाला सतत रुखरुख होती की आतां त्यांचं दर्शन, सहवास, उपदेश या सर्वांला आपण मुकलो. पण श्री स्वामींच्या समाधीनंतर एका स्वामिभक्ताबरोबरील त्यांच्या सोsहं साधनेसंबंधातील प्रश्न-उत्तराने शंका दूर केली.  
प्रश्न होता की प्रत्यक्ष दर्शन केंव्हा होतं? अन स्वामींनी उत्तर दिलं होतं की सान्निध्याची जाणीव हे दर्शनच नव्हे काय ? क्षणभर होणार्या बाह्य दर्शनापेक्षा अंतरी होणारे हे दर्शन जास्त वेळ टिकते. रोज होते.
मला स्वतःला आलेल्या अनेक अनुभवांनी मला त्याची खात्री पटली व त्याचं टिपण ”जेथे जातो तेथे”
या १५ डिसेंबर १९८१ रोजी  “गायत्री” प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या मझ्या पुस्तकात आहे. या माझ्या पुस्तकाच्या हस्तलिखिताचे पहिले वाचक होते माझे मामा वै. र. वा. ऊर्फ भाऊराव देसाई. पुस्तकाला प्रस्तावना मराठीतील सिद्धहस्त, “अमृतसिद्धी” या श्री स्वामींच्या चरित्रात्मक कादंबरिच्या प्रसिद्ध  लेखिका श्रीमती मृणालिनी जोशी यांची आहे.  
हे सर्व लिहिण्याचं कारण की, आज जवळ जवळ ३४ वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २७ जाने २०१६ ला “ स्नेहल प्रकाशन ” पुणे यांचे तर्फे प्रसिद्ध झाली. यामागील कारण मी ह्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत दिले आहे.               
" अमृतधारा " या संग्रहातील सर्व १६२ साक्यांचं लिखाण २७ नोव्हें १९३४ ते ७ मार्च १९३५ या १०१ दिवसांच्या कालावधीत घडलेलं आहे. श्री स्वामींनी इंग्रजी मध्ये लिहिलेली दोन कडवीही  
Nourished by the Nectar of thy Knowledge, Clad in the Robe of Thy Love,
Before Thee I dance, O Mother, in the Temple of Eternity."  हे इंग्रजीतील कडवं २० मार्च ला तर या आधीची इंग्रजीतील दोन कडवी ७ मार्च १९३५ ला लिहिली.
मात्र या संग्रहाच्या प्रथमावृत्तीचं प्रकाशन शके १८८४ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच इ.स. १९६२ च्या जुलै महिन्यांत, अथवा त्या सुमाराला, सूर्यकांत विठ्ठल देवळेकर, बाजार पेठ, यांचे मार्फत झाल्याचे मला माझे मेहुणे व ज्येष्ठ गुरुबंधु श्री श्रीराम लिमये ( श्री स्वामींचे गुरुबंधु वै काकासाहेब लिमये यांचे चिरंजीव) यांचेकडून समजले.  
लेखनकाल व प्रकाशन काळ यामधील जवळ जवळ २७ वर्षांच्या मोठ्या अंतरालाची कारण मीमांसा, श्री स्वामींचे स्वभाव विशेष, व स्थायी भाव लक्षात घेतां व साकल्याने विचार करता त्यांच्याच पुढील १९७४ मधील उद्गारांत पाहायला मिळते. “ आज कालचे नहोच आम्ही, माउलिंनेच आम्हाला इथे पाठवलं दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं   ” ( स्वा.स्व.जी. पृ २८४ ) हे व साकी १५८-१५९ मधील शब्द    
१९३४-३५ ते १५ ऑगस्ट १९७४ मध्ये घडणारया अवतार कार्याची त्याच्या महानायाकाने स्वहस्ते आधीच लिहिलेली हि संहिता आहे. आणि या सार्याचे “ अनंत निवासातील ” कानाकोपरा, देसाई परिवारातील सर्व सदस्य,अनेक स्वामीभक्त साक्षीदार आहेत एव्हढंच नाही तर त्या नाट्यातील सवंगडी आहेत.
मला “ अमृतधारा ” अशी भावली म्हणून हे भावार्थ विवरण. २९ जून २००९ मध्ये मी सेवा मंडळाला “भावार्थ गीता प्रचार-प्रसार” निधी एकत्र / खर्च करण्यासाठी पत्राद्वारे प्रस्ताव पाठविला होता व निदान बाराव्या अध्यायाची सी डी काढण्याचा आग्रह केला होता व तशी एक सी डी बनली देखील. त्यामध्ये जागा असल्याने “ अमृतधारेतील ” काही साक्या घालण्याचे व निवेदन करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले होते. १६२ मधील फक्त ७५ निवडायच्या होत्या. खूप विचार करूनही काही सुचत नव्हते मग श्री स्वामींना शरण गेलो. त्यांनी सांगितलं की ते जर ९०३३ ज्ञाने च्या ओव्यांमधून १०९ काढू शकतात तर यात काय अवघड आहे ? व काम सोपं झाले. ७५ साक्या निवडल्या त्यांचा स्वामी प्रेरणेन क्रम बदलला व सी डी तयार देखील झाली. “अमृतधारेतील ” साक्यांची ही पहिली सी डी  त्यावेळी केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे “ अमृतधारा ” म्हणजे  एका जगन्मातेच्या भक्ताचा मातेबरोबरचा लडिवाळ संवाद, एका   साधकाच हृदगत, एका सिद्धाच स्वगत, एका जागृत भक्ताचं सोsहं संगीत, एका अमर्त्य आनंदयात्रीच मनोगत, एका जीवन्मुक्ताच आत्मवृत्त असं बरंच काही आहे.
कोणत्याही चित्रपटाला अथवा नाटकाला तो यशस्वी होण्यासाठी, एक सशक्त कथानक आवश्यक असतं.  त्याचा एक लेखक असतो. चित्रपट पडद्यावर व नाटक रंगभूमीवर येऊन ते लोकप्रिय होण्यासाठी त्याला, चांगल्या निर्माता व दिग्दर्शकाची, मिळालेली भूमिका उत्तम वठविणार्या सक्षम कलाकाराची, व लक्षवेधी शीर्षकाची आवश्यकता असते.
ह्या दृष्टीने श्री स्वामींच्या “ अमृतधारा ” या १६२ साक्यांच्या संग्रहाकडे, अवतार-नाट्याकडे /कार्याकडे  पाहिलं असतां मला असं वाटतं की या तीन अंकी नाटकाचं नांव आहे “ अभंग-ज्ञानेश्वरी (य) (एक ईश्वरी संकल्प ) ”, त्याचा पहिला अंक आहे “अभंग-ज्ञानेश्वरी”, दुसरा “अभंग-चांगदेव-पासष्टी” व तिसरा अंक आहे,  “अभंग-अमृतानुभव”. तिसर्या अंकाची पूर्तता / प्रकाशन, नाथशष्टी (फाल्गुन-वद्य ६) १८८४ म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे सुमारे मार्च १९६२ ला झाले व तिसरी घंटा वाजून पडदा उघडल्यावर, लगेचच काही दिवसांत,   “ अमृतधारा ” या संग्रहाच्या प्रथमावृत्तीचं प्रकाशन शके १८८४ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच इ.स. १९६२ च्या जुलै महिन्यांत, अथवा त्या सुमाराला,करायला श्री स्वामींनी संमति दिली.
या नाट्याची निर्माती व दिग्दर्शक साक्षात जगन्माउली आहे तर साहाय्यक निर्माता व दिग्दर्शक ज्ञानेश्वर माउली व श्री स्वामींची गुरुमाउली आहेत. “भावार्थ गीता” “संजीवनी-गाथा” ह्या रचना या नांदी आहेत.                  
नवीन वर्षाच्या प्रथम दिवशी, गुढी पाडव्याच्या दिवशी, सद्गुरु माउलीच्या साहित्य प्रचार-प्रसार सेवेची गुढी उभारण्याची मनापासून फार इच्छा होती ती घडल्याचा आनंद आहे.
“ असो, भक्ताचे मनोगत । पुरवितां श्रीसद्गुरु समर्थ । देवभक्त ऐसें द्वैत । दावोनी खेळत, स्वयें तोचि ।। ”   
ranadesuresh@gmail.com                                                              (स्वपमं ३७/५)
९१९८२३३५६९५८
                                                                                                 माधव रानडे.